२७.१ तलवारांची वर्षे- १९६९- ७६

आर. के. तलवार मार्च, १९६९ मध्ये एसबीआयचे अध्यक्ष बनले. याचा अर्थ,  १९६० च्या दशकाच्या अखेरीपासून ते १९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत  म्हणजे ज्या काळात  बॅंकिंग क्षेत्र आपल्या ‘क्लास बॅंकिंग’ च्या (अभिजन बॅंकिंगच्या) मूळ तत्वाशी फारकत घेऊन ‘मास बॅंकिंग’ च्या (सर्वसामान्यांच्या बॅंकिंगच्या) दिशेने निघाले होते त्या काळात तलवारांनी भारतातील बॅंकिंग क्षेत्रावर आपले अधिराज्य गाजवले असं म्हणता येईल. तलवारांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व चालतच यायचं त्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वाच्या ऐन बहराच्या काळात भारतीय बॅंकिंगचा ते चेहराच  होते असं म्हणता येईल. परंतु केवळ आपलं काम चांगलं जाणणारा एक बॅंकर एवढंच तलवारांचं व्यक्तिमत्व नव्हतं. ते सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात कारण त्यांनी बॅंकिंगला नैतिक आणि सत्यवादी पैलूही बहाल केला. त्यामुळेच आजही त्यांचं नाव बॅंकिंग वर्तुळात घेतलं जातं ते भीतीयुक्त आदरानेच घेतलं जातं. ते तत्वनिष्ठ बॅंकर होते. व्यावसायिकतेबरोबरच सचोटी आणि मूल्यनिष्ठेसाठीही प्रसिद्ध होते.

युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अणि तलवारांसोबत आयडीबीआयमध्ये काम केलेले  एस. ए. दवे म्हणतात की ‘’ तलवारांकडे उच्च दर्जाची व्यावसायिकता आणि महान नेतृत्वगुण होते. काही लोक उत्कृष्ट व्यावसायिक असतात तर काही उत्तम नेते असतात परंतु या दोन्हींचा संयोग एकाच ठिकाणी असणं फारच कठीण असतं. त्याशिवाय काही दूरदर्शी माणसांना लहानसहान तपशील बघत बसायला आवडत नसतं परंतु तलवारांचं तसं नव्हतं. त्यांना तपशीलवार विश्लेषण आवडत होतं. उलट त्यांच्या काळात  कर्जदाराच्या आर्थिक माहितीचा सखोल अभ्यास करणारे अन्य सहव्यवसायी खूपच थोडे होते परंतु तलवार त्या थोड्यांतले एक होते.

बॅंकेचा व्यवसाय-विस्तार करून त्यांनी तो कित्येक पटींनी तर वाढवलाच परंतु त्याशिवाय नवकल्पनायुक्त (इनोव्हेटिव्ह) बॅंकिंग, आजारी उद्योगांचं पुनर्वसन, ग्रामीण विकासासाठी वित्त योजना अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत बॅंकेने त्यांच्याच काळात पुढाकार घेतला. लघु उद्योगांच्या वित्तपुरवठा-प्रक्रियेत त्यांनी सुलभता आणली. छोट्या उद्योजकांसाठी, छोट्या व्यावसायिकांसाठी, शेतकर्‍यांसाठी नव्या योजनाही आणल्या. एन. वाघुल यांनी नोंद केली आहे की,’’ लघु उद्योग आणि शेती यांच्याप्रति आपली सामाजिक जबाबदारी आहे याबद्दल बॅंकेला जागृत करणं हेच तलवारांचं सर्वात महान योगदान होतं.’’

त्यांच्या मनात सदैव बॅंकेच्या भविष्याबद्दलचे विचार असायचे. सतत वाढत्या शाखांना बॅंक कशाप्रकारे निभावून नेईल? हा प्रश्न सदैव त्यांच्या मनात रुंजी घालत असल्यानेच सरतेशेवटी त्यांनी बॅंकेच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या संरचनात्मक (ऑर्गनायझेशनल) पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला होता आणि तो तडीसही नेला होता. अध्यक्ष या नात्याने तलवारांनी सदैव धोरणात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं आणि दैनंदिन कामकाज आपल्या व्यवस्थापकीय संचालकांवर सोडलं. तलवाराचं दुसरं महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी बॅंकेच्या निधीचा वापर सगळ्यात शेवटी कुठे होणार आहे ?( एंड यूज ऑफ फंड्स), तो योग्य होतोय ना हे पाहाणार्‍या यंत्रणा उभारल्या. तसंच आरबीआयने मोठ्या कर्जांबाबत पत-विश्लेषण करण्याचे नियम घालून दिले होते परंतु त्यापूर्वीच तलवारांनी कंपन्यांच्या ताळेबंदांचे सखोल विश्लेषण सुरू केलं होतं. ‘ग्राहक राजा असतो’ यावरही तलवारांची श्रद्धा होती म्हणूनच १९७५ मध्ये बॅंकांतील ग्राहकसेवा-समस्यांचा अभ्यास करणारा एक कार्यकारी गट नेमण्यात आला त्याचं प्रमुखपद तलवारांनाच देण्यात आलं होतं. त्या गटाचा अंतरिम अहवाल ऑगस्ट, १९७५ मध्ये सादर करण्यात आला परंतु अंतिम अहवाल तलवार पाठवू शकले नाहीत कारण त्यांनी बॅंकेतून वेळेआधीच राजीनामा दिला. त्याची कहाणी या प्रकरणाच्या नंतरच्या भागात आपण बघणार आहोत. 

एसबीआयचा बहुखंडीय इतिहास, तसंच कार्यकालीन आठवणी लिहून ठेवण्याचे मोठ्या परिश्रमाचे कार्य तलवारांमुळेच शक्य झालं कारण बॅंकर म्हणून उत्तम कौशल्य असलेल्या तलवारांना इतिहासाबद्दलही तेवढीच ओढ होती म्हणूनच त्यांनी १९७५ साली अर्थ खात्यातील डी. एन . घोष यांना ‘आम्हाला बॅंकेचा इतिहास लिहिण्यासाठी सुयोग्य व्यक्ती द्या’’ अशी विनंती केली होती. तेव्हा घोषनी प्रा. भाबतोष दत्तांचा सल्ला घेतला असता त्यांनी अमीय कुमार बागची यांचं नाव सुचवलं. आरबीआयचा पहिला इतिहास लिहिला गेला तेव्हा दत्ता त्या संबंधित मार्गदर्शन समितीचे सदस्य होते. बागचींनी स्टेट बॅंकेचा इतिहास लिहायचं मान्य केलं खरं परंतु अट घातली की माझ्याकडे  एकट्याकडेच संपूर्ण जबाबदारी असेल.  कुठल्याही मार्गदर्शन समितीची भुणभुण मला नको आहे. तेव्हा बॅंकेने तलवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सर्व सहाय्य पुरवलं आणि बागचींनी या इतिहासाचे चार खंड लिहिले. ( पहिला खंड प्रेसिडेन्सी बॅंका आणि भारतीय अर्थव्यवस्था – १८७६- १९१४ असा दोन भागांत होता तर दुसरा खंड इतिहासाचा अधिकृत खंड असा होता). परंतु  बागचींनी १९९९ मध्ये बॅंकेशी संबंध तोडून टाकले कारण तिसरा खंड इंपिरियल बॅंकेवर होता, त्या खंडातील माहितीची व्याप्ती आणि तो कधी प्रकाशित व्हावा या तारखेबद्दल त्यांचे व्यवस्थापनाशी मतभेद विकोपाला गेले. तेव्हा ते काम बागचींचे त्या इतिहास प्रकल्पातील शिष्य आणि बागचींच्या कामात सामील होणारे पहिले एसबीआय अधिकारी अभिक रे यांनी पूर्ण केले. रे यांनी एसबीआय इतिहासाचा चौथा खंडही लिहिला- त्या खंडात १९५५ ते १९८० हा काळ घेण्यात आला आहे.

तलवार सात वर्षे बॅंकेचे अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी बॅंकेच्या कामकाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. केवळ थोड्या पानांच्या परिघात त्यांच्या सर्व योगदानांची माहिती देणं अशक्य असलं तरी त्यांचा स्वाद नमुन्यादाखल तरी नक्कीच चाखायला मिळेल.