३०.६ अंडररायटिंग आणि मर्चंट बॅंकिंग सेवा

आयसीआयसीआयच्या निर्मितीमागील एक महत्वाचा घटक म्हणजे भारतात सक्रिय भांडवली बाजाराचा अभाव. खास करून नव्या समभागविक्रीसाठी तर हा अभाव फारच जाणवायचा.  नव्या समभागविक्रीच्या बाजारात आयसीआयसीआयची भूमिका केवळ चालू कंपन्यांच्या नव्या समभाग किंवा डिबेंचर्स विक्रीस अंडरराईट करण्यापुरतीच मर्यादित नव्हती तर नव्या कंपन्यांचे समभाग आणि रोखे प्रथमच बाजारात आणतानाही आयसीआयसीआय अंडरराईट करत होती. कामकाजाच्या पहिल्या पाच वर्षांत आयसीआयसीआयने ८.३० कोटी रूपयांचे समभाग आणि डिबेंचर्स अंडरराईट केले.ते अंडररायटिंगचं उत्तरदायीत्व पार पाडताना त्यांना २.०४ कोटी रूपयांचे समभाग आणि डिबेंचर्स विकत घ्यावे लागले.

गुंतवणूक बाजार उभारण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी अंडररायटिंग करणे हे विकास बॅंकांचे आवश्यक कार्य आहे. त्यात कितीही मोठी जोखीम असली, नवी समभागविक्री करणार्‍या कंपन्या मुख्यत्वेकरून उद्योगात प्रथमच पाऊल टाकणार्‍या उद्योजकांच्या असल्या तरीही विकास बॅंका ती जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत. जोखमीसोबत नफ्याचे आश्वासनही येते हे आयसीआयसीआयच्या कामकाजाकडे पाहिल्यावर आपल्याला कळून येईल. 

आयसीआयसीआयच्या ताब्यातील शेअर्सवर सरासरी वार्षिक उत्पन्न ४ टक्क्यांच्या आसपास येत होतं.  लाभांश आणि भांडवली नफा एकत्र बघता त्या गुंतवणुकीतून त्यांना ८ टक्क्यांच्या आसपास नफा मिळत होता. आयसीआयसीआयच्या अनुभवावरून दिसून येतं की अंडररायटिंग क्षेत्र बर्‍यापैकी नफा देणारं होतं. मात्र त्यासाठी शेअर बाजारावर जवळून लक्ष ठेवणं भाग होतं आणि समभागविक्रीचं सक्रिय धोरण नियमितपणे अंगिकारणं आवश्यक होतं. परंतु नव्या इश्शूच्या बाजारातली आयसीआयसीआयची भूमिका दिवसेंदिवस कमीकमी होत गेली. आयडीबीआत तिच्या निर्मितीपासून या क्षेत्रात महत्वाची भूमिका वठवत होती. आयएफसीआयसुद्धा नव्या इश्शूत खूपच रस घेत होती. तथापि, अंडररायटिंग हे आपल्या मुख्य कामांपैकी एक आहे हे गृहीतक आयसीआयसीआयने सोडलं नाही.

अंडररायटिंग हा मर्चंट बॅंकिंगचा एक भाग आहे असं आपण समजू शकतो. त्या दृष्टीने पाहाता आयसीआयसीआय अगदी सुरुवातीपासूनच मर्चंट बॅंकिंगची सेवा देऊ लागली होती परंतु १९७१-८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी आपली मर्चंट बॅंकिंग शाखा उभारली  आणि ते कॉर्पोरेट क्षेत्रास सल्लागार स्वरूपाच्या सेवा देऊ लागले. भारतात मर्चंट बॅंकिंग एजन्सी १९७१-८० च्या दशकात येऊ लागल्या. अशी एजन्सी उभारणारी पहिली बॅंक होती ग्रिंडलेज बॅंक. त्यांच्यामागोमाग आयसीआयसीआयनेही आपली एजन्सी उभारली. त्यानंतर असा कायदा झाला की ‘फेरा’ कंपन्यांनी भारतात समभागविक्री करून आपलं परदेशी भांडवल ४० टक्क्यांपर्यंत खाली आणावं तेव्हा मर्चंट बॅंकिंगमधील ज्ञानासाठी आणखी एक नवं क्षेत्र खुलं झालं. अशा प्रकारे आयसीआयसीआयने आपल्या मर्चंट बॅंकिंग सेवेच्या माध्यमातून भारतीयीकरणाच्या प्रक्रियेसही हातभार लावला.

आयसीआयसीआयने फिन्ले समूहासाठी खूपच मोठं व्यापारी (मर्चंडायझिंग) काम पाहिलं. ते आयसीआयसीआयच्या मर्चंट बॅंकिंग सेवेतील महत्वाचा टप्पा ठरलं. सुरुवातीच्या दिवसांत आयसीआयसीआय कंपन्यांतले समभाग विकत घेत होती, त्या कंपन्यांची बाजारातली समभाग विक्री अंडरराईट करत होती.  परदेशी चलनातील कर्जेही देऊ शकत होती. त्यामुळे या काळात आयसीआयसीआय प्रवाहाला वेगळी दिशा देऊ शकली. या दोन क्षेत्रांत आयसीआयसीआय संशोधक आणि प्रवर्तक ठरली. फिन्ले समूहाकडे सर्वाधिक चहाचे मळे होते, त्यांनी हे सर्व मळे एकाच कंपनीच्या छताखाली आणले आणि पारेखांनी टाटांचं मन वळवलं की आपण फिन्लेंसोबत भारतातील कामकाजात जॉईंट व्हेंचर (संयुक्त उपक्रम) सुरू करावे. त्यातूनच टाटा फिन्ले लि. ची निर्मिती झाली. (नंतर तिचं नाव टाटा टी लि. आणि सध्या टाटा ग्लोबल बिव्हरेजेस लि. असं झालं आहे.) स्टर्लिंग कंपन्यांच्या स्थानिकीकरणाचा हा एक मार्ग होता आणि टाटा फिन्ले हे साधन वापरून तो वापरण्यात आला. व्यवहार पुष्कळ मोठा आणि गुंतागुंतीचा होता, मुख्य म्हणजे या प्रकारचा पहिलाच होता.  त्यामुळे तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला तेव्हा पारेखांना खूप आनंद झाला. अर्थसंस्थांमध्ये आयसीआयसीआयने विकसित केलेलं आणखी एक संशोधन म्हणजे मध्यम मुदतीचं ‘पुरवठादार कर्ज’ (सप्लायर्स क्रेडिट) पुरवणे. यातूनही त्यांना चांगला धंदा मिळाला आणि मग तो आयसीआयसीआयच्या कामकाजाचा मोठा भाग बनला. 

१९६२ सालानंतरचा काळ आयसीआयसीआयच्या कामकाजातला एक नवा टप्पा ठरला.  औद्योगिक वाढ मंदावली होती त्यामुळे विकास बॅंक म्हणून आयसीआयसीआयच्या भूमिकेकडे सर्वांची नजर लागली होती. बर्‍याच कंपन्या आपली परतफेडीची बांधिलकी निभावू शकत नव्हत्या. तर काहींना आपले प्रकल्प पुरे करण्यासाठी पैशांची टंचाई जाणवू लागली होती. विकास बॅंक या नात्याने आयसीआयसीआय स्वतःची भूमिका निर्मिकाची आहे, नाशकाची नाही असं मानत होती म्हणून तिनं दूरगामी दृष्टिकोन अंगिकारला आणि तात्पुरत्या अडचणींनी मागे हटायचं नाही असं ठरवलं. तिने परतफेडीच्या जबाबदारीची नवीन सूची बनवली आणि कंपन्यांना गरजेप्रमाणे जास्तीचा वित्तपुरवठा केला. आयसीआयसीआयच्या भागधारकांनी वार्षिक सभांच्या वेळेस सूचना केल्या होत्या की आपण कर्जे द्यावीत परंतु शेअरबाजारातील वाईट परिस्थितीमुळ समभागविक्रीस अंडरराईट करू नये. तेव्हा भागधारकांना सांगण्यात आलं की अशाच प्रसंगी तर भांडवली बाजारांना विकास बॅंकांच्या पाठिंब्याची अधिक गरज असते.

त्या काळात समभागाच्या सार्वजनिक विक्रीला मिळणारा प्रतिसाद एवढा अल्प होता की जेव्हा आयसीआयसीआयने अशा विक्रींना अंडरराईट करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना माहिती होतं की आपल्यालाच त्या समभागांचा मोठा हिस्सा विकत घ्यावा लागेल. याच काळात जी. एल. मेहतांचे उपरोधिक बोल,’’ अंडररायटर्सच अंडरटेकर (उत्तर क्रिया करणारे) बनले आहेत’ हे फारच लोकप्रिय झाले होते. आयसीआयसीआय हे मोठ्या नावातील आद्याक्षरे घेऊन  बनवलेलं नावही बरेचदा विनोद, खोचून बोलणे आणि कोट्या करण्यास कारणीभूत होत होतं. मेहतांनी लिहिलं आहे की आयसीआयसीआयची स्थापना झाल्यावर आरबीआयमधील एका  बडबड्या माणसाने आयसीआयसीआयवर ते फारच अहंकारी म्हणजे स्वतःशिवाय काहीच न पाहाणारे (आय सी आय सी आय म्हणजे मी मलाच बघतो) असा आरोप केला होता. प्रा. जॉन केनेथ गालब्रेथ जेव्हा नवी दिल्ली येथे अमेरिकन राजदूत होते तेव्हा त्यांनी एकदा मेहतांना  म्हटलं होतं की आयसीआयसीआय काम चांगलं करत असली तरी मला तुमचं नाव ऐकून फ्रोझन क्रेडीट (आईस) ची आठवण येते. कदाचित सगळ्यात धमाल विनोद कुठला असेल तर १९६६ मध्ये मेहता फिलाडेल्फिया येथे गेले असताना एका बॅंकरने त्यांचं स्वागत केल्यावर म्हटलं, आपण अध्यक्ष आहात आयसीआयसीआयसी…. मला सांगा हं कुठे थांबू ते.’’  मेहता स्वतःही हजरजबाबीपणा आणि विनोदी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. आयसीआयसीआयबद्दल एकदा बोलताना त्यांना जाणवलं की या शब्दांत दोन ‘सी’ (समुद्र)आणि तीन आय (डोळे) आहेत. तेव्हा ते म्हणाले की दोन समुद्र याचा अर्थ एक पॅसिफिक महासागर (जागतिक बॅंक) आणि एक अरबी समुद्र (भारत) . तसंच प्रत्येक माणसाला २ डोळे असतात परंतु आयसीआयसीआयला मात्र तीन डोळे आहेत कारण ग्राहकाने कर्जफेड करण्यात चुकारपणा केला तर शिवशंकराप्रमाणे हा तिसरा डोळाही उघडू शकतो. 

१९६४ साली पारेखांनी पी.सी. भट्टाचार्यांची ऑफर स्वीकारली असती तर आयसीआयसीआयला पारेखांच्या सेवेला मुकावं लागलं असतं. तेव्हा भट्टाचार्य आरबीआयचे गव्हर्नर होते, त्यांना वाटत होतं की पारेखांनी आयडीबीआयचं प्रमुखपद स्वीकारावं. (म्हणजे प्रत्यक्षात त्यांना आरबीआयचं उपगव्हर्नरपदच मिळणार होतं.) भट्टाचार्य मेहतांकडे गेले आणि पारेखांना आयडीबीआयचे प्रमुख म्हणून आम्हाला द्या अशी विनंती केली. मेहतांनी ताबडतोब पारेखांना घरी बोलावून घेतलं आणि या प्रस्तावावर तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे असं सांगितलं. पारेखांना क्षणभर खूपच आनंद झाला परंतु एका क्षणाचाही अवसर न दवडता त्यांनी म्हटलं की दुसर्‍या ठिकाणच्या उच्च पदासाठीसुद्धा मला आयसीआयसीआय सोडण्याची इच्छा नाही कारण इथे मला काम केल्याचं खूप समाधान मिळतं. मग ते भट्टाचार्यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानून म्हणाले की मी आपली ऑफर मान्य करू शकत नाही. आपण एक सोन्यासारखी संधी दवडलीत असं त्यांच्या हितचिंतकांनी सांगूनही स्वतः पारेखांना या निर्णयाची कधीच खंत वाटली नाही.