३०.१ विकास बॅंक परिपक्व झाली तेव्हा
मेहता-पारेख जोडीने आयसीआयसीआयमध्ये नवं युग आणलं. याहून उत्तम भागीदारी आयसीआयसीआयला मागूनही मिळाली नसती. पारेख १९५८ मध्ये महाव्यवस्थापक बनले तेव्हा त्यांनी केवळ संचालक मंडळाचाच नव्हे तर ग्राहकांचाही पूर्ण पाठिंबा आणि विश्वास कमावला होता. विकासात्मक बॅंकिंगच्या नव्याने विकसित होऊ पाहाणार्या क्षेत्रात पाय टाकणारे मेहता पारेखांवर पूर्णतया नसले तरी बर्यापैकी अवलंबून होते. त्यांनी युजीन आर. ब्लॅक यांना लिहिताना मान्य केलं होतं की, ‘’पारेख प्रत्येकच बाबतीत उच्च श्रेणीतले वाटतात, महाव्यवस्थापक म्हणून त्यांची निवड झाली म्हणून मला खूप आनंद झाला आहे...’’ पारेखांची अर्थशास्त्रावरची मांड आणि दोन दशकांचा मुंबई शेअर बाजारातील अनुभव याबद्दलही त्यांनी लिहिलं. पारेखांना केवळ शेअरबाजाराचीच जाण नव्हती तर मोठ्या जॉइंट स्टॉक कंपन्यांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची आणि समस्यांचीही माहिती होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते केवळ आर्थिक पैलूचाच पगडा आपल्या निर्णयदृष्टीवर बसू देत नव्हते तर व्यापक आर्थिक संदर्भाने आर्थिक समस्यांचं मूल्पमापन करत होते.