३.१ एकत्रीकरण आणि विस्तार
अफवा आणि दुष्टावा यांच्यामुळे बॅंकेत लोकांनी बरेचदा पैसे काढण्यासाठी झुंबड उडवूनही १९१६ सालापर्यंत सेंट्रल बॅकेने आपली मुळं भक्कम रूजवली होती आणि स्थिर गतीने प्रगतीही केली होती. तरीही लोकसंख्येचा असा एक विभाग होताच ज्याला अजूनही खाज होतीच की भारतीयांनी चालवलेली बॅंक डुबणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच ते बॅंकेच्या प्रतिष्ठेस धक्का लागावा यासाठी अफवा पसरवण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते. आपण हे आधीच पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा असं घडायचं तेव्हा तेव्हा सोराबजी अशा कंड्यांना अत्यंत कठोरपणे मूठमाती देण्यात थोडासाही वेळ घालवत नव्हते.
आर्थिक व्यवहारांना उत्तेजन मिळण्यासाठी कर्ज पुरवठा करणे हे बॅंकांचं प्राथमिक कर्तव्य आहे असा सोराबजींचा विश्वास होता. अशा प्रकारे ज्या कंपन्या मुळात भक्कम पायावर उभ्या होत्या परंतु त्यांना तगून राहाण्यासाठी कर्जाची पाठराखण गरजेची होती त्यांना ते मिळत होतंच. या नजरेने पाहाता सोराबजींचा संबंध टिस्को आणि टी आयबीशी जडला होता तो अगदी उद्बोधक वाटतो. दुसरं उदाहरण आहे ते टाटा ऑइल मिल्सचं. ही कंपनी बुडीत जायच्या मार्गावर होती परंतु योगायोगाने आगगाडीत घडलेल्या एका भेटीने ती कंपनी तरून गेली. पुढील काळात ‘सर’ पदवी मिळालेले नौरोजी सकलातवाला नवसारी ते मुंबई या आगगाडीच्या प्रवासात सोराबजींना भेटले. त्यांच्याशी दीर्घ चर्चा झाल्यावर सोराबजींनी त्यांना एक उपाय सुचवला.
समभागधारकांना गंभीर नुकसानीपासून रोखण्याची दोघांची इच्छा होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीयांना मोठ्या औद्योगिक कंपन्या सांभाळता येत नाहीत अशा संशयवाद्यांच्या शंकाही त्यांना ख-या करून दाखवायच्या नव्हत्या. सोराबजींनी त्यांना सुचवलं की कंपनीचे भांडवल कमी करून तुम्ही तिची पुनर्रचना करा. सर्व समभागधारकांची परवानगी घेऊन पुनर्रचनेची योजना अंमलात आणली गेली आणि कंपनी वाचली.
जेव्हा टिस्को ( आता टाटा स्टील) अत्यंत आर्थिक अडचणीत होती तेव्हा सोराबजींनी सेंट्रल बॅंकेच्या अनुभवाच्या बटव्यातून एक मोलाचा सल्ला आर.डी. टाटांना दिला की डिबेंचर्सचे व्याज चुकते करण्यासाठी सर्व संचालकांनी आपले खाजगी स्त्रोत खुले करावेत. बॅंक ऑफ बॉम्बेने त्यांना आणखी कर्ज देण्यास नकार दिला होता , सेंट्रल बॅंकसुद्धा आपण दिलेलं कर्ज टिस्कोकडून परत मागू शकत होती. परंतु सोराबजींनी तसं करायचं नाही असं ठरवलं. उलट त्यांनी आर.डी. टाटांना सांगितलं की तुम्ही माझा सल्ला मानलात तर मी आणखीही कर्ज देण्यास मागेपुढे पाहाणार नाही. नंतर बॅंक लवकरच मोठमोठ्या उद्योगांना कर्ज देणारा मुख्य स्त्रोत बनली आणि तिने १९२३ साली नॅव्हिगेशन कंपनीची समभाग उभारणी अंडरराईट केली. तसंच १९२६ साली टाटा हायड्रोचे डिबेंचर्स तसेच १९३५ साली स्वदेशी मिल्सचे प्रेफरन्स शेअर्सही अंडरराईट केले.