५.३ एक दिवा विझताना
१९३५-३६ पर्यंत सेंट्रल बॅंक देशातील सर्वात मोठी बॅंक बनली होती, तिच्याकडील ठेवी २५ कोटी रूपयांच्या झाल्या होत्या. देशातील अन्य ८४ बॅंकांकडील एकुण ठेवींच्या एक तृतियांश एवढी ही रक्कम होती. आता राष्ट्रीय स्तरावर तिला स्वदेशी बॅंक म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. भारतीय लोक चांगले बॅंकर्स बनू शकत नाहीत या विधानाला तिने छेद दिला होता आणि आपल्या कामगिरीने निंदकांची तोंडं बंद करून टाकली होती. ती नुसती टिकलीच नव्हती तर तिची भरभराट झाली होती. तिनं आधुनिक भारतीय बॅंकव्यवस्थेची पायाभरणी तर केली होतीच परंतु त्याशिवाय बॅंकिंग यंत्रणेला गुणवत्ता आणि प्रेरणाही दिली होती.
बॅंकेला पंचवीस वर्षं झाली तेव्हा बॅंकेचं भरणा भांडवल आणि राखीव निधी २.५ कोटी रूपये होता तर ठेवी ३१ कोटी होत्या. बॅंकेच्या शाखा ८४ होत्या. बॅंकेवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला त्यात बॅंकेच्या आर्थिक सचोटीचं कौतुक होतंच तसंच पुराणमतवाद आणि प्रागतिकता या दोन परस्परविरूद्ध शक्तींचा सुवर्णमध्य बॅंकेनं आपल्या धोरणात योग्य प्रकारे साधला म्हणूनही त्यांचं कौतुक होत होतं. सोराबजींनी त्या प्रसंगी दिलेल्या संदेशातून बॅंकिंगविषयीचं त्यांचं तत्वज्ञान आणि सेंट्रल बॅंकेनं निभावलेली भूमिका यांचा सारांशच व्यक्त होत होता. ते म्हणाले होते की चांगल्या बॅंकेचे फायदे केवळ तिच्या वास्तूच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित असता कामा नयेत. तसंच ते बॅंकिंग उद्योगाच्या मर्यादांपुरतेही सीमित नसावेत. —तर वाणिज्य, उद्योग आणि आर्थिक कामकाजाच्या प्रत्येक शाखेत त्यांचा प्रवेश व्हायला हवा. सोराबजी पुढे म्हणाले की ‘’सेंट्रल बॅंक ही स्वतःला ‘लोकांची बॅंक’ समजते. लोकांचं सहकार्य आणि पाठिंबा यांच्या बळावर तिला केवळ आकारानेच वाढण्याची इच्छा नाही तर त्यासोबत तिच्याकडून होणा-या देशसेवेची व्याप्ती आणि गुणवत्ता वाढवण्याचीही इच्छा आहे.’’
परंतु झाल्या तेवढ्याच प्रगतीवर संतुष्ट राहाण्याचा सोराबजींचा स्वभाव नव्हता. त्यामुळे आणखी एका क्षेत्रात त्यांनी नव्यानं पाऊल टाकलं ते भारतीय बॅंकिंगच्या दृष्टीनेही पहिलंच पाऊल होतं. लंडनमध्ये १९३६ साली त्यांनी पहिली भारतीय एक्स्चेंज बॅंक उघडली हेच ते नवं पाऊल होतं. परदेशी चलनाच्या उद्योगात काम करणारी एकही भारतीय बॅंक तोवर नव्हती. या गैरसोयीचा भारतीय बॅंकव्यवस्थेला चांगलाच फटकाही बसत होता. त्यामुळे ही कमतरता भरून काढणं हे ध्येय सोराबजींनी समोर ठेवलं आणि सेंट्रल एक्स्चेंज बॅंक ऑफ इंडिया लिमिटेड ही सेंट्रल बॅंकेची सहयोगी कंपनी लंडनमध्ये स्थापन केली. नंतर १९४३ साली ही कंपनी जरी बंद झाली असली तरी नंतर तिचं पुनरूज्जीवन नव्या अवतारात झालं आणि १९५४ साली ती बॅंकेची लंडनमधील नियमित शाखा म्हणून काम करू लागली. या ठिकाणीसुद्धा एखाद्या क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीचं वर्तन आणि संचालक मंडळाचा भित्रा पुराणमतवाद यांच्यातील फरक शाबीत होतो.
सोराबजींच्या याच धडाडीला कारणं काढून चाप बसवावा असा संचालक मंडळाचा कल होता. त्याच काळात एच.टी.पारेख हे तरुण कॉलेजविद्यार्थी लंडनमध्ये परीक्षेच्या निकालाची वाट पाहात होते. त्या काळात त्यांनी महिनाभर सोराबजींकडे सचिवपदावर काम केलं होतं. एके दिवशी सकाळी ते सोराबजींना ग्रॉस्वेनॉर हाऊस हॉटेलात आदराने भेटायला गेले आणि सध्या परीक्षेच्या निकालापर्यंत दुसरं करायला काही नाही तर मला तुमच्याकडे काम करू द्या अशी त्यांना विनंती केली. सोराबजीनी ताबडतोब त्यांना काम दिलं आणि सांगितलं की लंडनमधील प्रस्तावित बॅंकेच्या व्यवस्थापक पदासाठी हे अर्ज आलेत ते जरा वेगवेगळे कर. सोराबजी काम करून घेण्यात चांगलेच कडक मास्तर होते, पारेखांनी नंतर आठवण सांगितली की सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मी एक कप चहाही न घेता काम करत होतो. परंतु सोराबजींवर अन्याय न करता म्हणायचं तर त्या काळात स्वतः सोराबजींनीही काही खाल्लेलं प्यायलेलं पारेखांना आठवत नव्हतं. तेसुद्धा काहीही न खाता पिता काम करत होते. एच. टी. पारेख यांची पुतणी हर्षा पारेख हिला आठवतं की तिचे काका सांगायचे की सोराबजी खूपच कडक होते आणि त्यांना कामात अचूकता हवी असायची. सोराबजींनी धडाडीबद्दल आणि चटकन निर्णय घेऊन टाकण्याच्या वृत्तीबद्दल संचालक मंडळाची नकारात्मक वृत्ती होती त्या वृत्तीस पारेखांच्या साक्षीमुळे छेद जातो तो कसा हे त्यांच्या स्वतःच्या शब्दांतच नीट कळेल. ते म्हणाले होते,: ‘’ माझ्याकडे जुना टाईपरायटर होता. सोराबजींनी अध्यक्ष सर फिरोझ सेठना यांना लिहिलेलं पत्र मी एकेक बोटाने टाईप केलं. सेठना साहेब त्यांना लंडन शाखा न उघडताच परत निघून या असं म्हणत होते, त्यांच्या पत्रास उत्तर म्हणून हे पत्र होतं असं मला स्पष्ट आठवतं. त्यावर सोराबजींचं नमुनेदार उत्तर असं होतं की जेव्हा जेव्हा सेंट्रल बॅंक नवीन काहीतरी करू पाहाते तेव्हा तेव्हा मला नेहमीच नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. असं म्हणून त्यांनी अध्यक्षांची सूचना नाकारताना लिहिलं की या कार्यात आपल्यापेक्षा माझीच प्रतिष्ठा अधिक पणाला लागली आहे. ‘’
त्यानंतर ४५ वर्षांनी सोराबजीच्या जन्मशताब्दी सभेत बोलताना पारेख म्हणाले की त्या काळात सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ही एकच बॅंक होती जिच्या मस्तकावर कुणाचाही वरदहस्त नव्हता. केवळ छोट्या छोट्या माणसांच्या पाठिंब्यावरच ही बॅंक मोठी झाली आहे. त्यांनी सोराबजींची तुलना बॅंक ऑफ अमेरिकेचे संस्थापक ए.पी. जिआन्निनी यांच्याशी केली. त्यांनीही आपली बॅंक ‘छोट्या माणसां’साठीच काढली होती. ते म्हणाले, ईस्ट कोस्टवरील प्रस्थापित बॅंकर्सविरूद्ध झगडून जिआन्निनींना प्रगती करावी लागली तशीच सोराबजींनाही प्रस्थापित बँकांशी झगडतच वाट चालावी लागली होती. दोघेही कल्पक आणि चौकटीबाहेरचा विचार करणारे होते, दोघांनाही बॅंकिंगचा ध्यास लागलेला होता. दोघांमध्येही समान धडाडी होती,त्यामुळेच ज्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यास पारंपरिक बॅंकर्स का कू करत होते त्यांना पैसा पुरवायला ते तयार होत होते.’’
नानपोरिया एका पत्राचा उल्लेख करतात. त्या पत्रात सोराबजींनी सर फिरोझ सेठना यांना आश्वस्त केलं होतं की ‘ लंडन बॅंकेबद्दल चिंता करण्याचं काहीच कारण नाही, मी सगळी काळजी घेतो आहे.’’ इ.एफ. कॉकेल हे बॅंकेचे लंडन येथील एजंटही सोराबजींच्या कामावर नजर ठेवून होते आणि होणा-या प्रगतीबद्दल सर फिरोझना माहिती कळवत होते. त्यांनी सर फिरोझना लिहिलं की,’’ दरम्यान तुम्ही खात्री बाळगा की मला गरज वाटली तर मी माझं मत स्पष्टपणे मांडेन. तथापि, सर्व काही व्यवस्थित चाललं आहे याच निष्कर्षाप्रत मी येऊन पोचलो आहे. पी (पोचखानावाला) इथे आले म्हणून चांगलंच झालं आहे.’’ यातून हे स्पष्टच दिसतं की संचालक मंडळास परिस्थितीबद्दल स्वतंत्र मत हवं होतं कारण समजा सोराबजी उत्साहाच्या भरात काहीतरी निर्णय घाईघाईने घेऊन बसले तर बॅंकेचं हित त्यामुळे धोक्यात येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यातले धोके न दिसायला सोराबजी काही आंधळे नव्हते. निरीक्षकांच्या मतानुसार जर हा प्रयोग फसला तर त्याची झळ बॅंकेला फार बसू नये याबद्दलची पावलं त्यांनी आधीच उचललेली होती. त्यानंतर थोड्याच काळात जपानसह अन्य देशांत अशाच शाखा उघडण्याचा विचार सोराबजी करू लागले.
परंतु नियतीच्या मनात वेगळीच योजना होती. मृत्यूबद्दलची एक त्रस्त करणारी गोष्ट म्हणजे भविष्यात काय घडणार आहे ते आधी कळत नाही. अर्थात् त्या वेळी कुणाला अंदाज बांधता आला नसला तरी सोराबजींचं जीवन जवळजवळ अंतकाळाशीच येऊन ठेपलं होतं. मे, १९३७मध्ये सोराबजी कलकत्त्याहून मुंबईला आले तेव्हा त्यांना एक छोट्याशा पुळीचा त्रास होत होता. तोच आजार शेवटी प्राणघातक ठरला. डॉक्टरांनी सांगितलं की ते गळू झालेलं असून बरं व्हायला दोन महिने लागतील. तेव्हा त्या महिन्याच्या अखेरीस साकरबाई लंडनला त्यांच्या मुलींना घेऊन जाणार होत्या. त्यांचे दोन्ही मुलगे रतन आणि नोशिर तिथे होते. घरची माणसं एवढ्या दिवसांनी एकमेकांना भेटत आहेत तर त्यांच्या आड आपली ढासळती तब्येत येऊ नये अशी सोराबजींना काळजी लागली होती. बायकोने मुलींना घेऊन ठरल्याप्रमाणे जावं म्हणून तिची समजूत घालण्याचा सोराबजींनी निष्फळ प्रयत्न केला. परंतु लवकरच लक्षात आलं की हा आजार दिवसेंदिवस बळावतच चालला आहे. आजाराच्या विळख्यात अडकलेले सोराबजी रूग्ण म्हणून सहकार्य करणारे अजिबात नव्हते. बॅंकेत जायला मिळत नाहीये म्हणून अस्वस्थ होऊन त्यांनी ठरवलं की आपण या गळवाची शस्त्रक्रिया करून घेऊ म्हणजे ही उपटलेली कटकट मिटून जाईल. शस्त्रक्रिया तर झाली परंतु सोराबजींना खूपच ताप आला, तापात ते बरेचदा बेभान होऊ लागले. तापाचं कारण काय ते कळलं नाही. परंतु सोराबजींना कुठलातरी जंतुसंसर्ग झाला होता. तत्कालिन औषधांत त्या जंतूंशी लढण्याची क्षमता नव्हती. सर फिरोझ सेठना सोराबजींच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्यांना भेटले. सोराबजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलवतसुद्धा नव्हतं. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचं होतं ते कुणालाच कळलं नाही, कुणाला ते लिहूनही ठेवता आलं नाही. परंतु सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया उभारूनच सोराबजींनी खूप मोठं भाष्य करून ठेवलेलं होतं, त्यांच्या कर्तृत्वाचे पडसाद अनंत काळ उमटणार होते. सोराबजींची तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थनासभा आयोजित करण्यात आल्या परंतु शेवट तर जवळ आलेला होता. तो ४ जुलै, १९३७ रोजी प्रत्यक्ष आलाच. त्या अगोदर जवळजवळ २० तास ते बेशुद्धीतच होते.
हजारो लोकांनी ब्युएना विस्टा , वरळी येथील त्यांच्या घराभोवती गराडा घातला कारण त्यांना सोराबजींना शेवटची मानवंदना द्यायची होती. हा तोच माणूस होता ज्यानं स्वकर्तृत्वावर इतिहास घडवला होता, केवळ पूर्वसुरींच्या मार्गावरून तो चालला नव्हता. तिथं उपस्थित अन्य दिग्गजांत होते सर फिरोझ सेठना, इंपिरियल बॅंकेचे सर विल्यम लमॉण्ड, के. एफ. नरिमन, बी.जी.हॉर्निमन, सर एस. बी. बिलिमोरिया आणि सर बैरामजी जिजिभॉय. १४ जुलै रोजी लंडनमधील भारतीय नागरिकांनी सोराबजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा घेतली. केवळ सर्वसामान्य कारकून म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेले सोराबजी मृत्युसमयी भारतीय बॅंकिंग क्षेत्राचे सम्राट म्हणूनच नावाजले गेले होते. सर होमी मोदी या बॅंकेच्या संचालकांनी त्या सभेचं अध्यक्षपद स्वीकारलं. हेच मोदी नंतर बॅंकेचे तीन कार्यकाळांसाठी अध्यक्षही बनले (१९३८-४०, १९४२-४८ आणि १९५२-६६ ). त्या सभेत भाषण करताना सर होमींनी म्हटलं की ‘ सोराबजी मुंबईचे आणि भारताचे महान नागरिक होते, दृढनिश्चयी आणि कल्पक होते, जन्मजात बॅंकर होते. स्वदेशीचे पाईक असल्यामुळे त्यांनी अशा एका क्षेत्रात प्रवेश केला जो फक्त ब्रिटिशांसाठीच राखीव होता. एक अनाम कारकुन म्हणून सुरुवात करूनही खरोखरची भारतीय बॅंक कशी असते याची संकल्पना सर्वप्रथम त्यांनीच लोकांसमोर ठेवली.
चहूकडून श्रद्धांजलीचा तर वर्षावच झाला, परंतु बॅंकेने संमत केलेल्या ठरावातून हा माणूस आणि त्यानं स्थापलेली आणि जीवनभर सांभाळलेली संस्था यांच्यातील एकत्वाच्या भावनेला मान्यता लाभली ती अगदी आगळीवेगळीच होती. ठराव असा होता : ‘’ सेंट्रल बॅक ऑफ इंडिया आणि सर सोराबजी पोचखानावाला हे एकमेकांचे समानार्थी शब्द होते. मागच्या वर्षी बॅंकेची रजत जयंती साजरी झाली ती जणू त्यांची स्वतःची रजत जयंती असल्यासारखीच होती.