१६.२ चतुर, धोरणी सल्ला

आपण या पूर्वी बघितलंच आहे की सुरुवातीला पुरुषोत्तमदास स्वतंत्र मध्यवर्ती बॅंक उभारण्याच्या बाजूने नव्हते. त्यांना इंपिरियल बॅंकेचं हळूहळू विकसन करून तिचंच रूपांतर पूर्णस्वरूपी मध्यवर्ती बॅंकेत करायचं होतं. परंतु आरबीआयची निर्मिती करायची ठरल्यानंतर आरबीआय कायदा संमत करण्यआधी घडून आलेल्या बर्‍याच चर्चांमध्ये आणि विचारविनिमयामध्ये त्यांनी सक्रिय आणि फलदायी सहभाग घेतला. प्रारंभापासूनच ते आरबीआयचे मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होते.  पुढील काही वर्षांत बॅंकेस आणि देशास वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं तेव्हा पुरुषोत्तमदासांचं चातुर्य, दूरदृष्टी,  सचोटी आणि उद्योगाची जाण यांची अमोल साथ मिळाली.  आपल्यासोबत बर्‍याच वर्षांचं ज्ञान- कौशल्य-अनुभव यांचं गाठोडं घेऊन ते बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर आले होते.  चलन आणि बॅंकिंग क्षेत्रात त्यांच्याएवढं योगदान त्या काळात देशाला अन्य कुणा सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीनं दिलेलं नाहीये. पुरुषोत्तमदासांना आरबीआयच्या स्थापना पाहायला मिळालीच परंतु त्याशिवाय तिच्या निर्मितीक्षणापासूनच तिच्या वेगवेगळ्या कामकाज क्षेत्रात आघाडीची भूमिकाही करायला मिळाली.  आरबीआयची स्थापना झाल्यापासून अवघ्या पाचच वर्षातच दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने निर्माण झालेल्या समस्यांना  तोंड द्यावं लागलं. आणि जेव्हा हे जागतिक युद्ध थांबलं तेव्हा महागाई आणि स्टर्लिंग बॅलन्सचा मुद्दा आणि सरतेशेवटी भारताची फाळणी यास तोंड द्यावं लागलं. या सगळ्या समस्यांशी झगडताना पुरुषोत्तमदासांची दृढनिश्चयी वृत्ती, दूरदृष्टी आणि चातुर्य सदैव दिसून आलं. ‘’ या कठीण समयी आर्थिक स्थैर्य  आणि ताकद या दृष्टीने पाहाता पुरुषोत्तमदास संचालक मंडळाच्या आणि बॅंकेच्याच पाठीशी नव्हे तर देशाच्याही पाठी आधारस्तंभासारखे अविचल उभे राहिले.

सर ऑस्बोर्न स्मिथ यांचा कार्यकाळ अल्प ठरला हे आपण यापूर्वी पाहिलेले आहेच. स्मिथ यांची जुलै, १९३७ मध्ये गच्छन्ती झाल्यानंतर सर जेम्स टेलर त्या पदावर बसले. पुरुषोत्तमदासांनी या दोघांनाही सामर्थ्य आणि विवेकी सल्ला प्रदान केलाच परंतु त्यांचे उत्तराधिकारी सर सी.डी. देशमुख आणि सर बेनेगल राम राव यांनाही तसंच सहाय्य केलं.  धोरणातील सर्व महत्वाच्या मुद्द्यांबद्दल त्यांची मते विचारात घेतली जात होती.  एकदा टेलर इंग्लंडला गेले असताना बॅंक ऑफ इंग्लंडनी बॅंक दर वाढवला त्या उदाहरणावरून पुरुषोत्तमदासांच्या मताला किती महत्व मिळत होतं हे दिसून येतं.  ऑगस्ट, १९३९ मध्ये बॅंक ऑफ इंग्लंडनी त्यांचा बॅंक दर २ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर नेला परंतु आरबीआयनी काही त्यांचं अनुकरण केलं नाही. देशमुखांच्या मते टेलरना सुरुवातीला ब्रिटिशांची री ओढायची होती परंतु उपगव्हर्नर नानावटींनी त्यांना तसं करण्यापासून परावृत्त केलं. टेलर तेव्हा भारताबाहेर असल्याने त्यांनी नानावटींना तार करून बॅंक दर वाढवण्यास सांगितलं होतं परंतु नानावटी त्यास तयार झाले नाहीत. फ्रॅंक मोराएस यांच्या म्हणण्यानसुार या नकारामागे पुरुषोत्तमदासांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी निग्रहाने तसं पाऊल उचलण्यास विरोध केला होता कारण भारतातील परिस्थिती बॅंक दर वर नेण्यास अनुकुल नाही असं त्यांचं मत होतं. या विषयावर त्यांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की त्यांनी धमकी दिली की हे पाऊल उचलण्यास माझा विरोध का आहे ते समजावून सांगणारं सार्वजनिक निवेदन मी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करीन. त्या वेळेस टेलर इंग्लंडहून परतत होते आणि कराचीपर्यंत आलेले होते. त्यांच्याशी फोनवर नानावटींनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी विचारलंही होतं ,’’ सर पुरुषोत्तमदासांचं मन हा दर वाढवण्यासाठी आपण वळवू शकत नाही का?’’ सरतेशेवटी पुरुषोत्तमदासांच्या मनासारखं झालं. त्यांचा हा विजय  एक प्रकारे अद्वितीयच म्हणायला हवा. कारण ‘भारतीय अर्थव्यवस्थेस लंडन शहराच्या रथाच्या चक्रांना बांधून घालणार्‍या बेड्या खिळखिळ्या होऊ लागल्याचं ते प्रतीकच होतं. सरतेशेवटी बॅंक ऑफ इंग्लंडनेही वाढवलेले दर अल्पजीवीच ठरले. त्यांनीही ऑक्टोबर, १९३९ मध्ये ते दर पुन्हा २ टक्क्यांवर आणले.

आरबीआयच्या अधिकृत इतिहासात पुरुषोत्तमदासांच्या भूमिकेस मान्यता देण्यात आली आहे. बॅंकेच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात केंद्रीय संचालक मंडळाने बॅंकेच्या एकूणच कामकाजात सक्रिय भूमिका निभावली. संचालकांनी बॅंकेचं हितरक्षण करण्यासाठी आणि मध्यवर्ती बॅंकेची स्वातंत्र्याची परंपरा राखण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. हे सक्रिय संचालक बहुदा बॅंकेच्या स्थानिक मंडळांचे अध्यक्ष असत. बॅंकेच्या अधिकृत इतिहासात नोंदवण्यात आलं आहे की या सर्व व्यक्तींमध्ये सर्वात उठून दिसणारे आणि असामान्य कर्तृत्व दाखवणारे सर पुरुषोत्तमदास ठाकुरदासच होते. सर ऑस्बोर्न स्मिथ आणि सर जेम्स टेलर या दोघांना तसंच सर्व उपगव्हर्नरांनाही त्यांच्याबद्दल खूप आदर आणि विश्वास होता. केंद्रीय संचालक मंडळातील त्यांच्या सहकार्‍यांनीही त्यांचेच नेतृत्व मान्य केलं. त्यांचं आणि संचालक मंडळातील त्यांच्या सहकार्‍यांचं मुळी धोरणच होतं की भारताच्या परदेशी सरकारसोबत सकारात्मक पायावर सहकार्य करायचं परंतु त्याच वेळेस बॅंकेच्या आणि देशाच्या हितरक्षणाची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. म्हणूनच सर एस. पी. हे एकाच वेळेस कार्यप्रेरणा देणारे होते तसंच ते नको त्या बाबी रोखण्यात प्रभाव टाकणारेही होते.