प्रस्तावना (खंड दुसरा )
‘’ जीजीभॉय, या माणसाला आपण ऑर्डर का नाही देत?’’ ए.ए. ससून या अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष उद्योगपतींनी त्यांच्या सचिवाला विचारलं. ससून उद्योगसमूहाच्या कापडगिरण्यांच्या नाड्या त्यांच्याच हातात होत्या. नारणदास राजाराम आणि कंपनीचे भागीदार पुरुषोत्तमदास ठाकुरदास यांना जीजीभॉयनी मालाची ऑर्डर द्यावी असं त्यांना वाटत होतं. हा म्हातारा ससून त्यांना लागणारा कापूस वसनजी त्रिकमजी आणि कंपनी या सुस्थापित भारतीय कंपनीकडून घेत असे. ती कंपनी त्याची मुख्य पुरवठादारच होती. परंतु एक तरुण व्यापारी हल्लीहल्लीच कापसाच्या उत्तम दर्जामुळे व्यापारी वर्तुळात प्रसिद्ध झालाय ही बातमी ससूनच्या कानांवर पोचली होती, त्यामुळेच या पुरुषोत्तमदासचा कापूस असतो तरी कसा हे त्यांना पाहायचं होतं. पाहायचं होतं म्हणण्यापेक्षा स्पर्शाने अनुभवायचं होतं म्हटलं तर अधिक उचित ठरेल कारण ते आंधळे होते. दोन बोटांत धरुन आणि हातानं चोळून ते कापसाची गुणवत्ता समजून घ्यायचे. परंतु आपल्या मुख्य पुरवठादाराच्या किंमतींपेक्षा हा पुरुषोत्तमदास फारच जास्त किंमत लावतो अशी कुरकुर जीजीभॉयने केल्यावर पुरुषोत्तमदासनं आपली बाजू मांडताना म्हटलं की पण मी उत्तम दर्जाचा कापसाचा व्यापार करतो. तेव्हा त्या तरुणाच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित होऊन ससूननी ठरवलं की आपण त्याला एक संधी देऊन पाहू. म्हणून त्यांनी त्याला कापसाच्या ५०० गाठींची (बेल्सची) ची ऑर्डर दिली. माल तपासल्यावर त्यांना कळलं की पुरुषोत्तमदास दिल्या वचनाला जागणारा आहे. त्याचा कापूस खरोखरच उत्तम दर्जाचा होता. ससून यांनी मग आपल्या गिरण्यांत जाऊन तिथल्या कामगारांचा नव्या कापसाबद्दल काय प्रतिसाद आहे ते विचारलं तेव्हा कामगारही त्या नव्या मालाविषयी उत्साहाने बोलले.
मग ससून यांनी आपल्या कापूस पुरवठादारांना आणि दलालांना विचारलं,’’ मग एवढी वर्षं मी काय विकत घेत होतो रे?’’‘ त्यानंतर त्यांनी आपल्या कापूस- गोदामातला सगळा साठा तपासायला लावला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गोदामातल्या कुठल्याही कापसापेक्षा पुरुषोत्तमदासने पुरवलेला कापूस उच्च दर्जाचा आहे. मग त्यांनी पुरवठादारांना त्या सर्व गाठी बदलून द्यायला लावल्या आणि आपल्या खरेदी खात्यातील लोकही सचोटीचे आहेत ना तेही पाहिलं. आपला सर्वात मोठा खरेदीदार नाहीसा झाल्याने शेवटी ती वसनजी त्रिकमजी आणि कंपनी डब्यात गेली. पुरुषोत्तमदासच्या कंपनीशी स्पर्धा करू पाहाणारी मुंबईची एक इटालियन कंपनीसुद्धा बंद पडली. त्यानंतर धाडसी आणि सचोटीचा व्यापारी म्हणून पुरुषोत्तमदासची प्रतिष्ठा अधिकच मजबूत झाली. फ्रॅंक मोराएस म्हणतात त्यानुसार ‘कॉटन किंग’ची कारकीर्द सुरू झाली होती.’’
परंतु केवळ व्यापारी किंवा व्यावसायिक यशावरच थांबणं हे पुरुषोत्तमदासांचं भागधेय नव्हतं. राजकीय, आर्थिक अथवा सामाजिक- कुठल्याही क्षेत्रातील प्रगती ही शेवटी काही मूठभर मोठ्या माणसांची दूरदृष्टी, धाडस आणि चिकाटी यांचंच फलित असते हे तर सार्वकालिक सत्य आहे. वित्तीय आणि अर्थशास्त्रीय क्षेत्रांत तर ते अधिकच सत्य ठरतं. आजच्या पिढीला सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास हे नाव फारसं परिचयाचं नसलं तरी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी सार्वजनिक जीवन, उद्योग, विमा आणि बॅंकिंग या क्षेत्रांना दिलेल्या असामान्य आणि बहुविध योगदानामुळेच तत्कालीन भारतीय अवकाशातील अनेक तळपत्या ता-यांतील एक अशी उपमा त्यांना दिली तर ती वावगी ठरणार नाही. पुरुषोत्तमदासांचा जन्म ३० मे, १८७९ रोजी मुंबईच्या गजबजलेल्या गिरगावात एका गुजराती बनिया कुटुंबात झाला. त्यांचे वडील ठाकुरदार सॉलिसिटर होते तर काका विज्भूकनदास हे त्यांच्या बनिया जातीचं नाव राखणा-या कापूस- तेलबियांच्या व्यापारात होते. पुढे जाऊन पुरुषोत्तमदाससुद्धा याच व्यवसायात काम करणार होते. आपल्या आईवडिलांबद्दल त्या लहान मुलाला फारच थोडी माहिती होती कारण त्याचे वडील ठाकुरदास वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी मरण पावले होते आणि त्यानंतर आई दिवाळीबाईसुद्धा फार काळ न जगता पतिनिधनानंतर दोनच वर्षांत मरण पावली होती.
पुरुषोत्तमदासांना त्यांचे काका विजभुकनदास आणि काकू अंबालक्ष्मी यांनी पोटच्या पोरासारखं वाढवलं. पुरुषोत्तमदास मुंबादेवी स्थानिक शाळेत शिकले. त्यानंतर तेजपाल ऍन्ग्लो व्हर्नाक्युलर शाळेत त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. दोन्ही ठिकाणी ते फार रमले नव्हते. सरतेशेवटी एलफिन्स्टन स्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना शाळेत एकमेव बक्षिस मिळालं ते फ्रेंच या विषयातलं होतं, तेही त्यांचे फ्रेंचचे शिक्षक श्रीयुत साहियार म्हणून होते त्यांच्या दयाळूपणामुळे आणि या मुलाकडे त्यांनी खास लक्ष दिल्यामुळेच मिळालं होतं. बहुदा त्यामुळेच त्यांना त्या विषयात अधिक गुण मिळवण्याची इच्छा निर्माण झाली असावी.
नंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला, त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातही खास काहीच घडलं नाही. परंतु क्रिकेट, टेनीस आणि जिमनॅस्टिक्स अशा अभ्यासेतर उपक्रमांत मात्र ते सक्रिय सहभाग घेत होते. १९०० साली पुरुषोत्तमदास बीएची परीक्षा दुस-या वर्गात उत्तीर्ण झाले. त्या जोडीला ते कायद्याचाही अभ्यास करत होते. त्यामुळे आता उपजीविकेची कुठली वाट निवडायची हा प्रश्न समोर येऊन उभा राहिला. वडिलांच्या पायांवर पाऊल टाकायचं की काकांच्या व्यवसायात उतरायचं या दोन पर्यायांत निवड करायची होती. पितृप्रेमाने भारलेल्या पुरुषोत्तमदासांनी ठरवलं की आपण पित्याचा मार्ग निवडायचा परंतु वडिलांच्या जुन्या कंपनीतील दोन वरिष्ठ भागीदारांनी एवढा थंड प्रतिसाद दिला की त्यामुळे ते फारच बेचैन झाले. त्यावेळेस विजभुकनदासांनी त्यांना हलकेच सुचवलं की मला माझ्या कंपनीत तरुण माणसाची गरज आहे त्यामुळे तू या व्यवसायात आलास तर तुझं काहीच नुकसान होणार नाही. मग १९०१ साली नारणदास राजाराम आणि कंपनी या आपल्या काकांच्या कंपनीत पुरुषोत्तमदास शिकाऊ मदतनीस म्हणून सामील झाले. त्यानंतर त्यांची पुढील तीन वर्षे व्यवसाय शिकण्यात गेली. अनुभवाची कसर त्यांनी अथक उद्यमशीलता, सत्य परिस्थिती चटकन समजून घेण्याची तसेच कुठल्याही समस्येच्या अंतर्बाह्य काय चाललंय ते समजून घेण्याची क्षमता यांच्यामुळे भरून काढली. त्यामुळेच जेव्हा विजभुकनदास आजारी पडले- त्यांना हलताही येत नाही अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा पुरुषोत्तमदास कंपनीत आठ आण्यांचे भागीदार झाले. कंपनीला मागच्या वर्षी तेलबियांच्या उद्योगात तोटा झाला होता, तो भरून काढण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेचा काही भाग वापरला.
वरिष्ठ भागीदार या नात्याने पुरुषोत्तमदास यांची उपस्थिती हळूहळू जाणवू लागली. ज्या सचोटीसाठी ते नंतरच्या काळात प्रसिद्ध होणार होते, जिच्यामुळे त्यांना सरकारी बहुमान मिळणार होता ती सचोटी लवकरच सर्वांच्या दिसण्यात येऊ लागली. पुरुषोत्तमदासांना कळलं की नफेखोरी करण्यासाठी उत्तम दर्जाच्या कापसात कनिष्ठ दर्जाच्या कापसाची भेसळ केली जाते. त्यांनी ही प्रथा बंद पाडली खरी परंतु त्याबद्दल व्यापारी वर्तुळात ब-याच शंका घेतल्या गेल्या. सद्गुणांचं एवढं प्रदर्शन करण्यात कसला आलाय व्यवहारीपण असंच सर्वांचं मत होतं. उद्योगातले ज्योतिषी लौकरच भाकीत करू लागले की पुरुषोत्तमदास ज्या किंमतीला कापूस विकतोय, त्या किंमतीमुळेच तो बाजारपेठेबाहेर हाकलला जाईल. पण तसं काहीच झालं नाही. प्रामाणिकपणा हेच सुयोग्य धोरण ठरलं आणि पुरुषोत्तमदासांची पत वधारली. त्यातूनच त्यांच्या सचोटीची कीर्ती ए.ए. ससून यांच्या कानी पोचली आणि त्यातूनच वर सांगितलेला प्रसंग घडला.
त्या नंतर काही वर्षांनी म्हणजे १९११ साली पुरुषोत्तमदासांनी सार्वजनिक सेवेत पाऊल टाकलं तेव्हा मुंबईचे अनभिषिक्त राजे सर फिरोझशहा मेहता यांनी नागरी जीवनातील कीर्तीचा कळस गाठला होता. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीकडून सार्वजनिक कार्याचे धडे पुरुषोत्तमदासांना गिरवता आले. त्याचं असं झालं की १९११ साली गुजरातच्या कच्छ, काठेवाड भागात दुष्काळाने थैमान घातलं. तेव्हा मुंबईत सर फिरोझशहा मेहतांनी मदत गोळा करायला सुरुवात केली. त्यांना या मदतनिधीच्या कार्यासाठी योग्य सचिवाची गरज होती. पुरुषोत्तमदासांच्या कर्तबगारीची माहिती सर फिरोझशहांपर्यंत पोचली म्हणून त्यांनी त्यांना ते पद देऊ केलं. सर फिरोझशहा विजभुकनदासांना चांगलं ओळखत होते, त्यामुळे पुरुषोत्तमदास त्यांचेच पुतणे आहेत हे कळल्यावर त्यांना फार आनंद झाला. सुरुवातीला हो, नाही करत पुरुषोत्तमदासांनी ते पद स्वीकारलं. मग दुष्काळाचा प्रभाव ओसरण्यासाठी त्यांनी जवळजवळ वर्षभर झटून काम केलं. ते त्यासाठी दिवसाचे १४- १५ तास काम करायचे. त्यामुळे त्या निधीसमितीनं त्यांच्या कष्टांना दाद दिलीच शिवाय सर जॉर्ज क्लार्क यांनीही ‘कैसर ए हिंद’ या रजत-पदकासाठी त्यांचं नाव सुचवलं. परंतु पुरुषोत्तमदासांच्या सेवेच्या दृष्टीने पाहाता सर फिरोझशहा मेहतांना तो सन्मान फारच किरकोळ वाटला. म्हणून त्यांनी पुरुषोत्तमदासांना म्हटलं की तुम्ही हा सन्मान नाकारा, त्याऐवजी ‘सीआयई’ ही शौर्याची पदवी मागा. त्यांनी त्यांना नकारपत्राचा मसुदाही तयार करायला सांगितला होता. परंतु त्यांना पुरुषोत्तमदासांनी दिलेलं उत्तर हे शहाणपणा आणि औचित्य यांचा नमुनाच होतं. त्यांच्या उत्तराचा प्रतिवाद सर फिरोझशहांनाही करता आला नाही. पुरुषोत्तमदास त्यांना म्हणाले.’’ मी मुळात सन्मानासाठी काम करतच नाहीये. परंतु तरीही मिळालेला सन्मान मी आता नाकारला आणि नंतर त्याहून मोठा सन्मान स्वीकारला तर त्याचा अर्थ असा होतो की मी दुष्काळ निधीसाठी काम केलं ते केवळ काहीतरी बक्षीस मिळावं म्हणून केलं. पण मी तर त्यासाठी काम करतच नाहीये.’’
पहिल्या महायुद्धात ब-याच कापूस व्यापा-यांना बरकत आली, पुरुषोत्तमदास त्यास अपवाद नव्हते. युद्धामुळे आलेल्या तेजीमुळे त्यांना व्यवसायाचा पाया भक्कम करण्याची- तो वाढवण्याची संधी मिळाली. १९१६ मध्ये त्यांचं नाव मुंबई प्रांताच्या कायदेमंडळासाठी सुचवण्यात आलं. तिथं ते अन्नपुरवठा, सिंचन, पाणी, पाळीव जनावरे यांच्याविषयी अधिकारवाणीने बोलले. हे सर्व ज्ञान त्यांनी दुष्काळ-मदतनिधीसाठी काम करताना मिळवलेलं होतं. त्या काळात सर्व सत्ता सरकारहाती एकवटलेली होती त्यामुळे अधिका-यांकडून एखाद्या समस्येविषयी काम करून घ्यायचं असेल तर जनमताचा रेटा लावण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. सरकारच्या दोषांवर टीका करताना पुरुषोत्तमदास सकारात्मक उपायही सुचवत असत. ते त्यांना माहिती असलेल्या विषयांवरच बोलत असत आणि तेसुद्धा सर्व संबंधित माहिती व्यवस्थित तपासून घेतल्यावरच बोलत असत. परिणामतः त्यांची भाषणं सरकारी न्यायपीठाकडूनही आदरपूर्वक ऐकली जात.
भारत सरकार कायदा, १९१९ च्या अंतर्गत १९२० साली कायदेमंडळाच्या (लेजिसलेटिव्ह कौन्सिलची) जागी मुंबई प्रांत विधानसभा (बॉम्बे लेगिसलेटिव्ह असेंब्ली) स्थापन झाली तेव्हा पुरुषोत्तमदासांनी नव्या विधानसभेत मुंबईच्या कापूस व्यापाराचे प्रतिनिधी म्हणून प्रवेश केला. जुन्या कायदेमंडळाप्रमाणेच इथंही ते निर्भयपणे बोलायचे आणि विरोधी बाजू मोठ्या उत्साहाने मांडायचे. चित्रपटगृहांवर आणि नाट्यगृहांवर करमणूक कर लावण्याविरूद्ध ते बोलले. त्यांच्या वक्तृत्व कलेला तर फारशी कुणाची स्तुती न करणारे विधानसभेचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीही दाद दिली.
पुरुषोत्तमदासांची निःपक्षपाती वृत्ती, तळमळीचे प्रयत्न आणि सर्व विषयांवर सखोल विचार करण्याचा स्वभाव लक्षात आल्याने सरकारने ब-याच समित्यांवर त्यांची नेमणूक केली. १९२० मध्ये त्यांची नियुक्ती भारतीय रेल्वे समितीवर झाली. तिचे अध्यक्ष सर विल्यम ऍक्वर्थ होते. त्यामुळे त्या समितीला ऍक्वर्थ समिती असंच नाव पडलं होतं. नऊ सदस्यांची ही ऍक्वर्थ समिती रेल्वे व्यवस्थापन आणि वित्तपुरवठा या प्रश्नाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली होती. ‘ईस्ट इंडियन रेल्वेचं व्यवस्थापन बघणा-या कंपनीचा करार लौकरच संपुष्टात येणार होता हे ती समिती नेमण्यामागचं तात्कालिक कारण होतं. त्यामुळे भारतीय राजकीय वर्तुळात देशाच्या रेल्वेचं राष्ट्रीयीकरण व्हावं अशी मागणी मूळ धरू लागली होती. त्यामुळे या रेल्वेसेवा एखाद्या खाजगी कंपनीने चालवाव्यात की सरकारने चालवाव्यात हा निर्णय घ्यायचा होता. त्यात वेगवेगळ्या लोकांचे हितसंबंध गुंतले असल्यामुळे त्या समितीतले काही लोक कंपनीने कारभार करावा या मताचे होते तर काही लोक सरकारनेच रेल्वे चालवावी या मताचे होते. अंतिम अहवाल बनवण्याची वेळ आली तेव्हा इंग्लंडमधून आलेल्या अध्यक्षांसह तीन सदस्यांनी सरकारच्या हाती व्यवस्था असण्याची भलावण केली तर बाकीच्या सदस्यांचे हितसंबंध वेगवेगळ्या रेल्वे कंपन्यांशी जोडलेले असल्याने त्यांनी कंपनी व्यवस्थापनाची भलावण केली. चर्चासत्रांच्या शेवटी ऍक्वर्थनी जाहीर केलं की समितीमध्ये दोन समान तट पडले आहेत. चार सदस्यांना कंपनी व्यवस्थापन हवंय तर चारांना सरकारी व्यवस्थापन हवंय. अध्यक्ष या नात्यानं ऍक्वर्थना त्यांचं निर्णायक मत टाकण्याचा अधिकार होता. ते त्यांनी सरकारी व्यवस्थापनाच्या पारड्यात टाकलं. पुरुषोत्तमदासांनीही सरकारी व्यवस्थापनाच्या बाजूनेच मत दिलं होतं. या वर्तनातून पुरुषोत्तमदासांचे उदात्त हेतू आणि अतुलनीय सचोटीचा पुरावाच मिळत होता. भारतीय सदस्यांपैकी एकाने पुरुषोत्तमदासांचं मन खाजगी कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांना जीआयपी रेल्वेच्या व्यवस्थापनाची एजन्सी तुम्हाला देऊ असं आमीषही त्यांनी दाखवलं होतं. कारण त्या जीआयपी रेल्वेचं कंत्राट १९२४ ला संपणार होतं. हे आमीष खूपच लाभदायक होतं कारण त्या कंत्राटामुळे प्रतिष्ठा, सत्ता मिळाली असती, मोठमोठ्या लोकांशी उठबस वाढली असतीच शिवाय पुढील २० ते ३० वर्षांसाठी दर वर्षी कमीत कमी ७ लाख रूपये नफाही मिळाला असता. परंतु पुरुषोत्तमदासांनी त्या गळेपडू सदस्याला सांगितलं की मी विकाऊ नाही आणि भले त्या कंपन्या भारतीय असल्या तरी त्यांनी रेल्वेव्यवस्था पाहावी असं माझं मत नाही.
१९२२ मध्ये पुरुषोत्तमदासांचं नाव खर्च-कपात (रिट्रेंचमेंट) समितीसाठी सुचवण्यात आलं. समितीच्या अध्यक्षपदी लॉर्ड इंचकेप होते. केंद्र सरकारच्या वाढत्या खर्चात कपात करण्याचे मार्ग सुचवण्याचं काम समितीला देण्यात आलं होतं. पुरुषोत्तमदासांच्या ऍक्वर्थ समिती आणि इंचकेप समिती या दोन समित्यांतील योगदानमुळे तसंच मुंबई विधानसभेसारखी बरीच व्यासपीठं आणि कापूस उद्योगातील केलेल्या कामामुळे त्यांचं स्थान सरकारच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या नजरेत खूप उंचावलं होतं. १९२३ मध्ये त्यांच्या सेवेला सरकारदरबारी मान्यता मिळाली आणि त्यांना सर (नाईटहूड) या पदवीने सन्मानित करण्यात आलं. त्याअगोदर १९१९ साली त्यांना सीआयई पदवी मिळाली होती आणि त्यापूर्वी एमबीई पदवी मिळाली होती. त्याच वर्षी त्यांना आणखीही बहुमान मिळणार होता, म्हणूनच तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिडिंग यांनी राज्य विधी मंडळासाठी (कौन्सिल ऑफ स्टेटसाठी) त्यांचं नाव सुचवलं. पुरुषोत्तमदासांना लोक तोपर्यंत सर पी.टी. (पुरुषोत्तमदास ठाकुरदास) या नावानं ओळखू लागले होते. अशा प्रकारे सर पी.टींचं पदार्पण त्यांच्या शहराला आणि प्रांताला उत्कृष्ट सेवा देऊन झाल्यावर राष्ट्रीय मंचावर झालं होतं.
राज्य विधीमंडळातील पुरुषोत्तमदासांचा कार्यकाल जेमतेम वर्षभरच टिकला. त्या काळात विशेष सांगण्यासारखं काही घडलं नाही. १९२४ मध्ये केंद्रीय विधीमंडळात इंडियन मर्चंट्स चेंबर (आयएमसी) तर्फे भारतीय वाणिज्य प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवण्यात आलं. आयएमसीची स्थापना १९०७ साली सर मनमोहनदास रामजी या दूरदर्शी व्यावसायिकांनी ‘बॉम्बे नेटिव्ह पीसगुड्स मर्चंट्स असोसिएशन’ या संस्थेच्या सहकार्याने केली होती कारण ब्रिटिश-वर्चस्वाखालील बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अरेरावीला ती संस्था कंटाळली होती. आयएमसीच्या निर्मितीपासून पुरुषोत्तमदास तिच्याशी जोडले गेले होते. सर मनमोहनदास रामजींच्या आमंत्रणानुसार ते वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी आयएमसीचे उपाध्यक्ष बनले तर १९१३ साली अध्यक्ष बनले. त्यानंतर पुन्हा १९२०-२१ या काळातही बनले. अशा प्रकारे जवळजवळ तीन दशके पुरुषोत्तमदासांच्या गटाचं आयएमसीवर वर्वस्व होतं.
विधीमंडळात होणा-या वादविवादांत पुरुषोत्तमदासांनी बरेचदा सफाईने स्वतःची सोडवणूक करून घेतली. त्यांनी आपल्या गटात सामील होऊन आपल्या बाजूने मतदान करावं म्हणून मोहम्मद अली जिनांनी त्यांच्यावर दबाव आणला होता परंतु त्यांनी जिनांना नम्रपणे सांगितलं की मी फक्त स्वतःच्या सारासारविवेकबुद्धीवरच विश्वास ठेवतो. स्वतःचं मत ते निर्भीडपणे मांडायचे, प्रत्येक मुद्द्याचे गुणदोष पारखून स्वतंत्रपणे मत द्यायचे, केवळ देशहित हाच त्यांचा मुख्य हेतू असायचा म्हणूनच तर त्यांना लोकांकडून एवढा मान मिळू लागला होता.
मात्र या ठिकाणी पुरुषोत्तमदासांनी बॅकिंग क्षेत्रास दिलेल्या योगदानाबद्दल आपण विचार करणार आहोत. त्यातही रुपया-शिलिंग गुणोत्तराबद्दलची चर्चा, मध्यवर्ती बॅंक असली पाहिजे म्हणून चालवलेली मोहीम आणि नंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया १९३५ साली स्थापन झाल्यापासून जानेवारी, १९५७ पर्यंत त्यांनी भूषवलेलं त्या बॅंकेचं संचालकपद याबद्दलचा विचार त्यात असेल. खरोखरच पुरुषोत्तमदास कुठल्याही परिस्थितीस तोंड देण्यास समर्थ होते. त्यांचा सेंट्रल बॅंक ऑफ इंडियात सहभाग होता, तसंच ते इंपिरियल बॅंक ऑफ इंडियाचे क्रियाशील संचालकही होते. १९२२ साली त्यांनी इंपिरियल बॅंकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला, तिथपासून डिसेंबर, १९३४ मध्ये राजीनामा देईपर्यंत (म्हणजे रिझर्व्ह बॅंकेचा जन्म होण्याच्या थोडंसंच आधी) ते तिथं होते. त्यामुळे इंपिरियल बॅंकेला जवळजवळ बारा वर्षे पुरुषोत्तमदासांच्या अपवादात्मक व्यावसायिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्रचंड लाभ झाला. त्यांची विचारांमधली स्पष्टता, दूरदर्शीपणा, सचोटी आणि निःपक्षपातीपणा हा बॅंकेसाठी अमूल्य ठेवाच होता. रिझर्व्ह बॅंकेत कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी इंपिरियल बॅंकेचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना सर्व संचालकांनी आणि सर्व स्तरांतील अधिका-यांनी बहुविध प्रकारे मानवंदना दिली. तद्नंतर त्यांची रिझर्व्ह बॅंकेतील कारकीर्द २२ वर्षे चालली. फक्त श्री. श्रीराम, बी.एम. बिर्ला आणि सी.आर. श्रीनिवासन यांनीच त्यांच्यापेक्षा अधिक काळ रिझर्व्ह बॅंकेचं संचालकपद भूषविलं.
पुरुषोत्तमदासांनी ब-याच संस्थांच्या संचालक पदावर किंवा अध्यक्षपदांवर काम केलं. त्यात बॅंक, विमा, वाहतुक, सिमेंट, लोखंड आणि पोलाद, जलविद्युत अशा ब-याच क्षेत्रांतील कंपन्या होत्या. जवळजवळ साडेतीन दशके पश्चिम भारतातील प्रत्येक महत्वाच्या जॉईंट स्टॉक कंपनीच्या कारभाराशी पुरुषोत्तमदासांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध येत होताच. फ्रॅंक मोराएस यांनी त्यांचं वर्णन ‘ कॉर्पोरेट ऑक्टोपस’ या शब्दांत केलं आहे कारण ते बराच काळ पन्नासपेक्षा अधिक कंपन्यांचे अध्यक्ष किंवा संचालक होते. १९३० च्या आणि १९४० च्या दशकात तर ही संख्या सत्तरच्या जवळ पोचली होती. बेस्ट कं.लिमिटेड, इंडियन केबल ऍण्ड रेडिओ कम्युनिकेशन्स लि., टिस्को आणि टाटा पॉवर इत्यादी कंपन्यांशी त्यांचा संबंध होता. त्याशिवाय आणखी थोडी नावं आणखी सांगायचीच तर किलिक्स कंपनीशी त्यांचा संबंध होता. कोहिनूर मिल्स, अहमदाबाद इलेक्ट्रिक कंपनी यांचे ते संचालक होते तसंच सुरत इलेक्ट्रिसिटी कंपनीशीही त्यांचा संबंध होता. १९२४ साली टिस्को कंपनीची हालत खराब झाली तेव्हा त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळेच व्हाईसरॉय लॉर्ड रिडिंगनी आपलं मत ५० लाखांचे डिबेंचर्स काढण्याच्या बाजूने दिलं आणि कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढलं.
कापूस हा पुरुषोत्तमदासांच्या मुख्य व्यवसायाच्या केंद्रस्थानी होता. ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशनची पायाभरणी, इतिहास आणि प्रगती यांच्याशी त्यांची कारकीर्द जवळजवळ साडेतीन दशके अविभाज्यपणे जोडली गेली होती. कापूस- व्यापाराचं रूपांतर त्यांनी देशातील सर्वोत्तम अशा संघटित आणि शिस्तीच्या वस्तु-बाजारात (‘कमॉडिटी मार्केटमध्ये) केलं. संस्थेच्या पायाभरणीतल्या त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुरुषोत्तमदासांचे दोन पुतळे उभारण्याचा प्रस्ताव नंतरच्या काळात असोसिएशनने संमत केला. त्यातील एक पुतळा कॉटन एक्स्चेंज, मारवाडी बाजार येथे उभारला असून दुसरा कॉटन ग्रीन येथे उभारण्यात आला होता. कॉटनग्रीन येथील पुतळ्याचे अनावरण २९ मे, १९५२ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते झालं. परंतु काळबादेवीच्या कॉटन एक्स्चेंज इमारतीजवळ पुतळा उभारण्यास सुयोग्य जागा नसल्याने दुसरा पुतळा मात्र उभारता आला नाही. त्यानंतर बरीच वर्षे ती सोयीची जागा सापडलीच नाही. परंतु ४ जुलै, १९६१ रोजी पुरुषोत्तमदासांचा मृत्यू झाला त्यानंतर मात्र काळबादेवीत असोसिएशनच्या ट्रेडिंग हॉलमध्ये त्यांचा पुतळा उभारण्याचं त्या लोकांनी नक्की केलं.
आणखी एका संस्थेशी पुरुषोत्तमदास तीन दशके संबंधित होते त्या संस्थेचं नाव आहे ओरिएंटल गव्हर्नमेंट सिक्युरिटी लाईफ इन्शुरन्स कंपनी. त्या कंपनीच्या संचालक मंडळात ते १९१९ साली गेले, १९३३ साली अध्यक्ष बनले. त्यानंतर २२ वर्षे त्यांनी संस्थेचं नेतृत्व करून तिला यशाच्या अनेक सोपानांप्रत नेलं. परंतु १९५५ साली कर्मचा-यांना कंपनीचे समभाग देण्याच्या मुद्द्यावरून त्यांचे संचालक मंडळातील लोकांशी मतभेद झाले आणि त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला. १९३३ साली जेव्हा त्यांनी अध्यक्ष म्हणून कंपनीची जबाबदारी घेतली तेव्हा कंपनीचा व्यवसाय फक्त ४८ कोटी रूपये होता, तो १९५५ साली ते निवृत्त झाले तेव्हा तोच वाढून २३७ कोटी रूपये झालेला होता. तसंच त्यांच्या निवृत्तीपूर्वी एक वर्ष अगोदर नव्या व्यवसायात कंपनीने आत्तापर्यंत सर्वोच्च असा ४८ कोटी रूपयांचा व्यवसाय केला होता.
पुरुषोत्तमदास त्या काळातील जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या आर्थिक प्रश्नांत गुंतलेले होते, त्यामुळे नियोजन प्रक्रियेतही ते गुंतलेले असले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. १९३८ साली राष्ट्रीय नियोजन समितीची (नॅशनल प्लॅनिंग कमिटीची ) निर्मिती करून भावी नियोजनाचा पाया घातला गेला. त्यानंतर १९४४ साली त्यांनी तयार केलेला आराखडा प्रकाशित करण्यात आला. काही महत्वाच्या भारतीय उद्योगपतींनी त्या आराखड्यास बॉम्बे प्लॅन हे नाव दिलं. या दोन्ही प्रयत्नांशी पुरुषोत्तमदास खूपच जवळून संबंधित होते.
१९३९ साली पुरुषोत्तमदासांचा भारतीय नागरी सेवेतील (आयसीएसमधील) सी.डी. देशमुख यांच्याशी कामानिमित्त संबंध आला. हेच देशमुख नंतर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. देशमुखांना हे बहुमानाचे पद मिळवून देण्यात पुरुषोत्तमदासांनी बी. एम. बिर्लांसोबत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या बाजूला लोक जमवले, प्रचार केला, लोकांची मनधरणी केली, गोड बोलून त्यांचं मन वळवलं. देशमुख सोडून अन्य कुणीही भारतीय सरकारी अधिकारी त्यांना आरबीआयच्या सर्वोच्च पदावर बसायला नको होता. नंतर ते देशमुखांचे आणि त्यांच्या नंतर आलेल्या गव्हर्नरांचे बहुमोल सल्लागार बनले. तसंच, त्यापूर्वीही देशमुखांचे पूर्वसुरी सर ओस्बोर्न स्मिथ आणि सर जेम्स टेलर्स यांनाही त्यांनी तसाच बहुमोल सल्ला दिला होताच.
पुरुषोत्तमदासांनी ज्या सर चिंतामण द्वारकानाथ देशमुखांना आरबीआयचे गव्हर्नरपद मिळवून देण्यासाठी खटपट केली त्या देशमुखांच्या कारकीर्दीसारखी कारकीर्द आधुनिक भारतात अन्य कुणाचीही झाली नसेल. जगातही अन्यत्र त्यांच्यासारखं उदाहरण सापडणं अवघड आहे. अत्युच्च सरकारी अधिकारी, मध्यवर्ती बॅंकेतील मुख्य बॅंकर, केंद्रीय अर्थमंत्री, शिक्षणतज्ञ, संस्थास्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने देशमुखांनी आश्चर्य वाटेल एवढ्या विविध पदांवर काम केलं आणि भारतातील असंख्य संस्थांवर आपला ठसा मागे सोडला. त्यांना हवं असलेलं परंतु न मिळालेलं एकच पद होतं- ते होतं भारताचे राष्ट्रपतीपद.
देशमुखांनी आपल्या आठवणी ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’ या नावाने लिहून ठेवल्या आहेत, त्यात ते आपल्या जीवनाची तुलना नदीशी करतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची जीवनसरिता पश्चिम घाटात जन्माला आलेली असली तरी भूगोलात सांगितलेल्या सर्वसामान्य नदीप्रमाणे ती कधीच खालच्या पातळीवर वाहात गेली नाही. तिचा प्रवाह सदैव उत्तुंग पातळीच गाठत गेला कारण त्यांच्या असामान्य कारकीर्दीस फक्त एकच दिशा तीही केवळ वरचीच माहिती होती.
देशमुखांचा जन्म १४ जानेवारी, १८९६ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील नाटे नामक गावात झाला. तो मकर संक्रांतीचा शुभ दिवस होता. त्या दिवसाची शुभकारकता देशमुखांच्या जीवनाने आणि कारकीर्दीने नक्कीच सार्थ ठरवली. महाड येथे वकिली करणा-या द्वारकानाथांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या आईचं नाव वेणू (लग्नानंतर भागिरथी) होतं. ती बळवंतराव महागावकर यांची तिसरी कन्या होती. (या जोडप्याला एकुण १३ मुलं झाली, त्यापैकी ३ मुलं बाळपणीच गेली आणि १ मुलगी वयाच्या नवव्या वर्षी वारली) देशमुखांचं शिक्षण वयाच्या चौथ्या वर्षी महाड प्राथमिक शाळेत सुरू झालं आणि पुढील शिक्षण तळा या गावी झालं. १९०४ साली रोह्याला नवीन न्यायालय स्थापन झाल्यावर हे कुटुंब तिथे स्थलांतरित झालं. तळा येथे बरंचसं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर देशमुख रोह्याच्या प्राथमिक शाळेत वर्षभर गेले. त्यानंतर तीन शिक्षकांनी सुरू केलेल्या खाजगी शाळेत त्यांचं माध्यमिक शिक्षण सुरू झालं. या ठिकाणी त्यांना त्यांचे पहिले गुरू पुरुषोत्तम जोशी भेटले. ते त्यांना इंग्रजी शिकवायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शाळेत दोन यत्ता पुढे घालण्यात आलं.
१९०७ साली माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर देशमुखांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवण्यात आलं कारण रोह्याला त्या काळात उच्च माध्यमिक शाळाच नव्हती. मुंबईत ते मामांच्या घरी लॅमिंग्टन रोडवरील चाळीत राहू लागले. त्यांचं नाव गिरगावातील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या उच्च माध्यमिक शाळेत घालण्यात आलं. देशमुखांनी संस्कृत भाषेत खूपच प्रावीण्य दाखवलं आणि पाचव्या यत्तेत ते वर्गात पहिले आले. त्यांचे वर्गशिक्षक रामचंद्र कृष्ण लागू हे संस्कृतमध्ये एम.ए. होते. लवकरच देशमुख त्यांचे अगदी आवडते विद्यार्थी बनले. हेच लागू १९१३ साली एलफिन्स्टन कॉलेजात व्याख्याते म्हणून लागले आणि शालेय आणि कॉलेज जीवनात देशमुखांचे मार्गदर्शक म्हणूनच त्यांनी कार्य केलं. त्यांच्या आग्रहामुळेच पुढे देशमुख आयसीएस परीक्षेला बसले.
सहावी यत्ता झाल्यावर देशमुख एलफिन्स्टन हायस्कुलमध्ये भरती झाले. तिथलं जीवन चांगलंच मौजेचं होतं. तथापि, वर्गातील अन्य मुलांपेक्षा ते वयाने लहान असल्याने मॅट्रिकच्या परीक्षेस बसू शकले नाहीत. त्या काळात वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्याखेरीज कुणीही विद्यार्थी मॅट्रिकच्या परीक्षेस बसू शकत नव्हता. त्यामुळे एकाच वर्गात तीन वर्षे बसावं लागल्यामुळे त्यांना त्यांचं इंग्रजी आणि संस्कृत सुधारण्याची तसंच भावी शैक्षणिक यशाचा पाया रचण्याची खूप चांगली संधी मिळाली.
१९१२ साली देशमुख मॅट्रिकच्या परीक्षेस बसले आणि पहिले आले. त्यांना पहिली जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती मिळाली, आणखीही दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यांना नंतर कळलं की संस्कृतच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांत त्यांना ५० पैकी ५० गुण मिळाले होते. परंतु तोपर्यंत कुणालाच संस्कृतमध्ये १०० मध्ये १०० गुण मिळालेले नसल्याने परीक्षकांनी एकत्रितपणे निर्णय घेतला होता की आपण प्रत्येक गुणपत्रिकेतले २ गुण कमी करायचे. एकाच यत्तेत जास्त वेळ काढावा लागला ही चांगली गोष्ट झाली असं देशमुखांचं मत होतं कारण त्यामुळेच आपल्या जीवनाची भावी दिशा ठरली असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या मते १९१० किंवा १९११ साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली असती किंवा त्यानंतरच्या पुढल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या असत्या तर त्यात ते एवढ्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले नसते आणि मग त्यांना केंब्रिजला पुढील शिक्षणासाठी जाण्याची किंवा आयसीएसच्या स्पर्धेत उतरण्याची संधीही मिळाली नसती.
मॅट्रिकच्या परीक्षेनंतर एलफिन्स्टन कॉलेजने त्यांना साद घातली. त्यानंतर देशमुखांनी शिक्षणात झळकण्याची परंपरा सोडली नाही. त्यांनी प्रिव्हियस परीक्षेत संस्कृत आणि इंग्रजीत बक्षिसं मिळवली. त्यानंतर इंटरमिजिएटमध्ये गणितात पहिले आले म्हणून त्यांना कॉलेजचं पहिलं पारितोषिक मिळालंच परंतु त्याशिवाय संस्कृत आणि इतिहास या विषयांतही त्यांना बक्षिसे मिळाली. ज्युनियर बीएसाठी देशमुखांनी गणित विषय घेतला होता परंतु १९१५ च्या पहिल्या तिमाहीत त्यांचे मार्गदर्शक लागू यांच्याकडून त्यांच्या भावी कारकीर्दीस आकार दिला गेला. लागूंना वाटत होतं की देशमुख आयसीएस परीक्षा देण्याइतके हुशार आहेत. ती कल्पना देशमुखांच्या वडिलांना खूप आवडली असली तरी आर्थिक बाजू आड आली. त्यांच्या वडिलांकडे मुलाच्या परीक्षेसाठी खर्च करायला ५००० रूपये होते, त्याशिवाय आणखी ५००० रूपये कर्जाऊ उभारण्यास ते तयार झाले.
अडचणीचा मुद्दा होता तो म्हणजे लंडनच्या प्रवासासाठी लागणारे पुढले १०००० रूपये कुठून आणायचे. त्यानंतर ब-याच ठिकाणांच्या खटपटीस अपयश आलं तरीही लागूंनी मुद्दा लावून धरल्याने शेवटी हिंदू एज्युकेशन सोसायटीकडून कर्ज मिळालं. त्यांचे इतिहासाचे शिक्षक प्राध्यापक म्युलर यांनी केंब्रिज येथील जिझस कॉलेजला पत्र लिहिलं. त्यांच्या शिफारशीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भारतीय प्रशासन हा विषय शिकवणारे प्राध्यापक ऍण्डरसन यांनीही ट्रिनिटी कॉलेजला पत्र लिहिलं आणि तिथंही प्रवेश उपलब्ध झाला. परंतु या लोकांनी जीझस कॉलेजला आधीच होकार कळवलेला असल्याने ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेणं शक्य नव्हतं. मग आयसीएस परीक्षेसाठी कुठले विषय निवडावेत याबद्दल लागूंचे समकालीन आणि ती परीक्षाही उत्तीर्ण झालेले श्री. एम.व्ही. भिडे यांचा सल्ला घेण्यात आला. भिडे म्हणाले की तुम्ही गणिताऐवजी विज्ञान घ्या कारण गणितात खूपच नशिबावर भरोसा ठेवावा लागतो. तेव्हा मग देशमुखांनी त्यांचा सल्ला मानला आणि ट्रिपॉसच्या पहिल्या सत्रासाठी (केंब्रिज विद्यापीठातील बीए पदवीच्या अंतिम परीक्षेसाठी) विज्ञान हा मुख्य विषय घेतला.
देशमुख इंग्लंडला १५ मे, १९१५ रोजी बोटीने निघाले आणि १ जून रोजी लंडनला उतरले. जीझस कॉलेजात गेल्यावर त्यांनी ठरवलं की आपण वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूरचनाशास्त्र हे विषय नैसर्गिक विज्ञानाच्या ट्रिपॉससाठी घ्यायचे. अगोदर त्यांनी पदार्थविज्ञानशास्त्र हा विषय घ्यायचं ठरवलं होतं परंतु प्रयोगशाळेतला एक प्रयोग त्यांना करता आला नाही, तेव्हा तिथले शिक्षक त्यांना रागे भरले म्हणून तो विषय घेण्याचा विचार त्यांनी सोडूनच दिला. वनस्पतीशास्त्र हा विषयही त्यांनी घाबरतच घेतला होता कारण पी. के. चारी नामक भारतीय विद्यार्थ्यानं त्यांना सांगितलं होतं की या विषयासाठी चित्रकला चांगली हवी. चित्रकला क्षेत्रात आपल्याला फारशी गती नाही हे देशमुखांनी मान्य करूनही शेवटी वनस्पतीशास्त्र हाच विषय निवडला कारण प्राणीशास्त्रात त्यांना प्राण्यांचे विच्छेदन करावं लागणार होतं आणि ते तर त्यांना मुळीच आवडत नव्हतं. तथापि, वनस्पतीशास्त्राची निवड योग्यच ठरली.
देशमुख सकाळी व्याख्यानांना उपस्थित राहात तर दुपारी प्रात्यक्षिकं करत. त्याच वेळेस त्यांनी भूगोलाचा अभ्यास करून ती पदविका घेतली, तसंच वकिलीच्या पहिल्या परीक्षेचाही अभ्यास केला. जो काही मोकळा वेळ मिळे त्यात ते आयसीएस परीक्षेसाठी लागणा-या जास्तीच्या विषयांची पुस्तके वाचत. ती परीक्षा ऑगस्ट, १९१८ मध्ये द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या इंटरमिजिएट परीक्षेत ते पुरातन ‘शास्त्रीय’ भाषा (संस्कृत) घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले असल्याने तत्कालीन नियमांनुसार त्यांना पहिल्या वर्षाच्या विषयांची परीक्षा द्यायची गरज नव्हती. दुस-या वर्षाची नैसर्गिक विज्ञानाची ‘मेज’ या नावाने ओळखली जाणारी परीक्षा मे १९१६ मध्ये झाली आणि ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांना कॉलेजची वर्षाला ४० पौंडांची शिष्यवृत्तीही मिळाली.
पुढल्या वर्षी ट्रिपोस भाग १ या परीक्षेत देशमुखांचा निकाल तेवढाच उत्तम लागला. ते केवळ पहिल्या वर्गातच उत्तीर्ण होऊन थांबले नाहीत तर वनस्पतीशास्त्रात पहिलं आल्याबद्दल त्यांना फ्रॅंक स्मार्ट पारितोषिकही मिळालं. त्या काळात केंब्रिज विद्यापीठ विद्यार्थ्यांचे गुण प्रसिद्ध करत नसे. परंतु आपल्याला रसायनशास्त्र आणि भूरचनाशास्त्र यांच्यात किती गुण मिळाले याची उत्सुकता वाटून त्यांनी प्राध्यापकांकडे चौकशी केली. त्यांनी त्यांना गुण सांगितले नसले तरी त्या दोन्ही विषयांत ते पहिले आलेत हे त्यांना समजलं. दोन्ही प्राध्यापकांनी त्याला सांगितलं की ट्रिपोसच्या दुस-या परीक्षेलाही तू आमचेच विषय घ्यावेस असं आम्हाला वाटतं. केंब्रिजला असताना देशमुखांची मैत्री बिरबल साहनी आणि सी. के. देसाई (विठ्ठलभाई आणि वल्लभभाई पटेल यांचे भाचे) तसंच ऑक्सफर्डला शिकणारे जॉन मथाई आणि ट्रिनिटी कॉलेजला शिकणारे गणिती प्रतिभावंत रामानुजम यांच्याशी झाली. युद्धामुळे विद्यार्थी संघटनेतील वादविवाद-मंच बंद पडला असला तरी इंडियन मजलिस ही संस्था सक्रिय होती. देशमुख लवकरच त्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसले.
आयसीएस परीक्षा जवळजवळ येऊ लागली तेव्हा परीक्षेच्या अभ्यासासाठी देशमुख केंब्रिज सोडून लंडनला परतले. ते इंग्रजी, संस्कृत आणि वकिली या विषयांचाही आयसीएसच्या विषयांसोबत अभ्यास करू लागले होते. आपण आयसीएसची परीक्षा नापास झालोच तर हाती पर्याय असावा म्हणून त्यांनी ‘इनर टेंपल’ या कायदेशास्त्राच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ते पहिली परीक्षा पहिल्या वर्गात पास झाले. आयसीएस परीक्षा ऑगस्ट, १९१८ मध्ये झाली तेव्हा १० विषय- १९ प्रश्नपत्रिका आणि ४ प्रात्यक्षिके एवढा तिचा पसारा होता. त्या काळात तोंडी परीक्षा होतच नसे. परीक्षेचा निकाल लागला तेव्हा देशमुख सर्व विद्यार्थ्यांत पहिले आले होते आणि एस. के. सिन्हा हे सुप्रसिद्ध लॉर्ड सिन्हा यांचे सुपुत्र दुसरे आले होते. ६० गुण वाईट हस्ताक्षरासाठी कापल्यावर एकुण ५९०० गुणांपैकी देशमुखांना ३५२० गुण मिळाले होते. नंतरच्या वर्षांत आपल्या आयसीएसमधील कामगिरीची तुलना त्यांना संपर्कात आलेल्या अन्य काही इंग्रज लोकांशी करता आली. ते होते सर जेम्स ग्रीग— हे नंतर वित्त सदस्य (फायनान्स मेंबर) बनले तर दुसरे होते सर जेम्स टेलर- हे देशमुखांच्यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर होते आणि तिसरे होते सर जेरेमी राइसमन. हेसुद्धा वित्त सदस्य होते. ग्रीग आणि टेलर हे दोघे १९१३ सालच्या आयसीएस परीक्षेत अनुक्रमे ३३६७ आणि ३३४४ गुण मिळवून पहिले आणि दुसरे आले होते तर राईसमन १९१६ साली ३६०० पेक्षा अधिक गुण मिळवून पहिले आले होते.
देशमुखांचं आयसीएसचं प्रशिक्षण लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल लर्निंग येथे झालं. त्यानंतर ही संस्था बॅंक ऑफ इंग्लंड आणि सेंट पॉल्स चर्च यांच्याजवळील एका भाड्याच्या जागी हलवण्यात आली. त्यांनी हिंदू- मुस्लिम कायद्यांचा अभ्यास वकिलीच्या पहिल्या परीक्षेत केलेला असल्याने त्यांचा प्रशिक्षणाचा काळ फार तणावयुक्त नव्हता. अयोग्य प्रभाव आणि दबाव यांना बळी पडण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांनी भारतात काम करण्यासाठी मुंबई प्रांत न निवडता संयुक्त प्रांत, मध्य प्रांत आणि बेरार (व-हाड) या प्रांतांची निवड केली होती. प्रशिक्षणानंतरच्या (प्रोबेशनरी) परीक्षेत देशमुख दुसरे आले तर एस.ए. लाल यांना पहिला क्रमांक मिळाला. परंतु मुख्य लेखी परीक्षेतील देशमुखांचे गुण आणि लाल यांचे गुण यांत एवढी तफावत होती की दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र केल्यावर देशमुखांनाच पहिला क्रमांक देण्यात आला. ( दोन्ही परीक्षांच्या संयुक्त गुणांवरून सेवाज्येष्ठता ठरते) त्याशिवाय देशमुख त्याच वेळी वकिलीच्या दुस-या परीक्षेतही दुस-या वर्गात उत्तीर्ण झाले होते.
दरम्यानच्या काळात देशमुख रोझिना नावाच्या एका इंग्रज तरुणीच्या प्रेमात पडले. ऑक्टोबर, १९१९ मध्ये तिनंही त्यांच्या प्रेमास होकार दिला. अशा त-हेने प्रेमातही त्यांना यश मिळालं. मग नोव्हेंबर, १९१९ मध्ये त्यांनी आयसीएस नोकरीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी केली परंतु ते भारतात परत न जाता लंडनमध्येच थांबले कारण त्यांना वाटलं की आपल्याला वकीलमंडळात (बारमध्ये) जानेवारी, १९२० मध्ये बोलावलं जाऊ शकतं. परंतु शेवटल्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की बारमध्ये बोलावण्यासाठी आपण २७ गिनी फी द्यायला हवी, ती तर त्यांच्याकडे नव्हती. सरतेशेवटी त्यानंतर जवळजवळ ४८ वर्षांनी इनर टेंपलमधील वकिलमंडळात बोलावण्यात आलं. परंतु त्या क्षणी तर त्यांच्याकडे एक नोकरी असल्याने ते २७ गिनी भरण्याची तातडी काहीच नव्हती. म्हणून मग देशमुख फेब्रुवारी, १९२० मध्ये नव्या नवरीसह भारतात परतले.
भारतात परतल्यावर देशमुखांची पहिली नेमणूक बेरार म्हणजे व-हाडातील अमरावती येथे सहाय्यक आयुक्त म्हणून झाली. त्या प्रशिक्षणकाळात कनिष्ठ स्तरावरील कामं प्रत्यक्ष करण्यावर भर होता. काही महिन्यांच्या कालावधीनंतर उपविभागीय (सब डिव्हिजनल) अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी ते सज्ज झाले. उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक चांदूरला झाली, नंतर अमरावती येथे झाली. नंतर निवासी उपविभागीय आयुक्त म्हणून त्यांनी एलिचपूर येथे काम केलं, तिथं ते साधारण दीड वर्षं राहिले. त्यानंतर काही काळ रायपूर आणि महासमुंद येथे व्यतीत केल्यावर त्यांची नागपूर येथील सचिवालयात बदली झाली. तिथं सामान्य प्रशासन विभागात ते अवर सचिव ( अंडर सेक्रेटरी) म्हणून काम करू लागले. तोपर्यंत राजकीय आणि न्यायिक खात्यांची मुख्य जबाबदारी कुठल्याही भारतीयास देण्यात आली नव्हती. १९२६ च्या सुरुवातीस देशमुखांची बदली पुन्हा रायपूर येथे सरकारी रोख्यांचे कामकाज अधिकारी (सेटलमेंट ऑफिसर) म्हणून झाली. तिथं त्यांनी पाच वर्षांत कुणी केली नसतील एवढी प्रकरणं निकालात काढली.
१९३० मध्ये देशमुखांना एक पत्र आलं. त्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणा-या दुस-या गोलमेज परिषदेसाठी ३ सचिव नेमले जाणार आहेत, त्या पैकी एका सचिवाचा कार्यभार आपण स्वीकाराल का अशी विचारणा त्यात होती. देशमुखांनी तयारी दाखवली, तेव्हा त्यांच्यावर संघराज्यिक संरचना उपसमितीचं (फेडरल स्ट्रक्चर सबकमिटीचं ) काम सोपवले गेले. तिथं दर दिवशीच्या चर्चेचा सारांश लिहिण्याचं काम त्यांच्याकडे होतं. ते स्वतःची टिपणं काढायचे आणि दररोज दोन वेळा म्हणजे सकाळच्या सत्रानंतरच्या जेवणाच्या आधी आणि दुपारच्या सत्रानंतर घरी जाण्यापूर्वी दुस-यांदा अशा साधारण दहा पानांच्या त्या सगळ्या नोंदी सारांशरूपात लेखनिकाला सांगून लिहून घ्यायचे. मग ही टिपणं संध्याकाळी सर्व सदस्यांना वितरित केली जात. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्डनी या कार्यक्षमतेची दाद दिली आणि हे श्रेय कुणाचं आहे ते जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली. सेक्रेटरी जनरल ऑफ कॉन्फरन्स आर्किबाल्ड कार्टर यांनीही देशमुखांच्या मेहनतीची दाद त्यांना एक अर्ध-अधिकृत (डेमी- ऑफिशियल) पत्र लिहून दिली. याच कामामुळे देशमुखांना गांधीजींसह ब-याच महत्वाच्या भारतीय नेत्यांना भेटण्याची संधीही मिळवून दिली. गांधीजी हे त्या परिषदेतील कॉन्ग्रेसचे एकमेव प्रतिनिधी होते.
इंग्लंडहून परतल्यावर देशमुखांची नेमणूक महसूल सचिव या सरकारी पदावर हंगामी स्वरूपात (तो अधिकारी रजेवर होता म्हणून) झाली. या पदावर असताना कर्ज-तडजोड (डेट कन्सिलिएशन ) कायद्याची चौकट बनवणे आणि संमत करून घेणे हे त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण योगदान ठरलं.—भारतातील या प्रकारचा तो पहिलाच कायदा होता. लिनलिथगो कृषि आयोगाच्या प्रमुख शिफारशी अंमलात आणणं हा त्या कायद्याचा मुख्य हेतू होता. त्या काळी एक विधीमंडळ हे कामकाज बघत असे. त्यात काही नामनिर्देशित (नॉमिनेटेड) सदस्य मुख्यत्वेकरून सरकारी अधिकारी असत. देशमुखांना तिथे नियुक्ती मिळाली तेव्हा महसूल सदस्य सर हाइड गोव्हन यांना तो कायदा विधीमंडळात मांडण्यासाठी त्यांनी सहाय्य केलं. त्यानंतर मग १९३४ साली देशमुख मध्य प्रांत आणि बेरार (व-हाड) सरकारचे वित्त सचिव बनले आणि १९३९ साली ते केंद्र पातळीवर शिक्षण, आरोग्य आणि जमीन या खात्याचं काम पाहू लागले. त्यानंतर थोड्याच काळात ते आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. त्याची माहिती प्रकरण १७ मध्ये तपशीलवार देण्यात आली आहे.
पुरुषोत्तमदासांप्रमाणेच देशमुखांचं व्यक्तिमत्वही बहुआयामी होतं, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक पैलूंचं होतं. ब्रेटन वुड्स येथे विनिमय दराबद्दल भारताची बाजू मांडताना त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय होतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या राज्यपाल- मंडळाचे ते दहा वर्षे सदस्य होते. पॅरीसमध्ये या दोन्ही संस्थांच्या १९५० साली झालेल्या संयुक्त बैठकांचं अध्यक्षपद त्यांनीच भूषविलं होतं. सप्टेंबर, १९४९ मध्ये म्हणजे आरबीआयमधील त्यांचा वाढीव कार्यकाल संपल्यावर त्यांची नेमणूक अमेरिका आणि युरोप येथे खास आर्थिक राजदूत म्हणून झाली. त्या अधिकारात त्यांनी गव्हाच्या कर्जाच्या प्राथमिक वाटाघाटी अमेरिकेशी केल्या. त्याशिवाय पंडित नेहरूंनी त्यांना नियोजन आयोगात काम करण्यासाठीही बोलावलं होतं. एप्रिल, १९५० मध्ये आयोगाची स्थापना झाल्यावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्तीही केली होती. त्यानंतर ते अर्थमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी झाले. परंतु १९५६ साली पंडित नेहरूंनी मुंबईतल्या सार्वजनिक सभेत जाहीर केलं की मुंबई शहर केंद्रशासित असेल तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारत सरकारने भाषावार प्रांतरचना स्वीकारलेली होती आणि मुंबई शहरास नवीन महाराष्ट्र राज्यात सामील करण्याऐवजी मुंबई शहराचं वेगळं राज्य करावं अशी योजना शिजत होती. देशमुखांनी पहिल्या आणि दुस-या पंचवार्षिक योजनांच्या निर्मितीत आणि अंमलबजावणीत भरीव योगदान दिलं. इंपिरियल बॅंक ऑफ इंडिया, आयुर्विमा कंपन्या इत्यादींचं राष्ट्रीयीकरण, नवीन कंपनी कायद्याची निर्मिती अशा महत्वाच्या योजनांबद्दलही तेच आघाडीवर होते.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर देशमुख शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रांत सक्रिय झाले. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे १९५६-६० या काळात अध्यक्ष होते, दिल्ली विद्यापीठाचे १९६२- ६७ या काळात उपकुलगुरू होते. भारतीय सांख्यिकी संस्थेचे (इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे )१९४५-६४ या काळात अध्यक्ष होते. त्याशिवाय आर्थिक विकास संस्थेचे (इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे) १९६५-७४ या काळातले अध्यक्षपद, नॅशनल बुक ट्रस्टचेही १९५७-६० या काळातले अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. त्याशिवाय इंडिया इंटरनॅशनल सेंटरची त्यांनी १९५९ साली स्थापना केली. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे १९६३-६४ साली ते अध्यक्ष होते तर कोर्ट ऑफ गव्हर्नर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाचे ते १९५३-७३ या काळात प्रमुख होते.
देशमुखांची पहिली पत्नी रोझिना १९४९ मध्ये निधन पावली. त्यानंतर १९५३ मध्ये त्यांनी दुर्गाबाईंशी लग्न केलं. दुर्गाबाई स्वतःही खूप हुशार होत्या, त्यांच्या तोडीस तोड होत्या. त्यांच्या सहाय्याने देशमुखांनी कामकाजातील साक्षरता (फंक्शनल लिटरसी) आणि कुटुंब नियोजन या क्षेत्रात ‘आंध्र महिला सभा’ नामक संस्थेच्या माध्यमातून असामान्य योगदान दिलं. दुर्गाबाई त्या सभेच्या संस्थापिका आणि अध्यक्षा होत्या. १९७५ साली स्वतः देशमुख आणि त्यांच्या पत्नीला पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीयांना मिळणारा नागरी बहुमानाचा हा द्वितीय पुरस्कार पती-पत्नीच्या जोडीला मिळण्याचं हे एकमेव उदाहरण आहे. सर जॉन मथाई यांना त्या दोघांचा वाङ्निश्चय झाल्याचं कळलं तेव्हा त्यांचे डोळेच चमकले आणि ते देशमुखांना म्हणाले,’’ केवढी मजबूत युती आहे ही तुमची.’’ त्या दोघांनी एकमेकांत ठरवलं होतं: जेव्हा दोघांपैकी एक सरकारी पदावर असेल तेव्हा दुस-याने फक्त १ रूपया पगार घ्यायचा. देशमुखांना आणखीही बरेच सन्मान मिळाले. अर्थात् त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. उत्तम सरकारी सेवेसाठी त्यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला. त्याशिवाय त्यांना ब-याच नामांकित विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेटची पदवीही प्रदान करण्यात आली. त्यातही केंब्रिजमधल्या ज्या जीझस कॉलेजात ते शिकले त्या कॉलेजाने त्यांना मानद फेलोशिप दिली तेव्हा देशमुखांना खूप आनंद झाला होता.
देशमुख संस्कृतचे उत्साही अभ्यासक होते, त्यांनी कालिदासाच्या मेघदूताचं मराठी भाषांतर केलं होतं. सुरुवातीला त्याच्या काही प्रती त्यांनी खाजगी वितरणासाठीच प्रकाशित केल्या होत्या. परंतु त्यास मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे धीर येऊन त्यांनी सार्वजनिक आवृत्तीही प्रकाशित केली. (त्यांच्या अनुवादात मूळ लेखनाइतकीच कडवी आणि गेयता होती.) बालपणापासूनच त्यांना संस्कृतात आणि अधूनमधून मराठी, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत पद्यरचना करण्याची हौस होती. त्यांनी बंगालीत छोटीशी कविता लिहून ती रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या वाढदिवशी सादर केली होती. देशमुख भाषातज्ञही होते. संस्कृत, बंगाली, गुजराती, उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. दुर्गाबाईंशी लग्न झाल्यावर ते थोडं तेलगूही शिकले. त्यांना फ्रेंच भाषाही येत असल्याने १९५० साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या पॅरिस येथील वार्षिक अधिवेशनात त्यांनी फ्रेंचमध्ये भाषण दिलं, ते त्यांच्या फ्रेंच यजमानांना फारच आवडलं होतं.
त्यांना बागकामाची फार आवड होती त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना दिलेलं मानपत्र खरोखरच समर्पक होतं. : त्यात लिहिलं होतं, ते शिक्षणाने वनस्पतीशास्त्रज्ञ होते तर बागकाम हा त्यांचा छंद होता. परंतु व्हॉल्टेअरच्या ‘कॅंडिड’ या नायकाप्रमाणेच देशमुखांचाही सगळ्या अडथळ्यांना पार करून विविध बागा फुलवण्यावर विश्वास होता.’’ देशमुखांनी वनस्पती जीवनात केवळ वैज्ञानिकदृष्ट्याच रस दाखवला नाही तर आपल्या झाडांझुडपांची जोपासना करण्यातही त्यांना खूप आनंद मिळत होता. १, विलिंग्डन क्रिसेंट येथे राहात असताना (या बंगल्यात नंतर इंदिरा गांधी रहावयास आल्या) त्यांनी अर्धा एकर जमिनीत १५ मण गहू पिकवला होता, ही जमिनीची उत्पादकता सरासरीपेक्षा खूप अधिक होती. त्याशिवाय रिझर्व्ह बॅंकेत खाजगी चालू खातं उघडण्याचा अद्वितीय बहुमान त्यांनाच मिळाला होता. हैदराबादेतील आरबीआयच्या व्यवस्थापकांना देशमुखांनी जून १९७६ मध्ये पत्र लिहून त्यांच्या खात्यात एक चेक जमा करण्याची विनंती केली होती. ते पत्र सध्या पुणे येथील आरबीआयच्या संग्रहात आहे.
देशमुख २ ऑक्टोबर, १९८२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी हैदराबाद येथे निवर्तले.