३१.५ ताजा कलम
एच. टी . पारेखांनी गृहकर्जाच्या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवली असेल तर दीपक पारेख यांनी तिची अंमलबजावणी पूर्णत्वास नेली असं म्हणता येईल. त्यांनी आपल्या काकांच्या हातून अध्यक्षपद स्वीकारल्यावर एचडीएफसी केवळ वाढवलीच नाही तर शिवाय बॅंक स्थापन केली, म्युच्युअल फंड, सिक्युरिटी कंपनी, दोन विमा कंपन्या आणि भारतातील सर्वात मोठी घरबांधणी उद्योगातली खाजगी कंपनीही निर्माण केली. जसजशी वर्षे गेली तसतशी एचडीएफसी एक आर्थिक समूह (कॉंग्लोमरेट) म्हणून उदयास आली, बॅंकिंग, विमा (आयुर्विमा आणि अन्य), मालमत्ता व्यवस्थापन (ऍसेट मॅनेजमेंट), रिअल इस्टेट व्हेंचर कॅपिटल आणि हल्ली हल्ली शैक्षणिक कर्जे अशा आर्थिक क्षेत्रातील वेगवेगळ्या भागात तिची उपस्थिती जाणवू लागली. या सगळ्या वर्षांत दीपक हे केवळ एका व्यावसायिक तत्वावर चालणार्या संस्थेचे प्रमुखच उरले नाहीत तर आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठीसुद्धा त्यांना बरेचदा बोलावण्यात आलं. त्यातलं सगळ्यात हल्लीचं उदाहरण आहे सत्यम घोटाळा. त्याशिवाय बाहेरून भारतात व्यवसाय करायला येऊ इच्छिणारे बहुतेक लोक त्यांना विश्वासात घेतात. भारताला भेट देणार्या मोठमोठ्या जागतिक व्यावसायिकांना आणि अधिकार्यांना ज्या दोन तीन लोकांना नक्कीच भेटायचं असतं त्यात दीपक यांचं नाव असतंच असतं.
पारेख निवृत्त झाले त्या सुमारास भारतीय अर्थव्यवस्थेस आयात-निर्यातीच्या समतोलात (बॅलन्स ऑफ पेमेंट्समध्ये) पूर्णपणे उलटी परिस्थिती अनुभवास आली. आर्थिक सुधारणांचे सुरुवातीचे परिणाम म्हणून भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीत (पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्समध्ये) भरपूर परदेशी भांडवल आलं, ते आर्थिक क्षेत्रात तर चांगलंच जाणवलं. या वेगाने विकसित होणार्या अर्थक्षेत्रात एचडीएफसीनेही नवनव्या व्यवसायसंधी शोधून प्रतिसाद दिला. अशा प्रकारच्या पहिल्या संस्थांमधली एक होती कंट्रीवाईड कन्झ्युमर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. उपभोक्ता कर्ज (कन्झ्युमर फायनान्स) बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करणार्या या नव्या संस्थेने आपलं कामकाज फेब्रुवारी, १९९३ पासून सुरू केलं. त्याच काळात विकसनाच्या बर्याच पुढल्या टप्प्यावरील संस्था होती एचडीएफसी बॅंक लिमिटेड. आरबीआयने नरसिंहन समितीच्या शिफारशींनुसार बॅंकिंग खाजगी क्षेत्रास खुलं केल्यानंतर पहिली खाजगी क्षेत्रातली बॅंक बनण्याचा बहुमान तिलाच मिळाला.
आरबीआयने खाजगी क्षेत्रातील बॅंकांना परवानगी दिली तेव्हा परवाना मिळवणारी एचडीएफसी बॅंक हीच पहिली बॅंक होती. नव्या बॅंकांच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी आरबीआयने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष एस. एस. मराठे यांनी नंतर दीपकना सांगितलं की एचडीएफसीचा अर्ज सर्वात उत्तम होता. खरं सांगायचं तर पारेख बॅंक उघडण्यास फारसे इच्छुक नव्हते कारण आपल्याकडे ते ज्ञानकौशल्य (एक्स्पर्टाईझ) नाही अशी त्यांना चिंता वाटत होती. तेव्हा दीपक त्यांना म्हणाले की सध्या आपलं फक्त एकाच उद्योगात बस्तान बसलेलं आहे आणि तेही केवळ एकाच उत्पादनात आहे त्यामुळे अन्य स्रोतांकडूनही उत्पन्न मिळवणे आवश्यक आहे. एचडीएफसी बॅंक ऑगस्ट, १९९४ मध्ये स्थापन झाली आणि आजमितीला त्यांच्या शाखा आणि एटीएम देशभर पसरलेली आहेत. एचडीएफसीने एचडीएफसी बॅंकेसोबत खास व्यवस्था उभारली असून त्यानुसार गृहकर्जाचे अर्ज एचडीएफसी बॅंक एचडीएफसीकडे छाननीसाठी पाठवते. एचडीएफसी बॅंकेकडे आलेले गृहकर्जाचे प्रस्ताव एचडीएफसी मंजूर करते आणि विश्वासार्हता (क्रेडिट), कायदेशीर बाबी आणि तांत्रिक मूल्यमापन करून कर्ज देते. एचडीएफसी बॅंकेने आणलेल्या कर्ज-अर्जांचे पुढील सोपस्कार एचडीएफसीमध्ये होतात आणि कर्जदार आणून दिल्याबद्दल एचडीएफसी बॅंकेला फी मिळते.
काकांकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर दीपकनी पहिल्यांच अध्यक्षीय भाषणात म्हटलं की, ’’ एचडीएफसी समूहातील आर्थिक सेवा संस्थांच्या जाळ्यातून आपण जगाला एक वेगळी कार्यशैली देत आहोत त्या कार्यशैलीतून तिचा जगाबद्दलचा काळजीपूर्वक विकसित केलेला दृष्टिकोनच दिसून येतो. ‘’ दीपक यांच्या मते हा दृष्टिकोन तीन महत्वाच्या खांबांवर उभा आहे: प्रामाणिकपणा, परिणामकारकता आणि सेवा. ‘ लोकांना केंद्रस्थानी ठेवणे’ हेच त्यामागचं मुख्य धोरण होतं. आर्थिक सेवांचे विकसन करण्यामागे एचडीएफसीचा काय दृष्टिकोन आहे हेच यातून संक्षिप्तपणे दिसून येत होतं. सर्वांपर्यंत पोचलेली आणि सर्वांना समजलेली अशी सुसंबद्ध कॉर्पोरेट संस्कृती विकसित करणं हे काही खायचं काम नाही. कार्यक्षमता मिळवता येते परंतु संस्कृती रूजवावी लागते. ‘’आम्ही सेवा देतो, त्या सेवेचं स्वरूप आणि गुणवत्ता यांच्यामुळेच बाजारपेठेतील आमची प्रतिष्ठा ठरणार आहे आणि जसजशी वर्षे जातील तसतसं त्याच गोष्टी अग्रेसर असणार आहेत....सर्वच क्षेत्रांतील सेवेच्या सर्वज्ञात मापदंडांची नव्याने व्याख्या करण्याच्या प्रक्रियेत आपण सध्या आहोत आणि या नव्या, कष्टदायक मापदंडांनुसार सेवा देण्यासाठीच आम्ही यंत्रणा उभारल्या आहेत.’’
१९९५ च्या सुमारास अमेरिका, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलियासह सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांत घडून आलेल्या आर्थिक सुधारणांनंतर फक्त गृहकर्जासाठी उघडलेल्या संस्था वेगाने नाहीशा झाल्या. त्यातील बहुतेकींचे व्यापारी बॅंकांत परिवर्तन झालं. ‘म्युच्युअली ओन्ड’ म्हणजे फक्त ग्राहक आणि कंपनीचे धोरणकर्ते यांच्या मालकीच्या कंपन्यांची शतकभराची परंपरा हळूहळू मोडीत निघाली, त्या जागी जॉईंट स्टॉक मालकीच्या अधिक परिचित संस्था निर्माण झाल्या असा या परिवर्तनाचा अर्थ होता. आपल्याला माहितीच आहे की १९८१-९० च्या दशकात अमेरिकेत ‘सेव्हिग्ज ऍंड लोन’ क्षेत्रात आणीबाणी निर्माण झाली आणि ती १९२९ च्या महामंदीनतरची बॅंक क्षेत्रातली मोठी वाताहत ठरली. १९८९ सालापर्यंत अर्ध्या अधिक ‘सेव्हिंग्ज ऍंड लोन’ संस्था अपयशी ठरल्या. बुडीत गेलेल्या बॅंकांची पुन्हा जुळणी करून त्यांना नव्या सक्षम संस्थांचे रूप देण्यासाठी रिझोल्युशन ट्रस्ट कॉर्पोरेशनने भरपूर प्रयत्न करूनही शेवटी गृहकर्जाचे मुख्य स्रोत म्हणून व्यापारी बॅंकाच पुढे आल्या. म्हणजे इंग्लंडमधील बिल्डिंग सोसायट्या या ‘म्युच्युअल’ कंपन्यांच्या शेवटचा किल्ला लढवत होत्या, त्यांनाही ताब्यात घेतलं गेलं, त्यांचं विलिनीकरण झालं. एक प्रकारच्या झंझावातालाच त्यांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर पुढील काही वर्षांत त्यांचं एकत्रीकरण होऊन बॅंकांत रूपांतर झालं. अर्थसंस्थांच्या वर्गांतील फरक जसजसा नाहीसा होऊ लागला तसतसं त्या संस्थांनी पर्यायी रणनीतीच्या दृष्टीने स्वतःत परिवर्तन घडवून आणलं. त्यानंतर संस्थांची त्या त्या विशिष्ट मालमत्तेच्या श्रेणीनुसार व्याख्या करणंही बंद झालं. मात्र त्यांच्याकडून मिळणारी सेवा आधीपेक्षा अधिक सक्षम झाली हे मात्र नक्कीच.
दीपक यांच्या लक्षात आलं की अर्थक्षेत्रातील सुधारणांचा वेग येत्या वर्षांत वाढणार आहे त्यामुळे कृत्रिम भेदभावावर आधारित- ठराविक बाजारपेठेला सांभाळणार्या ठराविकच संस्था हळूहळू मोडून पडणार आहेत आणि त्या जागी अनेक उत्पादनं हाताळण्याच्या स्पर्धेत सामील होणार्या संस्था उदयास येणार आहेत. स्रोत आणण्यात आणि कर्जे देण्यातही या संस्थांची विविधता असणार आहे. कुठल्याही संस्थेचं भावी यश हे ती कुठल्या कुठल्या क्षेत्रात पोचून ग्राहकांना आकर्षित करू शकते याबद्दलच्या तिच्या विस्तारावर, क्षमतेवर, मैत्रीपूर्ण सेवेवर आणि उत्पादनांच्या स्पर्धात्मक किंमतींवर अवलंबून असणार आहे.’’
एचडीएफसीने या नव्या बाजारपेठेची तयारी करताना हे सर्व घटक स्वतःमध्ये बिंबवले होते आणि जोपासलेही होते. एचडीएफसीमध्येच त्यांनी घराच्या मालकीसंबंधीच्या अनेक सेवा विकसित केल्या- घरे घेण्यासाठी, आहेत ती घरे वाढवण्यासाठी, त्यांची दुरुस्ती-पुनर्रचना करण्यासाठी, घराची जागा शोधून ते निवडण्यात मदत करण्यासाठी तसंच घर घेण्याकरता बचतीची अनेक साधने पुरवण्यासाठी म्हणून त्यांनी बर्याच आर्थिक यंत्रणा उभारल्या. एकदा का घर घेतलं आणि ग्राहक सुरुवातीच्या सेवेने संतुष्ट असला तर ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, वाहने, विमा, बॅंकिंग सेवा अशा आणखीही गरजा निर्माण होतात. या सर्व गरजा लक्षात घेऊन एचडीएफसीने कुटुंबांसाठी म्हणून आपला उत्पादनांचा पाया तयार केला आणि एकाच छताखाली ही सर्व उत्पादने देण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी खास कर्मचारी नेमले आणि तुलनात्मक फायद्यांचा लाभ घेतला.
व्यवसाय करण्याची पद्धत वेगाने बदलू लागली होती. उद्योग नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करत होते त्या प्रक्रियेचा हा सगळा परिणाम होता. जागतिकीकरण आणि त्याचे परिणाम (तंत्रज्ञानातील क्रांतीने त्यात पूरक भूमिका वठवली) यांच्यामुळे माहिती आणि भांडवल हे सगळ्या सीमा पार करून ताबडतोब आणि शून्य खर्चात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ लागले. उद्योग अधिकाधिक ग्राहकोन्मुख होऊ लागले आणि इच्छेची ताबडतोब पूर्ती हीच प्रथा बनली. या वातावरणात ‘माहितीवर स्वामीत्व हक्क मिळवणे, मापदंड उभारून ग्राहकांना राखणे’ हे कार्य एचडीएफसीने हाती घेतले. ग्राहकही पूर्वी एखाद्या संस्थेशी एकनिष्ठ, अल्पमाहितीयुक्त असायचे. त्यांच्यातही बदल होऊन ते निवडीस प्राधान्य देणारे, किंमत आणि माहितीनुसार निर्णय बदलणारे बनू लागले. ठराविकच अटींवर सर्वांना विक्री या तत्वाऐवजी ते मागणी करू लागले की प्रत्येकाच्या गरजेनुसार कर्ज दिले पाहिजे आणि व्यवहाराला नुसतीच सुरुवात करून देण्याऐवजी ते पूर्णत्वासही नेले पाहिजे. एचडीएफसीने हे आव्हान पेललं आणि आणखीही बरीच आव्हाने पेलण्यासाठी ती सिद्ध होत आहे.