कृतज्ञता

ए.डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष मिनू आर. श्रॉफ यांनी मला साधारण तीन वर्षांपूर्वी विचारलं की भारतीय बॅंकिंगच्या इतिहासावर एक पुस्तक लिहिण्यात तुम्हाला रस आहे का, तेव्हाच माझ्या मनात या विषयाचं बीज रूजलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे काका ए. डी. श्रॉफ यांच्यासह बॅंकिंग इतिहासातील काही महत्वाच्या व्यक्तिमत्वांच्या कामगिरीचे वर्णन प्रस्तुत पुस्तकात असावं असा त्यांचा विचार होता. त्या वेळेस मला बॅंकिंग अथवा बॅंकिंगचा इतिहास यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्यांची विनंती मान्य करावी की न करावी म्हणून माझी द्विधा मनस्थिती झाली होती.  (मला प्रत्यक्ष बॅंकिंगची अजूनही माहिती नाही आणि बॅंकिंगच्या इतिहासाची त्याहून किंचितशी अधिक माहिती आहे असं मी नमूद करतो. त्यात कसलाही खोटा अभिनिवेश नाही.)

मला इतिहास आणि चरित्रलेखनात खूप रस आहे, तसंच ही विनंती स्वीकारल्याने एरवी मी ज्या विषयाची माहिती मिळवली नसती त्या विषयाची माहिती मिळवून मला काम करता येईल या इच्छेने मी त्यांच्या म्हणण्यास होकार दिला. त्यातील आव्हानांची जाणीव असूनही मी तसं केलं आणि त्यानंतरची तीन वर्षे सर सोराबजी पोचखानावाला, सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास, सर सी. डी. देशमुख, आर.के. तलवार, ए.डी. श्रॉफ आणि एच. टी. पारेख यांच्या संगतीत व्यतीत केली. 'हेच ते' या बॅंकिंग इतिहासाचे सहा अध्वर्यु आहेत. या पुस्तकासाठी अभ्यास  करणं आणि ते लिहिणं हे  कष्टसाध्य कार्य असलं तरी त्याच वेळेस ते खूप समाधान देणारंही होतं. इतिहास लेखनात बर्‍याच सत्य घटनांना एका सुसंबंद्ध कहाणीत बसवावं लागतं आणि त्यातून निघणारे निष्कर्ष  केवळ लेखकालाच नव्हे तर वाचकांनाही रस निर्माण होईल असे मांडावे लागतात. अशा प्रकारे, लेखन ही एकट्याने करण्याची कृती असली तरी असं पुस्तक प्रकाशित करण्यात अनेकांचा हातभार लागत असतो हे नक्कीच.  माझ्या प्रयत्नांना बर्‍याच लोकांनी आणि संस्थांनी सहाय्य केलं. त्यांच्या सहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

असं म्हणतात की एका छोट्या बाळाला वाढवण्यात सगळ्या गावाचा हातभार असतो. पुस्तकाचंही तसंच असतं. म्हणूनच सर्वप्रथम मी मिनू आर. श्रॉफ यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. या टीममध्ये त्यांच्या ट्रस्टमधील सहकार्‍यांचा आणि फोरम ऑफ फ्री एंटरप्राइझ या संस्थेतील सहकार्‍यांचाही समावेश आहे. या सर्वांनी मला शक्य ती सगळी मदत केली.  ऐशीच्या पुढेच वय असूनही मिनू आर. श्रॉफ यांनी ज्या उर्जेने आणि उत्साहाने मी लिहिलेले कच्चे खर्डे वाचले, बहुमोल सूचना केल्या आणि आपुलकीने उत्तेजन दिलं त्याला खरंच तोड नाही. या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं आणि या पुस्तकातील बिनीच्या शिलेदारांसह अन्य आर्थिक जगतातील लोकांचे मनोवेधक किस्से आणि कहाण्या ऐकणं हा आनंदाचा ठेवाच होता. मी त्यांना त्यांच्या आठवणी लिहिण्याबद्दल सुचवलं आहे ती सूचना त्यांनी गंभीरपणे मनावर घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.  त्यांचे काका ए.डी. श्रॉफ यांच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकार अंतिम आहे हेही मी मान्य करतो.  बौद्धिक चालना आणि उत्साह पेरण्याचे हे काम त्यांनी मला दिले म्हणून त्यांचे आभार मानायला शब्दही तोकडेच आहेत.

फोरमचे मुख्य संचालक एस. दिवाकर हे सुरुवातीपासूनच माझे आधारस्तंभ होते. ते आणि त्यांच्या सहकारी स्वाती कापडिया आणि झेनोबिया कलापेसी यांनी विभिन्न प्रकारे माझ्यासाठी मार्ग सुकर करून दिला. म्हणजे मुलाखती घेण्यासाठी लोकांशी संपर्क साधणं असो की संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी पुरेसे साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देणं असो. दिवाकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मला सदैव सहकार्यच दिलं. त्यांच्यासोबत या पुस्तकावर काम करताना मला खूप आनंद मिळाला. मी किरण मिश्र यांच्या योगदानाचा खास उल्लेख करतो कारण त्यांनी मला माझ्या अभ्यासात मदत केलीच शिवाय त्यांनी दक्षतेने केलेलं काम आणि वेगवेगळ्या ग्रंथालयांतून माग काढत मिळवून आणलेली पुस्तके यांची  मला प्रचंड मदत झाली.

संशोधनावर भर देणार्‍या अशा प्रकारच्या पुस्तक लेखनासाठी ग्रंथालये आणि  ऐतिहासिक दस्तावेज- संग्रहांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच मी मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय, एफ. इ. दिनशॉ कमर्शियल ऍंड फायनान्शियल लायब्ररी, ए. ए. जसदेनवाला लायब्ररी ऑफ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि ग्रंथालय, नवी दिल्ली आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया लायब्ररी, मुंबई या सर्वांचे आभार मानतो. तथापि, मी सर्वात ऋणी कुणाचा असेन तर तो मुंबईतील आरबीआय ग्रंथालयाचा कारण त्यांनी मला बहुतेक सर्व पुस्तकं, अहवाल आणि लेख उपलब्ध करून दिले. त्यांचा वापर मी या पुस्तकासाठी संशोधन आणि लेखन करताना केला. त्यातूनच मला एका महत्वाच्या व्यक्तीच्या नावाची आठवण होते ज्यांची मदत कल्पनेच्याही पलीकडची होती आणि औदार्य मर्यादेच्याही पलीकडचं होतं. ते आहेत राजीव रंजन – माझे बर्‍याच काळापासूनचे मित्र आणि आरबीआयमधील वरिष्ठ अधिकारी. कित्येक महिने ते मला पुस्तकं, अहवाल आणि लेख पाठवत होते. मी त्यांना मला काय हवंय त्याची यादी एसएसएसने अथवा ईमेलद्वारा पाठवायचो आणि अवघ्या काही दिवसांतच मला ते सगळं साहित्य मिळायचं, कधी कधी तर त्याच दिवशीसुद्धा मिळायचं. कधीकधी आरबीआय ग्रंथालयात  जे मिळायचं नाही त्यासाठी ते अन्य ग्रंथालयांशी आणि संस्थांशी संपर्क साधायचे आणि मला ते मिळेल याची तजवीज करायचे. काम करण्याचं साहित्य उपलब्ध नसणे किंवा त्यात नोकरशाहीचे अडथळे येणे यांच्यामुळे ज्यांना विलंब आणि वैफल्याचा सामना करावा लागला आहे अशा सर्वांना या गोष्टी मागितल्यासरशी मिळण्याची सुविधा किती मोठी आहे याची जाणीव असेलच. राजीव तुझ्या मदतीबद्दल खूप खूप आभार. तू नसतास तर हे पुस्तक लिहिलंच गेलं नसतं.

आरबीआयमधील सल्लागार आणि इतिहास विभागाचे प्रमुख एस.व्ही एस.दीक्षित या आणखीही एका वरिष्ठ बॅंकरशी ओळख करून देण्यात राजीवचा महत्वाचा वाटा होता. दीक्षितांनी पुणे येथील दस्तावेजसंग्रहातील कागदपत्रे मला उपलब्ध करून दिली. त्या संग्रहात सर जेम्स टेलर यांचे  हल्लीच गोपनीयतेच्या आवरणाखालून सार्वजनिक करण्यात आलेले कागदपत्र उपलब्ध आहेत. त्याशिवाय आरबीआयचे दस्तावेजसंग्रहाचे माजी प्रमुख अशोक कपूर यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचाही अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रकारे त्यांचे उत्तराधिकारी डॉ. आर. एल. साहू यांचेही मी आभार मानतो. त्यांनी मला दस्तावेजांच्या प्रतीच ताबडतोब दिल्या नाहीत तर त्याच सोबत पुस्तकात वापरण्यासाठी फोटोही दिले. आरबीआयचे सुनीलकुमार यांचेही मला पुस्तकं आणि अन्य साहित्य दिल्याबद्दल मी आभार मानतो.

नेहरू मेमोरियल आणि म्युझियम लायब्ररी येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डी. एस. रावत यांनी मला सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास आणि सी.डी.देशमुख यांचे दस्तावेज मिळवून दिले म्हणून त्यांचे आभार. त्याचप्रमाणे टाटा सेंट्रल अर्काईव्ह्ज येथील फ्रेनी श्रॉफ आणि आर. नार्ला यांनीही ए. डी. श्रॉफ यांचे व्यक्तिगत कागदपत्रे मिळवून देण्यात सहाय्य केलं.  पूर्वी एचडीएफसीमध्ये असलेले आर. आनंद यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी मला एचडीएफसी ग्रंथालयातील बरीच पुस्तके आणि कात्रणे दिलीत्यामुळे एच.टी.पारेख यांच्यावरील अभ्यास करण्यास खूप मदत झाली. ते एचडीएफसी सोडून गेल्यावर त्यांचे सहकारी महेश शहा यांनी पुढील मदत करून मला आणखी काही पुस्तकं आणि साहित्य दिलं. सतीश मुक्ते आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी मला संस्थापक सर सोराबजी पोचखानावाला यांचे फोटोग्राफ पुस्तकात वापरण्याची परवानगी दिली. तसंच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अमर सिंह यांनीही मला सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास यांचे फोटो  दिले म्हणून त्यांचेही आभार.

अशा प्रकारची पुस्तकं लिहिताना आधीच्या काही पुस्तकांचा आणि लेखकांचा आधार घ्यावा लागणे अटळच असतेतरीही हे पुस्तक लिहिताना काहींचा मी खूपच मोठा ऋणाईत बनलो कारण मी त्यांच्या लेखनावर निर्लज्जपणे डल्ला मारला, ते संक्षिप्त केलं आणि त्यांना परिच्छेदाचं स्वरूप दिलं. त्यामुळे त्यांचा खास उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त करणंच योग्य ठरेल. ती पुस्तके अशी:  ‘हिस्टरी ऑफ रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, १९३५-५१’, ‘द रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, १९५१-१९६७’ लेखक जी. बालचंद्रन, ‘द इव्होल्युशन ऑफ द स्टेट बॅंक ऑफ इंडिया, १९२१-५५,’ ‘द इरा ऑफ इंपिरियल बॅंक’ आणि ‘द इव्होल्युशन ऑफ स्टेट बॅंक ऑफ इंडिया: द इरा फ्रॉम  १९५५ -१९८०,’ लेखक अभिक रे. त्याशिवाय एन.जे. नानपोरिया यांनी लिहिलेलं ‘पोचखानावाला: द बॅंकर’ हे पुस्तक, फ्रॅंक मोराएस यांनी लिहिलेलं,’ सर पुरुषोत्तमदास ठाकुरदास’,  सी. डी. देशमुखांचं ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’, अपर्णा बसू यांचं ‘जी. एल. मेहता: अ मल्टी स्प्लेंडर्ड मॅन’, आदित्य मुखर्जी यांचं ‘इंपिरियलिझम, नॅशनॅलिझम ऍंड मेकिंग ऑफ द इंडियन कॅपिटलिस्ट क्लास, १९०२- १९४७’, जी. बालचंद्रन यांचं ‘जॉन बुलियन्स एंपायर’, आनंद चंदावरकर यांचं ‘केन्स ऍंड इंडिया: अ स्टडी इन इकॉनॉमिक्स ऍंड बायोग्राफी’ आणि बी.के. नेहरूचे ‘नाईस गाईज फिनिश सेकंड’. लेखांबद्दल म्हणायचं तर मी सर्वाधिक ऋणाईत असेन तो म्हणजे जी. बालचंद्रन यांच्या ‘टुअर्ड्स अ हिंदू मॅरेज: ऍंग्लो इंडियन मॉनेटरी रिलेशन्स इन इंटरवॉर इंडिया- १९१७-३५ या लेखाचा, राजुल माथुर यांच्या  ‘ द डिले इन द फॉर्मेशन ऑफ रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया: द इंडिया ऑफिस पर्स्पेक्टिव्ह’ या लेखाचा,  आनंद चंदावरकर यांच्या ‘सेंट्रल बॅंक ऍंड गव्हर्नमेंट: ऍन अनटोल्ड स्टोरी फ्रॉम आरबीआय’ज अर्ली हिस्टरी आणि आर. के. तलवार यांच्या ‘पब्लिक सेक्टर बॅंकिंग या लेखाचा!  यातील शेवटच्या लेखाच्या आधारावरच २५ वं प्रकरण बरंचसं बेतलेलं आहे.

वर उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी स्टेट बॅंक ऑफ इंडियावरील दोन पुस्तकांचे अधिकारी लेखक अभिक रे यांचा मला खास उल्लेख करायलाच हवा. त्यांच्या पुस्तकातील माहितीचा तर मी मनमोकळेपणाने वापर केलाच परंतु त्याशिवाय अभिक यांनी मला आणखीही काही पुस्तकं आणि संशोधन साहित्य दिलं. संशोधन स्त्रोतांबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं त्याला तर तोडच नाही. त्यांनी अजिबात खळखळ न करता स्वतःचं जमवलेलं संशोधन साहित्य आणि नोंदी मला दिल्या. त्यांनी मला आर. के. तलवार यांचे फोटो दिले म्हणूनही मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्याशी ईमेल माध्यमातून केलेल्या चर्चेचा आणि दिलेल्या काही स्पष्टीकरणांचा मला खूपच लाभ झाला. काही ठिकाणी माझ्या हातून लिहिताना काही चुका झाल्या होत्या तिथंही त्यांनी माझं लक्ष वेधलं आणि मला भविष्यात खाली मान घालण्याचा प्रसंग टाळला. हे पुस्तक त्यांच्या उच्च मापदंडास उतरेल एवढीच अपेक्षा मी करू शकतो.

एस. एस. तारापोर यांनी मोठ्या औदार्याने मी त्यांच्यावर थोपवलेले कच्चे खर्डे वाचण्याचं मान्य केलं आणि मला सूचनाही केल्या. त्या सूचनांतून त्यांचं ज्ञानकौशल्य आणि बौद्धिक कष्ट घेण्याची ताकद यांचा ठसा या पुस्तकावर निश्चितच उमटलेला आहे. त्यांनाही या पुस्तकाबद्दल माझ्याइतकाच उत्साह वाटत होता, तसंच वेगवेगळे उपयुक्त दृष्टिकोन आणि अंतर्दृष्टी देणार्‍या सूचना करण्यात ते पुढे होते. तसंच माझ्या त्यांच्या ताराही जुळल्या होत्या त्यामुळे माझं हस्तलिखित आकारास येत असताना त्यांनी ते काळजीपूर्वक चाळलं आणि त्यावर तपशीलवार शेरे लिहिले त्यामुळेही या पुस्तकात पुष्कळ सुधारणा झाली. त्यांच्यासारखी व्यक्ती मला मार्गदर्शक आणि विचारी दोस्त म्हणून मिळाली ही मला लाभलेली अत्यंत दुर्मीळ सुविधाच होती. तथापि, काही चुका उरल्याच असतील तर मी त्याला पूर्णतया जबाबदार असेन. अर्थात् त्या चुका कमी आणि तुलनेने तुरळक असतील अशी मी अपेक्षा करतो. त्यांची पत्नी फरीदा यांनी माझं नेहमीच औदार्याने आतिथ्य केलं. आम्ही दोघे पुस्तकाच्या चर्चेसाठी बसायचो तेव्हा त्या आमच्यासाठी चविष्ट नाश्ता (खरं तर तर ते छोटं जेवणच असायचं.) बनवायच्या त्यामुळे तर आमच्या चर्चेची लज्जत अधिकच वाढायची. त्यांच्या हातचा चमचमीत नाश्ता हेच प्रलोभन आणखी एक पुस्तक लिहिण्यासाठी पुरेसं आहे असंच कधीकधी मला वाटतं. खरोखरच, सावक आणि फरिदा तुमचे खूप आभार आणि भविष्यात मी तुमच्याकडे दत्त म्हणून हजर होणारच नाही याची काहीही हमी मी देऊ शकत नाही.

या पुस्तकासाठी संशोधन करताना आणि मग ते लिहिताना बर्‍याच लोकांशी माझं संभाषण झालं त्याचा मला प्रचंड फायदा झाला. येझदी एच. मालेगाम यांच्यासारख्या भारतीय मध्यवर्ती बॅंकिंगवरील अधिकारी व्यक्तींचे मी मनःपूर्वक आभार मानतो, त्यांनी माझं हस्तलिखित वाचलं,  त्यावर ज्ञानयुक्त सल्ला दिला आणि मार्गदर्शनही केलं. पुस्तकातील आशय आणि विषय कसा विकसित करावा याबद्दलचा त्यांचा निरंतर उत्साह आणि बहुमोल सूचना यांचा मला खूपच उपयोग झाला. या पुस्तकास त्यांनी प्रस्तावनाही लिहिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. दीपक पारेख आणि त्यांच्या भगिनी हर्षा पारेख यांनी मला त्यांचे काका एच.टी. पारेख यांच्याबद्दल खूप काही सांगितलं. त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि माझ्या प्रश्नांना शांतपणे उत्तरं दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. अशाच प्रकारे एन. वाघुल यांनीही माझ्यासाठी वेळ काढला आणि आर के. तलवार आणि एच. टी. पारेख यांच्याबद्दल प्रांजळ मतं मांडली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. ते त्या दोघांना उत्तम ओळखत होते आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. नासर मुनजी यांनीही बराच वेळ देऊन मला खूपच उत्कंठावर्धक माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार. एचडीएफसीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि तिचे संस्थापक एच. टी. पारेख यांच्याबद्दल त्यांनी बरेच मुद्दे स्पष्ट करून सांगितले तसंच काही मूल्यवान गोष्टीही सांगितल्या. आर. के. तलवार यांच्याबद्दल बोलण्यासाठी एस. एन. सावईकर आणि  एस. ए. दवे यांचेही मी आभार मानतो.

रॅंडम हाऊस इंडिया येथील दक्ष संपादिका मिली अश्वर्या, अनुकृती शर्मा आणि त्रिशा  बोरा यांचेही आभार मानतो कारण त्यांच्या योगदानामुळे या पुस्तकात खूपच सुधारणा झाली. मिली तर सुरुवातीपासूनच या पुस्तकाबद्दल उत्साही होती.  पुस्तक हाताळण्यातील तिचा दुर्दम्य उत्साह दाद देण्यासारखाच आहे. अनुकृतीच्या दक्ष आणि सद्सद्विवेक बुद्धीशी इमान राखून केलेल्या संपादनाने लेखनातील बर्‍याच ओबडधोबड भागांना ताशीवपणा, सुबकता आणि सुस्पष्टता बहाल केली. वास्तव घटनांच्या अचूकतेची खातरजमा करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करण्यात आले आहेत तसंच मी नकळतपणे काही अवतरणे चुकीची दिली नाहीत ना याबद्दलही खात्री करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा काही चुका अथवा एखादी गोष्ट राहून गेल्याचं कुणाला आढळून आलं तर मला आपण जरूर सांगावं. बेंजामीन फ्रॅंकलीन यांनी मित्रास लिहिलेल्या पत्रात  स्वतःच्या जीवनाबद्दल म्हटलं आहे की ‘’ माझी स्वतःची जरी नवी आवृत्ती निघाली तरी मला चालेल, कारण त्यात जुन्या जीवनात घडलेल्या चुकांची दुरुस्ती करता येईल.’’ या पुस्तकाच्या बाबतीतही मला तसंच वाटतं.

बेबी जॉर्ज यांनी माझ्या संशोधनाच्या नोंदी टंकलिखित करून दिल्या म्हणून त्यांचे आभार मनातो. तसंच माझे मदतनीस प्रभा (चिंटी) जाधव आणि जगतसिंह यांचेही आभार मानतो. जगतनी हजारो पानांच्या फोटोप्रती काढल्या आणि स्पायरल बाइंडिंग केलं. त्यानेच कुरियर, बारीकसारीक कामे आणि निरोप पोचवणे या गोष्टी अत्यंत समर्थपणे सांभाळल्या. गुलशन पटेल आणि राजगोपाल रंगनाथन यांनीही मला बहुमोल सहाय्य केलं त्यामुळे त्यांचेही आत्मीयतापूर्वक आभार.

माझी चुलतबहीण वेनाझ आणि तिचे पती ब्रिजपाल सिंह आणि माझे मित्र देवेंद्र सिंह आणि दक्षिता दास यांनी नवी दिल्ली येथे माझं आदरातिथ्य केलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो. या पुस्तकाच्या बाह्य आवरणावरील फोटो घेऊन दिल्याबद्दल देवेंद्र यांचे खास आभार. माझी आई रती, बहीण तुशना, मेहुणे फिरोझ आणि भाचा नवरोझ यांनी नेहमीसारखाच मला पुष्कळ पाठिंबा दिला. माझे वडील केकी आज हयात नसले तरी ते सदैव माझ्या मनात असतात म्हणूनच हे पुस्तक मी त्यांना अर्पण करीत आहे.

-- बख्तियार के दादाभॉय