८.१ विरोधी प्रस्ताव

पुरुषोत्तमदासांनी अफाट परिश्रम आणि संशोधन करून बनवलेल्या विरोधी प्रस्तावाचं वर्णन ’’तो अत्यंत महत्वाचा आणि लक्षात राहील असा दस्तावेज होता.’’ अशा शब्दांत झालं. १ शिलिंग ६ डाईमचा दर लादणे हे  अन्यायाचे कसे ते सांगण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणात फायली, दस्तावेज, आकडेवारी, सरकारी माहितीपुस्तके आणि अहवालांचा अभ्यास केला. त्यांनी हा दर मानायला नकार दिला कारण अधिका-यांनी चलाखीने तो निर्माण केला आहे असं त्यांचं मत होतं. त्यासाठीच त्यांनी अत्यंत तर्कशुद्ध रीतीने तयार केलेला, सत्य माहिती आणि आकडेवारी यावर आधारित असा विरोधी प्रस्ताव सादर केला. १ शिलिंग ६ डाईम दराशी सर्व किंमतींनी जुळवून घेतलं आहे या आयोगातील अन्य सदस्यांच्या मताशी ते सहमत नव्हते तसंच हा दर कायदेशीर/ नैतिक वगैरे असो किंवा नसो, पण तोच अस्तित्वात आहे आणि तो मानल्यामुळे सर्वांना कमीत कमी त्रास होईल हे म्हणणंही त्यांना मान्य नव्हतं.

हर्शल समितीने १ शिलिंग ४ डाईम दराची शिफारस केली होती. फॉलर समितीनेही तशीच शिफारस केली होती त्यामुळे सरकारने अधिकृतरीत्या या आधी तो दर मान्य केला होता. ‘’ २८ ऑगस्ट, १९१७ पर्यंत तो दर प्रभावीही होता परंतु युद्धामुळे चांदीच्या किंमतीत अवाजवी वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून सरकारने कौन्सिल ड्राफ्ट्सच्या विक्रीसाठी हा दर वाढवला. नाणी बनवण्यासाठी ज्या किंमतीला चांदी विकत घेता येत होती त्या किंमतीशी तो साधारणपणे जुळत होता. बॅबिंग्टन स्मिथ समितीच्या शिफारशींशी समन्वय साधण्यासाठी म्हणून सरकारने २ शिलिंग सोन्याचा नवा दर स्वीकारला. प्रत्यक्ष दर १ शिलिंग ४ पूर्णांक पाच सोळांश डाईम असूनही हा निर्णय घेतल्याने आणि सोन्याच्या किंमती हळू हळू घसरल्याने आधीपासूनच दुर्बळ असलेल्या निर्यातीची आणखीच वाट लागली परंतु आयातीस मात्र त्यामुळे जोरदार उत्तेजन मिळालं. पुरुषोत्तमदासांनी म्हटलं की १ शिलिंग ६ डाईम हा काही सर्वसामान्य परिस्थितीला दर नाही. मुळात १ शिलिंग ४ डाईमचा दर १९१७ सालचं युद्ध सुरू होण्याअगोदर वीस वर्षं व्यवस्थित चालू होता, केवळ युद्धाचा परिणाम म्हणून त्यात व्यत्यय आला होता.