२६.१० ताजा कलम

१९८० मध्ये आय.जी पटेल आरबीआय गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी इंदिराजींना शिफारस केली की आपण आणखी काही खाजगी बॅंकांच्या गटाचं राष्ट्रीयीकरण करावं. या खाजगी बॅंकांवर देखरेख ठेवण्याची तसंच सामाजिक नियंत्रणाचे नियम आणि कायदा त्या पाळतात की नाही हे पाहाण्याची जबाबदारी आरबीआयवर होती. दरम्यान अनेक लहान लहान बॅंका आकार वाढून मोठ्या झाल्या होत्या आणि सल्ला-नियमांना बेदरकारपणे धुडकावून लावणार्‍या काही व्यक्तींच्या खाजगी मालकीचं संस्थानच बनल्या होत्या.  त्यांच्यावर देखरेख ठेवणं आरबीआयला दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं होतं. पटेलांच्या सुचनेनुसार इंदिराजींनी आणखी सहा बॅंकांचं राष्ट्रीयीकरण केलं. त्यापैकी एकीच्याही ठेवी २०० कोटी रूपयांपेक्षा कमी नव्हत्या. तेव्हाच्या पत्रकार परिषदेत इंदिराजींनी दावा केला असला की यामुळे समाजाच्या दुर्बल घटकांचा फायदा होईल तरी पटेलांच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत इंदिराजींना स्वतःलाच  राष्ट्रीयीकरण करण्याची तेवढी उमेद राहिली नव्हती त्यामुळेच बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या दुसर्‍या फेरीचा सगळा पुढाकार स्वतः पटेलांनाच घ्यावा लागला. बॅंकिंग वर्तुळातलं मत हेच होतं की राष्ट्रीय ध्येये साध्य करण्यासाठी सरकारी रणनीतीतली ही अत्यंत तर्कशुद्ध खेळी होती आणि  ती खूप काळापासून करायची राहिली होती.

 

डी. एन. घोष अर्थमंत्रालयात असताना त्यांनी राष्ट्रीयीकरणासंबंधित कायद्याचा मसुदा बनवण्यात मदत केली होती. तेच पुढे १९८५ मध्ये एसबीआयचे अध्यक्ष बनले. त्यांनी आठवण सांगितली आहे की जुलै, १९६९ मध्ये बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा अगदी एसबीआयसह अन्य कुठलीही बॅंक राष्ट्रीयीकरणाच्या मूळ तत्वाशी जोडली गेलेली नव्हती. ते लिहितात :

सुरुवातीच्या उत्साहानंतर सरकारमध्ये असलेल्या आम्हा लोकांना वाटू लागलं की ज्याचा  थांग लागत नाही अशा समुद्रात आम्ही आमची नाव लोटली आहे, आम्हाला बॅंकिंग उद्योगातली अशी कुणीतरी व्यक्ती निकडीने हवी होती जी आम्हाला त्यातून बाहेर काढील आणि आमची नावही सुरक्षितपणे वल्हवील. तेव्हा आम्ही तलवार यांच्याकडे गेलो. एसबीआयचे त्यापूर्वीचे सर्व गव्हर्नर सरकारमधून आले होते. त्यांनी बॅंकिंग विकासाच्या पैलूंशी बॅंकेला जोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती प्रगती खूपच धिमी, अडखळणारी होती आणि किंचित दिशाहीनही होती. तलवारांबद्दलही आमच्या मनात शंका होत्या, कारण ते इंपिरियल बॅंकेच्या काळात नियुक्त झालेले होते, बॅंकेच्या उच्चभ्रू अभिजनांच्या  आसर्‍याखाली त्यांची जडणघडण झाली होती, तरीही या नव्या संदर्भात ते आमच्या मदतीला येऊ शकतील का? असं आम्हाला वाटत होतं. परंतु तलवारांनी आम्हाला अपेश दिलं नाही. : त्यांनी ज्या तर्‍हेनं  स्टेट बॅंकेत चैतन्य आणलं, तिचा एवढा विस्तार घडवून आणला की बॅंकिंगच्या जागतिक इतिहासात अशा प्रकारचं दुसरं उदाहरण कुठे मिळणार नाही. ते करताना त्यांनी स्टेट बॅंकेचं वैशिष्ट्य असलेलं ‘ एकता आणि स्थैर्य’ अत्यंत काळजीपूर्वक जपलं हेही तेवढंच उल्लेखनीय म्हणता येईल.

घोष म्हणतात की मी तलवार यांच्या वारसदारांपैकी एक नसतो तर त्यांनी बॅंकेसाठी केवढं मोठं काम करून ठेवलं आहे त्याचं महत्व मला कदाचित कळलंही नसतं. ‘’ १९८५ मध्ये मी बॅंकेचं अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा खूपच अल्प काळात मला जाणवलं की त्यांनी उभारलेल्या भक्कम पायावरच मला वरची इमारत उभारायची आहे.’’