४.२ नवकल्पना
टोकाचा कठोर विरोध होत असतानाही ज्या माणसाकडे बॅंक काढण्याची दूरदृष्टी असते त्या माणसाकडे नवनवे शोध आणि संकल्पना नसतील असं होणं अशक्यच आहे. सोराबजींनी रंगुनमधील हजारो घरात छोट्या छोट्या बचतपेट्यांचं वितरण केलं. ज्या ब्रह्मदेशातील लोकांना बचतीची सवय नव्हती त्यांना ती सवय लावल्यामुळे तेथील लोकांच्या घरोघरी सेंट्रल बॅंक पोचली हाही नवा शोधच होता. तसंच डाक-रोकड-पत्रांच्या ( पोस्टल कॅश सर्टिफिकेटच्या) धर्तीवर आकर्षक व्याजाची ३ वर्षांची रोकड प्रमाणपत्रं जारी करणारी पहिली बॅंकही सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच होती. मागणी निर्माण करणे आणि ती जोपासणे हा सेंट्रल बॅंकेच्या धोरणाचा एक भागच होता , त्याचमुळे १९१७ मध्ये त्यांनी मर्यादित उत्पन्न गटातील लोकांना सुलभ मासिक हप्त्यांत युद्ध- कर्जरोख्यांत पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे सेंट्रल बॅंकेची पत खूप सुधारलीच शिवाय हा निर्णय व्यावसायिक दृष्ट्याही योग्य ठरला. १९३५ मध्ये मुंबईतील खात्यांची संख्या ६९००० एवढी वाढली तेव्हा तिथली लोकसंख्या होती ११.६१ लाख, म्हणजे दर १७ नागरिकांमागे एकाचं खातं सेंट्रल बॅंकेत होतं. लोकांमध्ये बॅंकिगच्या सवयीचा प्रसार व्हावा अशी सोराबजींना मुख्यत्वेकरून कळकळ होती, त्यातूनच बॅंकेचा बराच लाभ होत होता.- सट्टेबाजी अथवा धोकादायक गुंतवणुकीतून नव्हे. जुलै, १९२४ मध्ये सोाराबजींनी नोंदवून ठेवलं आहे,’’ सेंट्रल बॅंकेचा विश्वास सलोख्याच्या परंतु ठाम धोरणावर होता, आमचं धोरण वृत्तीने जुनं असलं तरी परिस्थिती जोखून केलेल्या बदलांसाठी सदैव सिद्ध होतं.’’
सोराबजींच्या दृष्टीने बॅंकेचं धोरण केवळ एकाच प्रकारचा व्यवसाय करणं असं कधीच नव्हतं. त्यांचा मुख्य हेतू होता सर्व प्रकारचे व्यवसायांना आणि सर्व वर्गातील उद्योजकांना स्थान देणे. फक्त समभागधारकांसाठी नफा मिळवणे एवढाच उद्देश ठेवून सर्वसामान्य जनता आणि व्यापारवृद्धी यांच्यासाठी काहीच केलं नाही तर आपल्या अस्तित्वास अर्थच राहाणार नाही अशीच सेंट्रल बॅंकेची भूमिका होती. अगदी सुरुवातीपासूनच ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे सेंट्रल बॅंकेचं धोरण होतं आणि राष्ट्रीय संस्था या नात्याने तिनं त्यांच्या हिताचं सजगतेनं आणि उत्साहानं रक्षण केलं. सोराबजींचा विश्वास होता की बॅकेचं पहिलं कर्तव्य समभागधारकांप्रती नसून ठेवीदारांप्रती आहे कारण बॅंक ही सार्वजनिक पैशांची विश्वस्त म्हणून काम करते. त्या पैशांचा योग्य वापर व्हावा आणि सुरक्षित गुंतवणूक व्हावी म्हणूनच ती कटीबद्ध असते.
सेंट्रल बॅंकेचं नाव कोरलेले २ ते १० किलो वजनाचे सोन्या-चांदीचे बार विकण्याची योजनाही सेंट्रल बॅंकेनेच प्रथम काढली. १९२५ साली कमी मिळकतदार लोकांच्या सोयीसाठी तिनं ५ ते १० तोळे वजनाचे सोन्याचे बारही विक्रीस आणले. त्यांच्यावरील मिंटच्या शिक्क्यांमुळे अत्यंत विशुद्धतेचं प्रमाण मिळत होतं त्यामुळे मध्यमवर्गात ते खूपच प्रसिद्ध झाले.
गृह बचत पेटी योजना (होम सेव्हिंग्ज सेफ स्किम) १९२१ साली आणली गेली. सेंट्रल बॅंकेने सुरू केलेल्या महत्वाच्या संकल्पनांपैकी ही एक होती. या योजनेखाली प्रत्येक ठेवीदाराला एक छोटीशी पेटी दिली जायची. वार्षिक ४ टक्के व्याजावर रक्कम बचत खात्यात भरण्यापूर्वी छोट्या छोट्या रकमा ठेवीदार घरच्या घरी गोळा करायचा. पेटीची चावी ठेवीदार आणि बॅंक दोघांकडे असायची. पेटी बॅंकेत आणल्यावरच उघडता येऊ शकत होती. त्या पेटीवरील शब्दांमुळे तिचा हेतूही अगदी स्पष्ट कळायचा. त्यावर लिहिलं होतं,’’ बचतीमुळे लाभ होतो.’’ त्याशिवाय १०० रूपयांवरील रक्कम खातेदार १२ महिन्यासाठी मुदत ठेवीत ठेवून त्यावर अधिक व्याजही मिळवू शकत होता. एस एस एस पासबुक आणि बचत खात्यात चेकने पैसे काढण्याची सुविधाही सेंट्रल बॅंकेनेच प्रथम देऊ केली.
सोराबजींच्या नावाखाली वृत्तपत्रात येणा-या जाहिरातीतून या योजनेचं उद्दिष्ट थोडक्यात मांडलं जात होतं. : ‘‘सर्वसामान्य जनतेला छोट्या छोट्या बचती बाजूला काढायला शिकवण्याएवढी मोठी सेवा कुठलाही बॅंकर संबंधित घटकांना आणि सर्वसामान्य जनतेला देऊ शकत नाही. पैसा नुसताच कमावून त्याचे मूल्य वाढत नाही तर त्याचा काही भाग व्यवस्थित पद्धतीने बचत करूनच वाढतं मग ती बचत कितीही लहान असो. हा हेतू साध्य करण्यासाठी खास करून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ही सवय लावली जायला हवी, त्यायोगे त्यांना आकस्मिक खर्च , घरगुती आणीबाणीचे प्रसंग यांना तोंड देणे शक्य होईल. म्हणूनच आम्ही होम सेव्हिंग्ज सेफ खाते योजना काढली आहे’’. लोकांमध्ये बचतीची सवय रूजून एकूणच बॅंकिग क्षेत्राच्या हितासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावं हा या मागील उद्देश होता. आयसीबीइसीचे अध्यक्ष सर बी. एन. मित्रा यांनी त्यावर भाष्य केलं, ‘’ केवळ श्रीमंत लोकांच्या ठेवी आकर्षित करून घेण्यावरच तुमच्या बॅंकेने समाधान मानलं नाही तर भारतातील बहुजनसमाजात बचतीच्या सवयीला उत्तेजन देऊन तु्म्ही येथील समाजाची सेवाच करत आहात. त्यामुळेच ‘लोकांची बॅंक’ ही पदवी तुम्ही सार्थ करत आहात, या पदवीवरील तुमच्या अधिकाराला कुणीही विरोध दर्शवणार नाही. ‘’
सेफ डिपॉझिट व्हॉल्ट योजनेचं उद्घाटन १९२६ साली राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते झालं. असं उद्घाटन होणारी ही पहिलीच बॅंक होती त्यामुळे आणखी एका बाबतीत तिनं पहिला नंबर पटकावला होता असं म्हणायला हरकत नाही. बॅंकेचे अध्यक्ष सर फिरोझ सेठना यांनी लंडन आणि अन्य ठिकाणच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट योजनेची पहाणी केली तेव्हा त्यांना शोध लागला की हे व्हॉल्ट्स इंग्लंडपेक्षा युरोपातल्या देशांतच अधिक लोकप्रिय आहेत. या बाबतीत फ्रेंचांनी खूपच दांडगा अनुभव मिळवला आहे. मग हे व्हॉल्ट्स त्यांनी फ्रान्समधील जगप्रसिद्ध अशा मे. फिशेट यांच्याकडून मागवले. खरं तर, आपल्या सगळ्या गोष्टी स्वदेशी ठेवायच्या या बाण्याला जागून सेंट्रल बॅंकेच्या स्थापनेपासूनच त्यांच्या सगळ्या तिजो-या गोदरेज यांचेकडूनच घेतल्या जात होत्या. त्या खरोखरच परदेशी तिजो-यांच्या तोडीस तोड होत्या. परंतु सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स बनवण्याच्या क्षेत्रातील कौशल्य गोदरेज अथवा अन्य भारतीय उत्पादकांकडे नाही हे जाणवल्यामुळे तसंच ग्राहकांना सर्वोत्तम तेच मिळालं पाहिजे या उद्देशाने या तिजो-या फ्रान्समधून आयात करण्यात आल्या. अशा प्रकारचे व्हॉल्ट्स भारतात केवळ पहिलेच होते असं नव्हतं तर ते अग्नीप्रतिबंधक आणि चौर्यप्रतिबंधकही होते. त्यामुळे ठेवीदारांना जास्तीत जास्त सुरक्षा मिळत होती. तसंच ठेवीदारांना बॅंकेनं अशीही खात्री दिली होती की बॅंकेसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार कसेही असले तरी लॉकर्समधील वस्तूंवर बॅंकेचा कुठलाही दावा नसेल.
१९२४ साली बॅंकेने स्त्री-ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्त्री-सहाय्यक नेमल्या, त्यासाठी खास विभागही निर्माण केला. तेव्हाही ही कृती करणारी सेंट्रल बॅंक ही पहिली बॅंक ठरली. स्त्रियांनी बॅंकिंग सेवेचा लाभ घ्यावा म्हणून तसंच दागिने किंवा अन्य निष्क्रिय मालमत्तेच्या स्वरूपात पडून राहिलेल्या स्त्रोतांना आकर्षित करावं म्हणूनही ही कृती बॅंकेनं केली होती. हा विभाग स्थापन झाल्यावर थोड्याच काळात तो महिन्याला १००० ग्राहकांना सेवा देऊ लागला. स्त्रीविभागात सर्वप्रथम काम करायला आलेली महिला होती यास्मीन सर्व्हेयर- ती भारतातील पहिली वाणिज्य पदवीधर असून तिनं मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजातून १९२५ साली बी.कॉम पदवी मिळवली होती.
पुढील काळात बचत खाते ग्राहकाला सगळ्या बॅंका चेकबुक देऊ लागल्या परंतु ही प्रथा सर्वप्रथम सेंट्रल बॅंकेनंच सुरू केली होती. त्याशिवाय आजच्या घडीला रुपी ट्रेव्हलर चेक्स सर्वांनाच माहिती असले तरी हा शोधसुद्धा सेंट्रल बॅंकेने केलेल्या नव्या विचारातून निर्माण झाला आहे. त्याशिवाय ग्राहकांच्या इस्टेटींचं व्यवस्थापन पाहण्याचं काम बॅंकेने सुरू करून एका नव्या क्षेत्रातच पाऊल टाकलं. त्यासाठी बॅंकेने ‘ कार्यवाहक आणि विश्वस्त (एक्झिक्युटर ऍण्ड ट्रस्टी) या नावाने विभागच सुरू केला. हा विभाग १९२९ साली स्थापन झाला . इंग्लंडमधील विश्वस्त कंपन्याच्या धर्तीवर तो चालवला जात होता. सुरू झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यांतच या विभागाकडे ६० पेक्षा अधिक इस्टेटींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. त्या सर्व इस्टेटींची एकत्रित किंमत ६० लाखांपेक्षा अधिक होती. बॅंकेवर ठेवलेल्या विश्वासाचं जणू ते प्रतीकच होतं.
सेंट्रल बॅंक जो मूलभूत विचार करायची त्या विचारांना आलेलं आणखी एक फळ म्हणजे त्यांनी काढलेली ‘सेंट्रल फिक्स्ड एण्ड फ्लेक्झिबल ट्रस्ट कंपनी’ ही बॅंकेशी सहयोगी ट्रस्ट कंपनी. या कंपनीला आपण युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची पूर्वज म्हणू शकतो. १९३२ साली द डिपॉझिटर्स बेनिफिट इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सेंट्रल बॅंकेच्या एका सहयोगी कंपनीने विम्याची नवीन योजना काढली. त्या योजनेमागे दोन उद्दिष्टं होती- एक म्हणजे बचतीच्या सवयीस प्रोत्साहन आणि दुसरं म्हणजे मृत व्यक्तींवरील अवलंबित व्यक्तींच्या हिताचं रक्षण. त्यामागची अट एकच होती- ती म्हणजे विमादाराने आपल्या बचत खात्यात दर दिवशी सरासरी १० रूपयांची बाकी ठेवलीच पाहिजे. अगदी अल्पावधीतच सर्व मिळून ४० लाख रूपयांच्या एकुण ५000 पॉलिसी लोकांनी काढल्या. साधारण याच सुमारास बॅंकेने पंजाबात ब-याच ‘बाजार भोगवटा कचे-या‘ (मंडी पे ऑफिसेस’ )स्थापन केल्या त्यातूनच सेंट्रल बॅंकेच्या धोरणात ग्रामीण आणि कृषिक्षेत्रास मदत करणे या मुद्द्याचा समावेश झाला. ही मंडी ऑफिसं खेड्यांमध्ये म्हणजे जिथं शेतकरी त्यांनी पिकवलेलं धान्य साठवू शकत होते , किंमती स्थिर होईपर्यंत कर्जाचा लाभ घेऊ शकत होते अशा ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बॅंक (रिजनल रुरल बॅंक) ही संकल्पना उदयास येण्याच्या ब-याच अगोदर सोराबजींनी जिल्हास्तरावर जॉइंट स्टॉक बॅंक स्थापन केल्यास काय होईल त्याचा विचार केला होता आणि त्या विषयावर आपल्या संचालक मंडळाला एक अहवालही सादर केला होता.
बॅंकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि मोकळेपणा हेच सोराबजींचं धोरण होतं. या दोन गोष्टी नसल्यामुळेच भूतकाळात कित्येक संस्थांच्या आणि सामान्य जनतेच्या वाट्याला दुःख आलं होतं. त्यामुळेच या धोरणास अनुसरून सोराबजींनी दर पंधरवड्याला आपलं निवेदन प्रसिद्ध करायला सुरुवात केली. निवेदनांच्या माध्यमातून बॅंकेचे सर्व कामकाज व्यवस्थित चालू आहे हे ग्राहकांपर्यंत पोचावं हा त्यांचा हेतू होता. बॅंकेची मालमत्ता ( ऍसेट) आणि बॅंकेवरील बोजा (लायेबिलिटी) यांची नियमित मांहिती देण्याची प्रथा अन्य बॅंकांनीही आचरणात आणली आणि थोड्याच काळात ती बॅंकिंग क्षेत्रातील परंपरा बनून गेली. १९२१ सालापासून बॅंकेने मुदत ठेवीवर आणि चालू ठेवींवर आपण एकूण व्याज किती दिलं हे वेगवेगळ्या शीर्षकांखाली देण्याची माहितीपूर्ण आणि मौल्यवान प्रथाही सुरू केली.
सोराबजींनी ब-याच नवनव्या संकल्पना काढल्या, त्यात वैविध्यही खूप होतं. (खरं सांगायचं तर बहुतेक वेळेस ते नवनव्या वाटा धुंडाळत गेले ) परंतु त्यांना आपल्या कर्मचा-यांची चिंता होती त्यामुळेच ते व्यवस्थापक म्हणून वेगळे ठरले. सोराबजी सदैव ध्येयपूर्तीच्या विचारांनी झपाटलेले असले तरी त्या ध्येयाच्या संकल्पनेत केवळ स्वतःच्या संस्थेचं यश एवढीच गोष्ट नव्हती तर त्यांना एकूणच बॅंकिंग क्षेत्राची काळजी होती. ते म्हणाले होते की,’’ सेंट्रल बॅंक ही केवळ नफा मिळवणारं दुकान नाहीये, तर ती ध्येयमार्गे चालणारी संस्था आहे. त्या ध्येयाचा भाग म्हणूनच तिला देशाच्या आर्थिक विकासासाठी ख-याखु-या बॅंकर्सची फौजच्या फौजच प्रशिक्षित करायची आहे.
सोराबजींच्या प्रशिक्षणाची पद्धतही विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या जुनाट , वडिलकीचे अधिकार गाजवणा-या प्रशिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी होती. व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्ग यांच्यात जेवढी ओळख, जेवढा संवाद निर्माण होईल तेवढा त्यांना हवा होता आणि त्यांनी ते साध्यही केलं. त्यांच्या लक्षात आलं होतं की केवळ पाट्या टाकणारे कर्मचारी नकोत तर संस्थेची मूल्ये, संकल्पना आणि कार्यसंस्कृती यावर विश्वास ठेवणारे आणि त्यात सहभागी होणारे कर्मचारी हवेत. हा हेतू साध्य करण्यासाठी ते चर्चासत्रे आयोजित करू लागले, त्यांनी ग्रंथालये उघडली तसंच दरमहा एक मासिकही (सेंट्रलाईट नावाचे) प्रसिद्ध होऊ लागले. तरुण भारतीय बॅंक कर्मचा-यांसाठी परदेशी प्रशिक्षणाची व्यवस्था करणारी ती पहिलीच बॅंक ठरली. १९२३ सालापासून सेंट्रल बॅंकेने कर्मचा-यांसाठी नियमितपणे प्रशिक्षण सत्रे सुरू केली. हे प्रशिक्षण सहसा बॅंकेचे कामकाजाचे तास संपल्यानंतर रात्री ८ ते ९ या काळात दिले जात असे. सर्व कर्मचा-यांनी त्यात सहभाग घ्यावा म्हणून त्यांना उत्तेजनही दिलं जात असे. अभ्यासाची पुस्तकं फुकटच दिली जात आणि लंडनमधील इन्स्टिट्युट ऑफ बॅंकर्सच्या परीक्षा देण्यासाठी कर्मचा-यांना प्रोत्साहित केलं जाई. बॅंकिंग आणि वित्तपुरवठा क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दरमहा चर्चासत्रे आयोजित केली जात. त्याशिवाय सेंट्रल बॅंक दुस-या देशांतील तरुण बॅंकर्सनाही प्रशिक्षण देत असे. ते प्रशिक्षण मिळणारा पहिला गट होता स्टेट बॅंक ऑफ सिलोन. रॉयल बॅंकिंग कमिशन ऑफ सिलोन या आयोगाचे सोराबजी अध्यक्ष होते. ही बॅंक त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावरच स्थापन झाली होती. सध्या हे प्रशिक्षणाचे कार्य बॅंकेच्या मुख्य प्रशिक्षण महाविद्यालयात केलं जात आहे. महाविद्यालयाचं नावही बॅंकेचे संस्थापक ‘सोराबजी पोचखानावाला बॅंकर्स ट्रेनिंग कॉलेज’ असं अगदी सार्थ देण्यात आलं आहे. तेथील आणि देशभरातील अन्य ११ ठिकाणच्या केंद्रांवर हे प्रशिक्षण सध्या दिलं जातं.
बॅंकिंग व्यवसाय स्वीकारणा-या नव्या तरुणांकडून असलेल्या सोराबजींच्या अपेक्षा त्यांनी एका निवेदनात लिहून ठेवल्या आहेत. त्यात त्यांनी काही वैयक्तिक गुणांची यादी दिली आहे त्या गुणांचं महत्व अन्य सगळ्या गोष्टींच्याही वर आहे असं ते मानत होते. : लोकांना आवडेल असं स्वतःला सादर करणं, लोकांची सोय पाहण्याची वृत्ती ठेवणं, मानसिक सजगता, नीटनेटकेपणा, वागण्यातील कौशल्य, निर्धार, स्वतंत्र निर्णय घेण्याची बुद्धी आणि चारित्र्य हे ते गुण होते. एका भाषणात त्यांनी आपल्या कर्मचा-यांना बजावून सांगितलं की तुम्ही ग्राहकांचा विचार प्रामुख्याने करायला हवा तसंच त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्णतया गोपनीय ठेवायला हवेत.
ग्राहकहितास अग्रक्रम देऊन सोराबजींनी पुढील विचार मांडले आहेत; “असंतुष्ट ग्राहकाचं रूपांतर संतुष्ट ग्राहकात करण्याचे प्रयत्न कधीही सोडता कामा नयेत.सौजन्याने वागणे आणि बॅंकेतील सर्व घटकांना शक्य ती सगळी मदत करणे हे प्रत्येक कर्मचा-याचे कर्तव्य आहे. मी नेहमीच माझ्या अधिका-यांना आणि अन्य कर्मचा-यांना सांगत असतो की बॅंकेची सुरक्षितता आणि प्रगती यांच्याशी सुसंगत असलेली सर्व मदत त्यांनी ग्राहकांना केली पाहिजे. तसेच त्यांचे आर्थिक व्यवहारही पूर्णतया गोपनीय ठेवले पाहिजेत.’’
सोराबजींचा दृष्टिकोन व्यवहारी होता. फार अवडंबर न माजवता काम करायला त्यांना आवडत होतं. जेव्हा १९१६ साली बॅंकेची कलकत्ता शाखा उघडली तेव्हा मुख्य रोखपाल आणि त्याचे कर्मचारी तिथं आलेच नाहीत. तेव्हा सोराबजींनी जराही न चिडता बहुतेक सगळं काम आपल्या शिरावर घेतलं आणि उद्घाटन होण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
आणखी एक प्रसंग तर आता सेंट्रल बॅंकेच्या जुन्या किश्शांत अजरामर झाला आहे. त्या प्रसंगात असं घडलं होतं की सोराबजी बॅंकेच्या मार्गिकेतून चालत होते तेव्हा एक कारकून एका शिपायाला खतावणी आणून दिली नाही म्हणून रागे भरत होता. असं म्हणतात की तेव्हा सोराबजी स्वतःच त्या कपाटापाशी गेले आणि त्यांनी ती खतावणी काढून त्या कारकुनाच्या टेबलावर नेऊन ठेवली. त्यामुळे त्या कारकुनाला आश्चर्य तर वाटलंच पण लाजल्यासारखंही झालं. परंतु आपल्या कर्मचा-यांशी वागताना सोराबजींनी माणुसकीचा स्पर्श कधीही सोडला नाही. एखाद्या जुन्या, विश्वासू कर्मचा-याला चोरीच्या आरोपामुळे काढून टाकावं लागलं तर ते त्याच्या मेव्हण्याला किंवा तत्सम नातेवाईकाला करण्याजोगं काम शोधून देत असत. प्रत्येक पातळीवरील कर्मचा-यांकडून सोराबजींना निष्ठेचा लाभ झाला कारण ते त्यांच्याशी प्रेमाने, गोडीगुलाबीने वागत असत. अकार्यक्षमतेची किंवा निष्काळजीपणाची हद्दच गाठली गेली तरी ते वाजवीपेक्षा कधीच कठोर होत नसत. मदतीला सदैव तत्पर असत. ज्यांना गरज असे त्यांना संस्थात्मक आणि वैयक्तिक अश्या पातळीवर मदत सहज मिळत असे.
जानेवारी, १९७३ मध्ये कलकत्ता मुख्य शाखेची जुना वारसा म्हणून जपलेली लोखंड-पोलादाची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग विझल्यानंतर त्या इमारतीचं सर्वेक्षण करण्यात आलं तेव्हा समजलं की फक्त दोनच वस्तू आगीच्या वणव्यातून वाचलेल्या आहेत. त्यातली एक होतं गांधीजींचं चित्र तर दुसरा होता सोराबजींचा संगमरवरी अर्धपुतळा. एन. एम. मिस्त्री आठवण सांगतात की त्या आगीत बहुतेक सर्व जुनी कागदपत्रं नष्ट झाली असली तरी बॅंकेने जाहीर केलं होतं की जो कुणी माणूस वेगळा अर्ज भरून सोबत पासबुक जोडेल त्याला १000 रूपये ताबडतोब दिले जातील. तेव्हा अशी अपेक्षा होती की हजारो ग्राहक पुढे येतील परंतु प्रत्यक्षात फक्त ३00 च ग्राहक आले. त्यांचा बॅंकेवर विश्वास होता त्याचंच ते निदर्शक म्हणावं लागेल.
परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय बॅंकिंग योग्य मार्गाने विकसित व्हावं अशीच सोराबजींची इच्छा होती. कारण तसं झालं असतं तर देशाला भक्कम पायावरची स्वतःची अशी बॅंकिंग यंत्रणा मिळाली असती. त्यामुळेच सुरुवातीची धडपडीची वर्षं संपल्यावर त्यांच्या मनात केवळ स्वतःच्या बॅंकेचं कसं होईल एवढीच चिंता नव्हती तर ते एकूणच बॅंकिंग व्यवस्थेचा विचार करत होते.