पुस्तकाबद्दलचे प्रशंसोद्गार

भारताच्या अर्थक्षेत्रातील ऐतिहासिक घटना उलगडताना त्यातील महान व्यक्तिमत्वांच्या योगदानाबद्दल चमत्कृतिपूर्ण आणि अंतर्दृष्टी देणारं असं देखणं पुस्तक म्हणजेच बॅरन्स ऑफ बॅंकिंग. चित्तवेधक, ज्ञानवर्धक, चैतन्यशील आणि माहितीपूर्ण असं हे पुस्तक म्हणजे भारताच्या अर्थक्षेत्रातील निवडक महानायकांना दिलेली अद्वितीय आणि विद्वत्तापूर्ण आदरांजलीच आहे. या विषयाचे गंभीर अभ्यासक, अर्थतज्ञ, इतिहासकार आणि चौकस वाचक यांना या पुस्तकाच्या वाचनात खूपच रस वाटेल हे नक्कीच.

- वाय. व्ही. रेड्डी

 

१४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर.

बॅरन्स ऑफ बॅंकिंग हे एकमेवाद्वितीयम् असंच पुस्तक आहे. हे पुस्तक अन्य पुस्तकांपेक्षा वेगळं ठरतं कारण त्यात पाच महत्वाच्या भारतीय अर्थसंस्थांचं इतिवृत्त अत्यंत सुबोध तर्‍हेने सांगितलं आहे आणि ते करता करता लेखकमहोदयांनी भारताच्या अर्थक्षेत्रातील सहा उत्तुंग व्यक्तिमत्वांना जिवंत केलं आहे. यातील प्रत्येकानेच भारताच्या आर्थिक इतिहासात स्वतःचं नाव कोरलेलं आहे. त्यामुळे आणि वेगवेगळे रंजक किस्से आणि अंतर्दृष्टियुक्त लेखन यांच्यामुळे भारतातील अर्थयंत्रणेशी निगडित सर्वांनीच वाचण्यासारखं हे पुस्तक झालेलं आहे.

- दीपक पारेख, अध्यक्ष , एचडीएफसी लिमिटेड

 

भारताच्या बॅंकिंग व्यवस्थेवरील पुस्तकांची टंचाई तर मुळीच नाही, परंतु बॅरन्स ऑफ बॅंकिंग हे पुस्तक, त्याचा आवाका, भाषेतील सहजता आणि वास्तवातील अस्सलता यामुळे उल्लेखनीय ठरते. लेखकाने भारतीय बॅंकिंग इतिहास आणि सहा लक्षवेधी व्यक्तींनी त्याची केलेली पायाभरणी यांची अत्यंत कौशल्याने गुंफण केली आहे. आपल्या अर्थयंत्रणेच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्व संबंधितांना- खास करून विद्यार्थी, संशोधक, धोरणकर्ते आणि बॅंक व्यवसायिक अशांना हे पुस्तक वाचण्याची मी शिफारस करतो.

डॉ. बिमल जालान, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया

 

हे असामान्य पुस्तक बहुदा या प्रकारचं पहिलंच असावं कारण यात पाच महत्वाच्या अर्थसंस्थांचा इतिहास आणि त्यातील सहा नामांकित व्यक्तींचे योगदान यांची अत्यंत सुबक गुंफण केली आहे. भारताचा जवळजवळ शतकभराचा इतिहास यात सामावलेला आहे .  कामाचा प्रचंड आवाका आणि तो साध्य करण्यातली लेखकाची सहजसाध्यता यांच्यामुळे तर मी दिपूनच गेलो. ज्यांना बॅंकिंग आणि वित्त याबद्दल काहीच माहिती नाही अशा माणसांनाही बॅरन्स ऑफ बॅंकिंग हे पुस्तक वाचावेसे वाटेल. भारतीय अर्थक्षेत्र , अर्थव्यवस्था आणि देशासमोरील विद्यमान समस्या सोडवण्यासाठी इतिहासातील धड्यांचे मोल ज्यांना समजून घ्यायचं  आहे त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.’

- एन. वाघुल, माजी अध्यक्ष, आयसीआयसीआय लिमिटेड

 

 भारतीय बॅंकिंग आणि वित्त क्षेत्रात कार्यरत अशा मागील  शतकातील काही महनीय व्यक्तींच्या जीवनातील आणि त्या काळातील आठवणी जागवता जागवता  लिहिलेला हा अत्यंत उत्कृष्ट आणि संशोधित असा चरित्रात्मक इतिहासच आहे.  यातून इतिहास तर जिवंत झाला आहेच परंतु त्याशिवाय मध्यवर्ती बॅंकिंग, व्यापारी बॅंकिंग या संस्थांची हळूहळू उत्क्रांती कशी झाली, तसंच आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थांशी भारताचा संवाद कसा झाला इत्यादींबद्दलही  लिहिलेलं आहे. त्या काळातील घटनांचं आणि तत्कालीन महनीय व्यक्तींनी त्यात कसा भाग घेतला यावरचं  हे मनोरंजक आणि बहुमोल टिपणच आहे.

- एम. नरसिंहन, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि मानद  अध्यक्ष, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया

 

भारतात बॅंकिंग व्यवस्था कशी उत्क्रांत झाली त्याबद्दल मनाला खिळवून टाकणारं लेखन म्हणजेच हे प्रस्तुत ‘बॅरन्स ऑफ बॅंकिंग’ पुस्तक होय. सहा महनीय संस्थास्थापकांच्या योगदानाभोवती हे पुस्तक विणलं गेलं आहे.  भारतीय बॅंकिंगमधील या दिग्गजांचे योगदान सर्वसामान्यांना माहिती नसते त्यामुळे ही पोकळी भरून काढणारा हा प्रयत्न स्तुत्य आहे. संपूर्ण शतकभराचा प्रवास करून लेखकाने या व्यक्तींनी केलेल्या पायाभूत कार्याचा अत्यंत सुबक आढावा घेतला आहे आणि नवराष्ट्रनिर्मितीच्या काळातले त्यांच्या कष्टयातनांची माहिती सांगितली आहे. अनेक मनोरंजक किश्शांचा मीठमसाला लावलेलं हे पुस्तक या संस्था कशा उभारल्या हे सांगतंच परंतु त्यासोबत त्या प्रक्रियेत हातभार लावणार्‍या व्यक्तींच्या वैयक्तिक संघर्षाबद्दलही माहिती सांगतं. भारतीय बॅंकिंग आणि वित्त क्षेत्राच्या इतिहासात रस असलेल्या सर्वांनी हे पुस्तक वाचावं अशी मी जोरदार शिफारस करीन.;

- श्यामला गोपीनाथ, माजी उपगव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया