३.२ वाढ आणि मान्यता
सेंट्रल बॅंक लवकरच मजबुतीच्या मार्गावर चालू लागली. जेव्हा प्रेसिडेन्सीतील (प्रांतातील) महापालिकांच्या ठेवी स्वीकारण्यायोग्य बॅंकांच्या यादीत सरकारने तिचं नाव घालायचं ठरवलं तेव्हा तर बॅंकेच्या विश्वासार्हतेला राजमान्यताच मिळाली. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने काही लाख रूपये बॅंकेत जमा केलेही तथापि सेंट्रल बॅंकेने मोत्यांच्या तारणावर उदारपणे कर्जे वाटल्याची अफवा पसरली तेव्हा त्यांनी ते पैसे लगोलग काढूनही घेतले. परंतु सोराबजींनी केलेलं त्या अफवेचं खंडन इतकं जोरदार होतं की स्थायी समितीच्या सदस्यांनी त्यांची माफी तर मागितलीच शिवाय मुदत ठेवींच्या रूपात ब-यापैकी मोठी रक्कमही त्यांना दिली. पूर्णपणे भारतीयच असलेल्या कुठल्याही कंपनीबद्दल अद्यापि जनमानसात ब-यापैकी पूर्वग्रह शिल्लक होता आणि सोराबजींना माहिती होतं की बॅंकेची प्रतिष्ठा आपल्याला चिकाटीने राखावीच लागेल.
सेंट्रल बॅंकेने मुंबईत आणि अन्य ठिकाणी ब-याच नव्या शाखा उघडल्या होत्या. अगोदर सांगितल्यानुसार बॅंकेने मुंबईतील मांडवी, झवेरी बाजार, शेअर बाजार, अब्दुल रहमान रस्ता, सॅंडहर्स्ट रोड, काळबादेवी आणि भुलेश्वर यासारख्या महत्वाच्या ठिकाणी शाखा उघडल्या होत्या. ऑगस्ट १९१३ मध्ये त्यांनी कराचीला शाखा उघडली आणि त्यानंतर १९१६ साली कलकत्त्याला शाखा उघडली. त्यानंतर कलकत्ता येथे एकूण चार शाखा उघडण्यात आल्या- बडा बाजार, न्यू मार्केट, शाम बाजार आणि भवानीपूर.
सेंट्रल बॅंकेचा कलकत्त्यातील प्रवेशास काही परदेशी बॅंकांचा विरोध होता कारण त्यांना स्पर्धा सहन होत नव्हती, तसंच बंगालमधील बॅंकविश्वात त्यांचं जेवढं वर्चस्व होतं तेवढं ते पश्चिम भारतातल्या विदेशी बॅंकांचं नव्हतं. सोराबजींच्या लक्षात आलं की ग्रामीण भागात आपल्याला प्रचंड भावी शक्यता आहे, त्यानुसार सोराबजींनी आपल्या धोरणांना आकार दिला.
थेट इंग्रजी सत्तेबाहेरील (संस्थानांचा) प्रदेश आणि इंग्रजी सत्तेखालील प्रदेश यांच्या एकमेकांतील व्यापारास कर्ज सुविधा मिळणं अवघड होतं. तिथं नियमित तत्वावर चालणारा हुंडी (बिल ऑफ एक्स्चेंज) बाजारही नव्हता. त्यामुळे या भागात व्यापार आणि उद्योगधंदा वाढवण्याचे कार्य सोराबजींच्या शिरावर येऊन पडलं. त्याशिवाय लोकांना बॅंक ही संकल्पना समजून सांगण्याची मुहुर्तमेढही सोराबजींनी रोवली. त्यांना बॅंक नुसतीच चालवायची नव्हती. छोट्या उद्योजकांसाठी आणि शेतक-यांसाठी बॅंक काय काय करू शकते हे समजावून सांगताना सोाराबजी कधीही थकले नाहीत. असंतुष्ट ग्राहकास संतुष्ट करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न तिथे केले जात होते.
सोराबजींचं तत्वज्ञान त्यांच्याच शब्दात योग्य त-हेनं मांडता येईल. ‘’ आम्ही सोनं मिळावं म्हणून तळमळत नाही, आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि सद्भावना (गुडविल) याचीच किंमत आमच्या लेखी जास्त आहे.’’ असं ते म्हणाले होते.
सेंट्रल बॅंकेने मुंबई क्लिअरिंग हाऊसमध्ये अगोदरच प्रवेश केला होता आणि कलकत्ता क्लिअरिंग हाऊसमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. परंतु त्यास नकार देण्यात आला आणि बॅंकेकडून स्पर्धा होऊ नये म्हणून सेंट्रल बॅंकेवर काढलेल्या स्थानिक चेक्सवर खास कर लावण्यात येऊ लागला. त्यासाठी मग तत्कालीन बॅंक ऑफ बेंगालचे सचिव आणि खजिनदार सर नॉर्कौट वॉरन यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून कलकत्त्यातील बॅंकांना स्थानिक चेक्सवरती कमिशन न घेण्यासाठी राजी केलं. अशा प्रकारे सेंट्रल बॅंकेला आणखी एका क्षेत्रात प्रथम पाऊल टाकण्याचा बहुमान मिळाला. म्हणजे कलकत्त्यातील क्लिअरिंग हाऊसमधील अडथळे दूर करणारी ती भारतीय व्यवस्थापनाखालची पहिलीच बॅंक ठरली. परंतु बॅंकेला सोसाव्या लागणा-या विरोधाचा हा काही शेवट नव्हता. १९१६ साली त्यांनी कलकत्ता शाखेत बिले डिस्काउंट करायला सुरुवात केली परंतु बॅंक ऑफ बेंगालने त्यास कठोरपणे हरकत घेतली. तेव्हा सोराबजींनी सर नॊर्कॉट यांची भेट मागितली परंतु ती भेट दोनदा नाकारण्यात आली. तिस-यांदा ते नशीबवान ठरले आणि सर नॉर्कोट यांना त्यांनी पटवून दिलं की बिलं डिस्काउंट करण्यात कमी दर लावून किंमतीची लढाई लावून देण्याचा आमचा मुळीच इरादा नाही. सोराबजींचं व्यक्तिमत्व, त्यांचा उमदेपणा आणि मन वळवण्याची ताकद यांचा परिणाम सर नॉर्कोट यांच्यावर झाला आणि दोघांनी मित्रत्वाने एकमेकांचा निरोप घेतला.
सुरुवातीच्या दिवसांपासूनच सेंट्रल बॅंकेने विस्तार करण्याकडे कल दाखवला होता. १९१२ सालच्या उत्तरार्धात अभिदत्त (सबस्क्राइब्ड )भांडवल २० लाख रूपयांपासून ३० लाखांपर्यंत वाढवण्यात आलं होतं आणि २0000 समभाग प्रत्येकी २५ रूपये किमंतीचे प्रत्येकी ५ रु प्रिमियमवर काढण्यात आले होते. त्यातून मिळालेले प्रिमियमचे लाख रूपये राखीव निधीत जमा करण्यात आले. १९१७ साली अभिदत्त भांडवल ५० लाख करण्यात आलं आणि २ च वर्षांनी ते १ कोटी केलं गेलं. ठेवीदारांचं हितरक्षण आणि देशातील वेगवेगळ्या भागात शाखांचा विस्तार यासाठी अधिक भांडवलाची गरज होती. सोराबजींना माहिती होतं की ब-याच भारतीय बॅंका अपु-या भांडवलामुळेच डब्यात गेल्या. म्हणूनच बॅंक कुठल्याही संकटास तोंड देऊ शकेल अशा उपाय योजना आधीपासूनच निर्माण करण्यावर सोराबजी सदैव भर देत होते. १९१७ -२२ या काळात बॅंकेच्या ठेवी चौपट झाल्या म्हणजे त्या ३.५७ कोटींपासून १३.२२ कोटींपर्यंत गेल्या. १९२३ साली टीआयबीला स्वतःमध्ये सामावून घेतल्यावर तर सेंट्रल बॅंकेचं भांडवल आणि ठेवी दोन्ही भरपूर वाढलं. जानेवारी, १९२६ मध्ये व्यापारात जागतिक मंदी आल्याने जगातील सर्वच बॅंकांवर त्याचा परिणाम होत होता असं असूनही सेंट्रल बॅंकेच्या ठेवी मात्र १५.९३ कोटी होत्या. बॅंकेची स्थापना झाल्यावर वीस वर्षांनी हा आकडा १५.२१ कोटी झाला आणि जून १९३५ मध्ये आर्थिक क्षेत्र घुमजाव करत असताना तो मात्र २५.५८ कोटी इतका वाढला होता. पावलोपावली पूर्वग्रहदूषित अडथळे आणि शत्रुत्वभावना असूनही एवढी वाढ होत होती त्यावरून दिसून येतं की परिस्थिती अधिक अनुकूल असती तर बॅंकेने आणखी केवढं यश मिळवलं असतं.
सेंट्रल बॅंकेने संयुक्त प्रांतात आणि पंजाबातही शेतीक्षेत्रास कर्जपुरवठ्याची सुविधा दिली. तिथं कर्ज मिळत नसल्याने ग्रामीण भागाचं खूपच नुकसान होत होतं. अशा प्रकारे त्यांनी जे काही कार्य सुरू केलं त्यास आपण सर्वसाधारण बॅंकिग आणि विकासात्मक बॆंकिंग यांचे विवेकी मिश्रण म्हणू शकतो. त्या उलट दुस-या महायुद्धापूर्वी ब्रिटिश बॅंका फक्त व्यापारी बॅंकिगवरच भर देण्याची सर्वसामान्य प्रथा चालवत होत्या.
हे मिश्रणयुक्त बॅंकिंग भारतीय परिस्थितीस खूप सोयीचं होतं, कारण समस्या मुळी पैसे नसण्याची नव्हतीच तर ज्यांच्या हातात हा पैसा होता त्यांच्याकडून त्याचं सर्वत्र चलनवलन होण्याची गरज होती. सुप्त स्त्रोतांना अर्थव्यवस्थेत आणण्याची गरज होती आणि ती गरज भागवण्यासाठीच त्यांनी ब-याच मोक्याच्या ठिकाणी आपल्या शाखा उघडल्या. जून १९१८ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये शाखा उघडली आणि आपली पंजाबातली उपस्थिती प्रस्थापित केली.
या विस्तारामागचा सोराबजीचा हेतू त्यांच्या स्वतःच्या शब्दांतच अधिक उत्तम त-हेने सांगता येईल. त्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, ‘’बरेच मोठमोठे उद्योग पुढील काही वर्षांत भारतात उदयास येणार असले तरी छोटे प्रामाणिक भारतीय व्यापारी आणि व्यावसायिक आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत अत्यंत मूलभूत महत्वाची भूमिका बजावतच राहाणार आहेत. म्हणूनच सच्ची देशभक्ती आणि स्वहितरक्षण या दृष्टीने पाहाता त्यांना मजबूत करणे, त्यांना आधार देणे हेच आमचे कर्तव्य राहील. पंजाब ही उत्तम हट्टेकट्टे शेतकरी मालक , धडाडीचे छोटे व्यापारी आणि व्यावसायिक यांची मांदियाळी असलेली भूमी आहे. या उद्दिष्टास आघाडीवर जी बॅंक ठेवेल तिला या प्रांतात अत्यंत विस्तारित आणि लाभदायक संधी आहे.’’
१९३२ ते ३४ या कालखंडात पंजाबात २४ कर्ज कार्यालये (पे ऑफिसेस ) उघडण्यात आली. त्यात गहू, चणा आणि कपाशी याचं सर्वत्र तारण घेऊन कर्जाऊ रक्कम दिली जात होती. त्याशिवाय शेतकी उत्पादनात व्यवसाय करणा-या व्यापा-यांच्या मदतीसाठी गुंतवणूक मध्यस्थ आणि हमी दलाल (गॅरंटी ब्रोकर्स) यांचीही नियुक्ती करण्यात आली.
१९२५ पर्यंत लाहोर शाखा चांगल्या त-हेने प्रस्थापित झाली , सचोटीचे सरळ व्यवहार यासाठी तिची कीर्ती पसरली. तिच्या ठेवी आणि गुंतवणुका वाढल्या आणि सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा पंजाबात प्रथमच निर्माण करणारी ती पहिलीच बॅंक ठरली. जून १९२७ पर्यंत बॅंकेने आपल्या शाखा अहमदाबाद, अमृतसर, असनसोल, कलकत्ता, कानपूर, चंदौसी, नवी दिल्ली, हापूर, हैदराबाद, (डेक्कन) झारिया, कराची, कसूर, लाहोर, लखनौ, लायलपूर,मद्रास, रंगुन आणि सिकंदराबाद अशा ठिकाणी उघडल्या होत्या. संयुक्त प्रांताबद्दल सांगायचं तर सेंट्रल बॅंकेने तिथे १९३५ सालापर्यंत १३ शाखा उघडल्या होत्या.
ब-याच संस्थानांनी सुद्धा सोराबजींना आपल्याकडे शाखा उघडण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. नवानगर हे त्यातलंच एक संस्थान होतं आणि तिथले जाम साहेब सेंट्रल बॅंकेला भारतीय बॅंकांतली ‘सर्वात विश्वासार्ह आणि नवकल्पनोत्सुक’ बॅंक समजत होते. जामनगर शाखेचं उद्घाटन २७ मार्च, १९३७ रोजी म्हणजे सोराबजींचं निधन होण्याच्या काही महिने अगोदर झालं. बॅंकेला नवानगरमध्ये कुणी प्रतिस्पर्धी नव्हता. आणखी एका संस्थानात सेंट्रल बॅंकेने महत्वाची भूमिका बजावली ते होतं हैदराबाद संस्थान. तिथे शाखा उघडण्याखेरीज निजाम सरकारने घेतलेल्या एकुण ४ कोटी कर्जापैकी १.३ कोटी कर्जही सेंट्रल बॅंकेनेच दिलं होतं. ब्रिटिश रूपया चलनातून काढून टाकून तिथं ओस्मानशाही रूपया आणण्यातही त्या संस्थानाला सेंट्रल बॅंकेने सहाय्य केलं होतं. त्याशिवाय हैदराबादमध्ये घरबांधणीसाठीही कर्जे देण्यात बॅंकेने पायाभूत भूमिका वठवली होती.
कोचीनमध्येही शाखा उघडल्या गेल्या परंतु त्या फक्त व्यापाराला उत्तेजन देण्यासाठीच नव्हत्या तर कोचीन बंदराचा विकास करण्याचाही हेतू त्यामागे होता. बॅंकेने संस्थानांची बॅंक म्हणूनही काम पाहिलं आणि त्रावणकोर तसेच भोपाळ संस्थान सरकारांसाठी यशस्वीरीत्या कर्जे उभारून दिली. त्या काळात दक्षिण भारतातील बॅंकिंग क्षेत्रात छोट्या छोट्या बॅंका खूप मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यातील बहुतेक बॅंका त्रावणकोर नॅशनल बॅंकेच्या पावलावर पाऊल टाकून बुडाल्या त्यामुळे या पोकळीचा लाभ घेण्यासाठी सेंट्रल बॅंकेला मैदान मोकळं मिळालं आणि सोराबजी यांचे विश्वासू सहकारी बी.टी.ठाकूर यांच्या एकुण व्यवस्थापनाखाली वेगवान प्रगती साध्य करता आली. हेच ठाकूर नंतर युनायटेड कमर्शियल बॅंकेचे पहिले महाव्यवस्थापक बनले आणि जी.डी. बिर्ला अध्यक्ष बनले.
वेगवेगळ्या भागांत असंख्य शाखा उघडल्यामुळे स्थानिक परिस्थितीकडे जवळून लक्ष देणं गरजेचं बनलं, त्यामुळे मुख्य कार्यालयाकडून अवाजवी हस्तक्षेप न होता या शाखांच्या व्यवस्थापनासाठीची सोयीची यंत्रणा उभारण्यावर सोराबजींना लक्ष केंद्रीत करावं लागलं. फिरत्या लेखापरीक्षकांच्या पथकासह शाखा तपासणी विभाग तर होतेच परंतु त्याशिवाय सोराबजींनी स्थानिक मंडळे किंवा स्थानिक सल्लागार समित्यांची पद्धतही सुरू केली. त्यात महत्वाचे स्थानिक व्यापारी आणि सार्वजनिक नेतेही असत, ते कर्जेच्छुकांच्या विश्वासार्हतेबद्दल माहिती पुरवत. अशा प्रकारे बॅंकेचं हितरक्षण होत असे. त्यांच्याकडे स्थानिक परिस्थितीचं जवळून घेतलेलं ज्ञान असे. ते ज्ञान त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे बॅंक व्यवस्थापनास त्याचा फायदा होई. सेंट्रल बॅंकेसाठी हे अधिकच उपयुक्त होतं कारण तिला परदेशी बॅंकांकडून रोगट स्पर्धेला सामोरं जावं लागत होतं. या परदेशी बॅंका मुळात परदेशी व्यापारास अर्थपुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या असल्या तरी त्यांना देशांतर्गत व्यापारात घुसखोरी करण्याचीही वाईट खोड जडली होती. खरं तर ते क्षेत्र स्थानिक बॅंकाचंच होतं. सेंट्रल बॅंकेच्या स्थानिक मंडळांना विशिष्ट मर्यादेत कर्जांना संमती देण्याची मुभा होती. सहसा सेंट्रल बॅंकेचे संचालक ती कर्जं मंजूर करत असत. मुंबईतील आणि गट कचे-यांच्या मुख्यालयातील सर्व लेखापरिक्षक ( ऑडिटर्स) थेट सोराबजींनाच उत्तरदायी होते. अंतर्गत लेखापरीक्षण खूपच व्यापक आणि सखोल असे त्यामुळे चुका आणि अफरातफरी ताबडतोब लक्षात येत असत. ‘ असे प्रतिबंधात्मक उपाय त्या काळात अभिनव असेच होते. स्थानिक लोकांच्या जबाबदारीस न डावलता विवेकी पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) करण्याचे सोराबजींचं धोरण त्यातून दिसून येतं.