१२.१ भारतातील मध्यवर्ती बॅंकिंग: प्रारंभ
मध्यवर्ती बॅंकेची काही वैशिष्ट्यं असलेली एक बॅंकिंग संस्था भारतात स्थापण्याचे प्रयत्न २ शतकांपेक्षाही जुने आहेत. इतिहासात पाहिलं तर हे प्रयत्न जानेवारी, १७७३ सालापासून सुरू झालेले दिसतात. त्या वर्षी बंगालचे गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज यांनी महसूल मंडळासमोर ‘जनरल बॅंक ऑफ बंगाल ऍण्ड बहार या बॅंकेची योजना ठेवली होती. जिल्हावार गोळा केलेला महसूल ठेवण्यासाठी खजिन्याच्या जागेची सोय करणे, सगळीकडे चालेल असे नाणे निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महसुल गोळा करण्याच्या वेळी निर्माण होणारी चलन तुटवडा टंचाईची परिस्थिती दूर करणे ही तीन मुख्य कारणं बॅंक उभारण्यामागे होती. महसूल मंडळाने काही दुरुस्त्या सुचवून ही योजना मान्य केली परंतु एप्रिल, १७७३ मध्ये खाजगी बॅंक म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या पाठिंब्यावर उभारण्यात आलेली बॅंक फेब्रुवारी, १७७५ साली बंद केल्याने अल्पकालीन ठरली. त्याबद्दल एक मत असं होतं की या बॅंकेने ज्या सेवा देणं अपेक्षित होतं त्या देणं तिला आर्थिकदृष्ट्या परवडलं नाही, तर आणखी एका मतानुसार ही बॅंक बंद पडली ती आर्थिक कारणामुळे बंद पडली नव्हती. बॅंकेच्या अपमृत्यूमागची कारणं काहीही असली तरी तिनं नफा मात्र भरपूर कमावला होता आणि त्या नफ्याचा ५० टक्के हिस्सेदार ईस्ट इंडिया कंपनीचं सरकारच होतं.