२.३ संकटातून सुटका
१९१३ साली सेंट्रल बॅंक अवघी दोनच वर्षांची होती, तेव्हा भीतीग्रस्त ठेवीदारांनी पैसे काढून घेण्यास लावलेल्या रांगांचा अनुभव तिलाही घ्यावा लागला. सेंट्रल बॅक बुडाली तर त्याचा दणका भावी भारतीय बॅकिंग उद्योगाला केवढा बसेल याचा अर्थ सोराबजींना नक्कीच समजला असणार. म्हणून तर ते पुढल्या दिवशी देण्यासाठी पुरेसे पैसे आहेत ना याची सदैव खातरजमा करत असत. एका प्रसंगी एका प्रतिष्ठित व्यावसायिकांनी सोराबजींकडील समभाग आणि अन्य सिक्युरिटी तारण घेऊन त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचं कबूल केलं. मग ते समभाग आणि सिक्युरिटी विकाजींच्या हस्ते सोराबजींनी पाठवल्या पंरतु थोड्याच वेळात विकाजींनी त्यांना फोनवरून सांगितलं की त्या व्यावसायिकांनी विचार बदलला आहे आणि आता ते म्हणत आहेत की ‘’मी नवीन निधी दयायला तयार नाही उलट आधीपासून तुमच्या बॅंकेत ठेवलेल्या ठेवीच्या बदल्यात तारण म्हणून हेच समभाग आणि सिक्युरिटीज माझ्याकडे ठेवतो’’. हा फोन सकाळी ११ वाजता आला. ही बातमी समजताच सोराबजी ताबडतोब त्या व्यावसायिकाच्या कचेरीत बोलायला गेले. दुपारी २ वाजेतो त्यांच्याकडून काहीच कळलं नाही तेव्हा हिरजीभॉयना भीती वाटली की आवश्यक ते पैसे उभारणं न जमल्याने त्यांनी आत्महत्या तर केली नसेल. परंतु पैसे उभारण्यात यश मिळवून सव्वातीन वाजेपर्यंत सोराबजी घरी परतले आणि सगळ्या कुटुंबानं सुटकेचा निःश्वास टाकला. खरं तर घरच्यांना काळजी करायची काहीच गरज नव्हती कारण सोराबजी अतिशय निग्रही मनाचे होते, त्यांनी असं आततायी पाऊल कधीच उचललं नसतं. त्यांचं धाडस आणि मनाची अविचल वृती भविष्यातही असंख्य वेळा दिसून आली. त्यांच्या त्याच गुणांचा परिणाम कर्मचा-यांवरही झाला आणि तेसुद्धा घबराटीस बळी पडेनासे झाले.
सर फिरोझशहा मेहता हे मुंबईजवळील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांचे सोबती कावसजी जहांगीर यांना विचारलं की तुम्ही सेंट्रल बॅंकेस मदत कराल का, तेव्हा त्यांनी सोराबजींना माथेरानला बोलावून घेतलं आणि येताना कुठल्या कुठल्या सिक्युरिटी सेंट्रल बॅंक तारण म्हणून देऊ शकते त्याची यादीही सोबत आणायला सांगितली. दोन दिवस चर्चा झाल्यावर कावसजी स्वतःची गुंतवणूक तारण ठेवून स्वतःच्या नावावर कर्ज काढून बॅंकेस पैसे उसने देण्यास तयार झाले. सेंट्रल बॅंकेची तत्कालिन मोठी स्पर्धक बॅंक ऑफ इंडिया हिला ही बातमी समजली तेव्हा कावसजींनी तसं करू नये म्हणून बँक ऑफ इंडिया ने त्यांचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला तेव्हा तिने तांत्रिक कारणांवरून त्यांचा अर्ज रद्दबातल करून टाकला. त्या काळातल्या बॅंकिंग वर्तुळात कशा प्रकारचं वातावरण होतं ते बॅंक ऑफ इंडियाच्या वर्तनावरून स्पष्टच दिसून येतं. म्हणजे सेंट्रल बॅंक ही त्यांची स्पर्धक होती. ही बॅंक अपयशी ठरली तर त्याचा जनतेवर किंवा भारतीय बॅंकिंगवर काय परिणाम होईल याची जराही पर्वा न करता कुठल्याही परिस्थितीत तिची खोड मोडलीच पाहिजे हाच संकुचित विचार त्यामागे होता. त्यानंतर इंडियन स्पिसी बॅंक बुडण्याची शक्यता दिसू लागली त्यामुळे तर सेंट्रल बॅंकेतून पैसे काढून घेण्याची एकच धावपळ लोकांत उडाली. इंडियन स्पिसी बॅंकेचे भरपूर समभाग सेंट्रल बॅंकेकडे आहेत हे सर्वांना माहिती होतं. शिवाय हे समभाग बाजारात विकता येण्यासारखे नव्हते (ते अनकॉल्ड लायबिलिटी होते म्हणजे अंशतः भरणा केलेले (पार्टली पेड अप) होते.) यातील काही समभाग, कर्जाबद्दलचं तारण म्हणून सेंट्रल बॅंकेच्या ताब्यात असले तरी ते बॅंकेच्या स्वतःच्या नावावर होते त्यामुळे या खात्यामुळे बॅंकेला खूप त्रास सहन करावा लागणार अशी भीती निर्माण झाली होती.
कावसजी जहांगीर यांची मदतीची योजना अपयशी ठरली तेव्हा सर फिरोझशहा मेहतांनी मुंबईतील स्वतःच्या मालमत्तांचे कागदपत्र गहाण ठेवून सोराबजींना पैसे उभारून दिले. यामुळे अन्य संचालकांनाही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यास उत्तेजन मिळालं. (त्या संकटात सोराबजींनी आपल्या पत्नीचे दागिने विकले असं म्हणतात.) त्यानंतर केवळ बारा दिवसांत ८८ लाख रूपयांवरून ठेवी ४१ लाखांवर घसरल्या तरीही फिरोझशहा मेहतांनी केलेल्या मदतीमुळे बॅंकेबाबत अनुकूल मानसिकता तयार होऊन, बॅंकेवरील ताण कमी होण्यास सहाय्य झाले. त्यांच्या मालमत्तेच्या दस्तावेजांमुळे खरं तर गरज असलेल्या पैशांचा काही भागच मिळाला असला तरी लोकांनी त्या प्रसंगाकडे आत्मविश्वास वाढवणारी कृती या नजरेनं पाहिलं. त्यामुळे बॅंकेवरील दबाव कमी होऊन अन्य संचालकांनी दाखवलेल्या औदार्याचा लाभ उठवावा लागला नाही. आत्मविश्वास वाढवणारी आणखी एक कृती म्हणजे सेंट्रल बॅंकेने जनतेला सांगितलं की रविवारीसुद्धा आम्ही ठेवीदारांचे पैसे परत देऊ.
सेंट्रल बॅंकेला वाचवायला दोन घटक कारणीभूत ठरले असं आपण म्हणू शकतो : सर फिरोझशहा मेहता आणि अन्य संचालकांनी सार्वजनिकरीत्या प्रकट केलेला सोराबजींवरील विश्वास आणि कुठलीही सट्टेबाजी टाळण्याचा बॅंकेचा एकूणच धोरणविवेक. सुरक्षिततेची गरज जाणवून बॅंकेच्या संचालक मंडळाने १९१२ सालीच किती तारणाच्या (सिक्युरिटीच्या) बदल्यात किती कर्ज द्यायचं त्याचे नियम ठरवून ठेवले होते. त्यानुसार मालमत्ता हे भरीव तारण असलं तरी तेही बॅंकेच्या भरणा (पेड अप) भांडवलाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत नाही ना यावर वेळोवेळी लक्ष दिलं जात होतं. त्यामुळे सोराबजी आणि स्वदेशी चळवळ या दोन्हींचा हा विजय असला तरी त्या संकटाची तीव्रता किती होती त्याची कल्पना संचालक मंडळाच्या मिनिट्समध्ये लिहिलेल्या संक्षिप्त गोषवा-यातून येत नाही: त्यात त्यांनी लिहिलं आहे : व्यवस्थापकांनी माहिती दिली की क्रेडिट बॅंक आणि पीपल्स बॅंक यांच्या अपयशानंतर आपल्याही बॅंकेतून पैसे परत घेण्यासाठी लोकांनी अनपेक्षितपणे रांगा लावल्या तेव्हा आम्ही म्युनिसिपल आणि पोर्ट ट्रस्टच्या बॉण्ड्सच्या बदल्यात रू ६,७५,०००/- बॅंक ऑफ बॉम्बेकडून कर्जाऊ आणले. बॅंकांचे स्थैर्य जनतेच्या मतावर इतकं अवलंबून होतं की दुर्भाग्य आणि दुष्ट अफवा यांची भीती त्यांना अन्य कुठल्याही उद्योग धंद्यांपेक्षाही अधिक बाळगावी लागत होती. तरीही मुरंजन यांच्या निरीक्षणावरून असं दिसून येतं की बॅंक- व्यवस्थापनाच्या पूर्णपणे आवाक्याबाहेरच्या परिस्थितीमुळे बॅंका बुडाल्याची उदाहरणं फारच कमी आहेत. आलेल्या प्रत्येक संकटात कर्तव्य बजावण्यात कसूर पूर्णतः झाला नसला तरी प्रत्येक ठिकाणी अविवेकाने थोडासा हातभार लावलेला होताच.
ठेवीदारांच्या मनाची चलबिचल, कितीही अतिशयोक्त अफवेवर विश्वास ठेवण्याचा कल यांची सोराबजींना चांगली कल्पना होती. प्रारंभी निर्माण झालेल्या संशयाच्या ठिणगीचं रूपांतर घबराटीच्या आगीत होऊ शकतं हे त्यांना माहिती होतं कारण त्याच घबराटीमुळे कित्येक संस्थांवर संकट ओढवलं होतं. या बाबतीत तर देशी बॅंकांची खूपच वाईट दशा होती कारण परदेशी बॅंकांना त्यांच्या मूळ देशातून पुष्कळ स्त्रोत उपलब्ध होत होते त्यामुळे त्यांना संकटांतून बाहेर पडणं तुलनेनं सोपं होत होतं. गरजेपेक्षा खूप अधिक प्रमाणात रोकड जवळ बाळगणे हे सोराबजीचं स्वतःचं धोरण का होतं त्याची संगती यातून लागते. बॅंकेच्या हिताला बाधा पोचत असूनही हे धोरण ते राबवत राहिले होते.
त्या संकटातून सेंट्रल बॅंक बाहेर येते न येते तोच पहिल्या महायुद्धाच्या रूपात आणखी एक संकट समोर येऊन ठाकलं. राजकीय अस्थैर्याचा प्रभाव आर्थिक परिस्थितीवर पडत असतो, त्यामुळे सेंट्रल बॅंकेसह अन्य नव्या बॅंकांवरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा कमी होऊ लागला. नानपोरियांचं निरीक्षण आहे की,’’ १९१४ साली सेंट्रल बॅंकेच्या ठेवी ३० लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या परंतु अनावश्यक जोखीम टाळून बॅंक सजगपणे चालवण्याचं धोरण, व्यवसायाच्या योग्य पद्धती आणि सोराबजींचं बॅंकेवरील घारीसारखं लक्ष यांच्यामुळे इच्छित परिणाम दिसू लागले. सेंट्रल बॅंकेचे स्त्रोत फार नव्हते, तरीही पैसे परत करण्याची अनपेक्षित मागणी आली तर आपल्याकडे रोकड स्वरूपातली निधी हवा यावर व्यवस्थापनाचा भर होता, त्यामुळे मागील दोन वर्षांत झालेली पीछेहाट हळूहळू भरून निघाली. भविष्यात समोर येणा-या आव्हानांना तोंड देण्यासाठी बॅंक सक्षम झाली ती ही काळजी घेतल्यामुळेच झाली."
नोव्हेंबर, १९१५ मध्ये सर फिरोझशहा मेहता यांच्या आकस्मिक निधनाने बॅंकेचा एक आधारस्तंभ निखळला. त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेमुळे बॅंकेला वजन आणि वेगळेपण प्राप्त झालं होतं. सोराबजींच्या दृष्टीने ती खूप मोठी वैयक्तिक हानीसुद्धा होती कारण त्यांच्या स्वभावाला आणि सहज प्रेरणांना अनुकुल ठरणारा अन्य कुठलाही माणूस अध्यक्ष म्हणून समोर दिसत नव्हता. सर फिरोझशहा मेहतांचे निधन हा बॅंकेस मिळालेला दुसरा धक्का असं म्हणता येईल कारण त्यांच्या निधनाआधीचा पहिला धक्का बॅंकेच्या जन्मापासूनचे मुख्य रोखपाल एस. एन. विकाजी यांचं अकाली निधन झालं तो होता. या धक्क्यामुळे बॅंकेवर उदासीनतेची छाया पडली कारण ज्याच्यासोबत सोराबजींनी बॅंकेचा पाया रचला होता तो निकटचा मित्र आणि सहकारी सोराबजींना सोडून गेला होता.
मे १९१८ मध्ये पुन्हा एकदा संकटाने हल्ला चढवला. सेंट्रल बॅंकेने एवढं सगळं साध्य करूनही मत्सरी निंदकांच्या कटकारस्थानांना तोंड देण्याच्या बाबतीत ती अजूनही दुबळीच होती. बॅंकेची पत कमी व्हावी या उद्देशाने अफवा पसरवण्याची एकही संधी निंदक सोडत नव्हते. भोळी जनता अफवांना बळी पडायची त्यामुळे गैरविश्वासाचं संकट कोसळायचं. त्या संकटाला तर सगळ्याच बॅंका चळचळ कापायच्या. बॅंकिंगचे मापदंड आणि आर्थिक औचित्य यांच्या आधारे बॅंक चालवणं पुरेसं नाही, तर त्याचसोबत बॅकेची परिस्थिती मजबूत आहे हेही लोकांना माहिती असण्याची गरज होती. गडबड असल्याचा किंचितसाही वारा लागला तरी भारतीय जनतेचा विश्वासरूपी पत्त्याचा बंगला डगमगू लागत होता. विश्वास ठेवण्यात ‘धिमी’ असणारी जनता घोटाळ्याच्या खबरीवर विश्वास ठेवण्यात मात्र ‘तेज’ होती. त्यातच ‘चटकन संशय निर्माण करून लोकांना चिथवण्याची प्रवृत्तीही’ ब-याच लोकांची होती असं नानपोरिया म्हणतात. सोराबजींना या गोष्टीची चिंता जीवनभर वाहावी लागली.
एकदा कापड बाजारातील सट्टेबाजीचा व्यापार खड्ड्यात गेला आणि मुंबईच्या पैसाबाजारात एकच हलकल्लोळ माजला. अफवांचा आणि ‘ना शेंडा ना बुडखा’ अशा अहवालांचा सर्वसामान्य जनमतावर विपरित परिणाम होऊ लागला. लोक म्हणू लागले की सेंट्रल बॅंकेने मोती आणि कापड उद्योगास भरपूर कर्ज दिलंय. त्यामुळे त्यांचे अंदाजे ५० लाख रूपये बुडीत जाण्याची शक्यता आहे. परंतु तसे काहीही नसल्याचा निवाळा बॅंक व्यवस्थापनाने ताबडतोब प्रसिद्ध केला. त्यांनी त्यात लिहिलं की मोत्यांच्या तारणावर बॅंकेने एकही कर्ज दिलेलं नसून कापड उद्योगास फक्त ९ लाख रूपयांचे कर्ज दिलं आहे. त्या कर्जासाठीही पुरेसं तारण घेतलं असून जवळजवळ ३० टक्के मार्जिन असल्याने ते सुरक्षितही आहे. निवेदन प्रसिद्ध झाल्यावर आठवड्याभरात बॅंकेतून पैसे काढून घेण्याचे प्रकार थांबले.
सोराबजींना माहिती होतं की मनाची सतत चलबिचल होणा-या जनतेशी आपण व्यवहार करत आहोत, त्यामुळेच अफवांचे ताबडतोब खंडन केलं तरच आपण यातून सुटू शकू हे ते जाणून होते, तरीही अफवा पसरवणा-या उपद्रवींना थांबण्याची इच्छाच दिसत नव्हती. डिसेंबर, १९१८ मध्ये पसरवण्यात आलं की सेंट्रल बॅंक कठीण परिस्थितीत आहे कारण त्यांनी पीस गुड्स (विक्रीसाठी विणलेली सर्वसाधारण लांबीची कापडे) आणि कापड उद्योग यांना कर्जे दिली आहेत. पुन्हा ज्या वेळी या मालाच्या किंमतींनी तळ गाठला होता त्याच काळात अफवेने जोर पकडलेला असल्याने अफवेच्या धुरामागे खरीखुरी आग असेल का असं लोकांना वाटू लागलं होतं. परंतु सोराबजींना कुठल्याही भावी नुकसानीची शक्यता मुळापासूनच खुडून टाकणं पसंत होतं म्हणून त्यांनी वृत्तपत्रात निवेदन देऊन स्पष्ट केलं की घसरत्या किंमतींचा बॅंकेवर कुठलाही विपरित परिणाम होणार नाही कारण आम्ही सगळी कर्जे व्यवस्थित तारण घेऊनच दिलेली आहेत.
१९२० साली आणखी एक प्रयत्न झाला. सेंट्रल बॅंकेच्या उपद्रवी विरोधकांनी बॅंकेत पैशांची अफरातफर झालीये अशी अफवा सोडून दिली. १९२० सालच्या अखेरीपर्यंत बॅंक ऑफ बॉम्बेत अपहार झाल्याच्या बातम्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती, त्याच सुमारास सेंट्रल बॅंकेच्या एका अधिका-यालाही बेकायदेशीर सट्टेबाजीत गुंतल्याच्या आरोपावरून कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. मग काय, अफवांचा नुसता सुकाळ झाला.: अफरातफरीमुळे सेंट्रल बॅंकेलाही नुकसान सोसावं लागलं आहे अशी ती अफवा होती. त्यातच भर म्हणून आणखीही पिल्लू सोडून देण्यात आलं की बॅंकेने साखर उद्योगास मोठमोठी कर्जे दिली आहेत त्यामुळे नजिकच्या भविष्यात तिला भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा या प्रकरणातील सत्यता लोकांसमोर आणून निराधार अफवांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोराबजींच्या खांद्यांवर येऊन पडली.
त्यानंतर दोन वर्षांनी रंगूनमधील विख्यात कंपनी मे. जमाल ब्रदर्स बुडीत गेली. या कंपनीस कर्ज दिल्याने सेंट्रल बॅंक अडचणीत आली आहे अशी अफवा पसरली. आणखी एका प्रकरणात चीनमधील एका बॅंकेला अपयश आलं तेव्हा एक भलतीच हास्यास्पद अफवा पसरली होती की त्या बॅंकेच्या अपयशाचा परिणाम सेंट्रल बॅंकेवरही झाला आहे. अर्थात् हा बादरायण संबंध निराधार आणि खोटेपणाचा कळस आहे हे दाखवण्यात बॅंकेस काहीच अडचण आली नाही. बॅंकेची परिस्थिती आणि तिची धोरणे स्पष्ट करण्यासाठी सोराबजींनी केलेला वृत्तपत्र माध्यमांचा वापर हे उत्तम जनसंपर्काचं अगदी सुरूवातीच्या काळातलं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. लेखी निवेदनाला वजन असतं, त्यातून जाणवणा-या बांधिलकीचा मानसशास्त्रीय परिणाम खूपच अधिक होतो.
परंतु मत्सरी, असंतुष्टांनी पसरवलेल्या अफवा काही केल्या संपेनात. खरं तर लोकांनी पैसे काढण्यासाठी बॅंकेत घेतलेल्या प्रत्येक धावरूपी संकटातून बॅंक अधिकच बलवान आणि आत्मविश्वासपूर्ण स्थितीतच बाहेर आली होती. निःपक्षपाती निरीक्षकांना हेही दिसून येऊ लागलं होतं की बॅंकेची स्थिती डबघाईला आल्याची बोंब मारून लोकांना बॅकेत पैसे काढण्यासाठी धाव घ्यायला लावणा-या व्यक्तींचे हितसंबंधच त्यात अडकलेले होते. त्यातूनच जनतेच्या मनात सेंट्रल बॅंकेच्या कार्याबद्दल कौतुकाची भावना उत्पन्न झाली आणि तिच्याविरूद्ध काढलेल्या मोहिमांचा ते धिक्कार करू लागले. १९२३ साली सेंट्रल बॅंकेने टीआयबीचे स्वतःमध्ये विलिनीकरण केले तेव्हा बॅंकेच्या शत्रूंना आणखी खोड्या करायला निमित्त मिळालं. काही समभागधारकांनी बॅंकेविरुद्ध क्षुल्लक कारणांवरून खटले दाखल केले, तसंच १९२३-२४ या काळात सेंट्रल बॅंकेच्या कलकत्ता शाखेकडे अशीच ठेवीधारकांनी घाबरून धाव घेतली तेव्हा तिला गंभीर संकटास सामोरं जावं लागलं. कलकत्त्यात केवळ एका दिवसात १ कोटी रूपये ठेवीदारांनी काढून घेतले, तरीही ठेवीदारांची गर्दी कमी होण्याचं चिह्न दिसेना. या छोट्या वावटळीचं रूपांतर मोठ्या वादळात झालं. मग मुंबई आणि कलकत्त्यात रात्रभर बॅंक उघडी ठेवून लोकांचे करोडो रूपये परत करण्यात आले तेव्हा बॅंकेचे कर्मचारी दोन दिवस सलग काम करत होते. परंतु बॅंकेची पैसे देण्याची क्षमता लक्षात आल्यावर ज्या वेगाने पैसे काढले गेले त्याच वेगाने ते परतही आले. तसंच बॅंकेच्या कलकत्ता शाखेचं श्रेय मानलंच पाहिजे कारण मुख्य कार्यालयातून थेट सहाय्य न मिळताही दिवसाला ५० लाख रूपये देत त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.
लोकांना आश्वस्त करण्यासाठी नोटिसा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यात नमूद करण्यात आलं की सेंट्रल बॅंक ठेवीदारांसाठी मध्यरात्रीपर्यंत आणि गरज पडली तर त्यापेक्षाही उशीरापर्यंत चालू राहील. सोराबजींनी लिहिलेलं एक खास निवेदन अमृत बाझार पत्रिकेत प्रसिद्ध झालं ते पत्र आणि शेवटच्या बेचैन ठेवीदारास परत दिलेले पैसे या दोन्ही गोष्टींमुळे लाटेचा नूर पलटण्यास सुरुवात झाली आणि जे लोक वेड लागल्यासारखे पैसे काढून घेण्यास बॅंकेत धावले होते त्यातले बहुसंख्य लोक तेच पैसे पुन्हा भरण्यासाठी बॅंकेत परतले. बॅंकेने संकटास दिलेल्या प्रतिसादाबद्दल वित्त सदस्य (फायनान्स मेंबर) सर बेसिल ब्लॅकेट यांनी कौतुकोद्गार काढले: हे संघटित वादळ अडवण्यात बॅंक उत्तम त-हेने यशस्वी झाली त्याबद्दल तिच्या ताकदीस आणि भक्कमपणास दिलेली ती मानवंदनाच होती. त्यांनी अशीही आशा व्यक्त केली की हे असे दुष्टबुद्धीचे हल्ले जे कुणी प्रायोजित करत आहेत त्यांना याची जाणीव व्हावी की हा त्यांच्या वेळेचा अपव्ययच आहे कारण ते अगदीच निरूपयोगी ठरत आहेत.’’
सक्त ताकिदीचा हा आवाज विरून जातोय न जातोय तोच सेंट्रल बॅंकेवर नवीन संकट कोसळलं. म्हणजे ऑगस्ट १९२५ मधील अवघ्या दोन दिवसांत बॅंकेतून २ कोटी आणि अधिक रकमेच्या ठेवी ठेवीदारांनी परत घेतल्या. या संकटाचा उगम फारच हास्यास्पद होता. काही व्यापा-यांचं साखर आणि लोकर याच्या व्यापारात खूप नुकसान झालं आणि ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचले. त्यातल्या एकाच नाव आजम होतं आणि सेंट्रल बॅंकेच्या एका संचालकाचं नावही आजम होतं. या असल्या फालतू कारणासाठी बॅंकेच्या हितशत्रूंनी मुंबईतल्या झवेरी बाजारात खूप घबराट निर्माण केली. त्यामुळे बॅंकेच्या आर्थिक प्रकृतीबद्दल अपसमज पसरले. त्याची परिणती बॅंकेत ठेवीदारांनी धाव घेण्यात झाली. ‘आमचा काहीही संबंध नाही’ असं निक्षून सांगूनही पैसे काढून घेण्याचा संसर्ग पार अहमदाबादपर्यंत पसरला. त्यातच परिस्थिती आणखी बिघडण्यासाठी काही असंतुष्ट ग्राहक बॅंकेवरील हल्ल्यात सामील झाले. खरं तर अस्वीकारार्ह तारणामुळे त्यांना कर्ज नाकारण्यात आलं होतं त्याचाच वचपा ते काढत होते. त्यामुळे बॅंकेवर ठेवीदारांनी उडवलेल्या झुंबडीत सेंट्रल बॅंकेने सहा तासांत दीड कोटी रुपये दिले आणि दुस-या दिवशी ५० लाख दिले. कलकत्ता आणि अहमदाबाद शाखांनी ही झुंबड ओसरेपर्यंत प्रत्येकी ८ लाख आणि १५ लाख ठेवीदारांचे परत केलेले होते. अशाप्रकारे ठेवीदारांनी लावलेल्या झुंबडीस सेंट्रल बॅंकेने अक्षरशः खंडीभर वेळा तोंड दिलं आणि त्यातील प्रत्येक प्रसंगी ती तावून सुलाखूनच बाहेर पडली. त्यानंतर करीमभाई मिल्सच्या अपयशानंतर आणखी एकदा झुंबड उडाली आणि बॅंकेने दोन दिवसांत ३ कोटी रूपये परत केले. हे संकटही बॅंकेने न अडखळता पार केलं.
ऑगस्ट, १९२५ मध्ये उडालेल्या झुंबडीबद्दल बातमी देताना टाईम्स ऑफ इंडियाने लिहिलं, ’’निराधार- खासकरून द्वेषयुक्त अफवांमुळे सेंट्रल बॅंकेच्या ठेवीदारांमध्ये घबराट उत्पन्न होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. अशी घबराट आणि त्यातून बॅंकेत उडालेली झुंबड यांच्यामुळे बॅंकेच्या स्त्रोतांची पार वाट लागते हे शोचनीय आहे.’’
त्याच धर्तीवर कलकत्त्याच्या स्टेट्समननेही लिहिलं की,’’ पूर्णांशाने भारतीय व्यवस्थापन असलेली, राष्ट्रवादी हेतूने कामकाज करणारी बॅंकच या घबराटीच्या संकटानं सतत वेढली जावी ही विचित्रच परिस्थिती आहे असं म्हणता येईल. खरं तर या अफवांचे जनक कोण आहेत त्यांचा छडा लावून त्यांना न्यायालयातच खेचायला हवं.’’ इंडियन डेली मेल या वृत्तपत्राने लिहिलं की ‘या मंगळवारी पैसे काढून घेण्यासाठी बॅंकेत झुंबड उडाली तेव्हा सेंट्रल बॅंकेच्या अधिका-यांनी ज्या निर्भयतेनं आणि प्रसंगावधानाने तोंड दिलं त्याचा जनमानसावर उत्तम प्रभाव पडला.’’ कलकत्त्याच्या ‘इंग्लिशमन’ वृत्तपत्राने या हल्ल्यांना ‘जाणूनबुजून केलेले हल्ले’ असं म्हटलं. सेंट्रल बॅंकेस लक्ष्य करूनच हे हल्ले करण्यात आले होते. त्यांनी लिहिलं,’’ एकच बॅंक सदैव हल्ल्याची बळी ठरते, तीही एकच मोठी भारतीय बॅंक आणि समुद्रापार व्यवहार असलेल्या युरोपियन बॅंका मात्र सुखरूप राहातात यातच काय ते आलं.’’
नानपुरिया लिहितात की,’’ थोडक्यात सांगायचं तर बॅंक या संकटातून बाहेर आलीच परंतु दस्तुरखुद्द सोराबजीही या तणावातून ज्या नैतिकतेने बाहेर आले त्या नैतिकतेची ओळख सा-या देशभर पसरली. त्यानंतर देशाच्या संदर्भातही त्यांच्या सेवेची आणि सल्ल्याची दखल घेतली जाऊ लागली. म्हणजे केवळ चांगले कायदे करुन भागत नाही तर चांगले बॅंकर लोकच मजबूत पायावरची बॅंक उभारू शकतात ही म्हणच त्यांनी सार्थ केली असं म्हणता येईल.