संदेश
भारतीय अर्थव्यवस्थेच्या उभारणीत लक्षणीय योगदान देणार्या व्यक्तींची आत्मचरित्रे लिहिण्यास उत्तेजन देणं हे ए. डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्टचं ध्येयच आहे. ट्रस्टने अशी काही आत्मचरित्रे मागील काळात प्रसिद्धही केली आहेत आणि त्यांना प्रतिसादही उत्तम मिळालेला आहे. तथापि, ट्रस्टने बॅंकिंग या विषयाचा अधिकारवाणीने अभ्यास करणार्या ग्रंथाचं प्रकाशन आत्तापर्यंत केलं नव्हतं म्हणूनच आम्ही ठरवलं की हे पुस्तक लिहिण्यासाठी बख्तियार के. दादाभॉय यांना आमंत्रित करायचं. भारतीय बॅंकिंगला आकार देण्यात ज्या सहा महनीय व्यक्तींनी प्रवर्तकीय भूमिका बजावली त्यांच्याच्या असामान्य योगदानावर प्रस्तुत पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या सहा प्रवर्तकांच्या योगदानाचं वर्णन बॅंकिंग क्षेत्रातील पाच महान संस्थांच्या इतिहासाच्या माध्यमातून येतं. या व्यक्तींनी या संस्था उभारण्याचं स्वप्न पाहिलं, त्यांची स्थापना केली अथवा नेतृत्व केलं आणि केवळ त्यांचीच वाढ आणि विकास होण्यात मध्यवर्ती भूमिका निभावली नाही तर ते करता करता एकूणच बॅंकिंग उद्योगावरही आपला ठसा उमटवला.
या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे समोर दिसणार्या क्षितिजाच्याही पल्याड पाहाण्याची दृष्टी होती. त्यांची नजर उत्तुंगावर स्थिरावलेली होती, खूप दूरवरचं बघणारी होती. प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याचा निर्धार त्यांच्या उरात वसलेला होता. खरोखरच मागील शतकात कितीतरी आणीबाणीच्या प्रसंगी अत्यंत दुर्मीळ धाडस आणि दूरदृष्टी दाखवून त्यांनी एका हाती खिंड लढवली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सर्व माणसे प्रचंड प्रामाणिक होती, त्यांच्या तत्वांनी आणि मूल्यांनी सहयोगी व्यक्तींना प्रेरणा दिलीच परंतु भावी पिढ्यासाठीही ते दिशादर्शक असतील यात काहीच संशय नाही.
बॅंकिंगवरील पुस्तकांना बरेचदा वाचकांच्या निरूत्साहास सामोरं जावं लागतं परंतु बख्तियार हा धोका टाळण्यात यशस्वी झाले आहेत. दुसर्या एखाद्या व्यक्तीच्या हाती जो विषय अत्यंत कंटाळवाणा होऊ शकला असता अशा विषयावरही वाचकांना सतत उत्कंठा वाटत राहील असं वाचनीय लेखन त्यांनी केलंच परंतु त्याशिवाय बॅंकिंगच्या अन्य कुठल्याही इतिहासात ज्यांचा उल्लेख नाही अशा काही महत्वाच्या आणि विवादास्पद मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली आहे. चित्त खिळवून ठेवील असं लेखन, त्यासाठी दक्षतेने केलेला अभ्यास यांच्यामुळे हे पुस्तक म्हणजे भारतीय बॅंकिंग इतिहासावरील माहितीची खाणच बनलेलं आहे. समर्पक आणि रंजक किस्से म्हणजे तर दुधात पडलेली साखरच म्हणायला हवी.
हे पुस्तक जनताजनार्दनासमोर सादर करताना ट्रस्टींना अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक केवळ अभ्यासक आणि बॅंकर्स यांनाच खिळवून ठेवील असं नाही तर सर्वसामान्य वाचकासही ते वाचावेसे वाटेल असा ट्रस्टला सार्थ विश्वास वाटतो.
मिनू आर. श्रॉफ
(ए.डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त)