९.१ सरकारच्या चिमुटभर फायद्यासाठी जनतेच्या खंडीभर हिताचं बलीदान’
पुरुषोत्तमदास भारतात पोचले तेव्हा ते एखाद्या शूरवीरासारखं त्यांचं स्वागत झालं. देशहितासाठी त्यांनी बजावलेल्या धाडसाची काही ऍन्ग्लोइंडियन वृत्तपत्रे वगळता अन्य भारतीय वृत्तपत्रांनी वाखाणणी केली. परतल्यावरही त्यांनी त्यांची मोहीम जारीच ठेवली. लोकांना त्यांच्यावर होणा-या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी ते झटू लागले. संपूर्ण भारतभरातील सार्वजनिक सभांत त्यांनी भाषणं केली आणि यात गुंतलेल्या मुद्द्यांचं महत्व समजावून सांगितलं. १ शिलिंग ६ डाईम विनिमय दरामुळे देशाचे हित कसं पायदळी तुडवलं जात आहे याबद्दल ते बोलायचे. फक्त विचारवंतच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकालाही हे मुद्दे समजावेत म्हणून त्यांची धडपड चालली होती. १ शिलिंग ६ डाईमच्या दराविरूद्ध त्यांचा तळमळीचा प्रचार पाहून एखादा ख्रिश्चन धर्मप्रचारकही प्रभावित झाला असता.
अशाच एका सभेच्या वेळेस आघाडीच्या उद्योजकांनी एक बगीचा-पार्टी आयोजित केली. त्या पार्टीत आलेल्या लोकांमध्ये सर दोराब टाटा, सर व्हिक्टर ससून, सर दिनशा पेटीट ही मंडळी हजर होती. चलन समस्येबद्दल लोकांच्या मनात रस निर्माण करणे, चलनाचं स्टॅंडर्ड सोनं असावं यासाठी जनमत जागृत करणे आणि रूपयास १ शिलिंग ६ डाईमवर लटकवून ठेवण्याच्या धोरणाचा विरोध करणे यासाठी त्या सभेत भारतीय करन्सी लीगची स्थापना करण्यात आली. करन्सी लीगने आपल्या शाखा देशभर उघडल्या आणि वेगवेगळ्या लहानमोठ्या शहरअत सभा घेतल्या जाऊ लागल्या, तिथं छोटी छोटी माहितीपत्रकं आणि परिपत्रकं वाटली जाऊ लागली. पुरुषोत्तमदासांनी तिथं दिलेल्या प्रस्तावाचा वेगवेगळ्या भारतीय भाषांत- खास करून हिंदीत अनुवाद झाला त्यामुळे उच्च विनिमय दरामुळे भारताचे हित कसे धोक्यात येते याची माहिती मारवाडी समुदायास मिळाली. करन्सी लीगच्या पुणे येथील जनजागृती मोहिमेच्या उद्घाटनाच्या वेळेस पुरुषोत्तमदासांनी सरकारच्या विनाशकारी धोरणाची तपशीलवार माहिती दिली. ‘सरकारच्या चिमुटभर फायद्यासाठी जनतेच्या खंडीभर हिताचं बलीदान’ अशा शब्दांत त्यांनी त्या धोरणाची संभावना केली.