१.१ विश्वासाने घेतलेली भरारी
बॅंक ऑफ इंडियाची स्थापना १९०६ साली सर ससून जे. डेव्हिड, सर कावसजी जहांगीर (पहिली बॅरोनेट पदवी मिळालेले), रतनजी दादाभॉय टाटा (जे. आर. डी. टाटा यांचे वडील), गोरधनदास खटाव, जे. एच. दाणी, लालूभाई सामळदास, खेत्सी खियासी, रामनारायण हरनंदराय आणि नूरदीन इब्राहिम नूरदीन यांच्यासारख्या विश्वासार्ह व्यक्तींनी केली होती. हे सगळे लोक बॅंकेचे पहिले संचालक होते. मुंबईचे श्रीमंत व्यावसायिक सर शापूरजी भरूचा हे सर ससून यांचे जीवलग मित्र होते, ते स्वतः कधी संचालकपदावर राहिले नसले तरी बॅंकेच्या निर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.: त्या काळातील मुंबई ही कापड उद्योगाचं केंद्र आणि बंदर म्हणून प्रसिद्ध होती. सर्व एक्स्चेंज बॅंकाचे लगाम इंग्रज आणि युरोपियन लोकांच्या ताब्यात होते त्यामुळे व्यापारासाठी पैसा उभा करण्यात भारतीय व्यावसायिकांना खूप अडचणी यायच्या. मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीयांना तर बॅंकेचं तोंड पहाणंही शक्य नव्हतं. अशा वेळेस स्वकष्टावर प्रगती करणारे श्रीमंत गिरणीमालक सर ससून जे. डेव्हिड पुढे झाले. असं म्हणतात की ते १९२६ साली वारले तेव्हा भारतातल्या अत्यंत श्रीमंतांपैकी एक होते. त्यांच्या मनात आलं की भारतीय व्यापारास उत्तेजन देण्यासाठी आणि भारतीय व्यापा-यांना वित्तपुरवठा करण्यासाठी आपणच एक भारतीय मालकीची बॅंक काढावी. सर ससून यांनी कावसजी जहांगीर यांच्या कानावर ही कल्पना घातली आणि विचारलं की तुमच्या वडिलांना या कामात माझ्याबरोबर सहभागी होण्यात रस असेल का. ते ऐकल्यावर कावसजींचे वडील सर कावसजी जहांगीर (पहिले बॅरोनेट) यांनी अजिबात मागेपुढे पाहिलं नाही. त्यानंतर पुढे काय घडलं हा इतिहास सर्वांसमोर आहेच.
स्वदेशी चळवळ देशाच्या विचारविश्वात मूळ धरत असतानाच्या काळात बॅंक ऑफ इंडियाची नोंदणी करण्यात आली. ७ सप्टेंबर १९०६ रोजी तिची स्थापना झाली, तिचं अधिकृत भाग भांडवल १ कोटी रूपये होतं. ते १०० रूपये प्रत्येकी अशा समभागांत विभागलेलं होतं. यापैकी ५५००० समभागांसाठी खाजगी अर्ज भरण्यात आले आणि ४५००० समभाग जनतेला विकत घेण्यासाठी ऑक्टोबर, १९०६ रोजी खुले करण्यात आले. १ नोव्हेंबर, १९०६ रोजी बॅंकेने आपले व्यवहार सुरू केले. त्यांची नोंदणीकृत कचेरी ओरिएंटल बिल्डिंग, एस्प्लनेड मार्ग येथे होती. (तिथं आता अमेरिकन एक्स्प्रेस बॅंकेची कचेरी आहे.) बॅंक ऑफ इंडिया हे नाव वापरणारी ही पहिली बॅंक नसली तरी टिकून राहाणारी आणि पुढे भरभराटही होणारी अशी पहिलीच बॅंक आहे. या नावाची पहिली बॅंक १८२८ मध्ये कलकत्त्याला सुरू झाली होती, दुसरी बॅंक लंडनमध्ये १८३६ साली अँग्लो इंडियन बॅंक या स्वरूपात स्थापन झाली आणि तिसरी बॅंक मुंबईत १८६४ साली स्थापन झाली होती. परंतु सर ससून यांनी स्वतःची ‘बॅंक ऑफ इंडिया’ स्थापन केली तेव्हा या तिन्हीतली एकही बॅंक अस्तित्वात नव्हती. कावसजी जहांगीर, दुसरे बॅरोनेट यांनी लिहिलं आहे की सर ससून यांनी मृत्युसमयी शेवटचे शब्द उच्चारले ते होते,’’ बॅंक ऑफ इंडियाची काळजी घ्या.’’
बॅंक ऑफ इंडियाची स्थापना हा सोराबजींच्या करियरमधील सगळे अर्थच बदलून टाकणारा टप्पा होता. सोराबजींच्या मनातील नैसर्गिक कुतुहल आणि उच्च महत्वाकांक्षा यांच्यामुळे ते त्यांच्या नोकरीतून मिळणा-या ज्ञानमर्यादांच्या पल्याड गेले होते हे आपण पाहिलंच आहे. बॅंकिंग प्रक्रियेतील आपल्या मर्यादित भूमिकेपुरतं स्वतःला सीमित न ठेवता एकूणच बॅंकिंग प्रक्रिया म्हणजे काय हे शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. अन्य लोकांपेक्षा त्यांची नजर अधिक उंचावर खिळली होती. शिवाय तेव्हाच्या पूर्वग्रहदूषित वातावरणामुळे त्यांना कळून चुकलं होतं की आपण जास्तीत जास्त आपल्या भावासारखं हेडक्लार्क बनू शकतो. परंतु हे भविष्य त्या महत्वाकांक्षी तरुणाला काही फारसं रूचलेलं नव्हतं. सोराबजींनी ठरवलं की बॅंक ऑफ इंडियाची स्थापना हा आपल्याला हव्या त्या वेगवान प्रगतीसाठी लागणारा टेकू बनायला हवा. त्यांनी त्यांचे मित्र डी. एल. पांडे आणि होमी सी सेठना यांच्या ओळखीने फिरोझ सेठनांना गळ घातली की माझी ओळख आपण सर शापूर भरूचा यांच्याशी करून द्यावी. (हेच फिरोज सेठना नंतर सेंट्रल बॅंकेचे अध्यक्ष बनले. त्यांना नाईटहूडचा किताबही इंग्रज सरकारकडून मिळाला.) सोराबजींची भेट शापूरजींशी झाली खरी परंतु शापूरजींचा प्रतिसाद अजिबातच आश्वासक नव्हता. ते त्यांना म्हणाले,’’ मुला, आणखी काही वर्षांनी तुला मिशा फुटल्या की ये, या पदासाठी अधिक अनुभवी माणसाची आम्हाला गरज आहे. ‘’ म्हणजे वंशवादी पूर्वग्रहामुळे इंग्लिश बॅंकांनी त्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरला होता तर त्यांचं लहान वय आणि त्यांना अनुभव नसावा असा अंदाज यांच्यामुळे बॅंक ऑफ इंडियात जाण्याचा मार्गही बंद झाला होता.
एखाद्या कमी हिंमतीच्या माणसाने पराभव मान्य केलाही असता परंतु सोराबजींनी सर शापूरजींना दुस-यांदा गाठून त्यांचं मन वळवलं की कृपया आपण सर ससून यांच्याशी माझी गाठ घालून द्यावी. अनुभव घेण्यासाठी सोराबजी एवढे आतुरले होते की त्यांनी असंही सुचवलं की पगार न घेताही आपण काम करायला सिद्ध आहोत. सर ससून यांच्यावर या उत्साही तरुणाचा चांगलाच प्रभाव पडला. त्यांनी त्यांना विचारलं की तुमची पगाराची अपेक्षा काय आहे? त्यावर सोराबजींनी २०० रूपये आकडा सांगितला परंतु त्या ऐवजी १५० रूपये पगार देऊ करण्यात आला. ते पद सब-अकाउंटंटचं होतं. सोराबजींनी लगेचच नोकरी स्वीकारली. पैशाचा मोबदला त्यांच्या दृष्टीने दुय्यम होता. त्यांना पदामध्ये आणि पदामुळे मिळणा-या संधींत अधिक रस होता. तसंच त्या पदासाठी योग्य युरोपियन व्यक्ती सापडेपर्यंतच ही नोकरी राहाणार होती या विचारानेही ते नाऊमेद झालेले नव्हते.
आघाडीच्या परदेशी बॅंकेतील सुरक्षित नोकरी सोडून द्यायची, त्याऐवजी एका नव्यानं उघडलेल्या देशी बॅंकेत नोकरी धरायची या विचारामुळे घरचे लोक हवालदिल झाले. परंतु चार्टर्ड बॅंकेत अकाउंटंट पद भूषवणारे श्री. ब्रूस हेच नव्या बॅंकेत मॅनेजर म्हणून जात आहेत हे कळल्यावर त्यांच्या मनातली भीती थोडीफार कमी झाली आणि शेवटी त्यांनी सोराबजींचा निर्णय मान्य केला. परंतु प्रत्यक्षात श्री. ब्रूस बॅंक ऑफ इंडियात आलेच नाहीत आणि कचेरीची सगळी व्यवस्था उभारायचं काम सोराबजीच्या खांद्यांवर येऊन पडलं. परंतु पडलेल्या जबाबदारीस त्यांनी तोडीस तोड न्याय दिला कारण त्यांना व्यापा-यांशी थेट सबंध निर्माण करताना त्यांच्या समस्या आणि त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप समजावून घेता आलं. त्यांचं काम वरच्या लोकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहिलं नाही. सोराबजींची पाठ बॅंकेच्या ऑडिटर्सनी थोपटली, बॅंकेच्या संचालकांनीसुद्धा सोराबजीच्या कामाचं कौतुक दप्तरातल्या लेखी नोंदीच्या स्वरूपात केलं. त्यांच्या उद्यमशीलतेमुळे आणि कुशाग्रबुद्धीमुळेच अल्पावधीतच बॅंक सुदृढ पायावर उभं राहू शकली होती.
तथापि, सोराबजींच्या योगदानाचं कौतुक करूनही बॅंकेने मॅनेजर पदावर एच.पी. स्ट्रॉन्गफेलो यांना दरमहा रू ५००० एवढ्या भल्या मोठ्या पगारावर नेमलं ते नेमलंच. हा प्रचंड आकडाच स्पष्ट दाखवून देतो की युरोपियन लोकांची श्रेष्ठपदावरील नोकरी आणि सोराबजी आणि त्यांचे भावासारख्या लोकांची कनिष्ठ पदांवरील नोकरी यांच्यातली दरी केवढी प्रचंड होती. डिसेंबर, १९०६ मध्ये बॅंक ऑफ इंडियाच्या सेवेत येण्यापूर्वी स्ट्रिंगफेलो ‘अलायन्स बॅंक ऑफ सिमला’ येथे नोकरीस होते. म्हणजे पूर्णपणे भारतीयांनीच काढलेली बॅंक असूनही मॅनेजरपदावर युरोपियन माणूसच हवा असं भारतीय लोकांनाही वाटत होतं. यावरून हा पूर्वग्रह केवढा खोल रूजलेला होता हे दिसून येतं. बॅंक ऑफ बॉम्बेत काम करणा-या ए. जे. स्टुअर्ट यांची नेमणूक मुख्य अकाउंटंट पदावर झाली.
सोराबजींच्या कर्तृत्वाबद्दल स्ट्रिंगफेलोंचं लवकरच खूप चांगलं मत बनलं आणि ती गोष्ट चार चौघांत बोलून दाखवण्यासही त्यांनी कमी केलं नाही. बॅंकेच्या बहुतेक ग्राहकांना इंग्रजी येत नसे तेव्हा त्यांच्यासोबतच्या चर्चेत दुभाष्या म्हणून ते सोराबजींना घेऊ लागले. सोराबजी नेहमीच मॅनेजरसाहेबांच्या हाकेस हजर असत त्यामुळे त्यांची बॅंकेतली आणि ग्राहकांतली प्रतिष्ठा एकदम वाढली. ही गोष्ट इंग्रज अकाउंटंटच्या डोळ्यांत सलू लागली त्यामुळे सोराबजींना त्यांची जागा दाखवून देण्याचा त्यानं निर्धार केला. मग कचेरीतील हुकुमनाम्यांची (ऑफिस ऑर्डर्सची) मालिकाच लागली. त्या सगळ्या हुकुमनाम्यांचा हेतू सोराबजींना अपमानित करणं हाच होता. त्या सगळ्याचा कळस झाला जेव्हा एका युरोपियन माणसाची नेमणूक असिस्टंट अकाउंटंट म्हणून झाली आणि सोराबजीने स्वतःकडे येणारी व्हाऊचर्स त्यांच्याकडे पाठवायची एवढंच काम त्यांच्याकडे शिल्लक राहिलं. या अपमानाविरूद्ध केलेल्या निषेधाकडे पूर्णतया काणाडोळा केला गेला. : नाहीतरी युरोपयन श्रेष्ठत्व हे तर प्रस्थापित वास्तव होतं, त्याला आव्हान कुणी म्हणजे कुणीही देऊ शकत नव्हतं. या प्रसंगानंतर सोराबजींची खात्रीच झाली की आपल्याला न्याय्य वागणूक मिळायला हवी असेल तर नुसती भारतीयांनीच काढलेली बॅंक उपयोगाची नाही, तिचं व्यवस्थापनसुद्धा भारतीयांकडेच असलं पाहिजे.
भारतीय मालकीची आणि भारतीयांनीच चालवलेली बॅंक असली पाहिजे हा विचार सोराबजींच्या मनात रुजू लागला. त्यांच्या कल्पनाशक्तीच्या सुपीक जमिनीत पडलेलं हे बीज विश्वासही बसणार नाही असं समृद्ध पिक भविष्यात देणार होतं. सेंट्रल बॅंकेनं पुढे अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळवलं त्यातून ते सिद्धही झालंच. परंतु सुरुवातीच्या त्या काळात मात्र सोराबजींचे क्रांतिकारक विचार पाहाता त्यांना स्वतःलाही शंका वाटत असणारच. कारण ज्या व्यवस्थेचा ते स्वतः एक भाग होते तिलाच आव्हान द्यायला ते निघाले होते. सोराबजींच्या मनात जे होतं त्यामुळे तत्कालिन व्यवस्थेला धक्का बसत होता, ज्या गृहितकावर ती व्यवस्था उभी होती त्या गृहितकालाच धक्का बसत होता.’’ सोराबजी स्वतःशी विचारमंथन करत होते की भारतीयांनी स्वतःच्या बॅंका केवळ स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठीच नव्हे तर देशाचे हितसंबंध राखण्यासाठीसुद्धा उभारायला हव्यात. या अत्यंत कठीण काळात त्यांची पत्नी साकरबाई हिने खूप कळकळ, समजंसपणा आणि उत्तेजन देऊन त्यांची साथ केली. आणीबाणीच्या अनेक प्रसंगांत त्यांना ताकद देऊन उभं केलं.
भारतीयांबद्दलच्या पूर्वग्रहामुळे सोराबजींना खूप नैराश्य येत होतंच परंतु जेव्हा अहमदाबादच्या व्यापारी शिष्टमंडळाला स्ट्रिंगफेलो म्हणाले की कुणीही भारतीय माणूस तिथल्या बॅंकेच्या शाखेचं व्यवस्थापन सांभाळण्याइतका सक्षम नाही तेव्हा सोराबजींचं नैराश्य अधिकच वाढलं. जिथं कुठं वळतील तिथली मतं, भावना आणि परंपरा त्यांना सारख्याच शत्रुत्वाच्या दिसत होत्या. बॅंक चालवण्याची गुणवत्ता भारतींयात नाही ही वसाहतवादी लोकांची घिसीपिटी रेकॉर्ड ऐकून ऐकून सोराबजींच्या जीवाची नक्कीच लाही लाही होत असणार. विशेषतः त्यांची उत्तम पात्रता पाहूनही बॉम्बे मर्कंटाईल बॅंकेच्या अध्यक्षांना त्यांना मॅनेजरपद द्यावंसं वाटलं नाही तेव्हा तर त्यांना अधिकच हताश वाटू लागलं. तेव्हा त्यांनी एकदा मुंबईतील आघाडीचे कापड व्यापारी कल्याणजी वर्धमान जेट्सी यांच्याजवळ आपलं मन उघडं केलं. बॅंकेत ओळख झाल्यानंतर दोघाची घनिष्ट मैत्री झाली होती. त्यांच्या रूपात सोराबजींना एक सहानुभूती दाखवणारा आणि सक्षम जिवलग मित्र मिळाला होता. ब-याच विषयांवर दोघांचे विचार सारखेच होते. जिथं जिथं कल्याणजींना भेदभावाने वगळण्यात आलं ते सगळे अनुभव त्यांनीही सोराबजींना सांगितले. कितीही डोकं आपटलं तरी परदेशी लोक भारतीयांची कर्तबगारी मान्य करणारच नाहीत हेच त्यांचंही मत बनलं होतं. भारतीय बॅंकांची राष्ट्रीय प्रगतीतली भूमिका सोराबजींनी त्यांना विशद केली. विद्यमान व्यवस्थेला आव्हान देण्याची गरज आहे यावर जोर दिला. त्यांनी कल्याणजींना सांगितलं की नवीन बॅंक उघडण्यासाठी मला साधारण १०-२० लाख रूपयांची गरज आहे. फारशी मनधरणी करावी न लागताच कल्याणजी भांडवल उभारणीत मदत करायला तयार झाले. कल्याणजींनी दिलेल्या कर्जप्रस्तावांवर बॅंक ऑफ इंडियाने अत्यंत असामाधानकारक प्रतिसाद दिला होता, त्यामुळेही सोराबजींच्या योजनेस पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्धार पक्का झाला असावा.
त्या काळात स्वदेशीच्या विचारांना बळ मिळत होतं. सुरुवातीला थोडीशी संभ्रमावस्था झाल्यानंतर ती कल्पना बॅंकिगच्य़ा दुनियेतही हळू हळू येऊ लागली होती. एकोणिसावं शतक संपताना स्वदेशीचे प्रयत्न औद्योगिक उत्पादन क्षेत्राऐवजी जिथं तुलनेनं नफा कमावणं सोपं होतं अशा बॅंकिंग, विमा आणि अंतर्गत व्यापार या क्षेत्रात सुरू झाले होते. युरोपियन व्यवस्थापनाच्या बॅंका भारतीय कंपन्यांना हवी ती मदत करत नाहीत अशी लोकांची तक्रार ऐकू येऊ लागली होती. १९०१ साली लाहोरला स्थापन झालेली पीपल्स बॅंक ऑफ इंडिया, १९०६ साली मुंबईत स्थापन झालेली इंडियन स्पिसी बॅंक यांचा जन्म स्वदेशी चळवळीतूनच झाला होता कारण शेतमालाच्या निर्यातक्षेत्रात तेजी आल्याने तगडा नफा मिळाला होता. त्यामुळे पश्चिम भारत, पंजाब आणि संयुक्त प्रांतात असंख्य बॅंकिंग कंपन्या सुरुही झाल्या होत्या परंतु सर्वांचीच निर्मिती काही स्वदेशीच्या उद्दिष्टामुळे झाली नव्हती. युरोपियन बॅंकांच्या प्रचंड नफ्यातील थोडासा आपल्याही वाट्याला यावा या उद्देशाने त्यातल्या ब-याच बॅंका स्थापन झाल्या होत्या.
सोराबजीसुद्धा स्वदेशीच्या संकल्पनेने प्रभावित झाले होते. त्यांना जो भेदभाव सहन करावा लागला होता त्यानं त्यात महत्वाची भूमिका बजावली होती कारण तो भेदभाव वैयक्तिकच नव्हता तर सर्व भारतीयांवर आणि भारतावर उडवलेल्या नकोशा शिंतोड्यांसारखा तो होता. नव्या बॅंकेच्या संचालक मंडळावर प्रभावशाली भारतीय असतील तर त्याचा बॅंकेस फायदा होईल यावरही त्या दोघांचं एकमत झालं. त्यासाठी लालूभाई सामळदास, पुरुषोत्तमदास ठाकुरदास, फिरोझ सेठना, मनमोहनदास रामजी, फझलभॉय चिनॉय अशी माणसं त्यांना योग्य वाटली. अर्थात् त्यांनी सोहराबजींना आश्चर्य- संशयाने भरलेला प्रतिसाद दिला कारण ही कल्पना क्रांतीकारक तर होतीच पऱतु तिचा निर्माताही केवळ अठ्ठावीस वर्षांचा युवक होता. त्यांनी सोराबजीच्या साहसाविरूद्धचे नेहमीचे मुद्दे मांडून ते साहस अपयशी का ठरेल ते स्पष्ट केलं.: त्यांचा स्पर्धेत टिकाव लागणार नाही, अन्य भारतीय बॅंकांचा अनुभव फारसा उत्तेजनदायी नाही, नवीन बॅंक हे केवळ एक ‘शेखचिल्ली’ स्वप्न आहे, जे कधीच सत्यात उतरणार नाही.
पिछेहाट होऊनही सोराबजी डगमगले नाहीत. ध्येयसिद्धीच्या वाटेवर चालताना त्यांना मित्रांकडून आणि अगदी काही नातेवाईकांकडूनही उपहास आणि टोमणे ऐकावे लागले. या सर्वांची जणू खात्रीच पटली होती की सोराबजींच्या मनाचा तोल ढळल्यामुळेच असल्या उटपटांग योजना त्यांच्या मनात येत असतात. परंतु सोराबजींना आता मागे वळायचं नव्हतं. त्यांनी ठरवलं की झालं तेवढं पुरे झालं, आणि सरळ बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. बातमी घरी सांगितली तेव्हा माजलेला हलकल्लोळ भूतकाळात कधीही अनुभवावा लागला नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा उतावळेपणा माहिती होता परंतु आता मात्र त्यांनी अगदी हद्दच केली होती. त्यांनी त्यांना स्मरण करून दिलं की तू निवडलेल्या वाटेत धोके आहेत, सुरक्षितता आणि सारासार विचार वा-यावर सोडून दिल्याचा तुला पश्चात्ताप होईल. त्यामुळे सोराबजींना कदाचित आपल्या निर्णयाबद्दल शंकाही मनात आल्या असतील, कारण त्यांच्या कुटुंबीयांच्या शंका अगदीच चुकीच्या नव्हत्या, परंतु सरतेशेवटी ज्या आत्मविश्वासाने त्यांनी स्ट्रिंगफेलोंना तोंड दिलं त्याच आत्मविश्वासाने त्यांना दृढ उभं राहायलाही शिकवलं.