१५.२ वित्त सदस्य विरूद्ध आरबीआय गव्हर्नर

स्मिथची बॅंकेतून अकाली उचलबांगडी होण्यासाठी कुठले घटक कारणीभूत ठरले? १९३४ साली वित्त सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या सर जेम्स ग्रीग यांच्यासोबत स्मिथ यांचे संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते.  मंदीच्या काळात इंडिया ऑफिसच्या अधिकार्‍यांशीही त्याची तणातणी झाली होती. तसंच रिझर्व्ह बॅंकेच्या समभागांच्या परताव्यावरून त्यांचे टेलर आणि ग्रीगशी मतभेद झाले होते. ग्रीग आणि टेलर यांना आरबीआय समभागांवर ३.५ टक्के परतावा हवा होता त्यायोगे सर्व केंद्रांवरून ते समभाग पूर्णपणे विकले गेले असते परंतु ३ टक्के परतावा पुरेसा आहे असं स्मिथना वाटत होतं.  आरबीआयचा इतिहास (१९३५- १९५१) यातून व्यावसायिक बॅंकर्स आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील पारंपरिक झगड्याचा उल्लेख होतो. ग्रीग आणि टेलर दोघेही आयसीएसमधून आलेले होते. १९१३ सालच्या परीक्षेत ग्रीग पहिले आले होते आणि टेलर काही गुणांच्याच फरकाने दुसरे आले होते. दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांचा भूतकाळ पाहाता त्यांची जोडगोळी मस्तच जमली होती यात काहीच वाद नव्हता. स्मिथला मॉंटेग नॉर्मनचा पूर्ण पाठिंबा आहे याची ग्रीगला उत्तम जाणीव होती कारण त्यानं स्टेवार्टला लिहिलेल्या पत्रात शेरा मारला होता की,’’ या स्मिथकडे मुसोलिनीसारखी प्रचंड आढ्यता भरलेली आहे. या फुकटच्या आढ्यतेला बर्‍याच अंशी नॉर्मनच जबाबदार आहे. म्हणूनच तो आमच्याशी समान पातळीवरून बोलू शकत नाही.’’ इंपिरियल बँकेच्या व्यवस्थापकीय गव्हर्नर या पदावर काम करताना त्या बॅंकेचं स्वातंत्र्य राखण्याची स्मिथ यांना इच्छा होती. त्यांनी सरकार आणि गृहखात्याचे सचिव यांच्याकडून येणार्‍या दबावाबद्दल पूर्वी तक्रारही केली होती की ‘या लोकांचं वागणं पाहून कुणालाही वाटेल की इंपिरियल बॅंक हा सरकारचाच एक विभाग आहे आणि तोही चटकन डोळ्यात भरणार नाही असा विभाग आहे.’’  त्यामुळेच आत्ताही आरबीआयच्या गव्हर्नरपदावर बसल्यावर  आपण नकळत कुणाकुणाच्या शेपटावर पाय देत आहोत हे न कळून त्यांनी स्पष्टपणे तडकावलं होतं की,’’ आपण लंडन किंवा अन्य कुणाच्याही हो ला हो करणार नाही.’’

स्मिथवर केलेले आरोप त्याच्या कामातील नैपुण्याबद्दल नव्हते तर त्याचं चारित्र्य, दृष्टिकोन आणि स्वभाव यांच्याबद्दल होते. स्मिथची नेमणूक विचाराधीन असल्यापासूनच त्यांच्यावर घारीसारखी नजर रोखली गेली होती. ग्रीग जेव्हा स्मिथला मुंबईत पहिल्यांदा भेटले तेव्हाच ‘त्यांचा स्वभाव अंदाज बांधता येणार नाही असा आहे, त्यांना दारूचं व्यसन आहे’ अशा गोष्टी त्यांनी योग्य ठिकाणी कळवल्या होत्या. त्यांनी स्टेवार्टला लिहिलं की,’’ मला काही हा माणूस जेवढा लोकांनी सांगितला तेवढा धडाडीचा वाटला नाही.  आता गव्हर्नर झाल्यावर त्याला दारूऐवजी पाणी प्यायची सवय करावी लागेल त्यामुळे त्याचा भडकू स्वभाव कदाचित कमी होऊ शकतो.’’ तरीही ग्रीगने गव्हर्नर पदासाठी स्मिथला पाठिंबा दिल्याचं दिसून येतं ते बहुदा रूपयाच्या दराबद्दलचं त्याचं मत त्याला पटलं असावं. कारण आर्थिक आणि राजकीय  सक्षमतेची तीच ‘लिटमस टेस्ट’ होती. स्मिथ १ शिलिंग ६ डाईम दराच्या बाजूने नव्हते. त्यांना वाटत होतं की  अवमूल्यनवाद्यांनी हा वाद नव्याने उकरून काढला नाही तर तो आपला आपणच विरून जाईल. परंतु स्मिथच्या स्वभावाबद्दल मात्र ग्रीगच्या मनात चिंता होती म्हणूनच त्यांनी स्टेवार्टला लिहिलं होतं की,’’ हा स्मिथ  आम्हाला  अधूनमधूनसारखा धक्के देत राहाणार आहे.’’ परंतु हा आरबीआयच्याबाहेर म्हणजे इंपिरियल बॅंकेत राहिला तर आम्हाला केवळ धक्केच नाही तर चक्करच आणेल हे नक्की.’’ परंतु या ठिकाणी ही गोष्ट देखील ध्यानात घेतली पाहिजे की स्मिथच्या निवडीबद्दल ग्रीगने व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलसमोर एकदाही शंका किंवा प्रश्न उपस्थित केला नाही.

अत्यंत कडक स्वभावाचे स्मिथ आणि तसेच भांडकुदळ ग्रीग यांचे स्वभाव एकमेकांशी जुळणार नव्हते तसेच स्मिथ  आणि त्यांचे उपगव्हर्नर जेम्स टेलर या दोघांचेही स्वभाव जुळणारे नव्हते असं लोक बोलायचे. ग्रीगचा स्वभाव वाजवीपेक्षा जास्तच हेकेखोर आणि कठोर होता, स्मिथसोबत चाललेल्या रस्सीखेचीत हा  स्वभाव जास्तच उठून दिसला आणि वरच्या वर्तुळातील लोकांच्याही नजरेस आला. देशमुखांनी निरीक्षण नोंदवून ठेवलंय की स्मिथचा स्वभाव या दोघांच्या स्वभावाशी जुळत नव्हता हे तर होतंच परंतु त्याशिवाय बॅंक दर कमी करण्यामुळे होणारे परिणाम तसंच बॅंकेच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन इत्यादी बाबतीत त्यांच्यात आणि ग्रीगमध्ये खूपच गंभीर मतभेद निर्माण झाले. या सगळ्या गोष्टी स्मिथच्या राजीनाम्यामागे होत्या. त्याशिवाय सोनं देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यावर निर्यातकर लावण्याची स्मिथची सूचनाही सरकारला रूचली नाही.  अर्थात देशमुखांना काय काय गोष्टी माहिती होत्या याबद्दल आपण फक्त अंदाज बांधू शकतो. परंतु देशमुखांनी जेवढं सांगितलं त्यापेक्षा त्यांना खूप काही माहिती होतं असं समजणं फार अतिशयोक्त ठरणार नाही. परंतु मुळात देशमुखांचा तिथं प्रवेशच झाला १९३९ साली, म्हणजे स्मिथने राजीनामा दिल्यावर जवळजवळ दोन वर्षांनी- त्यामुळे त्यांना जे काही कळलं त्यातलं बहुतेक एकतर टेलरनी सांगितलं असणार अथवा त्यांच्या समर्थकांनी सांगितलं असणार. देशमुख हे शेवटी टेलरचेच शिष्य होते.  परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॅंकेचा या काळातला इतिहास लिहिण्यावर देखरेख करणार्‍या संपादकीय समितीचे अध्यक्ष असूनही देशमुखांनी  या प्रकरणाकडे संपूर्ण कानाडोळा केला. त्याबद्दल चंदावरकर लिहितात की,’’ बॅंकेच्या इतिहासातला या प्रकारचा महत्वाचा हा एकमेवच प्रसंग होता.’’

ग्रीगनं आरबीआयच्या संचालक मंडळाच्या रचनेवरही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पद्मपत सिंघानिया या महत्वाच्या हिंदू उद्योजकांचं नाव संचालक मंडळासाठी सुचवण्यात आलं तेव्हा त्यास विरोध केला कारण त्यांचे कॉन्ग्रेसशी आणि फिक्कीशी संबंध होते.  संचालक मंडळात हिंदू व्यावसायिकांची जास्त संख्या असल्याची ग्रीगला वाजवीपेक्षा जास्तच धास्ती वाटून राहिली होती. आरबीआयला स्वायत्ततेचा किंचितसाही वारा लागू नये यासाठी ग्रीगने सुरुवातीपासूनच पावलं टाकली होती. त्यासाठीच टेलर आणि सर सिकंदर हयात खान हे स्मिथचे दोन्ही उपगव्हर्नर निवडताना त्यांनी स्मिथशी सल्लामसलतही केली नव्हती.  यातील सर सिकंदर यांची निवड तर अगदीच दुर्दैवी निघाली कारण त्यांना बॅंकिंग, उद्योग किंवा वित्त यापैकी कुठल्याच क्षेत्राचा अनुभव नव्हता. प्रशासकीय अनुभव म्हटला तर पंजाबचे अल्पकालीन काळजीवाहू राज्यपालपद त्यांनी भूषवलेलं होतं. टेलरप्रमाणेच तेही ग्रीगच्या डावपेचांपुढे मान तुकवणारे होते. त्यांची निवड खरं तर राजकीय उपयुक्तता याच कारणामुळे झाली होती. या पदासाठी चेट्टी आणि व्ही.टी.कृष्णम्माचारी यांच्यासारख्या अन्य भारतीयांचा दावा फेटाळून लावण्यात ग्रीगच थेट जबाबदार होते.

आपण  असतानाही ग्रीग आपल्याशी न बोलता  थेट टेलरशी किंवा अन्य लोकांशी बोलतो असं स्मिथना वाटत होतं आणि तसं वाटण्यामागे सबळ कारणही होतं. ग्रीग टेलर आणि सर सिकंदर यांच्याशी थेट पत्रव्यवहार करून स्मिथला वळसाच घालत होता. तसंच तो व्हाईसरॉय, गृहखात्याचे अवर सचिव ( एस.  एफ. स्टेवार्ट) आणि बॅंक ऑफ इंग्लंड (मॉंटॅग नॉर्मन आणि ऑटो नेमियर) यांच्याशीही स्मिथला डावलून थेट संपर्क साधत होता. याबद्दल स्मिथनी ग्रीगना मे, १९३६ मध्ये पत्र लिहून या गोष्टीकडे बोट दाखवलं होतं,’’ मला डावलून  तुम्ही व्यक्तिशः टेलर यांच्याशी पत्रव्यवहार करता ही माझी हेतुपुरस्सर बेअदबीच आहे’’ अशाच एका प्रसंगी ग्रीगभक्त टेलरलाही खूप अवघडल्यासारखं झालं होतं म्हणून त्यांनी ग्रीगना आणि अर्थसचिव निक्सनना लिहिलं होतं की सांकेतिक तारा अधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करून पाठवण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. परंतु स्वतः टेलरनीही  असंख्य वेळा स्मिथला टाळून पुढे जाण्यात अजिबात मागेपुढे पाहिलेलं नाहीये.  या गोष्टी एवढ्या वाईट थराला गेल्या की एकदा ग्रीगला बरं नाहीये हे स्मिथना ‘कॅपिटल’ या अर्थविषयक साप्ताहिकाच्या बातमीतून कळलं.

या अविश्वासामुळे टेलरसोबतचे त्यांचे मतभेद अधिकच विकोपाला गेले. पुढे पुढे तर हे संबंध एवढे बिघडले की दोघंजण एकमेकांना टाळण्याची शिकस्त करू लागले. या शत्रुत्वाने मूर्खपणाची एवढी पातळी गाठली की एकमेकांना टाळण्यासाठी ते भरपूर मोठ्या रजा घेऊ लागले.  १९३५ मध्ये स्मिथ आरबीआयच्या लंडन शाखेच्या स्थापनेसाठी इंग्लंडला गेले ते तिथं पाच महिने राहिले, त्यात त्यांनी कुठल्यातरी आजारासाठी औषधोपचार घेतले. ते तिथून परतल्यावर टेलर ‘सहा महिन्यांच्या आजारपणातून विश्रांतीच्या’ रजेवर गेले. टेलर परतल्यावर थोड्याच काळात स्मिथनी लंडनला प्रयाण केलं. ही भेटही पाच महिने लांबली. या काळात स्मिथची बॅंकेतून उचलबांगडी व्हावी यासाठी ग्रीगनी पार्श्वभूमी तयार केली.

मुंबईतील सर होमी मोदींसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या बाजूने स्मिथ झुकलेले आहेत असं सरकारला वाटू लागलं. लॅंकेशायर कराराबद्दल हळूहळू भ्रमनिरास होऊ लागलेले मोदी हळूहळू कॉन्ग्रेसजवळ जाऊ लागले होते. पुरुषोत्तमदासांशिवाय स्मिथचे दुसरे निकटवर्ती मित्र होते शेअरब्रोकर आणि विख्यात अर्थतज्ञ ए. डी. श्रॉफ. केंद्रीय विधीमंडळाच्या संयुक्त निवडसमितीसमोर श्रॉफनी तज्ञ या नात्याने साक्ष दिली होती. याच समितीच्या अहवालानंतर आरबीआयच्या स्थापनेची पावले उचलण्यात आली होती. तोपर्यंत श्रॉफ हे भारताच्या आर्थिक विकासाचे खंदे प्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. आरबीआयचं स्वातंत्र्य कायम राहावं, तिचं रूपांतर आणखी एका सरकारी खात्यात होऊ नये यासाठी चाललेल्या स्मिथच्या लढ्याला त्यांचा पाठिंबा होता.

सुचेता दलाल यांनी श्रॉफ यांचं चरित्र लिहिलंय, त्यात त्यांनी निरीक्षण नोंदवून ठेवलंय की : श्रॉफ हे सर ऑस्बोर्न यांच्या नको तितके जवळचे आहेत असं मानलं जात होतं त्यामुळेच सर ऑस्बोर्न स्मिथना भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल वाटणारी सहानुभूती ब्रिटिश सरकारला  खटकत होती. १९३४ सालच्या श्रॉफ आणि स्मिथ यांच्यातील पत्रव्यवहारातून दिसून येतं की त्यांच्यात खूप जवळीक होती आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस स्मिथचा भरपूर पाठिंबा होता. ऑगस्ट, १९३६ मध्ये श्रॉफना पाठवलेल्या पत्रात स्मिथनी लिहिलंय,’’ भारतीय वृत्ती आणि भारतीय ध्येये यांच्याप्रती माझी समज आणि सहानुभूती यांच्यामुळे ग्रीगसारख्या  एकारलेल्या, हुकूमशाही दुःखद प्रवृत्तींच्या दृष्टीने मीही संशयित ठरतो.’’ सर सिकंदर यानी सक्रिय राजकारणात परतायची इच्छा प्रकट केल्याने त्यांच्या जागी उपगव्हर्नर म्हणून श्रॉफ यावेत अशी स्मिथची इच्छा होती. त्यामुळे लंडनला दिलेल्या दुस-या भेटीच्या वेळेस त्यांनी श्रॉफचं नाव सुचवलं. श्रॉफ यांचे मनमोकळे विचार आणि राजकीय कल यांच्यामुळे त्यांचं नाव कुणाला पसंत पडणं शक्य नव्हतं. ते कॉन्ग्रेसी अर्थतज्ञ आहेत याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्या आधी म्हणजे जुलै, १९३६ मध्ये स्मिथनी श्रॉफना लिहिलं होतं,’’  फार कठीण होत चाललंय, तुम्हाला माहितीच आहे मी अगदी वैतागून गेलो आहे आणि मला या पदावर राहाण्याची इच्छाच उरलेली नाही. मला कुणाकडूनही सच्चा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल असं वाटतच नाही.’’ या ठिकाणी ते टेलरना उद्देशून बोलत होते, त्यांच्यावर स्मिथचा विश्वास नव्हता. ग्रीगसोबत हातमिळवणी करून कटकारस्थाने केल्याचा आणि ग्रीगला बॅंकेच्या कामकाजात ढवळाढवळ करू देण्याचा आरोपही त्यांनी टेलरवर नंतरच्या पत्रात केला होता.

पुरुषोत्तमदासांना एका पत्रात स्मिथनी लिहिलं की बॅंकेवर वर्चस्व गाजवण्याच्या या लोकांच्या प्रयत्नामुळे मी फार गांजून गेलो आहे. ग्रीगसोबत हा टेलर माझ्याविरूद्ध सातत्याने कटकारस्थाने करत असतो याबद्दल मी आज त्याला  स्पष्ट  सांगितलं  आहे.  मला कळलंय की मी जरा कुठे बाहेर गेलो की तो लगेच जाऊन ग्रीगला भेटतो, वर मला त्याबद्दल शब्दानेही काही सांगत नाही. मी त्याला हेही सांगितलं की तो पूर्णतया सरकारचा हुज-या बनला  आहे. ही खरंच मोठी दुःखा़तिका असून मी जेव्हा येथून जाईन (हे लवकरच घडून येणार आहे) तेव्हा हा टेलर गव्हर्नर झाला तर ही बॅंक नक्कीच सरकारच्या दावणीला बांधली जाणार. या टेलरची आणि त्या ग्रीगची सारखी पत्रापत्री चाललेली असते आणि त्याबद्दल ते मला काही सांगतही नाहीत.’’

टेलर स्मिथना सर ऑस्बोर्न किंवा गव्हर्नर म्हणून कधीही संबोधत नसे म्हणूनही स्मिथचा चडफडाट होत असे. टेलरला लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी त्यांना थेटच विचारलं होतं,’  एक गोष्ट मला तुमच्याशी बोललीच पाहिजे आणि तीही लवकर बोलली पाहिजे. ती म्हणजे मला नुसतं ‘स्मिथ’ म्हणून संबोधायची सवय तु्म्ही ऑफिसच्या कामकाजात लावून घेतली आहे तसंच ती पत्रव्यवहारातही लावून घेतली आहे. मग तो पत्रव्यवहार आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांशी का असेना. ‘लंडनमध्येही एम. नॉर्मन यांच्याशी झालेल्या ऑफिसच्या कामकाजाच्या चर्चेच्या वेळेस तुम्ही एकदाही माझी पदवी (म्हणजे सर ऑस्बोर्न किंवा गव्हर्नर) उच्चारून मला यथायोग्य मान दिला नाहीत.  एम. नॉर्मननाही हे चांगलंच खटकलं हे मला माहिती आहे. माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची मैत्री असूनही ऑफिसच्या कामकाजासंदर्भात बोलत असताना त्यांनी पदवीशिवाय माझ्या नावाचा कधीही उच्चार केलेला नाही.’’ त्यावर टेलरनी त्यांना उत्तरादाखल लिहिलं की,’’ आपणास सर ऑस्बोर्न अथवा गव्हर्नर म्हणून संबोधण्याची माझी पूर्ण तयारी आहे. अर्ध-सरकारी (डेमी-ऑफिशियल) पत्रांतही तसं लिहू नये हे माहिती नसल्याने मला अजिबात कल्पना नव्हती की मी आपला अनादर करीत आहे. मी तर सरकारी प्रथेचं अनुकरण करत होतो. तथापि आता माझ्या लक्षात आलं आहे की मी सरकारी नोकरी सोडली आहे आणि आणखी वेगळी नोकरी धरली आहे जिथे  अधिक कडक परंपरा पाळल्या जातात. मी त्याप्रमाणे वागण्यास तयार आहे.’’

पुरुषोत्तमदासांनी स्मिथना लिहिलेल्या पत्रात आरबीआयच्या उपगव्हर्नरपदासाठी श्रॉफ योग्य आहेत असं लिहिलं होतं. श्रॉफ यांच्या क्षमतांबद्दल स्मिथना पूर्ण खात्री होती परंतु त्यांचं नाव खराब झालेलं होतं, तसंच त्यांनी पूर्वी केलेली विवादास्पद कृत्ये त्यांना हे पद मिळण्याच्या आड येतील असं त्यांना वाटत होतं. पुरुषोत्तमदासांना २१ जुलै, १९३६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्मिथनी सांगितलं की श्रॉफ उपगव्हर्नर बनले तर त्यांना खूप मोठा आर्थिक त्याग करावा लागेल.’’ तुम्ही जे काही ठरवाल त्याला माझा पाठिंबा असेल. या पदावर बसण्यासाठी त्यांच्याइतका दुसरा लायक भारतीय माणूस मला दिसत नाही. मला ते आवडतात, मला त्यांच्याबद्दल काम करायला विश्वासही वाटेल. आम्ही दोघं एकत्र चांगलं काम करू परंतु ते टेलर आणि ग्रीग यांबरोबर काम करायला तयार होतील का त्याबद्दल मला शंका वाटते कारण ग्रीगला ते आवडत नाहीत आणि त्याला तर त्याची नावड स्पष्टपणे दाखवण्याची सवय आहे.’’

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पुरुषोत्तमदासांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देऊन श्रॉफनी स्मिथना लिहिलं की ग्रीगला त्याची मनमर्जी करायला मिळाली तर ते सर सिकंदरच्या जागी दुसरा कुणीतरी आयसीएस माणूसच आणतील. ग्रीगनी पुरुषोत्तमदासांना आडून सांगितलंही होतं की सरकारला श्रॉफ त्यांच्या राजकीय मतांमुळे मान्य होणार नाहीत परंतु पुरुषोत्तमदासांना त्या शर्यतीत श्रॉफ यांचंही नाव असावं असं वाटत होतं कारण त्यामुळेच ‘’ सरकार कसं चुकीचं वागतंय, मी राजकारणात आहे म्हणून ते माझं नाव वगळत आहेत,’’ असा गाजावाजा करून श्रॉफ सरकारला खिंडीत गाठू शकतील.’’ ग्रीगला श्रॉफ आवडत नव्हते हे तर सर्वज्ञात होतं. त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं होतं की ‘ श्रॉफ हा फारच भयंकर माणूस असून सर ऑस्बोर्न स्मिथ यांची हुजरेगिरीच करील.’’ स्मिथनी पुरुषोत्तमदासांना १० ऑगस्ट, १९३६ रोजी लिहिलं की क्षमता आणि उपयुक्तता या दृष्टीने पाहाता  एडी (श्रॉफ) हाच योग्य माणूस वाटतो परंतु ग्रीगला त्याच्या ताटाखालचं मांजर बनायला तयार नसलेला  अधिकारी किंवा अन्य माणूस या जागी बसलेला आवडेल  असं मला वाटत नाही.’’  भारतीय स्वातंत्र्यप्रेरणा तसंच पुरुषोत्तमदास किंवा श्रॉफ यांसारख्या माणसांबद्दल ग्रीगच्या मनात अजिबात सहानुभूती नाही ही गोष्ट त्यानं आत्मचरित्र लिहिलं त्यातून स्पष्टच झाली आहे. त्यानं त्यात लिहिलं होतं की चार वर्षांतच आरबीआयवर  मोठ्या हिंदू व्यावसायिकांनी वर्चस्व मिळवलं. हे लोक कॉन्ग्रेसी गटातून आलेल्या सूचनांबद्दल खूपच संवेदनशील असतात. त्यातल्या बर्‍याच जणांनी कॉन्ग्रेसला निधीसुद्धा दिला आहे.’’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्मिथसोबत आपलं जमत नव्हतं याचा ग्रीगनी आठवणींत उल्लेखही केलेला नाही.

ग्रीगला एक गोष्ट अजिबातच गळी उतरत नव्हती ती म्हणजे स्मिथची सी. एस, रंगास्वामी या ‘इंडियन फायनान्स’ नामक साप्ताहिकाच्या संपादकाशी असलेली मैत्री. तडकफडक भाषा वापरण्याच्या  स्वभावानुसार ग्रीगनी टेलरना १८ मार्च, १९३५ रोजी लिहिलं ‘’ मग काय, मीही स्मिथच्या काळ्या यादीत आहे तर.  कदाचित म्हणूनच हे मास्टर रंगास्वामी या आठवड्याच्या इंडियन फायनान्समध्ये त्यांचे रंग दाखवताहेत. कारण आता  या डुक्कर रंगस्वामीचा पाठिंबा आपल्याला हवा असला तर महागाईबद्दलच्या त्याच्या अर्ध्या कच्च्या कल्पनांवर  आपणही  आंधळा विश्वास ठेवायला हवा हे तर स्पष्टच झालेलं आहे. ते काहीही असो, या स्मिथला फारच जास्त मित्र आहेत आणि हे सगळे त्यांची महागाईच्या विचारांनी भरलेली डोकी वर काढत आहेत, त्यामुळे मला आता या स्मिथच्या बाबतीत कुठलीही संधी घ्यायची नाहीये. मी ही परिस्थिती मॉण्टीला आधीच सांगून ठेवणार आहे.’’ ग्रीगनी टेलरला रंगास्वामीच्या स्मिथवरील प्रभावाबद्दलही लिहिलं होतं. त्यानं लिहिलं होतं की स्मिथला लोकप्रिय व्हायचं आहे , तो जेव्हा इंपिरियल बॅंकेत होता तेव्हा त्याला ते शक्य झालं. पण आता तो तिथून  इथं आला तेव्हा त्याला कळायला लागलंय की केंद्रवर्ती बॅंकेचा गव्हर्नर काय किंवा वित्त सदस्य काय या दोघांनाही लोकप्रिय होता येणार नाही म्हणजे नाहीच.  

 

त्यानंतर काही काळानं ग्रीगनं त्रावणकोरचे दिवाण सी. पी. रामस्वामी अय्यर यांची तक्रार स्मिथच्या लक्षात आणून दिली.  त्यात त्यांनी रंगास्वामींच्या छापील भाषणाबद्दल तक्रार केली होती. त्रावणकोरमधील बॅंकांमध्ये ठेवी काढून घेण्यासाठी झुंबड लावली होती. त्या बॅंकांना स्मिथने मदत करावी म्हणून त्यांचं मन वळवलं पाहिजे असं रंगास्वामींनी त्या भाषणात म्हटलं होतं. १८ मे, १९३६ रोजी ग्रीगनी स्मिथना लिहिलं,’’ तुमचं नाव हा माणूस उगाचच घेतो तर त्यानं ते घेऊ नये यासाठी एखादं निकराचं पाऊल उचलणं तुम्हाला शक्य होणार नाही का?’’ त्यानं भूतकाळात आपल्यामध्ये पुष्कळ कटकटी निर्माण केल्या आहेत आणि आपण जर काळजी घेतली नाही तर तो पुन्हा तसंच करील. त्यामुळे तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि जाहीररीत्या सांगा की त्या माणसाचा तुमच्यावर काहीही प्रभाव नाही.’’