३०.७ कौशल्यनिर्मिती
विकासाचं क्षितिज सातत्याने विस्तारत असताना आयसीआयसीआयला केवळ कर्ज देण्यापुरतं मर्यादित काम करून समाधान मिळत नव्हतं. त्यांना सदैव माहिती होतं की खरा विकास बरेचदा दृश्य स्वरूपात दिसत नसतो. याच तत्वज्ञानाशी बांधिलकी मानल्याने सुरुवातीच्या वर्षांपासूनच आयसीआयसीआयचं लक्ष प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञानिक आणि व्यावसायिक कौशल्यांत सुधारणा करण्याकडे ओढलं गेलं. मग ते त्यांच्या कर्मचार्यांसाठी स्वतःच्या संस्थेतच दिलेलं (इन हाऊस) प्रशिक्षण असो की आपल्या मध्यम आणि वरिष्ठ फळीतील अधिकार्यांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणं असो. हे कौशल्य विकसित करण्यासाठी जमेल ते सगळं आयसीआयसीआयने केलं कारण दिवसेंदिवस गुंतागुंत वाढणारं कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी ते बहुमोलाचं ठरणार होतं.
आयसीआयसीआयने जनतेचं मतही वेगवेगळ्या प्रकारे माहिती करून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा यत्न केला. आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या तर्हेने ओळखण्यासाठी, त्यांच्याशी संवाद सुधारण्यासाठी आयसीआयसीआयने वार्तापरिषदा आयोजित केल्या. आयसीआयसीआयच्या या कृतीचं अनुकरण नंतर अन्य लोकांनीही केलं. यामुळे कर्जदार कर्जदात्यांच्या अधिक जवळ आले, आपल्या ग्राहकांच्या गरजा आणि अडचणी काय आहेत यांबद्दल अधिक चांगला अंदाज बांधता आला. त्याशिवाय आयसीआयसीआयने उद्योगातले तज्ञ, व्यावसायिक, अर्थतज्ञ, सरकारी अधिकारी यांनाही आमंत्रित केलं, त्यासाठी आयसीआयसीआयमध्ये प्राथमिक अभ्यास आणि लेखी माहिती जमवण्यात आली. उद्योगांच्या अनुभवामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळालं. आपल्या अनुभवांवर आधारित लेख आणि अभ्यास छापून प्रसारित करण्याची परंपराही त्यांनी प्रस्थापित केली.
आयसीआयसीआयने १९७० साली मद्रासमध्ये इन्स्टिट्युट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट ऍंड रिसर्च ही संस्था काढली. १९६५ साली त्यांनी संस्थेत वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला, त्यात आशिया आणि आफ्रिका येथील विकसनशील देशांतल्या २-२ सदस्यांना भारतात दोन महिने व्यतीत करण्यासाठी दर वर्षी बोलावण्यात येऊ लागले. तिथं त्यांना विकासात्मक वित्तपुरवठा (डेव्हलपमेंट फायनान्स) या विषयावरील व्यवस्थापकीय प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. जुनीजाणती विकास बॅंक या नात्याने आयसीआयसीआय भारतातील आणि विदेशांतील अन्य विकासबॅंकांशी संबंध वाढवण्यात अधिकाधिक रस घेऊ लागली. त्यांनी आशियातील विकास बॅंकाची एक प्रादेशिक परिषद २९ मार्च, १९६२ रोजी आयोजित केली. अशा प्रकारे आयोजित केलेली ही पहिलीच परिषद होती.
आयसीआयसीआयने लवकरच आघाडीची विकास बॅंक म्हणून कुणालाही हेवा वाटेल असं स्थान प्राप्त केलं. तिच्या कर्मचार्यांच्या उच्च गुणवत्तेला आता सर्वत्र मान्यता मिळाली. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जॉर्ज वूड्स यांनी आयसीआयसीआयला विनंती केली की आपण नाजयेरियातील विकास बॅंकेसाठी आपले कर्मचारी जेम्स राज यांना पाठवावे. त्याच प्रकारे आर. के. चारी यांना मलेशियन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बॅंकेत तर एम.सी शेट्टी यांना आशियन डेव्हलपमेंट बॅंकेत काही काळासाठी (डेप्युटेशनवर) पाठवण्यात आलं. या सर्व काळात जॉर्ज वूड्स आणि रॉबर्ट मॅक्नामारा भारतात आयसीआयसीआयशी चर्चा करण्यासाठी आले. त्याशिवाय आपल्या ग्राहकांशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आयसीआयसीआयनेही पुढाकार घेऊन वार्तासत्रे भरवली, त्या योगे त्यांना ग्राहकांच्या समस्या अधिक चांगल्या समजल्या तसंच प्रकल्पांना वित्त पुरवण्याचा निर्णय घेण्यासाठी कुठल्या घटकांचा आयसीआयसीआयवर प्रभाव पडतो ते ग्राहकांना कळलं.