२४.४ नैसर्गिक नेता
इंपिरियल बॅंकेच्या नुसत्या आकारामुळेच तिचं सामर्थ्य वाढलं होतं. भारतातील बॅंकांच्या एकूण ठेवींच्या १/३ ठेवी याच बॅंकेकडे असायच्या. १९२६ पर्यंत सर्व एक्स्चेंज बॅंका मिळून जेवढ्या शाखा होत्या त्यांच्या दुपटीहून शाखा इंपिरियल बॅंकेच्या होत्या तसंच सर्व भारतीय जॉइंट स्टॉक बॅंकांच्या शाखांच्या १/३ एवढ्या शाखा इंपिरियल बॅंकेच्याच होत्या. मुरंजन यांच्या निरीक्षणानुसार ‘’एवढे प्रचंड स्रोत, विस्तार आणि ग्राहक असलेल्या बॅंकेला इतरांना आपल्यामागे यायला लावणं काही अवघड नव्हतं.‘’ त्याशिवाय सरकारशी खास नातं असल्यानेही बॅंकेला आघाडीचं स्थान मिळालं होतं यात काहीच नवल नव्हतं. ‘’
यामुळेच जनतेच्या भल्या मोठ्या, भरोसालायक निधीवर बॅंकेला जम बसवता आला आणि आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांचा खास वापरही करता आला. परंतु हा निधी किंवा ठेवी यांच्यापेक्षाही सरकार या बॅंकेत खोलवर लक्ष देत आहे तसंच या बॅंकेचं स्थैर्य आणि पत राखण्यासाठी ते नक्कीच पावलं उचलील हा एकूण विश्वास जनतेत होता हीच बाब अधिक निर्णायक ठरली.
स्थानिक बॅंकर्सनी मंजूर केलेल्या हुंड्या वटवून (डिस्काउंट करून) बॅंक देशांतंर्गत व्यापारास वित्तपुरवठा करू लागली. त्याशिवाय तिने कापड व्यवसायास दोन व्यक्तींनी स्वाक्षरी केलेल्या प्रॉमिसरी नोटेच्या आधारावर अल्प काळासाठी विनातारण कर्जही (क्लिन लोन) दिलं. तसंच बॅंकेच्या गोदामात साठवलेल्या शेतकी मालाच्या तारणावर कर्जेही दिली. इंपिरियल बॅंकेचा आकार आणि स्रोत यांच्यामुळे तिला भारतीय बॅंकिंग व्यवस्थेचं नेतृत्व नैसर्गिकपणेच मिळालं असलं तरी एक व्यापारी बॅंक या जबाबदार्या योग्य प्रकारे पार पाडील की नाही याबद्दल लोकांच्या मनात शंकाही होत्या. प्रारंभीच्या वर्षांत पुष्कळच हंगामी (सीझनल) चढउतार होऊनही ( बॅंकिंग निधी आणि चलन साठा या काळात दोन वेगवेगळ्या संस्थांच्या हातात असल्यामुळे असं होत होतं.) इंपिरियल बॅंकेला सरतेशेवटी ब्रिटिश सत्तेखालील संपूर्ण भारतात सर्वत्र समान व्याजदर आणणं शक्य झालं. सरकारी पैशाची सहज उपलब्धता आणि अधिकृत पाठिंबा यांच्यामुळे बाजारपेठेतील अन्य स्पर्धकांपेक्षा कमी व्याजदर लावणं बॅंकेला शक्य होत होतं. तसंच बॅंकेच्या शाखांच्या मोठ्या जाळ्यामुळे कुठेही पैसे पाठवणं शक्य झाल्याने देशांतर्त वित्तीय बाजारपेठेच्या एकत्रीकरणास भरीव सहाय्य झालं आणि हंगामागणिक / प्रांतागणिक व्याजदरातील चढउतार थांबले.
बॅंकेच्या स्थापनेच्या वेळेस अपेक्षा होती की बॅंक जनतेत आत्मविश्वास निर्माण करील, लोकांमध्ये बॅंकिंगची सवय रूजवेल, अशा प्रकारे देशातील भांडवल बॅंकव्यवस्थेत घेऊन येईल. असंख्य शाखा, अधिक मोठं आणि उत्तम तर्हेने वितरित खेळतं भांडवल (वर्किंग कॅपिटल), सरकारी जमांचा अधिक मोठा आणि लवचिक वापर यांच्यामुळे देशांतर्गत व्यापारास बॅंक अधिक उत्तम वित्तपुरवठा करील अशीच अपेक्षा होती.
१९२१- २८ या काळात इंपिरियल बॅंकेने नव्या शाखा उघडण्याचं धोरण विशेषतः जिथे एकही शाखा नव्हती अशा ठिकाणी मोठ्या उत्साहाने राबवलं. १९२० मध्ये फक्त शाखा ७० होत्या त्याच १९२८ मध्ये २०२ झाल्या. म्हणजेच सर्व एक्स्चेंज बॅंकाच्या शाखा एकत्र करूनही या शाखा त्यांच्या दुपटीपेक्षा जास्त होत्या. तसंच सर्व भारतीय बॅंकांच्या एकत्रित शाखांच्या १/३ शाखा इंपिरियल बॅंकेच्या होत्या. तिच्या ठेवीही भारतातील एकूण बॅंक ठेवींच्या १/३ होत्या. १९२९ -३३ या काळात थोड्याच नव्या शाखा उघडल्या गेल्या कारण बॅंकेच्या काही शाखा अजूनही नफाक्षम स्थितीत पोचल्या नव्हत्या त्यामुळे बॅंकेला नव्या शाखा उघडण्यापूर्वी शक्य झालं तर आधीच्या दोन शाखा एकत्र करायच्या होत्या. तथापि, पुढे १९३४ आणि १९४५ या काळात बॅंकेच्या शाखा २०२ वरून ४३३ एवढ्या झाल्या.
बॅंकेने स्टॉकच्या तारणावर कर्ज देऊन आणि बिल्स डिस्काऊंट करून पिकांच्या मोठ्या उलाढालीला वित्तपुरवठा केला. तसंच ती स्वतःच्या हुंडीच्या दरातील आणि बाजारपेठेतील हुंडीच्या दरातील फरक कमी करण्यात यशस्वी झाली. तसंच बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास बाजारपेठेतीलही दरांमधील बदल नाहीसे करण्यातही यशस्वी झाली. त्यामुळे साहजिकच कर्जपुरवठा यंत्रणेत थोडीफार लवचिकता आली. स्थानिक बॅंकर्सना हुंडी डिस्काऊंट करण्याचे (वटवण्याचे) दर कमी करणे भाग पडले कारण इंपिरियल बॅंक त्या हुंड्या कमी दराने वटवू लागली होती. ज्या ठिकाणी बॅंकेच्या शाखा नव्हत्या तिथलेही स्थानिक बॅंकर्स हुंडी वटवण्याचे दर कमी करू लागले कारण त्यांना भीती वाटू लागली की नाहीतर बॅंक याही भागात शाखा उघडेल की काय? तसंच इंपिरियल बॅंकेच्या स्पर्धेमुळे अन्य जॉइंट स्टॉक बॅंकांनाही त्यांचे दर कमी करण्यास भाग पडलं, तसंच ज्या ठिकाणी इंपिरियल बॅंकेच्या शाखा नव्हत्या तिथल्याही बॅंका हुंडी वटवण्याचे दर कमी करू लागल्या कारण त्यांना भीती वाटू लागली की नाहीतर इंपिरियल बॅंक याही भागात शाखा उघडेल. इंपिरियल बॅंकेच्या एलएचओ आणि शाखा यातील पैशांच्या देवघेवीची सुविधा खूपच कमी दरात होऊ लागल्याने जनतेच्या दृष्टीने फायद्याचे होते, मात्र १९२६ पासून त्या सुविधेच्या वापरात घट झाली तरी एकूण पाहाता लोकांनी ती सुविधा खूप मोठ्या प्रमाणात वापरली असं म्हणता येईल.
मान्यताप्राप्त स्थानिक बॅंकर्सनी त्यांच्या निर्धारित मर्यादेखाली एंडॉर्स केलेली बिलंही इंपिरियल बॅंक डिस्काऊंट करत होती. तसंच वेगवेगळ्या प्रांतांतील सहकारी बॅंकांशीही तिनं जवळचे संबंध प्रस्थापित करून त्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली. परंतु मुळात बॅंकेने खरीखुरी बॅकर्स बॅंक ही भूमिका निभावावी ही अपेक्षाच अतिशयोक्त होती कारण बॅंक व्यापारउद्योगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अन्य बॅंकाची प्रतिस्पर्धीसुद्धा होतीच. उलट इंपिरियल बॅंक कायदा, १९२० च्या अनुसार अन्य बॅंकांना सरकारी किंवा अन्य रोख्यांच्या तारणावर कर्ज देण्यास ती बांधिलसुद्धा नव्हती
परंतु इंपिरियल बॅंकेची अन्य बॅंकांशी स्पर्धा बरेचदा अतिशयोक्त पद्धतीने रंगवली गेली आहे कारण इंपिरियल बॅंकेच्या जिथं शाखा होत्या तिथल्या अर्ध्या अधिक ठिकाणी अन्य बॅंकांच्या शाखाही नव्हत्या. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांच्याही शाखा होत्या अशाच ठिकाणी स्पर्धेचा प्रश्न उद्भवत होता. मात्र अशा ठिकाणी व्याजदर कमी केल्याने जॉइंट स्टॉक बॅंकांची अर्धीअधिक एकाधिकारशाही नष्ट झाली हेच दिसून आलं, त्याचा फायदा उद्योग जगताला झाला. भारतीय बॅंकांची एक तक्रार अशी होती की इंपिरियल बॅंक परवडणार नाही इतक्या कमी दरात कर्ज देऊनही तिचा ढोबळ नफा सर्वाधिक असायचा कारण तिला सरकारी प्रचंड पैसा विनाशुल्क उपलब्ध असायचा. परंतु इंपिरियल बॅंकेच्या कामकाजावर घातलेल्या निर्बधांमुळे आणि सरकारला विनामूल्य सेवा देण्याच्या वाढीव खर्चामुळे हा फायदा नष्ट होऊन जायचा. तसंच बॅंकेच्या सार्वजनिक ठेवी आणि खाजगी ठेवी यांच्यातील प्रमाणही १/६ पेक्षा कधीही वाढलंच नाही. अधिक समतोल मूल्यमापन करायचं झालं तर असं म्हणता येईल की इंपिरियल बॅंकेचा ढोबळ नफ्याचा जास्त दर कमी किंमतीस ठेवी आकर्षित करून घेण्यामुळेच निर्माण होत होता कारण तिचं व्यवस्थापन व्यावसायिक स्तरावरचं असल्याने जनतेला तिच्याबद्दल अधिक विश्वासही वाटत होता.