३१.१ सगळ्यांसाठी घर : एच. टी. पारेख आणि एचडीएफसी लिमिटेड स्वीकारण्याची
डिसेंबर, १९७५ मध्ये एच. टी. पारेख आयसीआयसीआयचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले तेव्हा ते जवळजवळ ६५ वर्षांचे होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीवनातलं सगळ्यात महान कार्य अजूनही त्यांच्यासमोर उभं होतं. त्यानंतर २ वर्षांपेक्षाही कमी काळात म्हणजे ऑक्टोबर, १९७७ मध्ये त्यांनी माणसे आणि संस्थांना घरे बांधण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देणार्या एचडीएफसीची निर्मिती केली. वयाच्या पासष्टाव्या वर्षी बहुतेक लोक निवृत्त होण्यास एका पायावर तयार असतात, त्या काळात पारेखांनी आपली दुसरी कारकीर्द नुसती सुरूच नाही केली तर त्या प्रक्रियेत त्यांचं सर्वात आवडतं स्वप्नही पूर्ण केलं. कुठलीही संस्था आपापल्या काळाचं अपत्य असते आणि ज्या आर्थिक वातावरणाचा ती अंतर्गत भाग असते त्या वातावरणाचं प्रतिबिंब तिच्यात नक्कीच पडत असतं. द्रष्टे विवारवंत बरेचदा या मर्यादा उल्लंघून भावी स्थितीचा अंदाज घेतात. भारतात गृहकर्ज सर्वसामान्यांपर्यंत नेणारे एच. टी. पारेख हे असेच एक द्रष्टे विचारवंत होते.