२३.१ प्रेसिडेन्सी बॅंका

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचं मूळ शोधायचं तर एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात म्हणजे १८०६ साली बॅंक ऑफ कलकत्ता स्थापन झाली तिथपर्यंत जावं लागेल. याच बॅंकेला नंतर प्रेसिडेन्सी बॅंक ऑफ बेंगॉल अशी सनद (चार्टर) मिळाली. बॅंक ऑफ बेंगॉलने आपला व्यवसाय १८०९ मध्ये सुरू केला. त्यांच्यामागोमाग आणखी दोन बॅंका मुंबई प्रेसिडेन्सी (१८४०) आणि मद्रास प्रेसिडेन्सी (१८४३) मध्ये सुरू झाल्या. या सगळ्या बॅंका ब्रिटिशांच्या पुढाकाराने  ईस्ट  इंडिया कंपनीच्या कार्यक्षेत्रातील तीन प्रेसिडेन्सीत  सुरू झाल्या होत्या. मुख्यत्वेकरून ऍंग्लो इंडियन निर्मिती असलेल्या या बॅंका मुळात अस्तित्वात आल्या त्या मागे ब्रिटिशांची अर्थपुरवठ्याची गरज होती अथवा स्थानिक युरोपियन व्यापारास त्यांची गरज भासू लागली होती. भारताची अर्थव्यवस्था आधुनिक करण्यासाठी म्हणून केलेला निर्हेतुक प्रयत्न तर तो नक्कीच नव्हता. भारताच्या आधुनिक बॅंकेच्या शीर्षस्थानी या बॅंका राहिल्या, त्यातही १८०६ -७६ हा काळ बॅंक ऑफ बेंगॉलच्या वर्चस्वाचा होता.