२७.८ शाखा विस्तार

आपण मागच्याच प्रकरणात एसबीआयच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनांबद्दल पाहिलं आहे. १९६९ सालच्या सुरुवातीस म्हणजे तलवार अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या थोडंसंच आधी आखलेल्या दोन विस्तार योजना नवीन शाखा उघडण्याच्या लक्ष्यापासून अनुक्रमे १९ आणि ६० इतक्या संख्येने दूर होत्या. योग्य जागा न मिळणं हीच त्यातली मुख्य अडचण होती.  सरतेशेवटी ३२ नव्या शाखा या दोन योजनांखाली १९६९ मध्ये उघडण्यात आल्या तरीही अजून ४७ शाखा उघडायच्या राहिल्या होत्याच.

सरकार काही लक्ष्य कमी करण्यास तयार होईना त्यामुळे काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जून, १९७० अशी देण्यात आली. परंतु जून, १९७० च्या अखेरीस २४ शाखा उघडायच्या राहिल्याच.

१९७० मध्ये नव्या शाखा उघडण्यात मोठी झेप घेतली गेली. ४२५ नव्या शाखा उघडल्या गेल्या. त्यात २४६ शाखा ग्रामीण भागातल्या होत्या. बॅंकेची २००० वी शाखा नवी दिल्लीजवळ कांझावाला येथे नोव्हेंबर, १९७० मध्ये अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उघडण्यात आली. त्या प्रसंगी बोलताना तलवार म्हणाले की ‘’ आजमितीला बॅंकिंग व्यवस्था लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श करू इच्छिते आहे, पूर्वी कधी स्वप्नातही आलं नसेल एवढ्या गतीने तिला लोकांच्या अग्रक्रमाच्या गोष्टी आणि उद्दिष्टे यांच्या मदतीस यायचं आहे. या प्रक्रियेत आम्ही बॅंकेची २००० वी शाखा कांझावाला या ग्रामीण भागात उघडतो आहोत म्हणूनच हा टप्पा मला भूतकाळाचा आढावा घेण्याचा आणि भविष्याबद्दल चिंतन करण्याचा वाटतो.’’

शाखा विस्ताराचे काम १९७१ मध्ये निर्धारित गतीने चालूच राहिलं आणि एकूण ३६५ शाखा उघडण्यात आल्या. त्यापैकी २२९ अशा ठिकाणी होत्या जिथं यापूर्वी कुठलीही बॅंक नव्हतीच. अशा प्रकारे बॅंकेने दोन वर्षांत ७९० शाखा उघडल्या होत्या. तथापि या वेगवान विस्तारामुळे बॅंकेच्या मनुष्यबळावर काहीच्या काहीच ताण आला होता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची तीव्र टंचाई जाणवू लागली होती. त्यावेळेस निर्णय घेण्यात आला की भावी विस्ताराचा समन्वय अशा तर्‍हेने साधायचा ज्या योगे बॅंकेवर संरचनात्मक ताण सहन करता येईल असाच राहील.

ज्या ठिकाणी पूर्ण वेळ शाखा असण्याची गरज नव्हती परंतु तिथल्या ठेवी बॅंकिंग व्यवस्थेत आणता येण्यासारख्या होत्या अशा ठिकाणी १९७० साली बॅंकेने सॅटेलाईट शाखा उभारण्याचा प्रायोगिक तत्वावर प्रयत्न केला. १९७२ पर्यंत बॅंकेने ग्रामीण भागात अशा ४६ शाखा उघडल्या. तसंच १९७२-७३  मध्ये ६५० नवीन शाखा उघडण्याची बॅंकेची योजना होती परंतु शाखा उभारण्यासाठी आणि कर्मचार्‍यांना निवासस्थानांसाठी सुयोग्य जागा न मिळाल्याने त्यांना फक्त ५३१ च शाखा उघडता आल्या. १९७३ च्या अखेरीस बॅंकेच्या एकूण ३०१५ शाखा होत्या आणि त्यापैकी तीन चतुर्थांश शाखा ग्रामीण किंवा निमशहरी भागांत होत्या. डिसेंबर, १९७३ मध्ये ओरिसातील कोरापुट जिल्ह्यातील रायगड येथे बॅंकेने आपली ३००० वी शाखा उघडली.  १९७४-७६ या काळात शाखा विस्ताराचा वेग खूपच वाढला आणि योजनेत ठरल्यापेक्षाही जास्त शाखा उघडण्यात आल्या. १९७४ मध्ये लक्ष्य ३६८ असूनही बॅंकेने ३७५ शाखा उघडल्या तर १९७५ मध्ये ४१४ चं लक्ष्य असूनही बॅंकेने ४१९ शाखा उघडल्या तर १९७६ मध्ये ४३० चं लक्ष्य असूनही ४४३ शाखा उघडण्यात आल्या.