प्रस्तावना (मुख्य पुस्तक )
हे पुस्तक म्हणजे मागील शतकात भारतीय बॅंकिंगचा विकास कसा झाला तेच केवळ सांगणारा इतिहास नाही, तसंच या क्षेत्रावर प्रभाव पाडणा-या सहा व्यक्तिमत्वांच्या चरित्रात्मक गोषवा-याचा संग्रहही नाही. तथापि, एका अर्थी या पुस्तकात या दोन्हींचा समावेश आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या सहा प्रभावी व्यक्तिमत्वांनी बॅंकिंग क्षेत्रास स्वयंप्रकाशी ता-यासारखं योगदान दिलं. त्या योगदानाने त्या त्या वैयक्तिक संस्थांच्या सीमा ओलांडून संपूर्ण बॅंकिग व्यवसायावरच प्रभाव पाडला. अशा त्या सहा प्रवर्तक व्यक्तिमत्वांच्या योगदानाची सांगड प्रस्तुत लेखकाने बॅंकिगच्या इतिहासाशी अत्यंत कौशल्याने घातली आहे.
ए. डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्तांनी बख्तियार के. दादाभॉय यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी आमंत्रित केलं तेव्हा त्यांच्या मनात दोन उद्देश होते. त्यातला पहिला उद्देश होता भारतीय बॅंकिंगच्या मार्गक्रमणेस आकार देणा-या निर्णायक घटना आणि विशिष्ट प्रकरणे कुठली ते ओळखून त्यांची माहिती देणे तर दुसरा उद्देश होता ज्यांनी हे महत्वाचे बदल घडवून आणले त्या सहा प्रभावी व्यक्तींच्या योगदानाची लोकांना जाणीव करून देणे आणि त्यावर प्रकाशझोत टाकणे.
बख्तियार यांचे कार्य निःसंशय कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या पुस्तकाचा भर सत्यघटनांवर असल्यामुळे कदाचित ते रूक्ष आकडेवारी आणि तथ्यांची कंटाळवाणी जंत्री होण्याचा खूप मोठा धोका होता. परंतु बख्तियार यांनी ही माहिती आकर्षक तपशीलांनी आणि मनोरंजक किश्शांनी सजवली आहे, त्यासाठी खूप परिश्रम घेऊन, बरीच साधने वापरून संशोधनही केले आहे म्हणून ते निःसंशयपणे अभिनंदनास पात्र आहेत. ज्यांचं महत्व वादातीत आहे अशा पाच महत्वाच्या संस्थांवर प्रकाशझोत टाकता टाकता हे पुस्तक भारतीय बॅंकिगला आकार देणा-या काही अत्यंत महत्वाच्या घटना आणि संस्था यांच्या कहाण्याही खूपच सुंदर रंगवते. भारतीय बॅंकिगला प्रचंड योगदान देणा-या सहा नामांकित व्यक्तींचं योगदान या कहाण्यांच्या धाग्यांत नाजूकपणे विणलं गेलं आहे.
महान इतिहासकार अर्नोल्ड जे. टॉयन्बी यांनी दाखवून दिलं आहे की बदलत्या परिस्थितीमुळे प्रचंड मोठी आव्हानं उभी राहातात तेव्हा त्या प्रदेशातील रहिवाश्यांनी दिलेल्या तशाच जबरदस्त प्रतिसादांमुळेच महान संस्कृती उत्क्रांत पावतात. खूप दीर्घ काळ चाललेल्या दुष्काळामुळेच इजिप्शियन लोकांनी नाईलच्या त्रिभूज प्रदेशातील धोकादायक दलदलीत प्रवेश केला आणि त्यातील सगळे जास्तीचे पाणी काढून टाकले. त्यामुळेच अत्यंत सुपीक अशा नाईलच्या खो-यात त्यांचा प्रवेश होऊन इजिप्शियन संस्कृती उत्क्रांत झाली. आर्थिक यंत्रणा आणि आर्थिक संस्था यांचंही काही वेगळं नसतं. भारतीय बॅंकिंग व्यवस्थेची उत्क्रांती आणि त्यातील महत्वाच्या आर्थिक संस्थांची निर्मिती या घटनाही पुढ्यात येणा-या आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठीच घडून आल्या होत्या. हे प्रतिसाद देण्यात बॅंकिंग इतिहासातील काही मान्यवरांनी आघाडीची भूमिका निभावली.
सर सोराबजी पोचखानवालांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना केली तेव्हा त्यांनी केवळ एक नवीन बॅंकच सुरू केली नव्हती तर परदेशी वर्चस्वाच्या त्या काळात, प्रचंड विरोध होत असूनही त्यांनी दाखवून दिलं की भारतीय मालकीची आणि भारतीयांनीच चालवलेली बॅंक तेव्हा अस्तित्वात असलेल्या आणि परदेशी व्यवस्थापनाखाली चालणा-या अन्य बॅंकाशी यशस्वी स्पर्धा करू शकते, त्यांच्यापेक्षा अधिक काम करून दाखवू शकते. भारतीय व्यापारी बॅंकिंग व्यवस्थेची पायाभरणी करून त्यांनीच तर पुढे येणा-या अनेकांना मार्ग खुला करून दिला होता.
सर चिंतामण डी. देशमुख हे रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि सर पुरषोत्तमदास ठाकुरदास हे तिचे अत्यंत दमदार आणि दीर्घकालीन संस्थापक- संचालक या दोघांनी अत्यंत धीराने आणि अथकपणे बॅंकेची स्वायत्तता जपण्यासाठी लढा दिला. आजच्या घडीलाही या स्वायत्ततेचा उपभोग रिझर्व बॅंक घेत आहे. पहिले गव्हर्नर ऑस्बोर्न ए, स्मिथ यांच्याबद्दल लिहिताना, बख्तियार रिझर्व्ह बॅंकेच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दलही लिहितात, त्यासाठी दुसरे गव्हर्नर सर जेम्स टेलर यांची कागदपत्रे हल्लीच मुक्त करण्यात आली आहेत त्यांचा आधार त्यांनी घेतला आहे, हे या संदर्भात फारच उद्बोधक वाटतं.
ए.डी. श्रॉफ हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, त्यांनी अर्थजगतातील बरीच क्षेत्रं पादाक्रांत केली. मग ते बॅंकिंग असो किंवा विमा, वित्तपुरवठा, आर्थिक धोरण असो. बॅंकिंग क्षेत्रातील काही महत्वाच्या संस्थांच्या निर्मितीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली असली तरी त्यांचे सर्वात अविस्मरणीय योगदान आहे ते म्हणजे ब्रेटन वुड्स परिषदेत ते प्रतिनिधी म्हणून गेले होते, तेव्हाचे असं म्हणता येईल. तिथं त्यांनी भारताच्या वतीने उत्कट आवाहन केल्यामुळे जागतिक आर्थिक व्यासपीठावर भारताची आर्थिक ताकद लक्षणीय आहे हे सिद्ध झालं होतं.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे आर. के, तलवार हे महान वाणिज्यिक बॅंकर होते, त्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या नवोदित युगात कौतुकास्पद व्यावसयिक स्वायत्तता दाखवली आणि मागून येणा-या सर्व लोकांपुढे आदर्शच घालून दिला.
सरतेशेवटी अत्यंत द्रष्टे आणि संस्थांची उत्तम बांधणी करण्यात निष्णात अशा एच. टी. पारेख यांचा उल्लेख करायलाच हवा. त्यांनी ‘विकास बॅंकां’च्या कार्यक्षेत्राच्या सीमा तर वाढवल्याच शिवाय देशांतील गृहकर्जाचे जनक म्हणूनही त्यांचा यथोचित गौरव केला जातो.
या सगळ्या व्यक्तिमत्वांनी या पुस्तकाची पानं सजवली आहेत. हे सर्व जण नवनव्या गोष्टींचे शोधक होते, त्या प्रत्यक्षात आणणारे होते आणि त्यांना एकाच सूत्रात गुंफणारेही होते. या सगळ्या माणसांकडे असमान्य सचोटी, धाडस आणि दृढनिश्चय होता. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे देशहित होतं हे या पुस्तकाच्या पुढील पानांतून आपल्याला दिसेलच. त्यांनी साकारलेली भारतीय बॅंकव्यवस्था आज काळाच्या कसोटीस उतरलेली आहे. मागील दोन दशकांत कित्येक जागतिक अरिष्टे कोसळली तरीही ज्या लवचिकतेने ही व्यवस्था त्या आव्हानांना सामोरी गेली तोच तिच्या मजबुतीचा पुरावा आहे.
हे पुस्तक म्हणजे भारतीय बॅंकिग व्यवस्थेस आणि त्या व्यवस्थेत महत्वाचं स्थान भूषवणा-या सहा मान्यवरांना दिलेली मानवंदनाच आहे.
येझदी एच, मालेगाम
(विश्वस्त, ए.डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्ट, मुंबई)