२४.१ इंपिरियल बॅंक ऑफ इंडिया
जानेवारी १९२१ मध्ये जॉंईंट स्टॉक बॅंक या स्वरूपात प्रेसिडेन्सी बॅंक ऑफ बॉम्बे बेंगॉल आणि मद्रास या तीन बॅंकांचं एकत्रीकरण होऊन इंपिरियल बॅंक स्थापन झाली. या तिन्ही बॅंकांनी एकमेकींत हे सहकार्याचे संबंध निर्माण करण्यासाठी स्वतःहूनच पुढाकार घेतला होता. युद्ध काळात त्यांनी एकमेकींना केलेलं सहकार्य फायद्याचं ठरलं होतं तसंच लंडन क्लिअरिंग बॅंकांकडून होणार्या घुसखोरीचं दडपणही त्यांच्यावर होतं त्यामुळेच तर आपले हितसंबंध समान आहेत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. या नव्या बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. ख्रिसहोमनी एका समभागधारकास लिहिलेल्या पत्रात या एकत्रीकरणाची कारणं विशद केली होती. : ‘’तिन्ही बॅंकांचे हितसंबंध समान होते. एकत्रीकरणामुळे त्यांचे स्रोत आणि प्रतिष्ठा दोन्हीत भर पडली तसंच नव्या बॅंकेला संपूर्ण भारतभर बॅंकिंग सुविधांचा प्रसार करणे सुलभ होईल.’’ मात्र लंडनच्या बॅंकांकडून असलेल्या धोक्याबद्दल त्यांनी काहीच भाष्य केलं नाही हे नवल वाटण्यासारखंच होतं. त्याशिवाय जनमताचा रेटाही होताच कारण लोकांना वाटत होतं की या एकत्रीकरणामुळे देशभरात बॅंकिंग सुविधा निर्माण होण्यास मोठीच चालना मिळेल. त्याशिवाय सरकारी जमा स्वतःजवळ ठेवणार्या आणि त्यांचा वापर करून देशाची आर्थिक संरचना भक्कम करणार्या बॅंकेची गरज होतीच.