२.१ वादळातून वाट काढताना

स्वदेशीची प्रेरणा किंवा मग एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बॅंकांना होणा-या नफ्याचा मोह यामुळे ब-याच बॅंकांचं पेव फुटलं  होतं. १९१३ सालापर्यंत बॅंकिंग आणि कर्जाऊ कंपन्यांची संख्या ४५१ झाली होती. १९०६-११ या काळात त्यांच्याकडील ठेवी दुप्पट झाल्या होत्या. (१२ कोटींवरून २५ कोटींवर गेल्या होत्या) एकूण पाहाता,  १८९० ते १९११ या काळात ठेवींमध्ये ९५० टक्के वाढ झाली होती. यातील ब-याच संस्थांची काम करण्याची पद्धत मात्र शंकास्पदच होती. भरणा समभागांची (पेड अप  शेअर्सची) पूर्ण किंमत न मिळताच त्या व्यवहार सुरू करत होत्या. राखीव निधी ठेवतच नव्हत्या किंवा ठेवला तर अगदीच किरकोळ ठेवत होत्या. ताळेबंद प्रकाशित करत नव्हत्या आणि केलाच तरी तो रंगसफेदीयुक्तच असायचा. आपलं भरणा (पेड- अप) भांडवल किंवा राखीव निधी किती आहे त्याची जराही पर्वा न बाळगता त्या ठेवी स्वीकारत होत्या. मुळात बॅंकिंग, वित्त आणि अर्थशास्त्र यांची मूलभूत तत्वेही माहिती नसलेल्या व्यक्तींनीच यातील ब-याचशा तथाकथित स्वदेशी बॅंका  काढल्या होत्या आणि चालवल्याही होत्या.