२. आधुनिक भारतीय बँकिंग

अठराव्या शतकात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कलकत्ता आणि बॉम्बे (मुंबई) येथे दलाली पेढ्यांची (एजन्सी हाऊसेसची) स्थापना झाल्यावर आधुनिक धर्तीवरील बॅंकिंग व्यवसाय भारतात सुरू झाला. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार आणि त्याचे व्यवस्थापन जसजसं वाढू लागलं तसतसं ब्रिटिश व्यापारीही अंतर्गत व्यापारात काही प्रमाणात तर बाह्य देशांशी होणा-या व्यापारात मोठ्या प्रमाणात भाग घेऊ लागले. या व्यापाराला वित्तपुरवठा हवा होता, ब्रिटिश सैन्याला आणि नागरी अधिका-यांना बचतीचे पैसे घरी पाठवायचे होते, तसंच नव्या प्रशासनाला जिल्ह्यांतून गोळा केलेला कर मुख्य शाखांना पाठवायचा होता. हे सर्व करण्यासाठी आधुनिक बॅंकिंग यंत्रणा गरजेची होती.

कंपनी आणि येथील ब्रिटिश समुदाय यांच्या आर्थिक गरजा दलाली पेढीच्या (एजन्सी हाऊसच्या) व्यवस्थापनाकडून पु-या होत होत्या. प्रारंभीच्या व्यापारी कंपन्यांना सुरुवातीला फक्त चहा आणि नीळ यांच्यातच स्वारस्य होतं. तद्नंतर त्यांनी अनेक क्षेत्रात पाय रोवले. आधुनिक जगतातील कॉन्ग्लोमरेट अथवा बहुव्यावसायिक मोठ्या कंपनीचे हे अगदी सुरुवातीचं उदाहरण आहे. दलाली पेढ्यांनी (एजन्सी हाउसेसनी) आपल्या व्यवसायात बॅंकिगचाही समावेश केला आणि थोड्याच काळात त्यांचं ते महत्वाचं उपक्षेत्र बनलं. त्यांनी कमवलेल्या वैभवामुळे त्यांना भारताचे व्यापारी राजे असं नाव मिळालं. तर त्यांनी आणि कंपनीच्या नोकरांनी कमवलेल्या पैशास ‘शेकिंग द पॅगोडा ट्री’ (म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी गवसणे ) असं म्हटलं जाऊ लागलं. कंपनीच्या सेवेत येणे हीच मोक्याची संधी होती. मग बरीच धडाडीची माणसं कंपनीची नोकरी सोडून दिल्यावर स्वतंत्र व्यवसाय काढू लागली आणि बक्कळ माया जमवू लागली. एस. के. मुरंजन यांच्या निरीक्षणानुसार ‘’त्यातील बरेच लोक असे होते ज्यांनी कंपनीच्या नोकरीतील मर्यादित उत्कर्षाचा मार्ग त्यागून खाजगी व्यापार आणि व्यापार यातून मिळणा-या अगणित संपत्तीची वाट धरली होती.’’

नंतरच्या काळातल्या संयुक्त भांडवली (जॉईंट स्टॉक) बॅंका या दलाली पेढ्यांपासून फारकत घेऊन स्वतंत्रपणे उदयास आलेल्या असल्या तरी या पेढ्यांनाच आपण या उद्योगातील मुख्य प्रवर्तक मानलं पाहिजे. एक बॅंक वगळता बाकी सर्व बॅंका अमर्यादित उत्तरदायीत्व (अनलिमिटेड लायबिलिटी) या तत्वावर उभारण्यात आल्या होत्या. दलाली पेढ्यांकडे (एजन्सी हाऊसेसकडे) त्यांचं स्वतःचं भांडवल नसायचं त्यामुळे निधीसाठी त्या लोकांच्या ठेवीवर अवलंबून असत. या दलाली पेढ्यांनी तयार पिकं गोदामात बाजारात हलवण्यासाठी मदत केली, कागदी चलनही जारी केलं आणि जॉईंट स्टॉक बॅंकाच्या उभारणीचा मार्गही त्यांनीच मोकळा करून दिला. त्यातली सर्वात पहिली बॅंक होती १७७० साली स्थापन झालेली बॅंक ऑफ हिंदुस्तान. ही बॅंक अलेक्झांडर आणि कंपनी यांनी काढली होती. जेव्हा तिची पालक कंपनी बुडाली तेव्हा बॅंकेनेही आपला गाशा गुंडाळला. या दलाली पेढ्यांकडे (एजन्सी हाऊसेसकडे) स्वतःचं भांडवल खूपच अल्प होतं, तसंच त्यांना आधुनिक युरोपियन किंवा पारंपरिक भारतीय अशा कुठल्याच प्रकारच्या बॅंकिंगचं ज्ञान नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दलालीच्या व्यवसायांत जे चढउतार यायचे, व्यापारी संकटं यायची त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या बॅंकिगच्या कामकाजावरही उमटायचं. .

अशा प्रकारे एखादी दलाली पेढी बुडाली की तिनं काढलेली बॅंकही बुडायची. पाल्मर आणि कंपनीने काढलेली कलकत्ता बॅंकही त्या दलाली पेढीसोबत बुडाली . तथापि, ईस्ट इंडिया कंपनीचा बॅंक सुरू करण्यास विरोध असल्यामुळेच ती पोकळी भरून काढण्यासाठी या दलाली पेढ्यांवरच बॅंकिंगची कामं येऊन पडली होती. या बॅंकांनी केलेली सर्वात मोठी आणि शाश्वत कामगिरी कुठली असेल तर ती म्हणजे त्यांनी या देशात चलनी नोटांचं वितरण सुरू केलंही.

१७८५ च्या सुमारास द बंगाल बॅंक आणि द जनरल बॅंक ऑफ इंडिया या दोन बॅंका स्थापन झाल्या. त्यातली बंगाल बॅंक १७९१ साली बंद पडली कारण टिपू सुलतानाशी झालेल्या लढाईमुळे घबराट उत्पन्न झाली होती तर जनरल बॅंक १७९३ साली स्वतःहूनच बंद करण्यात आली कारण त्यातून नफाच मिळत नव्हता. या बॅंकाना काम करण्याची सनद ईस्ट इंडिया कंपनीकडून मिळाली होती. त्यांच्यानंतरच्या बॅंका भारतीय कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांखाली स्थापन झाल्या. या नंतर स्थापन झालेल्या बॅंकांचं वर्गीकरण दोन गटांत करता येईल.  पहिल्या गटात ३  प्रेसिडेन्सी बॅंका होत्या तर दुस-यामध्ये भारतीय जॉईंट स्टॉक बॅंका होत्या. १८२९-३० सालापर्यंत एजन्सी हाऊसेस (दलाली पेढ्या) शेवटच्या घटका मोजू लागल्या होत्या. त्या बंद पडलेल्या पेढ्या होत्या, अलेक्झांडर आणि कंपनी, कॉलिन आणि कंपनी, फर्गसन आणि कंपनी, पामर आणि कंपनी, आणि मॅकिंटोश आणि कंपनी.  यापैकी सात का आठ पेढ्यांनी १ कोटी ५० लाख रुपयांचं नुकसान केलं होतं आणि स्वतःसोबत संलग्न बॅंकांचंही दिवाळं काढलं होतं. हे अरिष्ट आणि १८६० साल या मधल्या काळात अवघ्या १२ बॅका काढण्यात आल्या. (या सर्व बॅंका युरोपियन व्यवस्थापनाखाली होत्या) त्यापैकी ६ बॅंका अपयशी ठरल्या आणि बाकीच्या बॅंका धंद्यात अविचारी गुंतवणूक केल्याने बुडाल्या.