२६.६ शेतकी क्षेत्रास वित्तपुरवठा

अगोदर चर्चा केल्यानुसार ग्रामीण भागास वित्तपुरवठा करताना बॅंक वित्तक्षेत्र, मार्केटिंग, प्रक्रिया आदी क्षेत्रांत सहकारी संस्थांच्या विकासास मदत करत होती. शेती आणि मळ्यांना थोडाफार थेट कर्जपुरवठा केला असला तरी बॅंकेचा शेतीसाठीचा वित्तपुरवठा मुख्यत्वेकरून सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच होता. बॅंकेने शेतकर्‍यांना थेट कर्जे देणे अपेक्षित नव्हते.

तथापि, ग्रामीण कर्ज संरचनेतील अपुरेपणा लक्षात घेता बॅंकेने थेट शेतकर्‍यांना कर्ज पुरवण्याच्या दिशेने आपलं धोरण वळवण्यास सुरुवात केली. १९६५ मध्ये प्रायोगिक तत्वावर हायब्रीड बियाणं निर्मिती, पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आदी खास जोपासना पद्धतींना थेट वित्तपुरवठा करून या  दिशेनं बॅंकेने  पहिलं पाऊल टाकलं. या छोट्या छोट्या प्रयोगांमुळे मिळालेल्या मजबूत आधारावर ती विद्यमान शेती प्रक्रिया आणि जमीन विकास, शेतांचं यांत्रिकीकरण  इत्यादींसाठी उत्पादन कर्जेही देऊ लागली. शेतकी मालावरील प्रक्रिया, साठवण आणि मार्केटिंग यांच्यासाठीही कर्जे देऊ लागली. सहकारी संस्थांसोबत स्पर्धा होणार नाही याची काळजी घेऊनच हे काम केलं जात होतं. 

त्याशिवाय बॅंकेने प्रदेशविकास योजनांनाही कर्जपुरवठा सुरू केला. उदाहरणार्थ, वाराणसी आणि इटा या उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांत एकूण  ३.२० लाख एकर जमीन शेतकी विकासाच्या सर्वसमावेशक योजनेखाली आणण्यात आली. ते करताना पाणीपुरवठ्यासाठी भूजल पातळीचा विकास , तसंच भूविकास, पिकांचे नियोजन, खतांचे-कीटकनाशकांचे वाटप इत्यादी गोष्टी प्राधान्यक्रमाने करण्यात आल्या. तसंच तेरई पट्ट्यातही ३२ हजार एकरांवर हायब्रीड बियाणे निर्मितीच्या योजनेस वित्तपुरवठा करण्यास बॅंकेने मान्यता दिली.