प्रस्तावना (खंड तिसरा)

‘’ माझे शाखाप्रमुख मला सापडत नाहीयेत. त्यांना शोधायला मदत हवीये मला’’ हे वाक्य स्टेट बॅंकेचे अध्यक्ष राज कुमार तलवार यांनी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक ईश्वर दयाल यांना उद्देशून जवळजवळ चार दशकांपूर्वी उच्चारलं होतं. स्टेट बॅंकेला तलवार यांच्याइतका सक्षम अध्यक्ष आत्तापर्यंत अन्य कुणीही लाभलेला नाही हे निर्विवाद मान्य व्हावे. ते संभाषण झालं तेव्हा स्टेट बॅंकेच्या शाखा आणि कचेर्‍या विपुल प्रमाणात निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाकाय बनलेली बँक अकार्यक्षम झाली होती. जास्तीच्या कामाचा बोजा हाताळायला काही नवीन विभाग आणि उपविभाग वाढवलेले असले तरी बॅंकेची संरचना आणि कामकाजाची पद्धत यांचा वारसा त्यांना इंपिरियल बॅंकेकडूनच मिळालेला होता. अगदी मोजक्याच शब्दांत तलवारांनी अत्यंत सोप्या तरीही सर्व काही व्यक्त करणार्‍या भाषेत बॅंकेच्या शाखांचं प्रशासकीय दूरत्व व्यक्त केलं होतं. एका प्रचंड मोठ्या, सतत वाढत्या संस्थेमधील वरिष्ठ व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे गट यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करणं ही त्या काळातली अत्यंत महत्वाची गरज होती.

शाखांचा वेगाने विस्तार केल्यामुळे शाखाप्रमुख पदावर कनिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने भरती करणे गरजेचे झाले होते. हे एजंट्स देशभरात सर्वत्र पसरलेले होते आणि त्यांचा बॅंकेच्या मुख्यालयाशी संपर्क जवळजवळ तुटल्यातच जमा होता. यामुळे नियंत्रण आणि देखरेखीच्या समस्या उद्भवत होत्या. मुख्य कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन देणं अशक्यच झालं होतं. त्यामुळे १९६० च्या दशकाच्या अखेरीस  एका वरिष्ठ व्यवस्थापकांच्या बैठकीत तलवारांनी ‘ माझे शाखा व्यवस्थापक हरवले आहेत’ असं म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. मार्च, १९६९ मध्ये बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी हाती धुरा घेतली त्यानंतर  एक वर्षाच्या आतच त्यांनी ठरवलं होतं की याबद्दल काहीतरी उपाय योजायलाच हवेत. म्हणूनच त्यांनी अहमदाबादेतील आय. आय. एम. संस्थेतील सल्लागारांना बोलावून ‘मला माझ्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क ठेवायला मदत करा’ अशी विनंती केली होती. बॅंकेची पुनर्रचना हा तलवारांच्या शिरपेचातील सर्वात मोठा आणि तेजस्वी असा मानाचा तुरा असला तरी तो केवळ एकमेव तुरा नाही हे नमूद केलंच पाहिजे. बॅंकेचं असं एकही क्षेत्र नाही जिथं त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला नसेल. त्यामुळे त्यांच्याबाबतीत म्हणायचं तर त्यांच्या  शिरपेचात दोन चार पिसं नसून तो विविध पिसांनी नटलेला आहे असं म्हणावं लागेल.

राज कुमार तलवार हे आरके तलवार म्हणूनच ओळखले जायचे. त्यांचा जन्म ३ जुलै, १९२२ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या झेलम, पंजाब या ठिकाणी झाला. डी. जे. सिंद कॉलेज (सध्याचे डी. जे. सायन्स कॉलेज, कराची )  येथून त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज, लाहोर येथून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तोपर्यंतच्या सर्वोच्च गुणांचं रेकॉर्ड तोडून ते वर्गात पहिले आले होते. त्या काळात करण्याची पुढली गोष्ट होती आयसीएस परीक्षेला बसणे. परंतु तलवारांचा पाश्चात्य संस्कृतीबद्दल खूपच मोठा पूर्वग्रह होता त्यामुळे त्या परीक्षेला बसायचं नाही असं त्यांनी ठरवलं. त्याशिवाय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणात घोडेस्वारी शिकावी लागली असती ते तर तलवारांना अजिबातच शिकायचं नव्हतं. त्या ऐवजी त्यांनी ठरवलं की आपण इंपिरियल बॅंकेत नोकरी धरून आपलं नशीब आजमावून पाहू. त्यांना मुलाखतीस बोलावण्यात आलं. लाहोर तेव्हा बंगाल सर्कलच्या हद्दीत येत असल्याने त्यांना कलकत्ता येथे मुलाखत देण्यास जावं लागलं.

मुलाखतीच्या एक दिवस अगोदर ते कलकत्त्याला पोचले, तेव्हा त्यांनी मुलाखतीस जायचं त्या ठिकाणचा प्राथमिक आढावा घ्यायचं ठरवलं. बॅंकेचे तत्कालीन सचिव आणि खजनिदार यांच्या कचेरीत ते पोचले तेव्हा तिथल्या शिपायानं त्यांना येण्याचं कारण विचारलं. तलवारांनी बॅंकेतील नोकरीसाठी उमेदवार म्हणून आपण आल्याचं सांगितलं तेव्हा शिपाई म्हणाला की आपल्याला फारच कमी संधी आहे कारण कौटुंबिक वशिल्याच्या लोकांचं पारडं नियुक्तीपत्रे पाठवताना जड भरतं.

परंतु त्यामुळे नाऊमेद न होता तलवार दुसर्‍या दिवशी मुलाखतीस गेले. त्यांचं शैक्षणिक रेकॉर्ड एवढं उत्तम होतं की त्यांची असामान्य अर्हता डावलणं बॅंकेला शक्यच झालं नाही. ते १९४३ मध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रूजू झाले आणि १९४६ मध्ये सेवेत कायम झाले. त्यांची पहिली नियुक्ती लाहोरला झाली आणि त्यानंतर थोड्याच वर्षांत त्या शहराला फाळणीच्या उग्र झळा बसल्या. दंगली शमण्याचं नाव घेईनात तेव्हा तलवारांनी त्यांच्या मुस्लिम मित्रांनी व्यवस्था करून दिलेल्या पाकिस्तानी लष्करी ट्रकमधून बायको-मुलाला भारतात पाठवलं. स्वतः तलवार आणि बॅंकेतील अन्य हिंदूंना बॅंकेच्या इमारतीतच आसरा घ्यावा लागला कारण बाहेर पडलं तर जीवाची शाश्वती नव्हती.  तलवारांनी नंतर आठवण सांगितली आहे की बॅंकेचे मुस्लिम पहारेकरी त्यांच्यासाठी अन्न घेऊन यायचे, त्यांना काय हवं नको ते पहायचे. त्यानंतर तलवारांनी बायको आणि मुलाला शोधण्यासाठी रजा मागितली तेव्हा  ब्रिटिश साहेबानं सांगितलं की तुम्ही लोकांनीच तर स्वातंत्र्य मागितलं आहे ना, आणि ते मिळालंय तुम्हाला,  मग आता कशाला रजा हवीये तुला?

फाळणीनंतर बायको-मुलाची पुनर्भेट झाल्यावर तलवार नवी दिल्लीला आले. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरानेच त्यांची कानपूरला नियुक्ती झाली. कानपूर येथे ११ दिवस काम केल्यावर त्यांची जमशेदपूरला बदली झाली. ही नियुक्तीही तात्पुरतीच ठरली कारण त्यानंतर तीन आठवड्यांतच म्हणजे १९४८ च्या प्रारंभी त्यांची नियुक्ती कलकत्ता येथे स्थानिक मुख्यालयातील (लोकल हेड ऑफिसातील किंवा एलएचओतील) शाखा विभागात (ब्रॅंच डिपार्टमेंटमध्ये )झाली. तलवार त्या आठवणी सांगताना म्हणाले की एलएचओतील वरिष्ठ लाहोरमधील जिल्हा व्यवस्थापकाला सांगायचे की लाहोरहून एक दोन सहाय्यक कलकत्त्याला पाठवा तेव्हा मलाही भीती वाटायची की अशीच आपलीही बदली परत होणार की काय? सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे वैतागून तलवार कलकत्ता येथील तत्कालीन सचिव आणि खजिनदार पुरी यांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की मला एका जागी कमीत कमी ६ महिने तरी ठेवा. त्यावर पुरींनी त्यांना सांगितलं की कलकत्त्याला होणार्‍या बदल्यांचं काम पूर्ण झालं की मगच मी तुमची विनंती ऐकू शकतो कारण इंपिरियल बॅंकेत आलेल्या ऑर्डरी निमूट स्वीकारायच्या असतात, त्याबद्दल बोलायचं नसतं. तलवारांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर त्यांना दीर्घकालीन स्थैर्य मिळालं कारण ते कलकत्ता येथे बारा वर्षांपेक्षा अधिक काळ राहिले.

तलवार शाखा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून आले होते. तिथं त्यांनी बरीच वर्षं तिथल्या प्रत्येक उपविभागाचं काम शिकण्यात व्यतीत केली. त्यानंतर सहाय्यक पर्यवेक्षक (असिस्टंट सुपरिंटेंडंट) पदावर आणि दोन वर्षांनी पर्यवेक्षक पदावर त्यांची बढती झाली. तलवारांनी कर्ज विभागात तीनहून जास्त वर्षे काम केलं. तिथं त्यांचे पर्यवेक्षक गुप्ता म्हणून होते ते काम करून घेण्यात खूपच कडक होते, बोलण्यातही तडकफडक होते. बॅंकिंगमधील खास करून कर्ज क्षेत्रातील बारकावे आत्मसात् करण्यासाठी तलवारांनी खूप कष्ट घेतले खरे परंतु त्यांच्याएवढा उत्तम अध्यक्ष स्टेट बॅंकेला मिळाला नाही असं म्हटलं जातं त्याच तलवारांनी कधीच बॅंकेच्या शाखेत काम केलेलं नव्हतं हे ऐकून कुणालाही आश्चर्यच वाटेल. तथापि, त्यांनी बॅंकेची पुनर्रचना करण्याचं कार्य हाती घेतलं त्यातून दिसून येतं की शाखा व्यवस्थापकांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं ते  तलवारांनाच अन्य शाखा व्यवस्थापक सहकार्‍यांपेक्षा अधिक माहिती होतं. तलवारांनी आठवण सांगितली आहे की मी कितीही मेहनत केली तरी गुप्तांच्या अपेक्षेस उतरू शकत नसे. परंतु तेव्हा जे अनुभव घेतले त्यांचं योगदान ‘आपण जे काही करायचं ते उत्तमच करायचं’ या माझ्या ध्येयात आणि पुढे पुढे बॅंकेत मी वरवर चढत गेलो त्या वाटचालीत भरपूरच आहे. म्हणूनच त्यांनी गुप्तांचं श्रेय मान्य करताना म्हटलं की,’’ तलवार या व्यक्तीस कलकत्ता येथे गुप्तांनी घडवलं.’’

तलवार स्टेट बॅंकेच्या बंगाल सर्कलचे शाखा पर्यवेक्षक (सुपरिंटेंडंट ऑफ ब्रांचेस)  आणि कर्ज- पर्यवेक्षक (सुपरिंटेंडंट ऑफ ऍडव्हान्सेस ) बनले, नंतर ते केंद्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील शाखांचे तपासनीसही बनले. १९६१ मध्ये त्यांना बंगाल सर्कलचे उपसचिव आणि खजीनदार हे पद मिळालं.  त्यानंतर वर्षभराने ते त्याच पदावर मद्रास सर्कलला नियुक्त झाले. तोपर्यंत कार्यक्षमता, सचोटी आणि व्यवसायनिष्ठा  (प्रोफेशनलिझम) या गुणांमुळे कुणालाही हेवा वाटावा  एवढी प्रतिष्ठा त्यांना मिळाली होती.

१९६५ मध्ये मद्रास सर्कलमधून हैदराबाद सर्कल वेगळं काढण्यात आलं तेव्हा तलवार हैदराबाद सर्कलचे पहिले सचिव आणि खजिनदार बनले. नवीन सर्कलचं कार्यालय उभारण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं. तलवार अध्यक्ष असताना एन. वाघुल त्यांचे खाजगी सचिव होते, (हेच वाघुल नंतर आयसीआय बॅंकेचे अध्यक्ष बनले. ) त्यांनी सांगितलं की ज्या तर्‍हेने तलवारांनी सर्कलचं नवीन कार्यालय उभारलं आणि काम करण्याचे मापदंड आणि आदर्श घालून ठेवले त्याबद्दल त्यांचे तेव्हाचे सहकारी आजही आदराने आणि अभिमानाने बोलतात. जानेवारी, १९६६ मध्ये तलवारांची नियुक्ती मुंबई सर्कलचे सचिव आणि खजिनदार म्हणून झाली. १ फेब्रुवारी, १९६८ रोजी त्यांची नियुक्ती स्टेट बॅंकेच्या दोन व्यवस्थापकीय संचालकांपैकी एका पदावर झाली तेव्हा ते पद भूषवणारी सर्वात तरुण व्यक्ती  तेच होते. त्यानंतर १ मार्च, १९६९ रोजी ते स्टेट बॅंकेचे अध्यक्ष बनले तेव्हा तर त्यांचं नेत्रदीपक यश कळसास पोचलं.  तेव्हाही त्या पदास भूषवणारे आणि स्टेट बॅंकेतल्या कनिष्ठ पदावरून वर चढत आलेले ते पहिले अध्यक्ष होते, तसंच वयाच्या केवळ ४७ व्या वर्षी ते स्थान मिळाल्याने ते तोपर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्षही होते.  

त्यांची कामगिरी उजवी होतीच परंतु त्यापेक्षाही त्यांचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांना सार्‍या जगाकडून मान्यता मिळाली. सरकार आणि आरबीआय दोन्हींकडे त्यांच्या मतांना मान होता, त्याशिवाय बॅंकिंग क्षेत्राचे प्रवक्ते म्हणून त्यांनाच मान्यता मिळालेली होती. सुरुवातीला त्यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी झाली असली तरी त्यांचा कार्यकाल १९७४ मध्ये आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. दुर्दैवाने त्यांचा दुसरा कार्यकाळ लवकर खंडित करण्यात आला कारण त्यांनी संजय गांधींचे ऐकण्यास नकार दिला.  त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाल संपण्यापूर्वीच ऑगस्ट, १९७६ मध्ये ते स्टेट बॅंकेतून बाहेर पडले. तेव्हा अर्थखात्यात काम करणार्‍या आणि पुढे १९८५ मध्ये एसबीआयचे अध्यक्ष बनलेल्या डी. एन. घोष यांनी म्हटलं की ज्या दिवशी तलवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी त्यांची प्रतिमा उंचावली. ‘’ माझ्या दृष्टीने तो त्यांच्या जीवनातला सर्वोच्च अभिमानाचा क्षण होता.’’

तलवार वृत्तीने अत्यंत आध्यात्मिक होते, त्यांची दैवी शक्तीवरील श्रद्धा अदम्य होती. ते पॉंडिचेरी येथील ऑरोबिंदो आणि मदर यांचे भक्त होते, तिथल्या आश्रमात भेट द्यायला बरेचदा जातही असत.  अध्यक्षपद गेल्यामुळे त्यांच्यावर फार काहीच परिणाम झाला नाही कारण त्यांना वाटत होतं की आपण दैवी शक्तीच्या इच्छा पूर्ण करणारं साधन आहोत. जे काही घडत असतं ते त्या शक्तीच्या इच्छेमुळेच घडत असतं. एन. वाघुल आठवण सांगतात की दैवी शक्तीवर एवढा अढळ विश्वास असलेली अन्य व्यक्ती माझ्या पाहाण्यात दुसरी नव्हती. त्यांना काढून टाकलं तेव्हा तलवारांच्या बर्‍याच मित्रांनी आणि प्रशंसकांनी त्यावर  नाराजी व्यक्त केली परंतु स्वतः तलवारांनी एका शब्दाने किंवा कृतीनेही त्या गोष्टीचा उल्लेख कधी केला नाही. अन्य गोष्टींप्रमाणेच याही बाबतीत त्यांचं चित्त शांतच राहिलं जे त्यांच्या गाढ आध्यात्मिकतेमुळेच शक्य झालं होतं. तलवार निवृत्त होऊन पत्नी शक्ती यांच्यासह  पॉंडिचेरीला राहायला गेले परंतु १९७९ मध्ये आयडिबीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांना पुन्हा बोलावण्यात आले. त्यानंतर सरकार आपल्या जागी दुसर्‍या कुणाला तरी नेमेल अश अफवा पसरल्यानंतर १९८० च्या अखेरीस त्यांनी  राजीनामाच दिला आणि ते पुन्हा पॉंडिचेरी येथे परतले. तिथली भाड्याची जागा त्यांनी तशीच ठेवलेली होती.  

निवृत्तीनंतरही ते काही थोड्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर राहिले परंतु त्यांनी बराचसा काळ शांतपणे मनन चिंतन करण्यात पॉंडिचेरीतील ऑरोबिंदो आश्रमात व्यतीत केला. शेवटल्या दिवसांत त्यांच्या रक्ताभिससरणात अडथळे निर्माण झाले होते तसंच विस्मृतीदोषही निर्माण झाला होता. वाघुल म्हणतात की मला आणि माझ्या स्टेट बॅंकेतील  एका माजी सहकार्‍याला  एकदा तलवारांना भेटायचं होतं परंतु त्यांनी आम्हाला नकार दिला. बहुदा आम्ही त्यांना ज्या स्वरूपात ओळखत होतो तीच त्यांची आठवण आमच्या मनात कायम राहावी असं त्यांना वाटत असावं. २३ एप्रिल, २००२ मध्ये म्हणजे त्यांच्या ८० व्या वाढदिवसास दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ असताना ते पॉंडिचेरी येथे निधन पावले.