१५.३ आर्थिक अनियमितता

रूपयाचे गुणोत्तर आणि बॅंक दर हे स्मिथच्या कार्यकाळातले दोन अत्यंत महत्वाचे आणि विवादास्पद मुद्दे होते. स्मिथचा विचार गव्हर्नरपदासाठी चालू होता तेव्हा विनिमय गुणोत्तराबद्दलची त्यांची भूमिका ग्रीगना आश्वासक वाटली होती. तसं पाहिलं तर स्मिथनी गुणोत्तराचा विषय खाजगीत किंवा चारचौघांसमोर कधीही काढला नव्हता तरीही ग्रीगच्या मनात त्यांच्याबद्दल संशय होता की आरबीआयच्या बोर्डावर आणि स्थानिक समित्यांवर वर्चस्व असलेल्या अवमूल्यनवादी, सट्टेबाज अशा भारतीय व्यावसायिकांशी स्मिथचं संधान आहे. तथापि, स्मिथ आणि ग्रीग यांच्यातील खरा वाद बॅंक दराबद्दल होता. स्मिथना दरात घट व्हायला हवी होती कारण पैसा स्वस्त झाल्यामुळे मंदीतून मार्ग काढता आला असता म्हणून बॅंक दर ३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणावा हा मुद्दा होता परंतु या मुद्द्याच्या फायद्यातोट्यापेक्षाही हा निर्णय घेताना आपलं मत विचारात घेतलं नाही हाच ग्रीगच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा  होता. दरातील बदलावर आपल्याला अंधारात ठेवलं गेलं होतं असं ग्रीगनी थेट व्हाईसरॉयनाही सांगितलं होतं परंतु ते खरं नव्हतं. स्मिथशी त्याबद्दल खाजगीत बोलून संशयनिरसन झाल्यावर व्हाईसरॉयनी ग्रीगना सांगितलं की स्मिथनं तुम्हाला या मुद्द्यावर अंधारात ठेवलं ही गोष्ट ते नाकारत आहेत. माझ्याकडेही असा सज्जड पुरावा आहे की त्यांनी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं होतं. हल्लीच प्रकाशात आलेल्या टेलरच्या पत्रांवरून दिसून येतं की स्मिथचं म्हणणं खरं होतं.

१४ नोव्हेंबर, १९३५ रोजी ग्रीगनी स्मिथना लिहिलं की बॅंक दर कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे असं आपलं मत आहे. म्हणून आपण त्याविषयी बोलण्यासाठी मला भेटायला या.’’ त्याच पत्रात त्यांनी लिहिलं की मला आणखीही एका विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. रंगास्वामींसोबत तुमचे काय संबंध आहेत ते मला विचारायचं आहे. तुम्ही जेवढा वेळ भारताबाहेर होतात तेवढा सगळा वेळ हा डुक्कर रंगास्वामी टेलरवर हल्ला करत होता. आणि मी तुमच्या लवकर परत येण्याबद्दल प्रार्थना करत होतो, तुम्ही परत आलात म्हणजे शेअर बाजारही पुन्हा वर जाईल. आता तुम्ही परत आल्यावर काही महत्वाच्या घडामोडी घडून आल्या तर त्याचा अर्थ असा होईल की आपल्या दोघांत दुफळी निर्माण करण्यात हा माणूस पूर्णतया यशस्वी झालेला आहे.... तसं असेल तर मी नुसताच गप्प  उभा राहू शकत नाही.  असंही विवेकाच्या बाजूनं उभं राहाणं अवघडच असतं म्हणा, परंतु  आपण दोघांनी पूर्ण एकमत दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ वर्तनातच नव्हे तर लोकांना ते दिसूनही आलं पाहिजे आणि तेच तर खूप कठीण आहे. ‘’

स्मिथनी त्या पत्रास १८ नोव्हेंबर रोजी प्रतिसाद दिला,’’ तुमचं पत्र वाचून मला खरोखरच खूप दुःख झालं. माझा रंगास्वामींशी आणि त्यांच्या लेखनाशी कुठल्यातरी स्वरूपात संबंध आहे असा त्यातून सूर निघत असल्याने मी अस्वस्थ झालो आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मला त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीची काहीही गरज नाही. तसंच भारत सोडून मी निघालो त्यानंतर मी ना त्याला पाहिलं ना त्याचं साप्ताहिक वाचलं. मला वाटतं की इथं किंवा इंग्लंडमध्येही जे कुणी महत्वाचे लोक आहेत त्यांना तुमच्याबद्दलचे माझे विचार माहिती आहेत.  कोण कुठला तो टीनपाट पत्रकार, त्यानं लिहिलेल्या गोष्टी तुम्ही गंभीरपणे घेऊन त्यावर कृती करण्याचा विचार करता किंवा  त्याच्यामुळे आपल्यात फूट पडते असं तुम्हाला वाटतं हे माझ्या आकलनाबाहेरचं आहे हे आता मला कळतंय.  त्या रंगास्वामीला कुत्रंसुद्धा विचारत नाही. त्याचं नाव सगळीकडे खराब झालं आहे. तरीही तुम्हाला माझा राजीनामा हवाच असेल तर तो तुम्ही खुशाल घ्या. कारण माझ्याऐवजी तुम्ही राजीनामा दिलात तर ते अधिक गंभीर प्रकरण ठरेल.

बॅंक दर कमी केल्यासंबंधात स्मिथनी ग्रीगना सांगितलं की यामुळे शेतीला मदत होईल  असं आपल्याला वाटतं. ते पुढे म्हणाले की : या बॅंक दरापेक्षा वित्तीय बाजाराचा दर जास्त आहे. मी परत आल्यावर सरकारी रोखे विकले कारण मला तुमच्या इच्छेस विरोध करायचा नव्हता. तरीही मला ही गोष्ट ठामपणे वाटते की मध्यवर्ती बॅंक या नात्याने आपलं जनतेप्रती काही कर्तव्य आहे. त्यामुळे ७ वर्षांचे कर्जरोखे अडीच टक्के व्याजदराने आपण ऍट पार विकले तर त्यामुळे दर खाली येण्यास खूप मदत होईल. त्यानंतर पत्राच्या शेवटी पुन्हा रंगास्वामी प्रकरणाकडे येत स्मिथनी आपण राजीनामा देतो असं सांगितलं. ‘’रंगास्वामीला भेटून काही चांगलं निष्पन्न निघेल असं तुम्हाला वाटत असलं  तर मी त्याला भेटेन. परंतु पूर्वीही त्यानं मला वचन दिलं होतं की तो माझी आंधळी भक्ती करणार नाही. मला त्याची  अंधभक्ती बेभरवाश्याची वाटते. खरोखरच मला त्याचा तिरस्कार वाटतो. त्याच्या कृत्यांची जबाबदारी मी घेऊ शकत नाही.  त्यामुळेच मी राजीनामा देण्यास स्वेच्छेने तयार आहे असं लिहून हे पत्र संपवतो.’’

२० नोव्हेंबर रोजी ग्रीग आणि स्मिथ फोनवर बोलले आणि ग्रीगनी ते संभाषण तपशीलवार लिहून काढलं. संभाषणास सुरुवात झाली तेव्हा ग्रीग रंगास्वामीवरून आपल्यावर आरोप करतो म्हणून स्मिथ खवळून बोलायला लागला. त्याबद्दल ग्रीगनं लिहिलंय,’’ स्मिथ सारखा माझ्याबद्दल गैरसमज करून घेत होता.  आमच्या दोघांत मतभेदांची दरी आहे हे लोकांना कळू न देणे तसंच दुसरं कुणी माझ्याविरूद्ध त्याचा वापर करत असेल तर त्याला तो करू न देणे हा माझा मुद्दा होता.’’ त्यानंतर त्या दोघांत बॅंक दराबद्दल चर्चा झाली आणि तो खाली आणण्यापूर्वी एक आठवडा थांबण्यासही स्मिथ तयार झाला. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्याला त्याबद्दलची ग्रीगची मतंही समजून घेता आली असती. त्यामुळेच ग्रीगने व्हाईसरॉयला खोटंच सांगितलं होतं  की स्मिथनं बॅंक दर कमी करण्याची गोष्ट माझ्याजवळ काढलीच नाही हे सिद्ध झालं.

स्मिथनी ग्रीगना सांगितलं की शेतीचं हित लक्षात घेऊन आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाने व्याजदरात घट केलेली आहे. त्यावर ग्रीगनी स्मिथना सांगितलं की हा दराचा प्रश्न तुम्ही संचालक मंडळाशी एवढ्या मोकळेपणाने बोलता हे बघूनच मला धक्का बसला  आहे कारण त्यातील काही लोक ही माहिती नक्कीच स्वतःच्या फायद्यासाठी  वापरतील. स्मिथ सिक्युरिटीज ऑन बॅलन्स विकतो आहे  असाही प्रवाद होता.  ‘’ रिझर्व्ह बॅंक, इंपिरियल बॅंक आणि सेंट्रल बॅंक यांनी एकत्रितपणे रोखे विकत घेण्याची खेळी खेळावी असं क्रॅडोकने निक्सनला सांगितलं असतानाही हा माणूस सिक्युरिटीज ऑन बॅलन्स विकूच कसा शकतो हे मला समजूच शकत नाही असं मी म्हणालो.’’ ते  ऐकल्यावर  मग स्मिथची आक्रमकता नाहीशी झाली. त्यानंतर मग ठरलं की त्यानं केलीसोबत या विषयावर बोलायचं, त्यानंतर केलीने दिल्लीला येऊन मला भेटायचं.  त्यानंतर क्रॅडॉकने निक्सनला तार करून आठवण करून दिली की माझी तुला पाठवलेली साप्ताहिक पत्रं गोपनीय असतात. ही खरोखरच  आत्तापर्यंत घडलेली लक्षणीय बाब आहे. म्हणजे काहीतरी डांबीसपणा झालेला आहे  आणि खाजगीत रोखे विकून फायदा करायचा प्रयत्न स्मिथनं केला आहे.’’

या संभाषणानंतर तीन दिवसांनी ग्रीगनी स्टेवार्टना लिहिलं की,’’ परत आल्यापासून हा स्मिथ काहीतरी विचित्रच वागतो आहे आणि आता मला याच्याशी  एकदाच काय ते शेवटचं बोलून घ्यायला हवं. फक्त आपण नॉर्मनना खाजगीत सांगा की  आपणास सर्व सत्य परिस्थिती समजेपर्यंत कृपया स्मिथला पाठिंबा देणारे कुठलेही संदेश पाठवू नका. तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा प्रश्न केवळ निर्णयशक्तीत दोष असण्याचा नाहीये किंवा स्वतःचं तारतम्य वापरण्याचाही नाहीये. तर माझ्यापासून हेतुपुरस्सर गोष्टी लपवण्याचा  किंवा त्याहूनही वाईट आहे. दुस-या दिवशी ग्रीगनी स्मिथना लिहिलं की ७ वर्षांचे कर्जरोखे घेऊन बाजारात जायची आपली तयारी नाही कारण ट्रेझरी रोख्यांपेक्षा ते अधिक महाग ठरतील आणि मी सरकारचा कॅश बॅलन्स वाढवण्यास तयार झालो तरच ते शक्य होईल परंतु त्यामुळे तर ते आणखी महाग होतील. बॅंक दराबद्दल ग्रीगनी म्हटलं की स्मिथला आपण हा दर कमी करण्यापासून रोखू शकलो नाही तरी मला हे लेखी स्वरूपात द्यावंसं वाटतं की त्यामुळे कुठलाही उपयुक्त हेतू साध्य होणार नाही आणि काही बाबतीत तर तो  अनिष्टच ठरेल.’ ‘’ या दर घटवण्याच्या बाबतीतला तुमचा युक्तिवाद तर मला मुळीच पटत नाहीये. त्यामुळे तुम्ही माझं मत तडकाफडकी धुडकावून लावलंत तर मला एकच पर्याय राहील. म्हणजे तुम्हाला माझ्याशी सहकार्य करायचं नाही असं गृहीत धरणे. खरं तर मी भारतात येण्यास तयार झालो तेव्हा श्री. नॉर्मननी वारंवार तुमच्याबद्दल खात्री दिली होती की तुम्ही मला सहकार्य कराल.’’

बॉंबे आणि कलकत्ता या दोघांनाही अडीच टक्क्यांच्या कर्जाची माहिती आहे, त्याहूनही महत्वाचं म्हणजे बोर्डाची बैठक होण्यापूर्वीच स्मिथला व्याजदर कमी करण्याची इच्छा आहे असा वास मार्केटला लागला आहे म्हणून आपल्याला आलेला वैताग ग्रीगनी व्यक्त केला. ‘’तुम्ही माझं मत सांगण्याची विनंती केलीत परंतु त्यावर पूर्ण विचार करण्याची संधीच मला मिळाली नाही.’ असं ग्रीग त्यांना म्हणाले. त्याहूनही वाईट म्हणजे या विषयावर आपल्यात आणि ग्रीगमध्ये मतभेद आहेत ही गोष्टही स्मिथनं बोर्डाला कळू दिली होती. या प्रकारच्या गैरसमजातूनच  बहुदा स्मिथनं सरकार आणि आरबीआय यांच्यात  एक मध्यस्थ अधिकारी  नेमावा अशी जगावेगळी सूचना केली असावी. ‘’ या देशात गोपनीय माहिती बरेचदा फुटते त्यामुळे अशा फुटीस बगल देण्यासाठी काहीतरी पद्धत तर अवलंबायलाच हवी. वित्त सदस्य आणि गव्हर्नर यांच्यातील संवादाबाबत तर ते अगदीच लागू आहे.’’स्मिथनी मग सुचवलं की आमच्यातले महत्वाचे निर्णय हा अधिकारी एकमेकांना तोंडी कळवेल. ग्रीगना हा विचार पसंत पडला परंतु त्यातून काहीच निष्पन्न घडलं नाही कारण तसा सोयीस्कर उमेदवार मिळणंच अवघड होतं. नंतरच्या काळात सी.डी. देशमुख त्या पदावर आले.

सर सिकंदरही टेलरना सगळ्या घडामोडी कळवायचे. २ डिसेंबर, १९३५ रोजी त्यांनी त्यांना लिहिलं,’’ सर जेम्स ग्रीग आणि सर ऑस्बोर्न यांच्यात बॅंक दराच्या प्रश्नावरून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत हे ऐकून तुम्हाला वाईट वाटेल. हे दोघे कसे आहेत हे तुम्हाला माहिती असल्यामुळे पुढे काय होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. सर ऑस्बोर्न यांच्या बोलण्यावरून मला समजलं की दोघांमध्ये खूपच तणातणीचा पत्रव्यवहार घडून आला आहे. नंतर मागच्या बुधवारी केलीने एक निरोप आणला. तो म्हणजे सर ऑस्बोर्न यांनी प्रस्ताव दिल्यानुसार बॅंक दर जर ३ टक्क्यांवर खाली आणला तर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सर ऑस्बोर्न एवढे अस्वस्थ झाले की पुढील साप्ताहिक बैठक होईपर्यंत या विषयावरील निर्णय रोखून धरण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरले आणि २७ तारखेलाच बॅंक दर ३ टक्क्यांवर खाली आणण्यात आला.

सर सिकंदर असंही म्हणाले की,’’ हा सगळा प्रकार अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. सद्य तणाव असाच टिकून राहिला किंवा त्यात नवीन भर पडली तर इथे आणखी थांबण्यात काही अर्थ आहे का याचा मला गंभी्रपणे विचार करावा लागेल.’’ परंतु ग्रीग आणि टेलर या दोघांचेही सर सिकंदर यांच्या क्षमतांबद्दल फारसे उच्च मत नसावे निदान त्यांच्यातील पत्रव्यवहार तरी तसं दर्शवतो. २९ एप्रिल, १९३६ रोजी टेलरने ग्रीगला लिहिलं की जर सिकंदर निघून गेले तर आपल्याला त्यांच्या जागी ठामपणे उभा राहाणारा माणूस पाहिजे. राजकीय कळपातून बाहेर फेकला गेलेला आणि त्यात नव्याने प्रवेशाची योग्य संधी शोधत राहाणारा माणूस नकोय आपल्याला.  आज  राजकारणात आहेत तर उद्या नाहीत अशा राजकारणी लोकांची वर्णी लावण्याचं ठिकाण बनण्याच्या धोक्यात बॅंक आधीपासूनच पडलेली आहे.  ही हास्यास्पद पद्धत आपण चालूच ठेवली तर विधीमंडळातील सदस्यांवर लावलेला प्रतिबंध लवकरच काढून टाकावा लागेल आपल्याला. ‘’ खरं तर टेलरनी मध्य प्रांत आणि वर्‍हाडातील महसूल सदस्य सर आयरे गॉर्डनना एप्रिल, १९३६ मध्येच लिहिलं होतं की आम्हाला असा एक  भारतीय अधिकारी निवडून द्या, जो उपगव्हर्नरच्या बढतीसाठीही नंतर योग्य ठरेल. सी. डी. देशमुख त्यासाठी योग्य ठरतील का असंही त्यांनी विचारलं होतं. परंतु सरकार त्यांना तिथून सोडण्याची शक्यता फार कमी होती.