३०.८ एका युगाचा अंत

जी. एल. मेहता १९७३ साली निवृत्त झाले आणि एका युगाचा अंत झाला. त्यांच्यामागून पारेख अध्यक्षपदी बसले. हा शांतस्वभावी व्यावसायिक आत्तापर्यंत आयसीआयसीआयचा जनमानसातला प्रतिनिधी बनला होता. आयसीआयसीआयच्या संचालक मंडळाने ९ मे, १९७४ रोजी बोलावलेल्या बैठकीत ठराव संमत करून म्हटलं की मेहतांनी आमच्या कामकाजास एक हेतू आणि ध्येय दिलं त्यामुळेच आयसीआयसीआय  सुप्रतिष्ठित संस्था या पदापर्यंत जाऊ शकली. त्याशिवाय त्यांनी आयसीआयसीआयचं सौहार्दाचं नातं भारत सरकार, आरबीआय आणि अन्य अर्थसंस्था यांच्याशीही जोडलं. आयसीआयसीआयवरील आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील तिच्या योगदानावरील जागतिक बॅंकेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. परिणामतः आयसीआयसीआयला जागतिक बॅंकेकडून कर्जरूपी पाठिंबा सदैव मिळत राहिला. त्याशिवाय त्यांची वागण्यातली अनौपचारिकता आणि सहज उपलब्धता यांच्यामुळे त्यांना कर्मचार्‍यांकडूनही सदैव एकनिष्ठा आणि संपूर्ण सहकार्य प्राप्त झालं.

परंतु  वागण्यातील सौम्यता आणि तारतम्यभाव असूनही धंद्यातील वाटाघाटी करण्यात मात्र ते पक्के होते. जेम्स एस. राज यांनी आठवण सांगितली आहे की ‘’ नाही हे शब्दही दुसर्‍याला न दुखावता सांगणारा दुसरा माणूस मी पाहिला नाही.  आयसीआयसीआयसाठी जागतिक बॅंकेशी कर्जाच्या वाटाघाटी करायला त्यांच्यासोबत जाण्याची सुसंधी मला १९६३ साली मिळाली. तेव्हा टेबलाच्या समोरच्या बाजूला बसलेल्या  स्वागत समिती’ने त्यांना पेचात पकडण्यासाठी बरेच अडथळे उभारले होते परंतु ते त्यातून हुलकावणी देत सहजगतीने बाहेर पडले. मला नक्की आठवतं की अंतिम वाटाघाटींच्या वेळेस जी.एल. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जॉर्ज वूड्स यांना भेटले तेव्हा ती बैठक अवघ्या १२ मिनिटांत आटपली होती.’’ 

मेहतांना स्वतःलाही आयसीआयसीआयमधली आपली कारकीर्द ही अनुभवसमृद्ध करणारी वाटली होती. त्यांनी लिहिलंय की,’’ तथापि, कारकीर्दीच्या अखेरीस म्हणजे वयाच्या ५८ व्या वर्षी बरेच लोक निवृत्त होतात किंवा त्यांना व्हावं लागतं त्या काळात मला ही आयसीआयसीआयमध्ये सामील होण्याची सुसंधीच प्राप्त झाली. (त्यासाठी श्री. जॉर्ज वूड्स आणि श्री. ब्लॅक यांचं योगदान एका बाजूला होतं तर दुसर्‍या बाजूला डॉ. रामस्वामी मुदलियार यांचं सौजन्य होतं.) हा अनुभव खूपच कल्पक आणि समृद्ध करणारा होता.—माझ्या डोळ्यांसमोर वेगवेगळे उद्योग स्थापन झाले, काहींचा विस्तार झाला, तंत्रज्ञानातील गुणवत्ता विकसित झाली, नवनवी उत्पादनं आणि प्रक्रिया वापरात आल्या. मी आयसीआयसीआयमध्ये सामील झालो तेव्हा एकूण ६२ प्रकल्पांना आम्ही सहाय्य केलं होतं आणि एकूण  ढोबळ कर्जमंजुर्‍या १८ कोटी रूपयांच्या होत्या आणि मी आयसीआयसीआय सोडली तेव्हा प्रकल्पांची संख्या १३३९ झाली होती अणि ढोबळ कर्जमंजुर्‍या ४०५ कोटी रूपयांच्या होत्या. आयसीआयसीआयशी संबंधित सर्व मंडळी शिस्त, सचोटी, उत्साह आणि समन्वयाने वागली हा माझ्या लेखी समाधानाचा ठेवाच आहे.’’

मेहतांच्या नेतृत्वाखालची ती आनंदी टीम होती. मेहतांचं सह्रदय नेतृत्व आणि पारेखांची भक्कम व्यावसायिकता यांच्यामुळे आयसीआयसीआयला खूपच प्रतिष्ठा प्राप्त झाली. मेहता बरेचदा म्हणत की अन्यत्र कुठेही मला एवढी शांती, सुख आणि समाधान लाभलं नव्हतं, कर्मचार्‍यांनाही एक मोठी आनंदी टीम म्हणून काम करायला आनंद होत होता. या संघभावनेमुळेच आयसीआयसीआयची प्रगती झाली. आयसीआयसीआयचे नंतरच्या काळात अध्यक्ष बनलेले एन. वाघुल पारेखांच्या जन्मशताब्दी वर्षप्रसंगीच्या भाषणात म्हणाले,’’ मेहता हे आयसीआयसीआयचा जनमानसासमोरचा चेहरा असले तरी शांतस्वभावी पारेख पडद्यामागून कार्यरत होते त्यामुळे आज आयसीआयसीआय जे काही आहे त्याचं  श्रेय पारेखांनाही जायला हवं.’’ ते पुढे म्हणाले की ‘’पारेखांनी एचडीएफसी स्थापनेत मोठं योगदान दिल्यामुळे त्यांचं आयसीआयसीआयमध्ये केलेलं कार्य पार्श्वभूमीला ढकललं गेलं आहे. ‘’ 

एप्रिल, १९७४ मध्ये मेहतांचं निधन झाल्यानंतर त्यांना आकाशवाणीवरून मानवंदना देताना पारेख म्हणाले की,’ त्यांचं शेवटचं, कदाचित सर्वात लाडकं कार्य आयसीआयसीआय हेच होतं. या ध्येयाशी ते जीवनातली शेवटची १५ वर्षे जोडले गेले होते. आपल्या जीवनातली ही अत्यंत सुखाची वर्षं होती असं ते सदैव म्हणत राहिले.  याच काळात त्यांच्यासोबत आयसीआयसीआयमध्ये काम करण्याचा बहुमान मला मिळाला. त्यांच्यासोबत  दिवसेंदिवस काम करताना आम्ही सगळे जणू त्यांनी टाकलेल्या मोहिनीमंत्राने भारलेच गेलो. त्यांच्या स्वभावातील गोडवा, वागण्यातील अनौपचारिकता, हजरजबाबीपणा, तारूण्यमय जोष, चळवळेपणा, दूरदर्शी दृष्टिकोन,सखोल चिकित्सकपणा यांच्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्यासोबत काम करणं हे सर्वांनाच आनंददायी ठरलं. आम्ही आयसीआयसीआयच्या उभारणीसाठी स्नायू आणि धमन्यांचा सांगाडा दिला असेल तर त्यांनी त्यात प्राण आणि प्रेरणा ओतल्या.  

मेंधोरांनी आठवण सांगितली आहे की संचालक मंडळाच्या बैठकीत मेहता आपल्या विधानांना एखादी वेगळी आठवण किंवा विनोदाची फोडणी देत असत.  एकदा एका नवउद्योजकाने  आयसीआयसीआयकडे कर्ज मागितलं होतं तेव्हा मेहता म्हणाले की,’’ आपण त्याला एक अट घालूया की तू तुझ्या ‘टाय’ची गाठ व्यवस्थित ‘टाय’ केलीस तर (बांधलीस तर) आम्ही तुला कर्ज देऊ. : तेव्हा आम्ही क्षणभर गंभीरपणे विचार करू लागलो होतो की आमच्या कर्जासोबत शर्ती घालायच्या असा याचा अर्थ होतोय की आम्ही त्याच्या घरगुती बाबतीत ढवळाढवळ करतोय असा अर्थ होतोय. कुठलीही बैठक असो की एकत्र जेवणं असो ते असले की तिथं चैतन्य असायचं.’’ त्यांची कन्या अपर्णा हिच्या सांगण्यानुसार त्यांनी मृत्यपत्रात लिहून ठेवलं होतं की माझी अत्यंयात्रा आयसीआयसीआयच्या कार्यालयावरून न्यावी. ते कार्याय तेव्हा १६३ , बॅकबे रेक्लमेशन येथे होतं. मेहता एकदा असं म्हणाले होते की,’’ माणसांमुळे संस्था घडतात. काम करणार्‍या माणसांवरच संस्था अवलंबून असतात, तरीही त्या संस्था जगतात आणि त्यांना स्वतःचं जीवनही असतं.’’ खरोखरच हे त्यांचे शब्द भविष्यवाणी वर्तवणार्‍या प्रेषितासारखेच ठरले असले तरी मागील दोन दशकांत आयसीआयसीआयमध्ये घडून आलेल्या परिवर्तनाची  मेहतांनी स्वप्नातही कल्पना केली नसती.

१९६०-७० या दशकाच्या अखेरीस आयसीआयसीआयमध्ये  येणारे नवीन एक अधिकारी होते विमल जालान. पारेखांनी त्यांना आयसीआयसीआयमध्ये मुख्य अर्थतज्ञाचं पद देऊ केलं तेव्हा ते वयाच्या तिशीत होते आणि भारतात परतायचा विचार करत होते. जालाननी आयसीआयसीआयमध्ये अडीच वर्षे काम केलं. ‘’पारेखांची पुढे जाण्याची तीव्र इच्छा, विनयशीलता, वर्तनातील साधेपणा आणि सामाजिक जाणीव या गुणांनी ते खूपच प्रभावित झाले होते.