८.४ भारतासाठी एक मध्यवर्ती बॅंक

सेंट्रल बॅंकेची आवश्यकता आहे का हा प्रश्न हिल्टन यंग आयोगाच्या नेमणुकीमागील मुख्य कारणांपैकी एक नसला तरी सर्व मध्यवर्ती कार्ये जिच्या हाती सोपवली जातील अशा आरबीआयची स्थापन करावी अशी शिफारस त्या आयोगाने केली होती. इंपिरियल बॅंकेने  उभारलेल्या सखोल जाळ्याचा देशाला होणारा लाभ हिरावला जाता कामा नये, तसंच तिला भारताला बॅंकिंग सुविधांचं जाळं पुरवण्याचं काम मोकळेपणानं करता आलं पाहिजे असा आयोगाचा दृष्टिकोन होता. त्यासाठी देशाला एक मध्यवर्ती बॅंक आणि एक खूप मोठी व्यापारी बॅंक अशा दोन वेगवेगळ्या बॅंका मिळणं गरजेचं होतं. मध्यवर्ती बॅंकेचे अभ्यासक आणि (नंतरच्या काळात ‘सर’ ही पदवी मिळालेले) सेसील किश यांनी तसंच बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मॉंटेग नॉर्मन यांनीही आयोगासमोर बोलताना  या दृष्टिकोनास दुजोरा दिला होता.

तर दुसरीकडे इंपिरियल बॅंकेस कुणीही प्रतिस्पर्धी असता कामा नये  असं पुरुषोत्तमदासांना वाटत होतं. म्हणून त्यांनी शिफारस केली की आपण इंपरियल बॅंकेतूनच मध्यवर्ती बॅंकेची हळूहळू निर्मिती करू. पुरुषोत्तमदासांनी त्यांच्या विरोधी प्रस्तावात नोंद केली,’’ जेवढं दूर भविष्यात पाहाणं शक्य आहे, त्यावरून आपल्याला दिसतं की आपल्या डोळ्यांसमोरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंपरियल बॅंकेचं विकसन करून तिचंच रूपांतर पूर्णस्वरूपी मध्यवर्ती बॅंकेत केलं तर फार चांगलं होईल.’’ आपल्या भूमिकेच्या समर्थनासाठी पुरुषोत्तमदासांनी बॅंक ऑफ फ्रान्सचं उदाहरण दिलं कारण ती बॅंक ही मध्यवर्ती बॅंकिंग आणि व्यापारी बॅंक अशी दोन्ही कार्यं यशस्वीपणे साध्य करत होती ( असं म्हणतात की आरबीआयचे दुसरे गव्हर्नर सर जेम्स टेलर हेसुद्धा मिश्र बॅंकिंगच्या बाजूने होते.) पुरुषोत्तमदासांनी भाष्य केलं की: इंपिरियल बॅंक ऑफ इंडियाची प्रतिष्ठा आणि अधिकार यांच्याशी तोडीस तोड स्पर्धा करणारा असा कुठलाही स्पर्धक नसावा. तसंच इंपरियल बॅंक आणि आणखी एक संस्था यांच्यात सरकारी निधीचं विभाजनही होता कामा नये. कारण देशातील स्त्रोतांना अर्थयंत्रणेत आणण्यासाठी इंपरियल बॅंक नव्या शाखा उघडते, काही काळासाठी फारसा नफा न देणा-या शाखाही उघडते, परंतु नवीन स्पर्धक उभा केल्याने इंपरियल बॅंकेच्या या शाखा उघडण्याच्या क्षमतेवर मर्यादा येईल. 

प्रस्तावाचा मसुदा एका हाती लिहिल्यामुळे पुरुषोत्तमदास खूपच थकून गेले. तीव्र मानसिक ताण घेऊन आणि अत्यंत सखोल संशोधन आणि तपासणी करूनच त्यांनी आपल्या दृष्टिकोनाचं तर्कनिष्ठ आणि प्रभावी सादरीकरण केलं होतं म्हणूनच खूप दमणूक झाली होती. आयोगातले सहकारीही फारसे सहानुभूती असणारे नव्हते. त्यातच भर म्हणून एकदा का पुरुषोत्तमदासांनी विरोधी प्रस्ताव सादर करण्याचा इरादा लेखी दिला तेव्हा तर त्यांनी आपले बंडखोर प्रयत्न सोडून द्यावेत म्हणून हरप्रकारे प्रयत्न होऊ लागले. त्यापैकी दोन घटनांचा उल्लेख येथे केलाच पाहिजे. त्यातली एक घटना होती त्यांना फसवून मनासारखं करायला लावण्याची तर दुसरी होती त्यांचं मन वळवण्याची.

पुरुषोत्तमदासांनी त्या प्रस्तावाबद्दलचं आपलं उद्दीष्ट स्पष्ट केलं तेव्हा आयोगाचे एक सचिव जी. एच. बाक्स्टर यांनी त्यांना माहिती दिली की संसदेच्या एका उपसमितीने शिफारस केली आहे की समितीच्या सदस्यांपैकी एक तृतियांश सदस्य एका विशिष्ट मताचे असल्याशिवाय विरोधाचा मुद्दा स्वीकारू नये. पुरुषोत्तमदास तर अल्पमतात होते त्यामुळे त्यांनी केलेला विरोध स्वीकारला जाणार नाही. बहुदा त्यांचे कष्ट वायाच जाणार आहेत. पुरुषोत्तमदासांनी त्या समितीचा अहवाल मागितला तेव्हा त्यांना त्वरित एक छापलेली प्रत देण्यात आली.

गोंधळलेले, हताश पुरुषोत्तमदास आपली समस्या घेऊन ज्येष्ठ कॉन्ग्रेस नेते लाला लजपतराय यांचेकडे गेले. लालाजी तेव्हा लंडनला आलेले होते. लालाजींनी त्यांना सुचवलं की तुम्ही सुप्रसिद्ध फेबियन समाजवादी ( फेबियन समाजवादी याचा अर्थ क्रांती करून नव्हे तर धीम्या गतीने समाजवाद आणण्यावर विश्वास असलेले लोक) आणि मजूर पक्षाचे नामांकित संसदसदस्य सिडनी वेब यांना भेटा. मजूर पक्ष सत्तेत असताना ते केंद्रीय मंत्रीमंडळातही होते. त्या दोघांतली बैठक ठरली आणि पुरुषोत्तमदासांनी आपली समस्या त्यांच्या कानी घातली. वेब त्यांना म्हणाले की उपसमितीने अहवाल दिला हे तर खरंच आहे परंतु तिनं तो संसदेत सादर केलेलाच नाही, त्यामुळे तो संमत होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे त्या हिल्टन यंगला म्हणावं की तो अहवाल मला देण्याऐवजी सरळ थेम्स नदीत नेऊन बुडव. तो ज्यावर लिहिलाय त्या कागदाएवढीही किंमत त्या अहवालाला नाही.’’

त्यावर पुरुषोत्तमदासांनी विचारलं की म्हणजे या सचिवानं माझी दिशाभूल केली की काय ? त्यावर वेब म्हणाले की तेवढंच करून ते थांबले नाहीयेत. एवढ्या महत्वाच्या राजकीय आयोगाच्या अध्यक्षाने विरोध करणा-या सदस्याला  चुकीची माहिती देणं हेच मुळात केवढं अनैतिक आहे. त्यावर सुटकेचा मोकळा श्वास टाकून पुरुषोत्तमदासांनी वेब यांचा सल्ला मानला आणि बाक्स्टरला सांगितलं की तुम्ही मला तोंडी जे सांगितलंत ते लेखी द्या. तेव्हा बाक्स्टर डगमगले आणि त्यांनी पुरुषोत्तमदासांना विचारलं, तुम्हाला पत्र कशासाठी हवंय. नव्याने मिळालेल्या ज्ञानाची ताकद लाभलेले पुरुषोत्तमदास आता आक्रमकतेने बोलण्याच्या परिस्थितीत होते. त्यांनी बाक्स्टरना सांगितलं की राजकीय आयोगाच्या सदस्यास तुमचे सरकारी नोकर कशी वागणूक देतात त्याचा नमुना म्हणून ते पत्र तुमच्या पंतप्रधानांना पाठवायचं आहे.’’ तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी बाक्स्टरला सांगणं भागच पडलं की अध्यक्षांच्या हुकुमांवरून मी तसं  वागत होतो. जेव्हा पुरुषोत्तमदासांनी त्यांना तसं लेखी द्यायला सांगितलं तेव्हा बाक्स्टरनी त्यांना आपल्या कचेरीत भेटायला बोलावलं. तेव्हा ‘या लबाडीच्या संबंधात मला बाक्स्टरला भेटण्याची इच्छा नाही किंवा दस्तुरखुद्द अध्यक्षांनाही भेटण्याची इच्छा नाही असं म्हणून पुरुषोत्तमदासांनी त्यांचं आमंत्रण फेटाळून लावलं. त्यानंतर अर्ध्या तासांत बाक्स्टरनी पुरुषोत्तमदासांना कळवलं की पुरुषोत्तमदासांचा विरोधी प्रस्ताव आयोगाच्या अहवालासोबतच संपूर्ण छापला जाईल असं सांगण्याचे अधिकार मला अध्यक्षांनी दिले आहेत.

पुरुषोत्तमदासांना रोखण्याचा हा प्रयत्न विफल झाला तेव्हा हिल्टन यंगनी आणखी एक युक्ती करून पाहिली : एका स्त्रीने पुरुषोत्तमदासांचं मन सौम्यपणे वळवावं म्हणून त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं. त्यासाठी नियुक्त स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून हिल्टन यंग यांची पत्नीच होती. सौ. हिल्टन यंग यांचेकडून दुपारच्या भोजनाचं आमंत्रण आलेलं पाहून पुरुषोत्तमदास चकीतच झाले. भोजनाच्या वेळेस बाईंनी त्यांना विनंती केली की हा विरोधी प्रस्ताव मागे घेण्याचा आपण विचार करावा. त्यांनी त्यासाठी पुरुषोत्तमदासांना आमीषही दाखवलं की सरकार आपल्याला एखाद्या प्रांताचं राज्यपालपद देईल किंवा प्रिव्ही कौन्सिलचं मुख्यपद देईल. परंतु पुरुषोत्तमदास त्यास बळी पडले नाहीत. अशा प्रकारे, दुसरा प्रयत्नही  पूर्णतया अयशस्वी ठरला.

त्यानंतर सर राजेंद्रनाथ मुखर्जींनी इंडिया ऑफिसमध्ये भरलेल्या आयोगाच्या शेवटल्या बैठकीच्या वेळी पुरुषोत्तमदासांवर टीकेची झोड उठवली तेव्हा कटूतेचा आणखी एक प्रसंग ओढवला. हिल्टन यंगनी जाहीर केलं की पुरुषोत्तमदासांचा विरोधी प्रस्ताव आम्ही स्वीकारत आहोत, तेव्हा राजेंद्रनाथांना क्षुब्ध होण्यास निमित्त मिळालं. त्या दिवशी पुरुषोत्तमदासांवर टीकेचा एवढा भडीमार झालेला होता की सर राजेंद्रनाथांचं टीकास्त्र चालू असताना ते दुस-या खोलीत निघून गेले होते. जेव्हा सर नॉर्कॉट वॉरन त्यांचा निरोप घ्यायला आले तेव्हा  पुरुषोत्तमदासांनी त्यांना विचारलं की सर राजेंद्रनाथ माझ्याविरूद्ध केवढी  वाईट भाषा वापरत आहेत याची तुम्हाला माहिती आहे का, तेव्हा वॉरन त्यांना म्हणाले की :‘’ मुळात अध्यक्षांनी या टप्प्यावर त्यांना बोलूच द्यायला नको होतं.’’ पुरुषोत्तमदासांनी विरोधी प्रस्तावावर स्वाक्षरी करू नये म्हणून हिल्टन यंगनी केलेले दोन प्रयत्न विफल गेले होते. त्याचा सल हिल्टन यंगच्या मनाला अजूनही टोचत होता हेच त्यातून दिसून येत होतं. आणखी एक सदस्य सर अलेक्झांडर मरे यांनी पुरुषोत्तमदासांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की मी भारतीय असतो तर मीही तुमच्यासारखंच वागलो असतो. पुरुषोत्तमदासांनी त्यांना ताबडतोब प्रत्युत्तर केलं होतं,’’ मरे साहेब, तसं असेल तर आत्ता मात्र तुम्ही या आयोगावर आहात ते भारताचे नव्हे तर इंग्लंडचे हितसंबंध राखण्यासाठी आहात.’’ या टोमण्याने अजिबात खजील न होता सर अलेक्झांडरनी नंतर लिहून ठेवलं की मीच काय, आयोगाच्या सर्वच सदस्यांनी तेच तर केलं आहे आणि म्हणूनच तर पुरुषोत्तमदास अभिनंदनास पात्र आहेत.