४.१ नवनवे शोध आणि संकल्पना

ज्या काळात सोराबजींनी सेंट्रल बॅंकेची स्थापना केली त्याच काळात बाकीच्या बॅंका फक्त रूढ व्यवसाय आणि नफा यांच्या मळलेल्या वाटेवरून चालण्यात संतुष्ट होत्या. त्यांचं कामकाज केवळ बॅंकिग क्षेत्राची कामे करण्यापुरतंच मर्यादित होतं.  बॅंक आपल्या आर्थिक गरजा कशा प्रकारे भागवू शकते यासंबंधीच्या लोकजागृतीत बॅंकाच महत्वाची भूमिका वठवू शकतात याची जाणच कुणाला नव्हती.  आपण अगोदरच बघितलेलं  आहे की सेंट्रल  बॅंक ज्या सामाजिक वातावरणात जन्माला आली ते वातावरण अजिबातच उत्तेजन देणारं नव्हतं. स्वदेशी बॅंकेबद्दल लोकांच्या मनातील आकसाला तिला तोंड द्यावं लागलं होतं. त्याच वेळेस जिथं आपल्याला समृद्धी मिळेल असं क्षेत्रही कसावं- जोपासावं लागलं होतं. स्वदेशी बॅंक देशाच्या कल्याणात कशी भर घालू शकते हे अजाण जनांना समजत नव्हतं. आजच्या काळात बचतीची सवय आपण गृहीतच धरतो परंतु त्या काळात तीही फारशी जाणीव लोकांना नव्हती. हे खास करून गरीबांना लागू होतं कारण त्यांच्या दृष्टीने बॅंक ही काहीतरी गूढ संस्था होती, तिचा त्यांच्या हिताशी काहीच संबंध नव्हता. अशा प्रकारे सोराबजींना बाकीच्या बॅंकांच्या द्वेषबुद्धीचं आणि सेंट्रल बॅंकेचं पतन व्हावं एवढीच  इच्छा बाळगणा-या निंदकांचं टोळकं यांना तोंड देता देता दुसरीकडे लोकांमध्ये खास करून लोकसंख्येतील गरीब वर्गामध्ये बचतीची सवय वाढवण्यासाठीही झटावं लागत होतं. नानपोरिया यांच्या निरीक्षणानुसार ‘’ या अशा निरूत्साही पार्श्वभूमीवर एखाद्या दूरदर्शी कल्पक शोधकाच्या उत्साहाने सोराबजींचा अवतार झाला आणि त्यांनी बॅंक आणि लोक यांच्यामध्ये जणू भागीदारीची भावना निर्माण केली, त्यामुळे बॅंक आणि लोक यांना एकमेकांना समजून घेण्याची अधिकाधिक वरची पातळी गाठणं शक्य झालं.’’ २५ वर्षांत सोराबजींनी केवळ एक बॅंकच स्थापन करून ती भरभक्कम पायावर उभी केली नाही तर त्याच वेळी आसपास असंही क्षेत्रही निर्माण केलं जिथं ती आपलं काम यशस्वी रीत्या करू शकेल.