१. भारतातील बँकिंगचा संक्षिप्त इतिहास
साल १८६० किंवा त्याच्या जवळपासच्या वर्षी भारताच्या केवळ राजकीय क्षेत्रालाच वेगळं वळण लागलं नाही तर अर्थव्यवस्थात्मक (इकॉनॉमिक) आणि आर्थिक (फायनान्शियल) क्षेत्रालाही वेगळं वळण लागलं. अर्थव्यवस्थात्मक क्षेत्रात म्हणायचं तर १८५० च्या दशकाच्या मध्यावर रेल्वे आणि कारखाने स्वरूपातील उद्योग या देशात सर्वप्रथम अवतरले. १८६० च्या दशकाच्या सुरुवातीस जेम्स विल्सन यांनी केंद्र सरकारच्या अर्थपुरवठ्यात ब-याच नव्या सुधारणा आणल्या तसंच बॅंकिग व्यवसायात ‘मर्यादित उत्तरदायीत्व’ (लिमिटेड लायेबिलिटी) ही संकल्पना रुजवली.
१८६० मध्ये पाश्चात्य धर्तीच्या अर्थसंस्था केवळ सहा व्यापारी बॅंकांपुरत्या मर्यादित होत्या. त्यांच्यासमवेत शेकडो स्थानिक पेढ्या आणि हजारो ग्रामीण सावकारही काम करत होते. ब्रिटिशांनी ‘स्थानिक बॅंकर्स’ हे नाव सर्व त-हेच्या खाजगी बॅंका (पेढ्या), सावकार, बॅंकिंग किंवा कर्जाऊ रकमा देणा-या भागीदारी पेढ्या अशा सरसकट सर्वांना दिलं होतं. फक्त ‘ बॅंकर’ म्हणताना एक फरक केला होता तो म्हणजे हे लोक कर्ज देण्याबरोबर ठेवीही स्वीकारत होते आणि हुंडीचे व्यवहारही करत होते, तर सावकार फक्त कर्जेच देत परंतु सहसा ठेवी स्वीकारत नसत किंवा हुंडीतही व्यवहार करत नसत. स्थानिक बॅंकिग हे फक्त काही जातींपुरतंच मर्यादित होतं. त्यात मुख्यत्वेकरून वैश्य आणि जैन यांचा भरणा होता. हे लोक सर्व देशभर पसरलेले होते. मद्रास प्रांतातील शेट्टी, राजपुतान्यातील आणि मध्य प्रांतातील मारवाडी, सिंधी आणि मुंबई प्रांतातील शिकारपुरी आणि मुलतानी, गुजरातेतील बोहरा आणि पंजाबातील खत्री असे ते लोक होते.
स्थानिक बॅंकर्स एकूण तीन प्रकारचे होते- म्हणजे ज्यांचा पूर्ण व्यवसायच बॅंकिंगवर आधारित होता असे लोक, ज्यांचा मुख्य व्यवसाय व्यापाराचा होता परंतु जे जास्तीच्या रकमा बॅंकिगसाठी वापरत होते असे लोक आणि जे आपल्या कडील निधी बॅंकिग आणि व्यापार यांच्यासाठी समसमान वापरत होते असे लोक.
तथापि तत्कालीन बॅंकर्सनी कमीतकमी एक महत्वाचं आर्थिक साधन म्हणजेच ‘हुंडी’ निर्माण केलं होतं असं दिसून येतं. ही हुंडी ‘बिल ऑफ एक्स्चेंज’शी मिळतीजुळती होती. अल्पावधीसाठीच्या वित्तपुरवठ्याचे साधन म्हणून तसंच देशातल्या देशात पैसे हस्तांतरण करण्यासाठीही ही हुंडी उपयुक्त होती.
‘’या हुंड्या शतकानुशतकांपासून म्हणजे जो काळ लिखित स्वरूपात नोंदला गेला नाही त्या काळापासून एकाकडून दुस-याकडे दिल्या जात होत्या. या बॅंकर्सची आर्थिक हुशारी आणि कल्पकता यांचं हे असामान्य स्मारकच म्हणता येईल.’’ आजच्या काळातही वापरली जाणारी हुंडी म्हणजे एका माणसाने दुस-या माणसाला लिहून दिलेली बिनशर्त आज्ञा असते. त्यात नाव लिहिलेल्या माणसाला त्याने विशिष्ट रक्कम मागितल्यावर लगेच अथवा विशिष्ट काळ संपल्यावर लगेच देण्याचे वचन त्यात असते. त्याला कायदेशीर दर्जा नसला तरी तिचा वापर करून अमुकच एक विशिष्ट व्यापारी व्यवहाराचा उल्लेख न करता निधी उभारता येतो किंवा पाठवताही येतो. बिल ऑफ एक्स्चेंजमध्ये तसे करता येत नाही.
हुंड्या दोन प्रकारच्या असतात: डिमांड म्हणजे दर्शनी हुंडी आणि ठराविक अवधीच्या (युझन्स) म्हणजेच मुद्दती हुंडी. दर्शनी हुंडीचे पैसे मागताक्षणी द्यावे लागतात तर मुद्दती हुंडीचे देणे ती विशिष्ट मुदत संपली की लागू होते.. त्याशिवाय हुंडीत धनीजोग आणि सहजोग असेही प्रकार आहेत. सहजोग प्रकारची हुंडी वटवताना बॅंकरला खात्री करून घ्यावी लागते की जो पैसे घेण्याचा हक्कदार माणूस आहे तोच हुंडी सादर करत आहे. परंतु धनीजोग प्रकारच्या हुंडीबाबत मात्र त्याची पैसे देताना या जबाबदारीतून सुटका झालेली असते . आणखीही दोन प्रकारच्या हुंड्या असतात- फर्मानजोग (यात मागणी केली की ताबडतोब पैसे द्यावे लागतात) आणि जोखमी (पाठवलेल्या मालाबद्दल या हुंड्या काढल्या जातात आणि त्यात काही अटीही असतात. म्हणजे माल किंवा त्याचा काही भाग प्रवासात हरवला किंवा नाश पावला तर हुंडीकर्त्याला किंवा ज्याच्या हाती हुंडी असते त्याला नुकसान सोसावे लागेल. ) अशा हुंड्यांचे पैसे माल सुरक्षितपणे हाती आला की दिले जायचे आणि त्यांचे खरेदीदार हेच एक प्रकारच्या विमा एंजटाचे काम करायचे.
ही हुंडी पद्धत चांगली चालत होती. हुंडीची रक्कम अदा करण्यास नकार देण्याच्या घटना दुर्मीळ होत्या, तसे करणा-या व्यक्तीस सामाजिक लांच्छनास सामोरं जावं लागत होतं. दिवाळं निघणे हा सार्वजनिक कार्यक्रम होता आणि दिवे लावून तो सर्वांसमक्ष घडत असे. ही पद्धत परस्परविश्वासावर आधारित होती. असं म्हणतात की माऊंट अबूवर दिलवाड्याची मंदिरं बांधण्यासाठी जैन बांधवांनी अहमदबाद शहराचे सावकार नगरसेठ यांच्यावर १० कोटी रुपयांची हुंडी काढली होती. राज्यकर्तेही आपली कर्जे चुकती करण्यासाठी किंवा दुस-या राजाला खंडणी देण्यासाठी म्हणून आपल्या सावकारांवर हुंडी काढत असत. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कुंवर राम सिंह (जयपूरचा राजा सवाई जयसिंह प्रथम याचा मुलगा) यांच्याकडून ६६००० रुपये उसने घेतले होते आणि दक्षिणेतील आपल्या अधिका-यांनी राजा रामसिंहला ते पैसे द्यावेत म्हणून त्यांच्या नावे हुंडी लिहून दिली होती.
भारतातल्या सर्व बॅंकिंग पेढ्या मग त्या प्राचीन काळातील असोत की अर्वाचीन – त्यातल्या कुणालाही जगतसेठच्या पेढीशी तुलना होईल असं इतिहासातील स्थान पटकावता आलेलं नाही. या पेढीचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते. तिचे संस्थापक हिरानंद साहू १६५२ मध्ये जोधपूरहून पाटण्याला स्थलातंरित झाले. त्यांच्यामागे १७११ साली त्यांचा पुत्र माणिकचंद याच्या हाती पेढीची मालकी आली. त्याने फरुखशियारच्या बंडास मदत म्हणून १ कोटी रुपयांची कर्ज दिले. त्या बदल्यात त्याला नगरसेठ माणिकचंद ही पदवी मिळाली. १७१४ साली माणिकचंदच्या निधनानंतर त्याचा पुतण्या आणि दत्तकपुत्र फतेहचंद याच्या हाती पेढीचे अधिकार आले. त्यांच्या काळात तर पेढीने वैभवाचे आणि सत्तेचे नवनवे सोपानच गाठले. १७२२ साली बादशहा महमूद याने फतेहचंदला ‘जगतसेठ’ ही वंशपरंपरागत चालणारी पदवी दिली. या पेढीच्या समृद्धीचा कळस फतेहचंद यांचे दोन नातू माहताब राय आणि त्यांचा बंधू यांच्या कारकीर्दीत झाला. परंतु राजकारणी डावपेच लढवण्याची किंमत त्यांना मोजावी लागली आणि मीर कासीम यानं त्यांना फासावर लटकावलं.
वाराणसी हे ब-याच पेढ्यांचं मूळ उगमस्थान होतं. अठराव्या शतकात त्या सर्व पेढ्यांमध्ये विशेष नावलौकिक मिळवलेली पेढी होती गोपाळदास साहू आणि त्याचा मुलगा मनोहर दास साहू यांची. त्या काळच्या भारतातल्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी या पेढीने नेमलेला मध्यस्थ होता. हा गोपाळदास ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने वाराणशी परिसरातल्या शेतक-यांकडून सारा गोळा करत असे आणि त्यांचा खजिनदार म्हणूनही काम करत असे. गोपाळदासचा समकालीन सुरतेचा त्रवादी अर्जुन नाथजी हा मूळचा वाराणसीचा नागर ब्राह्मण होता. तो गुजरातेतला सर्वात श्रीमंत सावकार म्हणून गणला जायचा. भारतातील अधिकृत ‘कंपनी श्रॉफ’ हा दर्जा ईस्ट इंडिया कंपनीने त्याला दिला होता. परंतु या अर्जुन नाथजीची (१६१९- १६३४) सुरतेत भरभराट होण्यापूर्वी सुप्रसिद्ध व्यापारी आणि सावकार वीरजी व्होरा याचे नाव सुरतेचा महत्वाचा व्यापारी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारात आणि प्रवासी नोंदींत सापडतं. त्यात लिहिलं आहे की "हा वीरजी व्होरा म्हणजे ८० लाख रुपयांची संपत्ती असलेला या विशाल राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात श्रीमंत व्यापारी आहे.’’ अहमदाबाद शहरातही सेठ शांतीदास होते, त्यांचं कुटुंब नंतरच्या काळात नगरसेठ या पदवीने ओळखलं गेलं. हे पद त्यांना शहाजहान किंवा औंरगजेब यांच्यापैकी एकाने दिलं होतं.
दक्षिणेतील सावकारी क्षेत्रात स्थानिक शेट्टी लोक पुढे असले तरी तिथेही गुजराती व्यापारी आणि सावकार सक्रिय असलेले दिसून येतात. १७४० साली दक्षिणेतील सर्वात मोठी सावकारी पेढी बुकनजी काशीदास याची होती. त्याला ‘सावकारांचा सावकार’ आणि त्या प्रांताचा मुख्य सराफ असंही म्हटलं जात असे.