२६.७ प्रशिक्षण
कुठलीही संस्था तिथं काम करणार्या माणसांमुळेच मोठी होते. बॅंकेच्याही लक्षात आलं की आपले हजारो कर्मचारीच बॅंकेला चांगलं किंवा वाईट बनवू शकतात. हे लक्षात घेऊन सर्व स्तरातील कर्मचार्यांची उत्पादकता वाढावी आणि बॅंकेच्या सामाजिक ध्येयांशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी बॅंकेने उत्तम तर्हेने रचलेले प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आणि अंमलातही आणले.
एसबीआयसारख्या प्रचंड संस्थेसाठी वरिष्ठ व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय मध्यम फळीतील व्यवस्थापकांना समजावून देणं गरजेचं होतं कारण तेच प्रत्यक्षकर्मी कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करत होते. शिवाय या मध्यम फळीतील अधिकार्यांना सारखं सारखं वरच्या लोकांवर मार्गदर्शनासाठी अवलंबून न राहाता स्वतःच पुढाकार घेऊन कृती कशी करायची हे शिकवणंही गरजेचं होतं. म्हणूनच पर्यवेक्षकीय आणि व्यवस्थापकीय व्यक्तींचा विकास हा बॅंकेने आपला एक महत्वाचा उपक्रम मानला होता. त्यासाठी बॅंकेने हैदराबाद येथे कर्मचारी प्रशिक्षण कॉलेज काढलं होतं आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिक प्रशिक्षण शाळाही (झोनल ट्रेनिंग स्कूल्स काढल्या होत्या. तसंच मध्यम फळीतील व्यवस्थापकांसाठी वारंवार परिसंवाद आणि छोटे अभ्यासक्रमही आयोजित केले जाऊ लागले होते. त्या ठिकाणी वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकही हजर राहात आणि तिथं मुक्तपणे अगदी विनासंकोच विचारांची देवाणघेवाण होत असे. आरबीआयचे बॅंकर्स ट्रेनिंग कॉलेज, हैदराबादेतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया आणि अन्य बिझिनेस मॅनेजमेंट संस्थांमधील प्रशिक्षण सुविधाही बॅंक आपल्या कर्मचार्यांसाठी उपलब्ध करून देत होती.