२७.४ कर्मचार्यांशी संबंध
तलवार कलकत्ता एलएचओमधील शाखा विभागात (ब्रांच डिपार्टमेंटमध्ये) पर्यवेक्षक (सुपरिंटेंडंट ) असताना त्यांना कर्मचार्यांना हाताळण्याच्या पहिल्या परीक्षेस तोंड द्यावं लागलं. कारण मुळातच कर्मचार्यांच्या पुष्कळ समस्या असल्यामुळे कलकत्ता हे ठिकाण काम करायला जिकिरीचं होतं. तेव्हा काय झालं की कर्मचारी संघटनांच्या ‘मंद गतीने’ काम करण्याच्या धोरणाचा कामावर गंभीर परिणाम होत होता. अधिकार्यांना भर रस्त्यावर मारहाण करण्याच्या अथवा अपमानित करण्याच्याही घटना घडत होत्या. यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे प्रसंगाला सरळ समोर जायला अधिकारी घाबरू लागले होते. तलवारांनी आपल्या कचेरीची पाहाणी केली तर तेव्हा कुणीही कामच करत नव्हतं तलवारांनी त्यांना सांगितलं की आपण काम सुरू करा, मी नंतर तुमची प्रगती पाहायला येतो. त्यानंतर ते त्यांच्या दालनात गेले तेव्हा चार वरिष्ठ युनियन नेत्यांनी त्यांना जोरदार शिवीगाळ सुरू केली. आणि ‘तुम्ही तुमच्या कामापुरतं बघा’’ म्हणून खडसावलं. थोड्या वेळात कलकत्त्यातील सगळ्या शाखांतले कर्मचारी एलएचओमध्ये जमले. तिथं त्यावेळी सचिव आणि खजिनदार अनुपस्थित असल्याने नेत्यांनी उपसचिवांची भेट घेऊन तलवारांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली. तलवारांनी उपसचिवांना सांगितलं की की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि जे परिणाम होतील ते भोगायलाही तयार आहे परंतु कृपया आपण मला कर्मचारी संघटनांची माफी मागण्याचा हुकुम देऊ नका. त्यानंतर झालं असं की तलवारांनी आपली भूमिका बदलली नाही आणि वरिष्ठांनीही त्यांना माफी मागायला सांगितली नाही. सरतेशेवटी युनियनवाले काहीच करू शकले नाहीत आणि काही तासांनी जमाव आला तसा निघून गेला.
तलवारांनी ते अध्यक्ष बनल्यावर घडलेला एक प्रसंगही सांगितला आहे. कलकत्त्यात संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आले असताना त्यांना कळलं की एका अमान्यताप्राप्त युनियनने ठरवलंय की जोपर्यंत तलवार आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तोवर त्यांना इमारतीतून बाहेर पडूच द्यायचं नाही. तेव्हा ‘बैठक वेळेआधी संपवायची’ सूचना तलवारांनी नाकारली. ते आणि बॅंकेचे सचिव-खजिनदार श्री. पी.सी.डी. नंबियार मुख्य रस्त्यावर आले तेव्हा अमान्यताप्राप्त युनियननी त्यांना घेराव घातला. दोघांनाही धक्काबुक्की झाली तेव्हा अमान्यताप्राप्त युनियनच्या अध्यक्षाने तलवारांना सांगितलं की बॅंकेचे अध्यक्ष या नात्याने आपण हस्तक्षेप करावा आणि या नंबियारांनी आमच्या काही मागण्या मान्य केल्या नाहीत त्या त्यांना मान्य करायला लावाव्या. तलवारांनी त्याबद्दल नंतर सांगितलं की मी काही केल्या वाकणार नाही हे कर्मचार्यांना माहिती होतं , तसंच त्या मागण्या पुर्या करणं किंवा न करणं हे नंबियार यांच्याच क्षमतेत आणि अधिकारात बसत होतं त्यामुळे त्यात आपण पडण्यामागे कुठलंच तार्किक कारण मला दिसत नव्हतं.’’ म्हणून पुन्हा पुन्हा मागणी होऊनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी शांत राहिले. घेराव तीन तास चालला आणि त्यानंतर कर्मचारी निघून गेले.
आणखीही एक प्रसंग अमान्यताप्राप्त युनियनच्या बाबतीतच घडलेला आहे. बॅंक ऑफ बिहार ही २८ शाखांची अनुसूचित बॅंक आर्थिक संकटात सापडली आणि नोव्हेंबर, १९६९ मध्ये सरकारच्या आदेशानुसार तिचं विलिनीकरण एसबीआयमध्ये करण्यात आलं. बॅंक ऑफ बिहारच्या पाटणा शाखेचं एसबीआय पाटणा शाखेत एकत्रीकरण झाल्यावर बॅंक ऑफ बिहारच्या कर्मचारी संघटनेची मान्यता नष्ट झाली. ही कर्मचारी संघटना उपद्रवी आहे हे सर्वांना माहिती होतं. त्या प्रसंगी तर त्यांनी एवढा गंभीर उपद्रव दिला की पाटण्यातील क्लिअरिंग हाऊस (एसबीआयने चालवलेलं) दीर्घ काळ बंदच राहिलं होतं.
हा पेचप्रसंग काही काळ चालूच राहिला, त्यामुळे अर्थमंत्री यशंवतराव चव्हाण यांचं लक्ष त्याकडे गेलं. त्यांना या प्रकरणी लवकर तड लागावी असं वाटलं. तेव्हा मग आरबीआयच्या गव्हर्नरांनी तलवारांशी बोलावं असं त्यांना सुचवण्यात आलं. तलवारांनी गव्हर्नरांना सांगितलं की फक्त मान्यताप्राप्त युनियनशीच बोलणी करण्याचं धोरण आहे. अमान्यताप्राप्त युनियनशी आम्ही काहीही व्यवहार केले तरी त्यामुळे मान्यताप्राप्त युनियन तातडीने कांगावा सुरू करील आणि परिस्थिती आणखीच चिघळेल. पण गव्हर्नरनी त्यांना सांगितलं की अर्थमंत्र्यांची इच्छा आहे की क्लिअरिंग ताबडतोब सुरू झालं पाहिजे आणि त्यांच्या सूचना तर आपल्याला मान्य करायलाच हव्यात. तलवारांनी त्यांना आपण तसं का करू शकत नाही हे सांगून म्हटलं की त्यामागची कारणं मी आपल्याला अगोदरच विदित केली आहेत.
त्यानंतर तलवार आपल्या कचेरीत गेले तेव्हा मनुष्यबळ विभागाचे प्रमुख त्यांची वाट पाहात होते. त्यांनी तलवारांना सांगितलं की कर्मचारी युनियनच्या अध्यक्षांनी कोंडी फोडण्यासाठी तलवारांना उद्देशून एक पत्र तयार केलं आहे. त्या पत्रात स्टाफ युनियनने तलवारांना आवाहन केलं होतं की आपण बॅंक ऑफ बिहारच्या कर्मचारी युनियनच्या मागण्या मान्य कराव्यात. कारण मान्यताप्राप्त कर्मचारी युनियनला माहिती होतं की तलवार तर काही झुकणार नाहीत. त्यामुळे एवढा असमान्य अध्यक्ष गमावण्यापेक्षा आपणच हा पेचप्रसंग सोडवण्यासाठी पुढे येऊ.
तलवारांनी आरबीआय गव्हर्नरना ते पत्र दाखवलं आणि सांगितलं पेचप्रसंग संपुष्टात आलेला आहे. तेव्हा आरबीआय गव्हर्नर म्हणाले की तलवार त्यांच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्षांचं ऐकतात परंतु अर्थमंत्र्यांच्या सूचना पार पाडायला मात्र नकार देतात हे फारच विनोदी आहे. दुसर्या दिवशी तलवार चव्हाणांना भेटले तेव्हा चव्हाण त्यांना म्हणाले की मी एखादी गोष्ट करण्याचा संकेत देत असतो तेव्हा ती लगेच केली पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. उत्तरादाखल तलवारांनी स्पष्टवक्तेपणाबद्दल माफी मागून म्हटलं की खरं तर असे संकेत कधीच दिले जाऊ नयेत. नंतर त्यांनी चव्हाणांना ते पत्र दाखवलं तेव्हा चव्हाण म्हणाले, ‘’ ही मुत्सद्दीपणाचीच कृती झाली तुमच्याकडून.’’ तलवारांनी नंतर सांगितलं की त्यानंतर अर्थमंत्री चव्हाण यांच्याकडून मला कधीही कसलीही सूचना आली नाही.
तलवारांना आणखी एका संपाला तोंड द्यावं लागलं. १९६९ साली म्हणजे अध्यक्ष झाल्या झाल्या लगेचच बॅंक अधिकार्यांनी हा संप केला होता. पर्यवेक्षकीय अधिकार्यांना मिळणार्या पगारांबद्दलचं असमाधान हे या संपामागील मुख्य कारण होतं. मुळात तलवार मुंबई सर्कलचे सचिव आणि खजिनदार असतानाच व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली या विषयाचा अभ्यास करणार्या त्रिसदस्य गटात सामील होते. त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन या अधिकाऱ्यांप्रति सहानुभूतीचा होता परंतु तत्कालीन अध्यक्ष पगारवाढीच्या मागणीस अनुकुल नव्हते. त्यानंतर तलवार स्वतः व्यवस्थापकीय संचालक बनले तेव्हाही त्यांनी अध्यक्षांकडे हा विषय काढला होता परंतु तेव्हा त्यांना अध्यक्षांनी सरळ सरळ झटकूनच टाकलं होतं. त्यामुळेच मार्च, १९६९ मध्ये बॅंकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यावर अवघ्या तीनच महिन्यात त्यांना ज्या विषयावर सहानुभूती वाटत होती त्याच विषयाला नेमकं भिडण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.
पगारवाढीच्या मागणीची तीव्रता वाढावी यासाठी अधिकारी संघटनेने मुंबई एल एचओमध्ये धीम्या गतीने काम करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे कामाचं नुकसान होऊ लागलं आणि सामान्य जनतेची गैरसोय होऊ लागली. आम्ही आमच्या युनियनचे आदेश पाळत आहोत हे कारण सांगून चार कनिष्ठ अधिकार्यांनी व्यवस्थापनाच्या आज्ञा मानायला नकार दिला तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यावर व्यवस्थापनाच्या अरेरावीच्या कृत्याबद्दल युनियनचे पदाधिकारी तलवारांकडे निषेध व्यक्त करायला आले आणि निलंबित अधिकार्यांना कामावर पुन्हा बोलावलं नाही तर आम्ही संपावर जाऊ अशी धमकी देऊ लागले. परंतु ते लोक चुकीच्या माणसाला धमकी देत होते. तलवारांनी त्यांना भीक घातली नाही उलट तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना कळवलं आणि अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू करण्यात त्यांची मदत मागितली. तसं केल्याने अत्यावश्यक बॅंकिंग सेवेवर परिणाम झाला नसता. मोरारजींनी त्यांना पूर्ण पाठिंब्याचं आश्वासन देऊन म्हटलं, ’’बॅंक सहा महिने बंद राहिली तरी चालेल, मला पर्वा नाही.’’
लवकरच सगळं काम ठप्प झालं आणि संप सगळ्याच सर्कल्समध्ये पसरला. तलवारांनी वृत्तपत्रांत जाहिराती देऊन व्यवस्थापनाची बाजू समजावून सांगितली तसंच बॅंकेच्या सर्व अधिकार्यांना व्यक्तिशः पत्रे पाठवली. त्यानंतर दोनच आठवड्यांत युनियनने हंगामी प्रस्ताव पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा व्यवस्थापनाच्या आदेशांचं स्थान युनियनच्या आदेशाच्या वरच असले पाहिजेत या आपल्या भूमिकेस तलवार चिकटून राहिले. त्यानंतर आणखी आठवड्याभरात संप मागे घेण्यात आला. कर्तव्य बजावत असताना आम्ही व्यवस्थापनाचे आदेश पाळू हे अधिकार्यांनी मान्य केलं तसंच व्यवस्थापनानेही त्यांना हमी दिली की आम्हीही अधिकार्यांवर द्वेषयुक्त कारवाई करणार नाही.
या संपकाळात घडलेली एक घटना उल्लेखनीय आहे. मुंबईशाखेतील रोकड विभागाची जबाबदारी असलेल्या अधिकार्याने स्ट्रॉंग रूममध्ये चावी देण्यास नकार दिला. हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं मानून व्यवस्थापनाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलं. परंतु कसं कोण जाणे त्याबद्दलची कृती करण्यास विलंब झाला. नंतर पुढे तलवारांनीही ठरवलं की त्या अधिकार्यावर गुन्हेगारी आरोप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्या प्रकरणात पुढे काही झालं नाही आणि थोड्याच काळात संपही संपला. परंतु अधिकार्यांचा पगारवाढीचा प्रश्न तसाच राहिला त्यामुळे तलवारांनी अधिकारी संघटनेशी सल्ला मसलत करून यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत बोलून हा प्रश्न धसास लावला.( तेव्हा मोरारजींच्या जागी यशवंतराव अर्थमंत्री बनले होते.) जेव्हा असोसिएशनचे पदाधिकारी चव्हाणांचे आभार मानायला गेले तेव्हा ते त्यांना म्हणाले, ‘’तुम्ही तुमच्या अधिकार्यांसाठी काय भांडाल? तुमच्यापेक्षा तुमच्या अध्यक्षांनीच तुमची बाजू अधिक चांगली मांडली.’
तथापि, तलवारांचे संबंध त्यांच्या स्वतःच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी बरेचदा तणावाचे राहिले. त्यांचे काही आवडीचे गट होते, त्यांच्याशी ते नेहमीच आत्मीयतेने वागायचे. बरेचदा हे सगळे कनिष्ठ अधिकारी असायचे आणि त्यांच्यात तलवारांना धडाडी दिसायची, त्यामुळे त्यांची जडणघडण करण्याची इच्छा त्यांना होत असे. वेगवान प्रगती करतील अशी संभाव्य शक्यता असणार्या अधिकार्यांत ते वैयक्तिक रस घ्यायचे, त्यांना चर्चा करण्यासाठी बोलवायचे. असं करताना बरेचदा त्यांच्या वरिष्ठांना त्यात डावललं जायचं. त्यामुळे पदाची उतरंड कठोरपणे मानणारे वरिष्ठ व्यवस्थापक अस्वस्थ व्हायचे. गुणवत्तेला हुडकून काढून तिचं संगोपन करण्याची तलवारांची क्षमता बॅंकेत प्रसिद्ध होती. वाघुलांच्या मते,’’ तलवाराचं करिष्माई व्यक्तिमत्व आणि भेटण्यास उपलब्ध असणं यामुळे बॅंकेतील तरुण अधिकारी त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे तसंच तलवारही त्यांना हवी असलेली गुणवैशिष्ट्ये एखाद्या माणसात दिसली तर तसाच प्रतिसाद द्यायचे.’’ एखाद्याला आपल्या पंखाखाली त्यांनी घेतलं तरी त्यांचं वडिलकीचं वागणं सूक्ष्म असे, ते कुठल्याही प्रकारे उपदेश करण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करत नसत. परंतु कधीकधी त्यांच्याही हातून चूक झालेली आहे. एकदा तर त्यांनी तुलनेने कनिष्ठ माणसाला पाठिंबा देऊन सर्वांसमक्ष म्हटलं होतं की ‘’माझ्यानंतर हा अध्यक्ष झालेला पहायला मला आवडेल,’’ तेव्हा त्यांच्या अन्य वरिष्ठ सहकार्यांच्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण झाली होती. आता हा अधिकारी सक्षम असला तरी अशाप्रकारे उंचावर घेऊन जाण्यासारखं त्याच्यात काही नव्हतं.