१५.४ स्मिथवर झालेला आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

७ डिसेंबर, १९३५ रोजी टेलरनी ग्रीगना लिहिलं की स्टेवार्टचं म्हणणं असं आहे की मी या सगळ्या चर्चांतून दूरच राहावं कारण त्यामुळे गोष्टी आणखीन बिघडल्या तर माझी परिस्थिती फार अवघड होईल. त्यांनी ग्रीगना असंही कळवलं की स्मिथनं राजीनामा दिला त्यामागचं कारण ‘’ तुम्ही काय करताय तेच पाहातो, मला तुम्ही राजीनामा द्यायला सांगता काय तेच पाहायचंय मला’ हे नाही.  एकूणच पत्रव्यवहार पाहाता त्याचा राजीनामा मागण्याइतकं टोकाचं पाऊल उचलण्याएवढं कारण तुमच्याकडे आहे का अशीही मला शंका वाटते. खासकरून त्याचा भारतातील सरकारविरोधी जमावावर काय परिणाम होईल तेही पाहायला हवं. कारण हे लोक त्यावरून नक्कीच गदारोळ करतील. ‘’ टेलरनी ग्रीगना सांगितलं की माझ्यासोबत काम करायचं या उद्देशानेच स्मिथ आले होते आणि त्यांचं दुटप्पी वागणं ग्रीगना वाटतंय ते मुद्दामहून केलेलं नसूही शकतं. टेलरनी सुचवलं की अशीही  शक्यता आहे की स्मिथ आल्या आल्या मुंबईतल्या कुठल्यातरी (बहुदा ए.डी. श्रॉफ)  ब्रोकरनी त्यांच्यासमोर २.५ टक्के लोन हा बॅंक दरातील घटीचा प्रस्ताव ठेवला असेल आणि स्मिथची या गोष्टीस मान्यता आहे हे कळण्याएवढा धूर्तपणा दाखवून त्यानं ही सुवार्ता सगळीकडे पसरवलीही असेल. टेलरनी ग्रीगना सांगितलं की स्टेवार्टनी आपल्याला सांगितलं की नॉर्मन या विषयी फारच चिंतेत आहेत, त्यामुळे त्यांनी सरळ स्मिथना लिहून कळवावं की या वागण्यास सहकार्य म्हणत नाहीत. ‘’ मी जर काही सुचवलंच तर असं सुचवेन की स्मिथ या पलीकडे जाऊन काहीही करणार नाही, तो फारच सावधपणे वागणारा आहे आणि  बॅंक दरात दोन- अडीच पेनींची घट करणं म्हणजे तसं पाहाता पोकळच मोठेपणा आहे.’’ ‘

ग्रीगनी १६ डिसेंबर, १९३५ रोजी टेलरला उत्तर पाठवलं त्यात त्यांना स्मिथबद्दल काय वाटत होतं हे कळून येतं.  हे पत्र या ठिकाणी जवळजवळ पूर्णच दिलं आहे कारण त्यातून ग्रीग  बोलण्यात केवढे तिखट आणि रोखठोक होते ते दिसून येतं. त्यांनी या पत्रात स्मिथनी पैसे खाल्ल्याचा थेट आरोप केला आहे आणि त्यांना जाळ्यात अडकवण्याएवढा पुरावा आपण शोधणं थांबवणार नाही असंही लिहिलं आहे.

‘’  गर्विष्ठ, कुणाचीही भीड न ठेवता बोलणारा, मुळातच ताठ कण्याचा माणूस असं स्मिथचं तुम्ही रंगवलेलं चित्र वाचून मी खोखो हसलो. मला तर तो नखशिखान्त लबाड माणूस वाटतो. सरकारी माहितीचा वापर तो स्वतःते खिसे भरण्यासाठी करील. तो (कदाचित क्रॅडॉकसह ) आणखीही काही लोकांना ही माहिती पोचवील, त्यामुळे तेही लोक स्वतःचे खिसे भरतील. त्यानं या बॅंक दराच्या प्रकरणात माझा  आणि लेमंडसह बर्‍याच जणांचा विश्वासघात केला आहे याचा पुरावा माझ्याकडे  आहे. या पुढे मी त्याच्याशी बोलणं चालू ठेवलं तरीही त्याच्यावर माझा तीळभरही विश्वास यापुढे कधी बसणार नाही. परंतु मी त्याला राजीनामा दे असं सांगू शकेन एवढा भरभक्कम पुरावाचाही माझ्याकडे नाही नाहीतर हाच  माझ्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा लावायचा. म्हणून मी म्हणतो की आपण पुढे काय काय घडतंय याची वाट पाहू परंतु स्मिथला भेटण्यासाठी मी स्वतःहून पाऊल उचलणार नाही. त्यानं मला भेटायला बोलावलं तर मी त्याचं आमंत्रण स्वीकारेन की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. म्हणूनच मी त्याच्याविरूद्ध मिळतील तेवढे बारीक सारीक पुरावेही गोळा करत राहीन आणि आज ना उद्या त्याला नक्कीच जाळ्यात पकडीन. सहकार्य करणं म्हणजे काय याबद्दल ऑटो निम्येरने स्मिथला लेक्चर द्यावं  एवढंच स्टेवार्ट आणि नॉर्मन सुचवतील. परंतु यापुढे मी स्वतः अशी कुठलीही गोष्ट घडूच देणार नाही कारण यापुढे मीच असहकार करायचं ठरवलेलं आहे. आणि जेम्स, मुला, बघच तू, माझे शब्द लिहून ठेव. आपल्या डोळ्यांदेखत तुमची ही रिझर्व्ह बॅंक चारचौघात नाचक्की होऊन कोसळली नाही किंवा मोठा घोटाळा उघडकीला आला नाही तर आपण खूपच नशीबवान ठरू. तुम्ही सगळे मला मूर्ख समजतही असाल परंतु माझंच मत योग्य आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तरीही मी उतावीळपणाने काहीही करणार नाही. जोपर्यंत हा डुक्कर माझ्या तावडीत सापडणार नाही  तोपर्यंत मी माझं काम करतच राहीन. केवळ अहंकार दुखावला म्हणून मी असं म्हणत नाहीये तर सार्वजनिक नीतिमत्ता ठोकरणा-या व्यक्तीस तिथून हाकलून देण्याची वेळ आली आहे म्हणून म्हणत आहे. ही मूर्ख, बावळट आरबीआय एका गोर्‍या माणसाच्या लबाडीमुळे कोसळावी असं मला अजिबात वाटत नाही.’

स्मिथवरील हा शब्दबंबाळ हल्ला पाहून गांगरून गेलेल्या टेलरनी ग्रीगना सांगितलं की मला अजूनही वाटतं की स्मिथला आपल्याशी सहकार्य करायचं आहे, तो रंगास्वामीला उत्तेजनही देत नाहीये. ‘’ माझ्या मते तो उडाणटप्पू स्वतःहूनच त्याचं फालतू लिखाण करतो आहे.’’ टेलर पुढे असंही म्हणाले की मागे  एकदा स्मिथचं नाव त्यानं घेतल्याने मागच्या वर्षी स्मिथ खरोखरच अवघडून गेला होता आणि त्यानं त्याचं लेखन बंद करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु पुढे टेलरनी असंही लिहिलं की ‘’ तो तसं करणारच नाही  असं मात्र मी म्हणणार नाही कारण तो काही बर्‍यावाईटाचा विचार करून लढणारा माणूस नाही.’’

स्मिथना ग्रीगशी सहकार्य करायचं होतं किंवा नव्हतं हा प्रश्न बाजूला ठेवूनही स्मिथच्या आर्थिक सचोटीबद्दल ग्रीगच्या मनात शंका होत्या यास वाल्टर क्रॅडॉक (प्लेस, सिडॉन्स आणि गफ या कलकत्ता-स्थित शेअर ब्रोकिंग फर्मचे वरिष्ठ भागीदार) यांनी दुजोरा दिला आहे कारण स्मिथ खरेदी करायचा त्याच्या पाचपट विकत होता. आर्थिक गैरकृत्यांचा स्मिथविरूद्धचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा पुरावा डिसेंबर, १९३५ च्या केंद्रीय अन्वेषण शाखेच्या कलकत्ता येथील कचेरीच्या अहवालात आहे. आरबीआयच्या समभागांमध्ये वारंवार होणारी अंदाधुंद चढउतार पाहून अफवा सुरू झाल्या की  एक विशिष्ट अधिकारी (स्मिथ) याने काही व्यावसायिकांशी (बद्रीदास गोएंका आणि मांगीराम बांगुर) संगनमत केलं आहे आणि त्यातून मिळालेला नफा हे सगळे मिळून वाटून खात आहेत. तेव्हा या शाखेने आपलं काम सुरू केलं होतं. त्याशिवाय अशीही अफवा होती की रंगास्वामींना स्मिथ गुप्त खबरी द्यायचा आणि त्यातून तो पैसे करायचा. या शाखेने आरबीआयच्या इस्टर्न लोकल बोर्डावरील दोन संचालक  अमर कृष्ण घोष आणि एस. सी. मित्रा यांना बोलावून प्रश्नही विचारले होते. त्या दोघांनी काही धक्कादायक माहिती उघड केली होती. म्हणजे या भानगडीतल्या स्मिथच्या भूमिकेवर बोलताना मित्रा म्हणाले होते की ,’ हे  अगदीच अशक्य नाही.’’ आणखीन महत्वाचं म्हणजे त्यांनी ग्रीगचे पूर्वाधिकारी सर जॉर्ज शुस्टर यांच्याही काही आर्थिक गैरव्यवहारांबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की शुस्टरनीही ‘टिप्स’ देऊन भरपूर पैसा केला होता. बघा ना, बी. एम बिर्ला (ईस्टर्न लोकल संचालक मंडळाचे अध्यक्ष) यांनी चांदीवरील कराबद्दल शुस्टरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ५० लाख रूपयांचा नफा केला.  घोषनी दुजोरा दिला की स्मिथने क्रॅडॉकच्या फर्मच्या आणि मांगीराम बांगुर यांच्या माध्यमातून पैसे केले.

ग्रीगनी स्टेवार्टना लिहिलं की स्मिथनी सरकारी रोख्यांचे जोरदार व्यवहार केले आहेत याचा आपल्याकडे पुरेसा पुरावा आहे. तसंच त्याचे बॅंकेतील काही मित्र अशा रोख्यांचे आपल्या खाजगी खात्यातूनही व्यवहार करत आहेत. त्याच पत्रात त्यांनी पुढे लिहिलं की  आमच्यातलं हे लटकं प्रेमाचं भांडण आहे अशी नॉर्मनची समजूत असेल तर तुम्ही ती खोडून काढा आणि त्यासाठी निकराचा काय उपाय योजावा लागेल त्याचा विचार करा. कॉमनवेल्थ बॅंक ऑफ ऑस्ट्रेलियाचे स्मिथचे समकालीन अधिकारी लेस्ली मेल्विल यांनी एका (खात्री नसलेल्या) अफवेचा तीव्र शब्दांत उल्लेख केला की स्मिथ कुठल्यातरी आर्थिक व्यवहारात गुंतलेले होते, त्यात हितसंबंधांचा संघर्ष झाल्याने त्यांची मुंबईतली त्या बॅंकेतली नोकरी गेली होती.

परंतु आश्चर्य म्हणजे एवढं सगळं कळूनही ग्रीगनी स्मिथच्या अनियमित आर्थिक व्यवहारांबद्दल सखोल चौकशी झालीच पाहिजे हा मुद्दा उचलून धरला नाही. तसंच शुस्टरविरूद्ध केलेल्या अत्यंत गंभीर आरोपांचीही काहीही चौकशी झाली नाही. यातून एकच निष्कर्ष निघू शकतो की गोष्टी चव्हाट्यावर आणल्याने बॅंकेची प्रतिष्ठा डागाळली असती, तिची सार्वजनिक पत आणि विश्वासार्हता कोलमडली असती. ग्रीगनी या विषयाचा पाठपुरावा केला नाही. त्यांना  आपल्यावर अब्रूनुकसानीचा दावा व्हायला नको होता. ( असं त्यानं टेलरना विश्वासात घेऊन सांगितलं होतं.) तसंच स्मिथविरूद्धचा आपल्याकडील पुरावा त्यांना खरोखरच दोषी ठरवेल का याबद्दलही त्यांना खात्री नव्हती. त्याचप्रकारे शुस्टरच्या व्यवहारांच्या चौकशीतून अत्यंत लाजीरवाणा घोटाळा बाहेर फुटला असता तर त्यामुळे ब्रिटिश सत्तेची प्रतिष्ठा गंभीरपणे काळवंडली असती. हेही शक्य आहे की त्या काळात खास माहितीचा वापर करणं इतकं बोकाळलं होतं की अशा प्रकारच्या वागण्यास सरकारी अधिका-याचं गैरकृत्य असा शिक्काही मारता आला नसता. मुळात ग्रीग आणि स्मिथ यांच्यात एवढं शत्रुत्व नसतं तर स्मिथच्या कृत्यांकडे खोडी काढायच्या उद्देशांनी पाहिलंही गेलं नसतं.