३०.२ गगनविहारी आणि हसमुख
गोष्टी जशा घडत गेल्या ते आयसीआयसीआयच्या दृष्टीने सुदैवी ठरलं कारण गैरसमज होण्याचा खूप मोठा धोका मुळात होताच. मेहता-पारेख एकमेकांना ओळखत नव्हते, जनतेच्या दृष्टीने तर ते समान पातळीवरही नव्हते. मेहतांची पत्रकार, उद्योजक म्हणून मोठीच प्रतिष्ठा होती. सरकारी वर्तुळांत मान होता. ते नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि जकात आयोगाचे माजी अध्यक्ष होते, १९५८ च्या मध्यापर्यंत ते भारताचे वॉशिंग्टन येथे राजदूतही होते. पारेखांचंही चांगलं नाव होतं परंतु ते तुलनेने छोट्या व्यावसायिक वर्तुळात होतं. मात्र मेहता नाममात्र अर्धवेळ संचालक असले तरी त्यांना ‘कार्यकारी अधिकार्याचे अधिकार‘ देण्यात आले. त्यामुळे सरकार अस्वस्थ झालं कारण ते कंपनी कायद्याचं उल्लंघन होतं. कायद्यानुसार व्यवस्थापनाचे अधिकार महाव्यवस्थापकांकडे असायला हवे होते. म्हणून आयसीआयसीआयला सरकारला औपचारिक आश्वासन द्यावं लागलं की मेहता अर्धवेळ अध्यक्ष असून त्यांना दिलेल्या कार्यकारी अधिकारांत व्यवस्थापनाचे कुठलेही अधिकार नाहीत. ते अधिकार पूर्णतः व्यवस्थापकीय संचालकांकडे आहेत. तर इकडे जागतिक बॅंकेने विल्यम डायमंड यांना आयसीआयसीआयसोबत काम करायला पाठवलं होतं, त्यांनीही निरीक्षण नोंदवलं की अशा संदिग्ध परिस्थितीत झगडे होण्यासाठी भरपूर जागा होती.
डायमंडनी निरीक्षण नोंदवलं की,’’ परंतु त्यांच्यात वाद झाले नाहीत हे आयसीआयसीआयचं भाग्यच म्हटलं पाहिजे. मेहता आणि पारेख या दोघांची व्यक्तिमत्वे आणि बुद्धिमत्ता यांचं त्यात योगदान आहे. दोघेही आयसीआयसीआयच्या यशस्वीतेच्या ध्येयाने झपाटलेले होते, आपण एकमेकांना पूरक आहोत हे समजून घेण्याची समयसूचकताही त्यांच्यात होती. मेहता बहिर्मुख, चैतन्याने रसरसलेले होते, त्यांना राजकीय आणि नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून मार्ग कसा काढायचा ते माहिती होतं. लोकांशी संबंध जोपासण्यात ते उत्तम होते. परंतु आपल्याकडे पारेखांसारखं कंपन्यांचं सखोल ज्ञान आणि आर्थिक कौशल्य नाही हे त्यांना माहिती होतं. पारेख शांत आणि अंतर्मुख होते, त्यांनी मनात विचार आल्या आल्या आयुष्यात कधी पाऊल उचललं असेल असं मला वाटत नाही. एकदा मेहता माझ्या मुंबईच्या घरी आले असता मी रशियाला जाण्यासाठी म्हणून फरची हॅट विकत घेतली होती, ती त्यांनी डोक्यावर घालून विदुषकी चाळे केले, तेव्हा मी त्यांचा फोटो घेतला होता. पारेखांनी तसं वर्तन करून हास्य निर्माण केल्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मग तसा फोटोबिटो काढण्याची तर बातच सोडा. ‘’
आपण एकमेकांना पूरक आहोत हे मेहता आणि पारेखांनी ओळखलं होतं, त्यांचं एकमेकांशी चांगलं जमतही होतं. परंतु मेहता ‘बॉस’ होते यात काहीच संशय नव्हता. मेहता सर्व निर्णय प्रक्रियेत भाग घेत असले तरी संचालक मंडळ, सरकार, परदेशी नेते, प्रसार माध्यमे, उद्योग संघटना आणि सत्तेचा ढाचा अशासारख्या बाह्य बाबींवर अधिक करून लक्ष केंद्रीत करायचे तर पारेख आयसीआयसीआयच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवत होते: उदा. गुंतवणूक, प्रशासन इत्यादी. दोघेही धोरण आणि नवीन भरती यांच्या बाबतीत वैयक्तिक पुढाकार घेत होते परंतु सर्व महत्वाचे निर्णय एकमताने घेत होते. त्यामुळे काही काळ गेल्यावर त्यांच्यात आपुलकीचे स्नेहसंबंध निर्माण झाले. त्यामुळेच उच्चभ्रूंना शोभेशा घमेंडीने व्यवसाय न करणारं वातावरण आयसीआयसीआयमध्ये निर्माण झालं. ते लोकांना अनुभवासही येऊ लागलं.
पारेखांनी आयसीआयसीआयची अंतर्गत पत्रिका ‘स्वयम्’ मध्ये लिहिलं की ‘’ १९५८ मध्ये श्री. गगनविहारी मेहता आयसीआयसीआयचे अध्यक्ष बनले आणि मी महाव्यवस्थापक बनलो. आयसीआयसीआयची व्यवस्थापन तंत्रेही बदलली. नव्या व्यवस्थापनाच्या मदतीने आम्ही आयसीआयसीआयमध्ये नवं युगच आणलं. १९५९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेस नवीन उत्तेजन मिळालं.... आयसीआयसीआयचा व्यवसाय सालोसाल वाढू लागला, कर्मचारी संख्याही चौपट झाली. सक्षम आणि कर्तबगार कर्मचार्यांमुळे संपूर्ण समुहातच एकसुराने गीत सादर व्हावे तशी कामे होऊ लागली. ‘’
मेहतांनी संस्थेत एक प्रकारची अनौपचारिकताही आणली, जी पूर्वीच्या दिवसांत नव्हती. त्यांना कामे वाटून देण्याची सवय होती , तसंच ज्या गोष्टी करण्यास आपण सक्षम नाही त्या स्वतः करण्याच्या भरीस ते पडत नसत. त्यांच्या हाताखाली कर्मचार्यांतील नातेसंबंध सहज आणि ताणरहित बनले. जरी वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे आयसीआयसीआयशी थेट संबंध निर्माण झाले असले तरीही कामकाजात एखाद्या तरुण व्यक्तीने आणावा तसा उत्साह आणि तळमळ त्यांनी आणली. ते त्यांची कर्तव्ये गंभीरपणे पार पाडत होते, संस्थेत काय घडत आहे यावर बारीक नजर ठेवून होते. महत्वाचं म्हणजे त्यांनी कामात जोश आणला, ध्येयाची जाणीव आणली. त्यांच्यासोबत आयसीआयसीआयही हळूहळू कोषातून बाहेर आली आणि बहिर्मुख संस्था बनली.
जी. एल. मेहतांची कन्या आणि चरित्रकार अपर्णा बसूंनी लिहिलंय की ‘’ आम्ही ज्यांना हसमुखभाई म्हणत होतो ते पारेख आणि त्यांच्या पत्नी हिराबेन हे आमच्या कुटुंबातलेच झाले होते. हसमुखभाई खूप सौम्य स्वभावाचे, मितभाषी आणि विनयी होते, परंतु शेअर बाजार, गुंतवणूक याबद्दलचं त्यांचं ज्ञान अफाट होतं. ते अत्यंत प्रामाणिक होते. बापू त्यांना सर्वच बाबतींत विश्वासात घेत, त्यांच्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता, ते त्यांना आपला धाकटा भाऊच मानत.हसमुखभाईंनाही बापूंबद्दल खूप आत्मीयता आणि आदर होता. मरणशय्येवर असताना काही तास अगोदर बापूंनी ‘पारेखना बोलवा’ असं सांगितलं होतं.’ ते त्यांना पारेख अशीच हाक मारत.’
मेहतांखेरीज पारेखांनी विल्यम डायमंड यांच्याशीही खूप काळ टिकणारं नातं जोडलं. डायमंड यांना फक्त सल्लागार याच भूमिकेत पाठवण्याचा धोरणीपणा ब्लॅकनी दाखवला होता. तरीही ब्लिट्झ या साप्ताहिकाने चुकीची बातमी दिली होतीच की विल्यम डायमंड नामक अमेरिकन व्यक्तीस आयसीआयसीआयचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं आहे. डायमंड यांना आयसीआयसीआयने आपल्या परिवारात सामील करून घ्यावं आणि कंपनीच्या सर्व कामकाजात भाग घेण्याची संधी द्यावी अशी ब्लॅकची इच्छा होती. ही इच्छा फळास आली. मग सर्व धोरणात्मक निर्णयांत भाग घेणे आणि कर्मचार्यांसाठी वार्तासत्रे आयोजित करणे हे तर डायमंडनी केलंच परंतु आयसीआयसीआयने आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी उद्योग जगतास उद्देशून पहिलं परिपत्रक काढलं तेव्हा ते बनवण्यामागील चालतंबोलतं चैतन्य स्वतः डायमंड होते. डायमंड आणि पारेख यांचे सुरुवातीपासूनच सौहार्दाचे संबंध होते. पारेख आणि त्यांची पत्नी हिरा हे दोघं डायमंड आणि त्यांची पत्नी लोईस हिला आणायला विमानतळावर गेले होते आणि मग ते चौघेजण पारेखांच्या घरी आले होते. त्या काळात युनियन बॅंकेच्या अपोलो आणि दलाल स्ट्रीटच्या कोपर्यावरील इमारतीतील एक मजला आयसीआयसीआयच्या कचेरीसाठी भाड्याने घेतलेला होता. त्या मजल्यावर डायमंडची केबीन पारेखांच्या केबीनच्या बाजूलाच होती. दोघंजण तिथं दर दिवशी दोन ते तीन तास एकत्र घालवत. विशिष्ट प्रकारची कामकाज पद्धती, मूल्यमापन पद्धती, परदेशांतील विकास बॅंकांच्या पद्धती यासारख्या बर्याच मुद्द्यांवर पारेख डायमंडना प्रश्न विचारायचे.
थोड्याच आठवड्यांत डायमंडनी जागतिक बॅंकेस गोपनीय अहवाल पाठवला त्यात पारेख म्हणजे सुखद आश्चर्यच आहेत असं म्हटलं होतं. त्यांना अर्थक्षेत्रात ज्ञान होतंच परंतु शिवाय त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्या आणि माणसांच्या माहितीचा मोठा खजिनाच होता. ते भेटण्यास सहज उपलब्ध आणि मनमोकळ्या स्वभावाचे होते. डायमंडनी सुचवलं की जागतिक बॅंकेने त्यांना एकदा अमेरिकेत बोलवावं म्हणजे त्यांची अधिक चांगली ओळख होईल. डायमंड अशा पदावर होते जिथून ते आयसीआयसीआय आणि जागतिक बॅंकेतील त्यांचे वरिष्ठ या दोघांनाही सल्ला देऊ शकत होते. जागतिक बॅंक त्यांना पगार द्यायची परंतु बाकी सर्व खर्च आयसीआयसीआय देत होती. मेहता-पारेख जोडगोळी १९५९ च्या मध्यावर वॉशिंग्टनला बॅंकेच्या दुसर्या कर्जाबद्दल वाटाघाटी करायला गेली तेव्हा तिथं काय घडू शकेल याबद्दल डायमंडनी त्यांना सांगितलं आणि त्याच वेळेस या दोघांशी कुठल्या मुद्द्यांवर बोलायचं हेही त्यांनी जागतिक बॅंकेला सांगितलं होतं.
पारेख आणि डायमंड यांच्यातील मैत्री खूपच लवकर फुलली. १९५९ च्या अखेरीस डायमंड जोडपं श्रीलंकेला फिरायला गेलं तेव्हा पारेख उभयता त्यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर पुढल्या वर्षी आयसीआयसीआयच्या तिसर्या कर्जाच्या वाटाघाटींसाठी पारेख अमेरिकेला गेले तेव्हा सोबत त्यांची पत्नी होती. तेव्हा त्यांचं डायमंड दांपत्याने सहा आठवड्यांसाठी आतिथ्य केलं. पारेख आणि डायमंड यांनी एकत्र एक पुस्तक लिहायचंही ठरवलं होतं परंतु त्यातून ते प्रत्यक्षात उतरलं नाही. तथापि, पारेखांनी ‘द स्टोरी ऑफ अ डेव्हलपमेंट बॅंक, आयसीआयसीआय, १९५५- ७९’ हे आयसीआयसीआयवर पुस्तक लिहिलं तेव्हा त्याला डायमंडनी प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर डायमंड जोडपे १९८९ साली भारतात आले होते तेव्हा पारेखांना भेटले परंतु तेव्हा पारेखांच्या पूर्वीच्या व्यक्तिमत्वाची केवळ सावली शिल्लक राहिली होती. त्यांना तीन दशकांपूर्वी विमानतळावर भेटायला आलेला तो ताठ, हट्टाकट्टा माणूस आता उरला नव्हता.
जेम्स एस. राज यांनाही आयसीआयसीआयमध्ये मेहतांनी आणलं. पारेखांनंतर आयसीआयसीआयचे अध्यक्ष बनलेले राज आठवण सांगतात की ते १९५९ मध्ये भारतात परतले होते परंतु त्यांना नवी दिल्लीतील सचिवालयात प्रवेश करण्यात अडचण येत होती. त्यांना जणू स्टॉक एक्स्चेंजचे अतिरिक्त संचालक म्हणून मुंबईस तडीपारच करण्यात आलं होतं. तेव्हा मेहता आयसीआयसीआयच्या अध्यक्षपदी येऊन एक वर्ष होत आलं होतं. मेहता त्यांना म्हणाले,’’ तुम्ही ही पोलिसगिरी थांबवून काहीतरी उपयोगी काम हातात का घेत नाही? पारेखांची बढती झाल्याने आमच्याकडे उपमहाव्यवस्थापकाचं पद रिकामं आहे. तुम्हाला स्वारस्य असलं तर आम्ही तुमचा त्या पदासाठी विचार करू....’ राजना तेव्हा आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता कारण त्यांना बॅंकिंग किंवा विकासात्मक बॅंकिंग याबद्दल काहीच माहिती नव्हतं. परंतु मेहतांनी त्यांचे मुद्दे झटकून टाकले आणि काहीतरी नक्कीच मार्ग काढू असं त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे मार्ग निघाला आणि राज चक्क केवळ चार महिन्यांत आयसीआयसीआयचे उपमहाप्रंधक बनले. त्यानंतरचा काळ जीवनातला आनंदाचा काळ होता असं राजनी सांगितलं. ‘’ जी. एल. आणि एच.टी. पारेख यांच्या नेतृत्वाखाली नवीन संस्था उभारण्यात खूपच उत्साह वाटत होता. या दोघांची टीम कौतुकास्पद होती. त्या दोघांमधील उच्च गुणांमुळे सगळ्या कर्मचार्यांना ते हवेहवेसे वाटत. तिथलं आनंदी वातावरण आणि नवनव्या गोष्टी शिकण्याची उत्कंठा एवढी होती की आयसीआयसीआयमध्ये व्यतीत केलेली वर्षे आपण काम करतोय असं वाटलंच नाही.
त्यानंतर बर्याच वर्षांनी आयसीआयसीआयचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक फिरोझ मेंधोरा यांनीही आयसीआयसीआयच्या व्यवस्थापन शैलीत बदल झाल्याचं पुढीलप्रमाणे लिहिलं. ’’ पूर्वीच्या विकास बॅंका नफा मिळवणार्या असल्या तरी सेवाभावी संस्था होत्या. मी आयसीआयसीआयमध्ये सामील झालो तेव्हा ऐकलं होतं की आयसीआयसीआय ही संस्था थंड वृत्तीची- उच्चभ्रू लोकांची संस्था आहे: ती ठराविक ग्राहकांना धरून ठेवते, तिथलं वातावरण खूपच शिष्टाचारयुक्त आहे, ग्राहकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी घमेंड तिथल्या लोकांना असते. परंतु मी १९६० साली तिथं प्रवेश केला तेव्हा लक्षात आलं की ही प्रतिमा १९५८ सालच्या पूर्वीची आहे. कारण १९६० सालापर्यंत आयसीआयसीआय ही मानवी मूल्ये जपणारी, सहानुभूतीने वागणारी विकास बॅंक बनली होती. ती नवीन उद्योजकांना जोखीम घेण्यास उत्तेजन देत होती. हे परिवर्तन घडवून आणण्याचं श्रेय जी. एल. मेहता आणि एच. टी. पारेख या जोडीस जातं.’’ १९८४ साली एस. एस. नाडकर्णी हे आयसीआयसीआयचे सहावे अध्यक्ष बनले,नंतर ते आयडीबीआयचेही अध्यक्ष बनले, त्यांनी आठवण सांगितली आहे की ‘’ पारेखांनी केवळ बोलण्यातूनच नव्हे तर प्रत्यक्ष तसं वागून आमच्यात मूल्यसंस्कार रूजवले. उदारहृदयी आणि मानवी घटक लक्षात घेणारी अशी त्यांची व्यवस्थापन शैली होती. ‘’ समोरच्या आव्हानांना तोंड देताना आपल्याला समविचारी व्यावसायिक कर्मचारीगटाची गरज आहे याची पारेखांना जाणीव होती. ‘’ त्यांना नोकरशाहीचं अवडंबर नसलेली, मैत्रीपूर्ण, मदतीस तत्पर अशी सुयोग्य सार्वजनिक प्रतिमा जपता जपता विकासात्मक संस्थेचं व्यवस्थापन करायचं होतं त्यामुळे त्यांना तसाच कार्यकुशल कर्मचारीवृंद हवा होता. हा कर्मचारीवृंद नवउद्योजकांना सेवा देण्यास, त्यांना आकर्षित करण्यास आणि उत्तेजन देण्यास इच्छुक असायला हवा होता आणि वाजवी जोखीम पत्करण्यास सिद्धही असायला हवा होता. आयसीआयसीआयलl भारतीय उद्योजक समुहाने लौकरच स्वीकारलं, सरकारकडूनही तिला मान्यता मिळाली एवढंच नव्हे तर जागतिक बॅंकेसाठीही अन्य जगासमोर ठेवण्याचं ती उदाहरणच बनली. नाडकर्णी म्हणतात की ‘व्हेंचर कॅपिटल’ ही संकल्पना सर्वतोमुखी होण्यापूर्वी बराच काळ आधीपासूनच एच. टी. पारेख नवउद्योजकांना वित्त पुरवठा करण्याच्या बाजूने होते.