१.२ नवी बॅंक जन्मली
नवीन बॅंक स्थापन करण्यासाठी बरीच कामं करावी लागणार होती, त्या कामांत सोराबजी आणि त्यांचे मित्र कल्याणजी यांनी स्वतःला पूर्ण झोकून दिलं. त्यांनी ग्रेशम बिल्डिंग या इमारतीतील काही जुन्या जागा दरमहा ६०० रूपये भाड्यावर घेतल्या. इस्टर्न बॅंकेचे माजी रोखपाल एस. एन. विकाजी यांच्या ओळखीने हे काम झालं. या विकाजींनी रू ५०० दरमहा पगारावर त्यांच्याकडे मुख्य रोखपाल म्हणून येणं मान्य केलं त्यामुळे ते आता तिघं मिळून आपल्या बॅंकेसाठी सुयोग्य संचालक शोधण्याच्या कामी गुंतले. वित्तक्षेत्रातील मोठमोठ्या दिग्गजांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. म्हणून मग त्या काळात कमी प्रसिद्ध अशा उद्योजकांकडे ते गेले, तेव्हा त्यांच्याकडे संचालक पदावर येण्यास तयार झालेल्यांत अर्देशीर बी. दुबाश, मंचरशॉ एफ. खान, एम. जे. वर्धमान, मुळजी हरिदास, मोतीलाल कानजी, जमशेटजी एच. चोठिया, राधाकिसन लक्मिचंद आणि हाजी दाऊद हाजी एलियास हे लोक होते. कल्याणजींनी बॅंक उभारणीचा सर्व प्राथमिक खर्च केला होता, त्यांचीही नेमणूक संचालक म्हणून करण्यात आली.
कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सुयोग्य व्यक्ती शोधणे हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं.— ज्याच्यामुळे लोकांना बॅंकेबद्दल विश्वास वाटेल असाच तो माणूस असायला हवा होता कारण काळच असा होता जेव्हा मानसिक घटकांवर खूपच भर दिला जात होता, त्यामुळे मानसिकतेचं महत्व खूप मानलं जात होतं. परंतु नव्या बॅंकेचं ‘मेमोरॅंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन बनवून पूर्ण होत असताना आणि बॅंकेचं अध्यक्ष कुणाला बनवावं ही चिंता मनाला छळत असतानाच बातमी आली की ‘बॅंक ऑफ बर्मा बुडाली आणि तिनं ठेवीदारांचं भरपूर नुकसान केलं. हे अपयश येण्यासाठी यापेक्षा वाईट वेळ दुसरी शोधूनही सापडली नसती परंतु आपले प्रयत्न सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. बॅंक ऑफ बर्मा’ बुडाली; त्यामागच्या कारणांचं सोराबजींनी विश्लेषण केलं त्यानुसार त्यांना एक दोष असा सापडला जो आजच्या काळालाही लागू आहे. :व्यवहारात पारदर्शकता नसणे आणि बॅंक नक्की काय करत आहे हे सातत्याने न सांगणे हा तो दोष होता.
परंतु गैरसोयीचं वातावरण, पूर्वग्रह आणि बॅंकेच्या आश्रयदात्यांची तरुण वयं असूनही तुलनेनं भांडवल सहजगत्या जमा झालं. त्यास सोराबजींचं आनंदी, उत्साही व्यक्तिमत्व आणि स्वदेशी चळवळीची एकवटू पाहाणारी ताकद हे घटक कारणीभूत होते. सेंट्रल बॅंकेचं अधिकृत भांडवल होतं ५० लाख रूपये. ते ५० रू. प्रत्येकी अशा समभागांत विभागलं गेलं होतं. तर अभिदत्त (सब्स्क्राईब्ड) भांडवल होतं २० लाख रूपये, त्यापैकी अर्धं भांडवल भरणा झालेलं (पेड अप) होतं. एच. टी. पारेख यांचे वडील ठाकोरदास हे सोराबजींसोबत बॅंक ऑफ इंडियात होते. त्यांनीही त्यांच्याबरोबर बॅंक सोडली आणि ‘चालू खाती आणि बिल्स विभागा’चे पर्यवेक्षक म्हणून ते त्यांच्याकडे आले. त्यांनीही बॅंक स्थापन करण्यात मदत केली. एच. टी. पारेख यांचे पुतणे आणि एचडीएफसी बॅकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी आठवण सांगितली आहे की नव्या शाखेच्या दारावरचं तोरण त्यांच्या आजोबांनीच बांधलं होतं. सोराबजींचे आणखी एक सहकारी ए. एस. बलसेकर हेही चीफ अकाउंटंट पदावर रूजू झाले.
भांडवल उभारणीत आलेल्या यशामुळे प्रफुल्लित होऊन त्यांनी २१ डिसेंबर, १९११ रोजी बॅंकेची नोंदणी करायचं ठरवलं. थोड्याच काळात सेंट्रल बॅंकेने जनतेचा विश्वास जिंकला. सोराबजींचा स्वतःवरील आणि जनतेवरील विश्वास सार्थ ठरला. स्वदेशीचे वारे देशात वाहू लागलेले असताना या त्रिमूर्तीला सर फिरोझशहा मेहतांकडे जावंसं वाटलं नसतं तरच नवल होतं. निष्ठा आणि कडवी देशभक्ती हीच ज्यांची ओळख होती त्या फिरोझशहा मेहतांनी नक्कीच त्यांच्या बॅकेचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं. लेडी मेहतांशी विकाजींचा परिचय होता, त्यामुळे भेट मिळण्यात अडचण आली नाही. विकाजी आणि सोराबजींना भेटण्यास फिरोजशहा तयार झाले. या लोकांनी त्यांना आपलं काम सांगितलं तेव्हा सर फिरोझशहा म्हणाले की क्रेडिट बॅंक ऑफ इंडियानेही मला अध्यक्षपद देऊ केलं होतं परंतु ते मी नाकारलं कारण त्या बॅंकेच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन- मधील काही तरतुदी मला मान्य नव्हत्या. त्यावर सोराबजींनी त्यांना आश्वस्त केलं की आपण म्हणाल ते बदल करण्यास आम्ही तयार आहोत, त्यावर फिरोजशहांनी त्यांना प्रस्तावावर विचार करण्याचा शब्द दिला.
चिंतायुक्त प्रतिक्षेत काही काळ गेल्यावर सोराबजींना उत्तर मिळालं. सर फिरोझशहा मेहता त्यांच्या बॅंकेचे अध्यक्ष होण्यास तयार होते. मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पूर्णतः संचालक मंडळाची असेल असा बदल त्यांना आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये करून हवा होता. सोराबजींनी लगेचच होकार दिला आणि २८ डिसेंबर, १९११ रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकीत ते संबंधित कलम बदलूनही घेतलं. त्यानंतर फिरोझशहांना अध्यक्ष म्हणून आमच्या संचालक मंडळात आपण सामील व्हावं असं औपचारिक विनंतीपत्र त्यांनी पाठवलं. नानपोरिया त्याबद्दल लिहितात, ’’सोराबजींमध्ये नेतृत्वाची धमक होती, तिला फिरोझशहांनी प्रतिसाद दिला. त्यांच्यात त्यांना आदर्शवाद, क्षमता आणि निर्धार यांचा संयोग झालेला आढळला. सर फिरोझशहा मेहतांनी २४ जानेवारी, १९१२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपद स्वीकारलं आणि १९ जून, १९१२ रोजी झालेल्या वैधानिक (स्टॅट्युटरी) बैठकीत आर्टिकल्समधील कलमबदलास वैधानिक मान्यता मिळाली. समभागांची यादी १५ मार्च, १९१२ रोजी बंद करण्यात आली होती आणि २० लाखांच्या भांडवलाचा संपूर्ण भरणा झाला होता. त्यानंतर आठवड्याभरातच एकूण दीड लाख रूपये रकमेची ७० हून अधिक चालू खाती उघडण्यात आली. ए. एफ. फर्ग्युसन आणि कंपनी, बाटलीबॉय आणि बाटलीबॉय यांना लेखापरीक्षक (ऑडिटर्स) म्हणून नेमण्यात आलं तर अर्देशीर होरमसजी दिनशा आणि कंपनी यांना सॉलिसिटर म्हणून नेमण्यात आलं..
संचालक मंडळाच्या दृष्टीने पाहाता सोराबजींना दुय्यम स्थान मिळालं होतं. परंतु त्यांनी ती व्यवस्था का बरं पत्करली होती? त्याचं उघड उत्तर हेच आहे की त्यांना आपली बॅंक लवकरात लवकर सुरू व्हावी असं वाटत होतं. तसंच आपल्या मनातील कल्पना संचालकांना पटवून देण्याची क्षमता आपल्याकडे आहे यावरही त्यांचा विश्वास होता. परंतु त्यांची निरहंकारी वृत्ती आणि स्वदेशी बॅंकिंग संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याबद्दलचा उत्साह याही गोष्टींनी त्यात नक्कीच भूमिका बजावलेली होती हे नाकारता येणार नाही.
सर फिरोझशहा बॅकेत आल्यामुळे बॅंकेस प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्यामुळे बॅंकेस असा अध्यक्ष मिळाला ज्यानं आपल्यासोबत सार्वजनिक प्रतिष्ठा आणि देशभक्तीचीही सोबत आणली. त्यांच्या आगमनामुळे जनमानस या नवजात संस्थेच्या बाजूला वळू लागलं. म्हणजे बॅंक ऑफ बर्माच्या अपयशानंतर झालेलं नुकसान काही अंशी तरी भरून आलं असं म्हणता येईल. सोराबजींची निवड खरोखरच उत्तम होती कारण भारतीयांनी भारतीयांसाठी चालवलेली बॅंक काढण्याची त्यांची महत्वाकांक्षा अन्य कुठल्याही व्यक्तिमत्वामुळे मूर्तरूपात साकार झाली नसती. स्वदेशी संकल्पनेचा विकास होण्याचा काळ १८८० ते १९०० हा होता आणि सोराबजींच्या सुरुवातीच्या जीवनाचा बराचसा काळही हाच होता ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. स्वदेशीचा मुख्य भर राजकीय असला तरी सोराबजींच्या दृष्टीने राजकीय हेतू हा प्रसंगोपात होता. या बाबतीत त्यांचे विचार समकालीन सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अर्देशीर गोदरेज यांच्या विचारांशी जुळणारे होते. स्वदेशीचा विचार हा स्वराज्याच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे हे जाणणा-या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी तेही एक होते. भारताला स्वतंत्र व्हायचं असेल तर केवळ ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून चालणार नाही तर त्याने त्याच गुणवत्तेच्या वस्तू बनवल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. स्वदेशीबाबत गोदरेज अधिक बोलके आणि आक्रमक असले तरी दोघांच्याही लक्षात आलं होतं की ब्रिटिशांचं राजकीय वर्चस्व उघड दिसत असलं, आर्थिक वर्चस्व तेवढं उठून दिसत नसलं तरी तेही तेवढंच अपायकारक आहे. १९०७ साली स्थापन झालेल्या टाटा आयर्न ऍण्ड स्टील कंपनीला केवळ तीन महिन्यात संपूर्ण भांडवल फक्त भारतीयांकडूनच मिळालं. या यशातून त्या काळातील लोकभावना कळून येते. परंतु सेंट्रल बॅंकेचं मूळ पूर्णतया सोराबजींच्या बॅंकिंग संस्था स्थापन करण्याच्या इच्छेतच दडलेलं होतं. त्यांना अशी भारतीय बॅंक स्थापन करायची होती जिथं भारतीय स्वतःच स्वतःच्या नियतीचे मालक असतील. एस. के. मुरंजन यांच्या निरीक्षणानुसार,’’ सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया डिसेंबर, १९११ मध्ये अस्तित्वात आली त्यामागे मुख्यत्वेकरून बॅंकिंगमधील प्रतिभावंत व्यक्ती सर सोराबजी पोचखानवाला यांचे अथक परिश्रम कारणीभूत होते. त्यांचा जीवनेतिहास बॅंकिंग आणि फायनान्स या क्षेत्रांवर प्रेम करण्यातच व्यतीत झाला.’’
व्यवस्थापकीय गुणांचा ठेका फक्त युरोपियन लोकांकडेच असतो, या तत्कालीन पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनास शह देण्यासाठी सोराबजींनी तो नाकारला. गोदरेज यांच्याप्रमाणे सोराबजींनाही विश्वास होता की आर्थिक ताकदीशिवाय नुसतं राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेलं राजकारण ही एक पोकळ संकल्पना ठरेल. त्यांना वाटत होतं की राष्ट्रीय नवनिर्माण आणि आर्थिक स्वायत्तता या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येण्यासारख्या नाहीत. येथील स्थानिक माणसांना पाश्चात्य तत्वांना अनुसरून बॅंक चालवता येणार नाही, स्थानिक लोक दुस-या स्थानिकांवर विश्वास ठेवणार नाहीत या खोलवर रूजलेल्या गैरसमजांशी सोराबजींना लढावं लागलं. भारतीय लोकांत कर्तबगारी नाही असं बहुतेक युरोपियन लोकांचं ठाम मत करून देण्यात आलं होतं त्यामागे एकतर त्यांची पक्की खात्री होतीच शिवाय दुसरं म्हणजे युरोपियन हितंसंबंधांना धक्का बसण्याची भीती होती.
हा पूर्वग्रह अगदीच चुकीचा नव्हता असंही म्हणता येईल कारण भारतीय बॅंकिंग संस्था उदासीनता, अविश्वास आणि संशय यांच्या धुक्यात काम करत होत्या. भारतीय बॅंकांचे व्यवस्थापक आणि संचालक बरेचदा अप्रामाणिकपणाने वागायचे, अंदाधुंद सट्टेबाजीला नुसतं उधाणच आलं होतं. सुनिश्चित आणि मान्यताप्राप्त मापदंड, योग्य नैतिकता आणि बॅंकिंगसाठी पोषक वातावरण नसल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली होती. भारतीय बॅंकांवर विश्वास ठेवलेल्या भारतीय ठेवीदारांना प्रचंड नुकसान सोसावं लागलं होतं. त्यामुळे सोराबजींच्या लक्षात आलं की स्थानिक बॅंकिंग संस्थांवरील अविश्वासाच्या अडथळ्याची धोंड इतक्या चटकन पार करता येणार नाही. अप्रामाणिकतेचा अडथळा सोडला तर वाटेत येणारी आणखी एक धोंड होती ती अनुभव नसल्याची आणि आधुनिक बॅंकिंगमधील गुंतागुंत समजून घेण्याच्या अभावाची ! त्यातच भर म्हणून परदेशी बॅंकांना मिळणा-या राजकीय आणि आर्थिक फायद्यांमुळेही भारतीय बॅंकांचे हितसंबंध धोक्यात येत होते.
सोराबजींचा जन्म १८८१ मध्ये झाला तोपर्यंत चाळीसपेक्षा अधिक बॅंका उगवल्या आणि मावळल्याही होत्या. त्यातली सुरवातीची बॅंक ऑफ हिंदुस्तान १७७० साली स्थापन झाली होती. फक्त तीन प्रेसिडेन्सी बॅंकांनीच १८३२-३३ आणि १८५७ सालची आर्थिक आणीबाणी सहन केली तसंच १८६३- ६६ या काळातले चढउतारही सहन केले. एकोणिसाव्या शतकातील भारतात सार्वजनिक ठेवी आणि पैशांचे चलनवलन अत्यंत कमी होतं. युरोपियन लोक आपली जास्तीची बचत आणि गुंतवणूक इंग्लंडलाच पाठवत होते तर स्थानिक लोकांना जमिनीत गुंतवणूक करण्यात स्वारस्य होतं. बॅंकिंगमधून मिळणारा नफा खूप जास्त होता कारण कर्ज देण्यातील धोका आणि निर्विवाद तारण मिळवण्यात अडचणी यामुळे व्याजदरच खूप जास्त होते.
सेंट्रल बॅंक १९११ मध्ये स्थापन झाली तेव्हा आपलं नवं साहस सुरू करताना येणा-या अडचणींची सोराबजींना पूर्ण कल्पना होतीच परंतु त्या काळातील ब-याच भारतीय बॅंकांचं रेकॉर्डही फारसं समाधानकारक नव्हतं याचीही त्यांना तेवढीच कल्पना असणार. थोड्याच काळात स्पष्ट झालं की स्थानिक बॅंकिंगची वाढ हवी असल्यास जनतेचा सक्रिय सहभाग लागणार आहे. त्यासाठी लोकाचं सहकार्य आणि त्यांचा विश्वास या गोष्टी असायलाच हव्या होत्या. विशेषतः भारतीय बॅंकिंग जेव्हा बाल्यावस्थेत होतं, स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी झगडत होतं तेव्हा तर या गोष्टींची तीव्रतेने गरज होती. सोराबजींनी पुढे त्याबद्दल सांगितलं की ‘’असंख्य बॅंकांचा आजमितीला भारताच्या कोनाकोप-यात वेगाने उदय होत आहे हे मला माहिती आहे. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की एवढ्या घाईगर्दीने फुटलेलं हे बॅंकांचं पेव म्हणजे दर्जाची खात्री असेलच असं माझं मन सांगत नाही.’’
सेंट्रल बॅंकेच्या निर्मितीपासूनच लोकांचा समज होता की ही पारशांची बॅंक आहे. तिथले बरेचसे कर्मचारी पारशी होते यात शंका नाही, तसंच पारशी समाजातले बरेचसे लोक तिथले ग्राहक होते. परंतु कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील पारशांचं तत्कालीन प्राबल्य सोडलं तर कुठल्याही प्रकारचा धार्मिक भेदभाव किंवा आकस बॅंकेत होता असं दर्शवणारी एकही बाब आढळून येत नाही. सोराबजींना याची जाणीव होती म्हणूनच त्यांनी फेब्रुवारी, १९१६ रोजी म्हटलं की, ’’आमची बॅंक पारशांची बॅंक आहे असा चुकीचा समज पसरला आहे म्हणून हा समज दुरुस्त करण्याची संधी मी घेऊ इच्छितो. आमच्या संचालक मंडळात तीन पारशी आणि तीन हिंदू संचालक आहेत. अगदी हल्लीच सुदैवाने आमचे मुसलमान सहकारी श्री. आजम यांचेही अमूल्य सहकार्य आम्हाला लाभलं आहे. मी आपणास खात्री देऊ इच्छितो की बॅंक कुठलाही भेदभाव न करता व्यवसाय करत आहे, मुंबईतल्या वैविध्यपूर्ण समाजांचा आमच्यावर विश्वास आहे. छोटे भारतीय व्यापारी आणि उद्योजकीय गटातील लोकांच्या बाजूने उभं राहाण्याची आम्हाला विशेष इच्छा आणि कळकळ आहे. अशा प्रकारे आम्ही स्वदेशी बॅकेचं एक महत्वाचं काम पूर्ण करत आहोत. ‘’
तथापि, बॅंकेशी असलेला पारशांचा संबंध पूर्वी आणि आजही तेवढाच बळकट आहे. एन. एम. मिस्त्रींनी बॅंकेची ३५ वर्षे सेवा केली. तिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते १९९०-९१ साली निवृत्त झाले. ते जुनी आठवण सांगतात की सेंट्रल बॅंक एका भल्या मोठ्या पारशी कुटुंबासारखी होती. इथं सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते, त्यांची भांडणही व्हायची परंतु वेळप्रसंग आला तर सगळे एकजुटीने उभे राहायचे. लेजरच्या रकमा जुळत नसतील तर प्रत्येकजण मदत करायला पुढे यायचा.
बॅंकेची पहिली शाखा मांडवी येथे १ मे, १९१२ रोजी उघडण्यात आली. त्यानंतर आणखी शाखा झवेरी बाजार, शेअर बाजार, अब्दुल रहमान स्ट्रीट, सॅंड्हर्स्ट रोड, काळबादेवी आणि भुलेश्वर अशा शहरातील महत्वाच्या व्यवसाय केंद्रांच्या जागी उघडण्यात आल्या. मुंबईबाहेरील पहिली शाखा कराची येथे ऑगस्ट, १९१३ मध्ये उघडण्यात आली. सेंट्रल बॅंक भक्कम पायावर उभी असून, कुठल्याही धोक्यापासून दूर होती तरीही तिच्या अस्तित्वालाच नख लावण्यासाठी आलेली असंख्य संकटं तिला झेलावी लागली. त्यासंबंधीची माहिती पुढील प्रकरणाचा विषय म्हणून आपल्यासमोर येत आहे.