प्रस्तावना (खंड पहिला)
१९१० साली बॅंक ऑफ इंडियातील एका तरुण पारशी सहाय्यक हिशोबनीसाच्या मनात ‘आपणच एक बॅंक काढावी’ असा एक अत्यंत असंभवनीय विचार घोळू लागला. या अचाट महत्वाकांक्षी साहसाची वार्ता व्यवस्थापक एच. पी. स्ट्रिंगफेलो यांच्या कानांवर आली तेव्हा असा काही विलक्षण विचार त्याच्या मनात खरंच आहे का याची खातरजमा करून घेण्यासाठी त्यांनी त्यास बोलावून घेतलं. तो खरोखरच गंभीरपणे असा विचार करतोय हे कळल्यावर स्ट्रिंगफेलोंना मोठाच विनोद वाटून त्यांनी त्याला ‘गंभीरपणे’ सल्ला दिला की भारतीयांनी काढलेली आणि भारतीयांनीच चालवलेली बॅंक काढण्याची भलतीसलती शक्कल तू डोक्यातून पूर्णपणे काढूनच टाक. स्ट्रिंगफेलोंना त्या तरुणाच्या करियरची चिंता होती कारण त्यानं नोकरीस लागल्यापासून बॅंकेची खूप चांगली सेवा केली होती. दुस-या कुठल्याही भारतीय माणसाला त्याच्या एवढी प्रतिष्ठा बॅंकेत मिळालेलीही नव्हती. स्ट्रिंगफेलोंनी त्याला सांगितलं की भलत्याच नादाला लागून आतापर्यंत कमावलेलं सगळं गमवायला निघालास तर तुझ्यासारखा मूर्ख तूच. त्यांनी त्याला असंही सांगितलं की माझ्या सल्ल्यावर काही काळ चिंतन कर, निर्णयाचा पुनर्विचार कर. परंतु तरुणाने तर मनाची आधीच तयारी केलेली होती, त्यानं व्यवस्थापकांना सांगितलं,’’ साहेब, माझा विचार पक्का आहे, मी बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा देतो आहे. एके दिवशी माझी बॅंक आपल्या बॅंकेपेक्षा मोठी होईल.’’अशा प्रकारे अनपेक्षितपणे घेतलेल्या एका निर्णयातून देशातली एका आघाडीच्या बॅंकेचा जन्म झाला. हा तरुण होता सोराबजी एन. पोचखानवाला आणि त्यानं काढलेली बॅंक होती सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया. स्ट्रिंगफेलोने केलेल्या थट्टेचं रूपांतर तरूण सोराबजीनं प्रत्यक्ष वास्तवात केलं आणि व्यवस्थापक स्ट्रिंगफेलोंना त्या गोष्टीत विनोद वाटला असला तरी प्रत्यक्षात तो विनोद नव्हता हे ‘स्वतःची’ बॅंक स्थापन करून सिद्ध केलं.
कुठल्याही महान यशामागची महत्वाकांक्षाही तशीच महान असते. वाहत्या प्रवाहाविरूद्ध पोहण्याची क्षमता आणि इच्छाही त्यात अंतर्भूत असते. प्रस्थापित उद्योगांत वयस्कर, बदलास सहसा तयार नसणा-या मनोवृत्तीच्या लोकांची भाऊगर्दी झालेली असते. वारशाने मिळालेली मनोवृत्ती बदलण्यासाठी, मनात रुतून बसलेल्या विचारांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांच्यापल्याड जाण्यासाठी धाडस लागतं. बरेचदा प्रगतीशील, स्वतंत्र प्रज्ञेच्या लोकांच्या प्रयत्नांतूनच प्रगती आणि बदल घडून येतात कारण प्राप्त परिस्थितीस आव्हान देऊन ती बदलण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. वरिष्ठांकडून मिळालेलं ज्ञान गिरवत राहात वहिवाटीच्या रस्त्यावरून चालण्यास सर सोराबजी पोचखानवाला तयार नव्हते. म्हणूनच ते नवीन मार्ग शोधणारे नेते बनले. त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, उच्च महत्वाकांक्षा आणि महान धाडस यांतूनच भारतीयांनी उभारलेल्या आणि भारतीयांनीच चालवलेल्या सेंट्रल बॅंकेची स्थापना झाली. त्यांचे चरित्रलेखक एन. जे. नानपोरिया म्हणतात ‘’एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या जमशेदजी टाटांसह अन्य ब-याच पारशी प्रवर्तकांकडे ज्ञान होतं, सागरात उडी घेण्याचं दर्यावर्दी साहस होतं, सोराबजीतही तेच गुण होते. अन्यथा त्यांना अशा कुठल्याही संस्थेची स्थापना करता आली नसती वा तिच्या निर्मितीत पुढाकार घेता आला नसता. म्हणूनच सेंट्रल बॅंक ही केवळ व्यापारी यशोमुकुट मिरवण्याची संधी मिळालेली एक संस्था एवढंच नसून दोन्ही पाय जमिनीवर रोवून उभ्या असलेल्या एका द्रष्ट्या माणसाने पाहिलेल्या स्वप्नाची ती पूर्ती आहे.
सोराबजींचा जन्म ९ ऑगस्ट, १८८१ रोजी मुंबईत झाला. गुलबाई आणि नुसेरवानजी पोचखानवाला या दांपत्याचे चार मुलगे आणि तीन मुली अशा अपत्यांतले ते सर्वात धाकटे पुत्र होते. सोराबजी सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. ते माझगाव येथील ‘होप हॉल’ नामक हॉटेलचे मालक होते. ‘माझगाव हॉटेल’ या नावानेही ते हॉटेल ओळखलं जायचं. त्या काळच्या मुंबईतलं ते ब-यापैकी हॉटेल होतं त्यामुळे तिथं इंग्रजांचा आणि भारताला भेट देणा-या परदेशी लोकांचा राबता असे. त्याशिवाय एस्प्लनेड मार्गावरील वेलिंग्डन हॉटेलही त्यांच्या मालकीचं होतं. नुसरवानजींच्या मृत्यूआधी घडलेल्या घटनांमध्ये एक योगायोगावर आधारित विरोधाभास आढळून येतो. नुसरवानजींनी त्यांची संपत्ती बॅंकेत ठेवली होती, ती बॅक बुडीत गेल्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे अल्पवयापासून सोराबजी स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकले. स्वतःच्या हिंमतीवर उभारलेल्या स्त्रोतांच्या आधारे विचार करणे आणि कृती करणे’ यातूनच ‘पुढाकार घेण्याची वृत्ती आणि नवनव्या गोष्टी शोधून काढण्याची क्षमता यांचा उगम झाला असावा. वडिलांच्या मृत्यूनंतर साधारण वर्षभराने पुन्हा त्यांच्या कुटुंबावर दुःखद आघात झाला. त्यांचा रुस्तुमजी नावाचा भाऊ विहिरीत बुडून मेला. या दुःखद अपघाताची पहिली बातमी सोराबजींनाच कळली. एके दिवशी शाळेतून घरी येताना त्यांना घराजवळ खूप गर्दी जमलेली दिसली. गर्दीतून वाट काढत पुढे जाऊन त्यांनी पाहिलं तर त्यांच्या विहिरीत बुडालेल्या भावाला बाहेर काढून ठेवलेलं त्यांना दिसलं. त्यानंतर ही दुःखद वार्ता घरी जाऊन सांगण्याचे काम त्यांच्याच शिरावर येऊन पडले.
सोराबजींचे थोरले बंधू हिरजीभॉय हे ‘चार्टर्ड बॅंक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया ऍण्ड चायना’ या बॅंकेत दरमहा १०० रूपये पगारावर नोकरीस होते. त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून घराची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी खूप त्यागही केला. म्हणजे कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असल्याने त्यांचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्याशी लग्नही करण्यास त्यांनी नकार दिला. फावल्या वेळात बिलियर्ड्स खेळातील मार्कर बनवून ते जास्तीचे पैसे मिळवायचे. त्यांनी बनवलेल्या मार्करना ‘हिरजीभॉय मार्कर’ असं नाव मिळालं होतं. त्यांना संगीत आणि बागकाम दोन्हींची आवड होती, या दोन्ही छंदांत त्यांनी धाकट्या भावालाही सामील करून घेतलं. सोराबजी व्हायोलीन वाजवायला शिकले. कौटुंबिक खर्च चालवण्यासाठी तेही व्हायोलीनच्या शिकवण्या घेऊ लागले. त्यांना वाचनाची खूप आवड होती, नंतर ते कविताही लिहू लागले. परंतु प्रौढपणी मात्र भारतीय नाट्यकला एवढा एकच खराखुरा छंद त्यांच्यापाशी राहिला. त्यांनी एकूण तीन नाटकं लिहिली त्यापैकी खुस्रो-शिरिन आणि येझदेझार्द शेरियार यांची निर्मिती यशस्वी झाली. मदान थिएटर्स या नाट्यसंस्थेस १९२४ साली आर्थिक अडचणी आल्या तेव्हा आर्थिक बाबतीत विवेक आणि त्वरित निर्णय घेणे या आपल्या गुणांचा वापर करून सोराबजींनी त्या संस्थेस मदत केली. त्यांनी कंपनीच्या समस्यांचं विश्लेषण करून तिची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव पाठवला, त्यामुळेच शेवटी ती कंपनी तरली. हिरजीभॉय आयुष्यभर अविवाहित राहिले, त्यांनी आपल्या भावाबहिणींची लग्नं लावून दिली आणि खरोखरच वडिलांना मिळतो तसाच प्रेमादर त्यांना सर्व कुटुंबाकडून मिळाला. त्यांचा निरोप घेतल्याशिवाय सोराबजी कधीही घरातून बाहेर पडले नाहीत असं म्हणतात.
सोराबजींचे काकाही त्याच बॅंकेत हेडक्लार्कच्या पदावर पोचले होते. ही प्रतिष्ठा आणि मान एखाद्या भारतीयास मिळणं दुर्मीळच होतं. काकांनी आपलं वजन वापरून हिरजीभॉयना बॅंकेत लावून घेतलं आणि हिरजीभॉयनीसुद्धा सोराबजींसाठी २० रूपये दरमहा पगाराच्या कारकुनीच्या नोकरीची व्यवस्था केली. सोराबजींनी वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि सेंट झेविअर्स कॉलेजात प्रवेश घेतला परंतु ते प्रिव्हियसच्या परीक्षेत नापास झाले. पुस्तकी अभ्यासाबद्दल आपल्याला फारशी आस्था नाही, त्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यात आपल्याला अधिक रस आहे हे बहुदा तेव्हाच त्यांना पहिल्यांदा कळलं असावं अशी शक्यता आहे. कदाचित त्यांच्या स्वभाववृत्तीच्या माणसाला काम करणं आणि शिकणं या दोन गोष्टी एकमेकींपासून अलग करणं शक्य झालं नसावं आणि म्हणूनच नुसत्याच पुस्तकी पांडित्याबद्दलच्या त्यांच्या नाराजीतून ते प्रतिबिंबित झालं असावं हेही शक्य आहे.
भाऊ बॅंकेत जमाखर्च लिहिणारा आणि काका हेड क्लार्क असल्यामुळे सोराबजींनी शक्य होतं ते सगळं बॅंकिग शिकून घेतलं. फक्त स्वतःला नेमून दिलेल्या कामातच तरबेज व्हायचं एवढ्यावर त्यांचं समाधान होत नव्हतं तर बॅंकेच्या कामकाजाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल ज्ञान घेण्यावर त्यांचा कटाक्ष होता. स्वतःच्या मनानेच ते खात्याखात्यातून फिरले आणि संपूर्ण बॅंकिंग व्यवस्था कशी चालते त्याची मूलभूत तत्वे त्यांनी शिकून घेतली. अशा प्रकारे ज्या गुणांमुळे ते नव्या बॅकेचे प्रवर्तक बनले त्यापैकी काही गुण ते सुरुवातीपासूनच दाखवू लागले होते, अर्थात् इतरांना ते तेवढ्या चटकन जाणवलं नव्हतं, खुद्द सोराबजींना स्वतःलाही तरी ते कुठं जाणवलं होतं? मात्र साध्यासुध्या महत्वाकांक्षेच्याही पलीकडे जाणारं असं काहीतरी आपल्या मनात झंकारू लागलं आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली होती. परंपरा आणि काळाची गरज यांच्यामुळे काहीही प्रश्न न विचारता जी प्रस्थापित व्यवस्था इतरांनी स्वीकारली होती तिलाच सोराबजी आव्हान देऊ पाहात होते. खरं सांगायचं तर भारतीय कारकुनांना प्रशिक्षण वगैरे देण्याचा कुठलाही विचार परदेशी व्यवस्थापनाच्या मनात नव्हता. उलट भारतीयांबद्दल दूषित पूर्वग्रह असल्याने कितीही गुणवत्ता दाखवली तरी अधिकारीपदापर्यंत पोचण्याची कुठलीही शक्यता त्यांच्याबाबतीत नव्हती. सोराबजींचे भाऊ हेडक्लार्क होऊन पंधरा वर्षं उलटून गेली तरीही आकसाचं छत भेदून वरच्या पदावर जाण्याची शक्यता दूरवरही दिसून येत नव्हती. भारतीयांबद्दलचा आकस एवढा बळकट आणि सर्वव्यापी होता की ब-याच जणांना तो तसा आहे याची जाणीवही नव्हती. कुठलाही भारतीय माणूस अकाउंटंट किंवा सब- अकाउंटंटच्या पदावर पोचण्याची आकांक्षाही धरू शकत नव्हता.
सोराबजींनी अनमोल असा प्रत्यक्ष अनुभव मिळवलेला असला तरी लवकरच त्यांच्या लक्षात आलं की स्वतःहून मिळवलेल्या शिक्षणाला मर्यादा आहे. म्हणून त्यांनी बुक किपिंगच्या क्लासला नाव घातलं आणि यथावकाश ते लंडन चेंबर ऑफ कॉमर्सची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर कुणीतरी त्यांना ‘जर्नल ऑफ द इन्स्टिट्युट ऑफ बॅंकर्स, लंडन या संस्थेचं माहितीपत्रक दिलं. तेव्हा सोराबजींनी ठरवलं की आपण या संस्थेची परीक्षा उत्तीर्ण झालो तर या निवडलेल्या व्यवसायातील आपल्या भावी संधी खूपच वाढतील.
मात्र त्या परीक्षांना बसायचं कसं ही समस्या त्यांना ताबडतोब सोडवावी लागणार होती कारण तो अभ्यास शिकवणारी कुठलीहि संस्थात्मक सुविधा भारतात अस्तित्वातच नव्हती. त्याशिवाय शैक्षणिक पात्रता नसल्यामुळेही सोराबजींची बाजू लंगडी झाली होती. परंतु सुदैवाने त्यांना जर्नलची प्रत मिळाली होती त्यात पोस्टाद्वारे अभ्यासक्रम शिकवणा-या लंडनमधील संस्थेची जाहिरात होती. सोराबजींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मन लावून अभ्यास सुरू केला. गोष्टी प्रत्यक्ष करूनच शिकता येतात असा त्यांचा विश्वास असला तरी पुस्तकातील सैद्धांतिक ज्ञानही तितकंच महत्वाचं असतं हे त्यांच्या व्यवहारी मनाला समजलं होतं. हा काय प्रकार चाललाय ते न कळल्यामुळे त्यांचे भाऊ आणि मित्रांनी त्यांना अभ्यास करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की सोराबजींची तीक्ष्ण बुद्धी आणि काम करण्याची धमक यांच्यामुळे बॅंकेच्या काऊंटरवर काम करता करताच त्यांना सगळं काही शिकता येणार आहे. परंतु आपलं सर्वोच्च हित कशात आहे हे सोराबजी जाणून होते, त्यामुळेच त्यांनी ‘जनांचा’ सल्ला ऐकला तरी प्रत्यक्षात स्वतःच्या ‘मनाचं’च केलं. ‘’पुस्तकातील ज्ञान आणि व्यवहारातील ज्ञान यांचा मेळ एकत्र साधण्यावर त्यांचा विश्वास होता, पुढील काळात ते स्वतःच त्याचं प्रतीक बनले. त्यांचा दृढविश्वास आणि व्यक्तिमत्व यांनीच त्यांच्या गतीशील नेतृत्वाचा पाया घातला.’’
सोराबजींनी अभ्यासक्रमाची पहिली परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार केली. ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना बॅंकेतर्फे ५ पौंड रूपये देण्याची पद्धत होती, परंतु सोराबजींना ते पैसे देण्यास बॅंकेने नकार दिला कारण भारतीय शाखांत काम करणा-या भारतीय व्यक्तींना तसे उत्तेजन देण्याचा मुळात हेतूच नव्हता. वंशवादाच्या या धडधडीत दाखल्यामुळे त्यांच्या यशाचा आनंद काहीसा हिरावून घेतला गेला. त्याचा सोराबजींच्या मनावर उठलेला ओरखडा कधीच निघून गेला नाही. त्यानंतर पुढल्या परीक्षेतील राजकीय अर्थशास्त्र (पोलिटिकल इकॉनॉमी) वगळता सगळे विषय ते पहिल्या फटक्यात उत्तीर्ण झाले. हा विषय अत्यंत तांत्रिक होता. त्याचा अभ्यास व्यवस्थित, मुळापासून करण्याची सुविधाच सोराबजींपाशी नव्हती. परंतु नंतर हाही अडथळा त्यांनी चिकाटीने पार केला आणि इन्स्टिटयुट ऑफ बॅंकर्स, लंडन या संस्थेचे ते भारतातले पहिले प्रमाणपत्रधारी सदस्य (सर्टिफाईड असोसिएट) बनले.
सोराबजींचा दिवस रोज पहाटे साडेपाचला सुरू व्हायचा. सकाळी उठल्यावर ते बाजारहाट करायला जात. ही त्यांची सवय आयुष्यभर टिकली. म्हणजे ‘सर सोराबजी पोचखानवाला’ या पदापर्यंत पोचल्यावरदेखील स्वतः बाजारात जाऊन मासे, फळं आणि अन्य किराणा आणल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. बाजारहाट करून झाल्यावर ते बुक-किपिंगच्या क्लासला जात, मग घरी येऊन कपडे बदलून व्हायोलिनची शिकवणी द्यायला जात. नंतर एका इराणी हॉटेलात घाईघाईने न्याहारी उरकून १० वाजेपर्यंत बॅंकेत हजर होत. संध्याकाळी उशीरापर्यंत काम करत. बरेचदा सुट्टीच्या दिवशी आणि रविवारीही कामावर येत. त्यांचा भाऊच हेडक्लार्क असल्याने सोराबजींना परकीय चलन व्यवसायाबद्दल शिकण्याची संधी मिळाली. तत्कालीन परदेशी बॅंकांत हा विभाग म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक लपवून ठेवलेलं गुपित होतं. असं म्हणतात की त्या काळात फक्त तीनच भारतीयांना आर्बिट्रेज व्यवहारांची माहिती होती (एकाच वस्तूच्या समभागाच्या किंवा सिक्युरिटीच्या वेगवेगळ्या बाजारात असलेल्या वेगवेगळ्या किंमतींचा फायदा घेऊन उलाढाल करणे म्हणजे आर्बिट्रेज व्यवहार).: त्यातले एक होते चार्टर्ड बॅंकेचे हेडक्लार्क हिरजीभॉय (सोराबजींचे भाऊ), हे या स्थानी १९०५ साली आले आणि दुसरे होते मर्कंटाईल बॅंकेचे हेडक्लार्क. दिवसभराचं काम संपलं की बॅंकेत सामसुम होई तेव्हा बॅंकिंगच्या काही पैलूंचा सोराबजी हिरजीभॉय यांच्या मदतीने अभ्यास करीत. त्यानंतर रात्री जेवण झाल्यावर ते संगीताच्या मैफिलीसाठी आपल्या कुटुंबीयांत सामील होत. याही बाबतीत सोराबजी निर्दोषतेच्या शोधात असत. त्यासाठी व्हायोलीन आणि पेटी शिकवणारे कुणी गुरू मिळतात का याच्या शोधात ते सदैव असत.
तरुणमंडळींना करमणूक आणि मौजमजा करण्याचं आकर्षण असतं तसं त्यांना नव्हतं. याचा अर्थ सोराबजी फारच गंभीर प्रवृत्तीचे होते असा नव्हता तर या गोष्टींना देण्याएवढा वेळच त्यांच्यापाशी नव्हता. सोराबजी गंभीर आणि विचारी, शांतचित्त भलेही असतील, परंतु ते स्नेहशील, आपुलकीने वागणारे, प्रसन्न वृत्तीचे तरुणही होतेच. भावी जीवनात प्रगती करण्याच्या ध्येयात ते बुडून गेलेले असले तरी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही याची त्यांना जाणीव होती म्हणूनच तर ते त्यात भर घालण्यासाठी खाजगी शिकवण्या घेत होते. आर. बी. विसनजी खिमजी यांच्या मुलांची ते बुक किपिंग आणि वाणिज्य विषयांची शिकवणी घ्यायचे. ते खिमजी कुटुंबाच्या घरातलेच एक झाले होते. ती मुले नंतर मेसर्स विसनजी ऍण्ड सन्स या कंपनीचे मालक बनल्यावर त्यांनी मोकळेपणाने सोराबजींचं ऋण मान्य केलं, सोराबजींनीही पुढे सांगितलं की माझ्या सुरुवातीच्या काळात सेठ विसनजी माझे आश्रयदाते होते.
सोराबजी बॅंक ऑफ इंडियाच्या नोकरीत असताना एकदा त्यांना लाहोर- कलकत्ता येथे काम करणा-या गुलाबसिंग ऍण्ड सन्स या प्रथितयश कंपनीचे लायचंद यांनी नोकरीचं आमंत्रण दिलं, वर ३०० रूपयांचा राजेशाही पगारही देऊ केला. (त्या काळात सोराबजी महिन्याला फक्त ७५ रूपये कमावत होते.) सोराबजी आणि लायचंद यांची भेटही कशी झाली तर लायचंदांनी रस्त्यात त्यांना जवळच्या पोस्टाचा पत्ता विचारला. तेव्हा दोघांमध्ये संभाषण झालं. सोराबजींच्या सकारात्मक दृष्टीमुळे आणि मैत्रीपूर्ण वर्तनाने लायचंद प्रभावित झाले. त्यांनी सोराबजींच्या परिस्थितीचीही माहिती करून घेतली तेव्हा ती सुधारण्याची त्यांना तीव्र इच्छा होऊ लागली. त्यांच्यातील भावी क्षमता लायचंद यांच्या धूर्त बुद्धीने चांगली पारखली आणि त्यांना नोकरी देऊ केली. सोराबजींनी होकार देऊन बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. ही बातमी घरी समजली तेव्हा एकच हलकल्लोळ उडाला. ती नोकरी त्यांनी घेऊ नये, बॅंकेचा राजीनामा परत घ्यावा यासाठी त्यांचं मन वळवण्याचे भरपूर प्रयत्न होऊ लागले. ‘दहा ठिकाणी हात घालणा-याला काहीच मिळत नाही’ यावर सगळ्या कुटुंबाचा विश्वास होता. त्यांनी बॅंकेतच राहावं म्हणून हिरजीभॉय आणि आईनं त्यांच्या खूप मिनतवा-या केल्या, सरतेशेवटी सोराबजींनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. अशा प्रकारे बॅंकेतील उदयोन्मुख कारकीर्द सोडून देण्यापासून त्यांना रोखलं गेलं. अर्थात् सोराबजींसाठी आणि एकूण बॅकिंग क्षेत्रासाठीही झालं ते चांगलंच झालं असं आपण म्हणू शकतो. आता सोराबजींनी बॅंकेच्या पायाभरणीसाठी केलेल्या प्रयत्नांकडे आपण वळू.