५.१ हे दुर्दैवी प्रकरण
ज्या ज्या संस्थेला किंवा संघटनेला एखादा धडाडीचा संस्थापक लाभतो तेव्हा एका छोट्याशा उद्योगापासून मोठ्या संस्थेपर्यंत भरारी घेताना तिला केव्हा ना केव्हातरी ताणतणाव सहन करावे लागतातच. विस्ताराचा तीव्र ध्यास असणा-या सोराबजींसारख्या धडाडीच्या संस्थापकाला बॅंकेचे पुराणमतवादी संचालक सर दिनशा वाच्छा यांच्याशी संघर्ष करावा लागला. बॅंकेच्या या अंतर्गत कलहाला ‘मसानी प्रकरण’ असं नाव मिळालं खरं परंतु ज्यांच्यामुळे ते नाव मिळालं ते रुस्तुम मसानी (नंतर त्यांना सर ही पदवी मिळाली) हे काही त्या प्रकरणातील मुख्य पात्र नव्हते. मसानींनी १९२५ साली सेंट्रल बॅंकेत प्रवेश केला असला तरी सर दिनशा आणि सोराबजी यांच्यातील मतभेद त्या आधीच काही वर्षे उघड्यावर आलेले होते. सोराबजींविरूद्ध सातत्याने निर्माण होणा-या दबावाची सुरुवात तर नाटकात मसानीचा प्रवेश होण्यापूर्वीच झालेली होती. कंपनीच्या काही संचालकांना वाटू लागलं होतं की बॅंकेच्या कामकाजाला विशिष्ट पद्धत, नियंत्रण आणि संस्थात्मकता यायला हवी आहे. त्याचाच परिणाम म्हणून मसानींची बॅंकेत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बॅंकेच्या इतिहासातला हा सर्वात दुःखद अध्याय होता आणि या अध्यायातील दोन मुख्य पात्रे म्हणजे सोराबजी आणि मसानी यांचे चरित्रलेखक अनुक्रमे एन.जे. नानपोरिया आणि बी. के. करंजिया यांनी या दुःखद प्रकरणाबद्दल काय म्हटले आहे ते पाहाणे मोठे उद्बोधक ठरेल.