३१.४ संस्थापकांचा पदत्याग
फेब्रुवारी, १९९३ मध्ये संचालक मंडळाने पारेखांनी दिलेला अध्यक्षपदाचा आणि संचालक मंडळाचाही राजीनामा नाईलाजाने स्वीकारला. पारेख बर्याच वर्षांपासून निवृत्तीचा आग्रह धरत होते परंतु लोक त्यांचं मन वळवत होते. त्यांनी हातातली सूत्रे दीपकला दिल्यावर एचडीएफसीच्या उत्क्रांतीचे एक पर्व संपले. ते १९९३ मध्ये अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले तेव्हा केशब महिंद्रांनी अध्यक्षांच्या खुर्चीत बसायला नकार दिला कारण केशबना वाटत होतं की दीपक पारेखांनीच अध्यक्ष बनलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः उपाध्यक्ष म्हणूनच काम करणं पसंत केलं.
१९९३- ९४ हे वर्ष एचडीएफसीसाठी पूर्वी कधीही पाहिलं नव्हतं एवढं यशदायी वर्ष होतं. करपूर्व नफ्यात ७८ टक्के वाढ होऊन तो १३० कोटी रूपये झाला. समभागांचं मूल्यही ८१ रूपयांवरून ११४ रूपयांवर गेलं आणि एकूण मालमत्ता ४०६० कोटींवर गेली. एचडीएफसीने मंजूर केलेली एकूण कर्जे ५५०० कोटी रूपयांपर्यंत गेली आणि प्रत्यक्ष दिलेली कर्जे ४५०० कोटी रूपये झाली. त्या वर्षीचा लाभांशही आत्तापर्यंत कधी नव्हे एवढा म्हणजे २८ % झाला. म्हणजे पारेखांनी एका उत्तुंग डौलदार ओक वृक्षाचं बीज (अकॉर्न) लावलं होतं त्याचं समर्थ, मजबूत अशा ओकवृक्षात रूपांतर झालं होतं. एवढं यश मिळवूनही स्वतः पारेख मात्र नम्र आणि पूर्वीसारखेच मृदुभाषी राहिले होते.
एचडीएफसीच्या यशामुळे पारेखांनी टाकलेल्या त्या धाडसी पावलाकडे चटकन नजर जात नाही. प्रत्यक्षात त्यांनी दीर्घकालीन स्रोत निर्माण करणारी अशी अर्थसंस्था उभारली होती (एरवी असे स्रोत उभारणं कठीण असतं), ती घरांना थेट कर्जे देत होती (जी कुठल्याही संस्थेने यापूर्वी भरीव प्रमाणात दिलेली नव्हती.) .तसंच (कर्ज फेड न झाल्यास मॉर्गेज बंद करून घरविक्रीचा कायदेशीर दृष्ट्या वैध मार्ग तेव्हा नव्हता तरीही) ती दरमहा कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडून घेत होती. एवढं सगळं करताना ती वाणिज्यदृष्ट्या नुसतीच टिकून राहिली नव्हती तर समभागधारकांना अधिकाधिक लाभ सातत्याने वाढवून देत होती. संस्था पंचविसाव्या वर्षात शिरली तेव्हा ती गृहकर्ज उद्योगाचं नेतृत्व करत होती. तिच्या ताळेबंदाचा आकार १७८०० कोटींवर गेला होता आणि संचयी (क्युमुलेटिव्ह) कर्जे ३१०९५ कोटी रूपयांची मंजूर केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष वाटप २५९५३ कोटी रूपयांचं झालं होतं. तसंच तिने एकूण १७.६ लाख घरे विकत घेण्यास सहाय्य केलं होतं. त्यामुळे दसर्याच्या शुभदिनी तिची झालेली निर्मिती खरोखरच शुभदायिनी ठरली होती.