अक्षरध्वनीचा प्रवास!

Akshardhwani logo

वर्ष असेल २०१४-१५. अजून मुंबईतील स्ट्रॅन्ड बुक स्टॉल बंद व्हायला काही वर्षे बाकी होती. 

मी सीए करत असताना जेव्हा इन्स्टिट्यूटच्या कुलाबा ऑफिसला जायचो तेव्हा स्ट्रॅन्ड बुक स्टॉलला एक चक्कर व्हायची. तिथली ती नवीकोरी इंग्रजी पुस्तके, भरगच्च कपाटे, कोपऱ्यात बसलेले स्पष्ट मराठी बोलणारे साधे मराठी कर्मचारी आणि एकदा भेटलेले टी एन शानभाग, यांचं माझ्या मनावर प्रचंड गारुड झालेलं होतं. श्री शानभाग गेल्यावरही  तिथून भरपूर इंग्रजी पुस्तके घेतली होती. आणि मग २०१४-१५ मध्ये एका फेरीत हाती लागलं Barons of Banking. निळसर आकाशी रंगाबरोबर सोन्याच्या नाण्यांचं चित्र होतं मुखपृष्ठावर. पुठ्ठाबांधणीचं हे पुस्तक स्ट्रॅन्डच्या पद्धतीप्रमाणे बाहेरून दिसेल असं काचेमागे लावलं होतं. बाकी काही न घेता तेव्हढं एक घेतलं आणि मुंबई डोंबिवली रेल्वे प्रवासात वाचायला सुरवात केली. तेव्हा माहितीही नव्हतं की या पुस्तकाचा मराठी अनुवाद मी संपूर्ण जगासाठी मोफत उपलब्ध करून देऊ शकेन.

पुस्तकाचा आवाका फार मोठा आहे. विषय क्लिष्ट असला तरी भाषा साधी आणि सोपी आहे. लेखक बख्तियार दादाभॉय यांची गोष्टीवेल्हाळ आणि तरीही नेमकी माहिती देणारी शैली यामुळे पुस्तक कमालीचे वाचनीय तर आहेच पण एक संदर्भग्रंथ म्हणून त्याचे मूल्य अनन्यसाधारण आहे.

पुस्तक वाचून होत असताना एकीकडे ज्ञानात भर पडत असल्याचा आनंद होत होता पण त्याचवेळी हे आपल्या मराठीत उपलब्ध नाही म्हणून मन हळहळतही होत. प्रिय मित्र विशालशी याबद्दल बोललो. त्याने 'मराठी बोला' चळवळीत सहभागी व्हायला सुचवले. चळवळ चांगली होती पण मला त्यात माझ्या कल्पनेचा सूर शोधता येईना. खरे सांगायचे तर मलाच माझी कल्पना अजून नीट कळली नव्हती. त्यामुळे मी मराठी बोला चळवळीतून बाहेर पडलो.

मग विशालबरोबर बालभारतीला जाऊन श्री किरण केंद्रेंना भेटलो. मराठीसाठी काहीतरी  करायचे आहे म्हणून त्यांना सांगितले. पाठ्यपुस्तक वाचून दाखवायचे आणि त्याच्या ऑडिओची लिंक  मुलांना पुस्तकात द्यायची अशी कल्पना होती. त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. पण नंतर त्या उपक्रमाला पुढे कसे न्यायचे त्याचा आराखडा मीच करू शकलो नाही. बॅरॉन्स माझी वाट बघत होते आणि मी इकडे तिकडे धावत होतो.

शेवटी एक दिवस कल्पना सुचली की बॅरॉन्सचाच अनुवाद करावा. विशालशी बोललो. हे एकमेव पुस्तक ठरू नये तर यासाठी संस्थात्मक कार्य करायचा प्रयत्न करावा असं ठरलं. म्हणून मग माझे फेसबुकवरील मित्र श्रीनिकेत देशपांडे, हृषीकेश कुलकर्णी, कौस्तुभ खांडेकर, देवदत्त राजाध्यक्ष, अभिजीत पळणिटकर आणि शेवटी माझ्या अर्धांगिनीशी बोललो. चॅरिटेबल कंपनी काढायचे ठरले. अक्षरध्वनी लर्निंग फाउंडेशन हे नाव मिळायलाच तीन चार महिने गेले. नंतरही कार्यालयीन कामात प्रचंड वेळ गेला. शेवटी एकदाची कंपनी स्थापन झाल्यावर फोरम फॉर फ्री एंटरप्रायझेस आणि ए. डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्टशी संपर्क साधला. त्यांनी पुस्तकावर नफा न कमविण्याच्या अटीवर भाषांतरास परवानगी दिली.

मोठ्या आनंदात फेसबुकवर भाषांतर प्रकल्पाची घोषणा केली. "आमचे प्रायोजक व्हाल का?" म्हणून प्रेमळ आवाहन केले. आणि फेसबुक मित्रांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोनशे एक्कावन्न ते साठ हजार अश्या रकमेच्या देणग्या मिळाल्या. ही माझी पुण्याई नसून पुस्तकाची आणि मराठी भाषेची पुण्याई आहे हे मला माहिती होते. त्यामुळे झटकन भाषांतरकर्ता शोधायच्या मागे लागलो.  

पण नंतर एकामागून एक अडचणी येत भाषांतराचे काम सुरूच होईना. इथे देणग्या बँक खात्यात येऊन पडलेल्या होत्या. वर्षागणिक ऑडिटचे पैसे जात होते पण भाषांतर करण्यास योग्य व्यक्ती मिळत नव्हती. पुस्तक तयार होते, पैसे तयार होते पण गाडं जे अडकलं होतं की ज्याचं नाव ते. शेवटी  फेसबुकवरच सविता दामले  यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी केलेला जेरुसलेम एक चरित्रकथा हा निवड वाचला होता. त्यांना कल्पना सांगितली आणि त्यांचा होकार आला.

पुस्तकाच्या वेगवगेळ्या प्रकरणांचा अनुवाद माझ्याकडे येऊ लागला. आता हवी होती वेबसाईट. जिच्यात या एकाच नव्हे तर आगामी सर्व पुस्तकांची सोय असणार होती. पुन्हा फेसबुकवर साद घातली. पण कुणालाच माझी कल्पना लक्षात येत नव्हती. तोपर्यंत कोविड आला. आता पुस्तकाचा अनुवाद पूर्ण होता. फेसबुकमुळे झालेली मैत्रीण क्षिप्रा टुमणे हिने विनामूल्य प्रूफ रीडिंगही करून दिले. अनुवादाचे पैसेही देऊन झाले होते पण वेबसाईट नव्हती. देणगीदारांपैकी एकानेही पुस्तकाची प्रगती कुठवर आली म्हणून विचारले नसले किंवा संस्थापक सदस्यांपैकीही कुणी मला त्याबद्दल विचारले नसले तरी माझे मन माझे मलाच खात होते.

शेवटी पुन्हा फेसबुकमुळे झालेला मित्र प्रसाद शिरगावकर पुढे आला. मला काय हवे आहे ते मी त्याला सांगू शकलो. आणि तो ह्या क्षेत्रातील इतका तज्ज्ञ आहे की माझी तोडकी मोडकी कल्पना त्याला व्यवस्थित कळली . या कामाला काही मोबदला नको. एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होण्यात आनंद आहे, मी पूर्ण मदत करतो असे त्याचे धीराचे शब्द बोलून त्याने लगेच वेबसाईटचा कच्चा आराखडा करून दिला. पण पुढे वेबसाईटवर अपलोड आणि फॉरमॅटिंगचे काम अडकले. आता मीच थकलो होतो. त्यावरही पुन्हा फेसबुकमुळे झालेली मैत्रिण शिल्पा केळकरने हात दिला. आणि शेवटी पुस्तकाची ऑनलाईन आवृत्ती पूर्णपणे तयार झाली.

आता यापुढे याच पुस्तकांच्या वाचनाचे रेकॉर्डिंग हाती घ्यायचे आहे. आणि अजून काही पुस्तके अनुवादासाठी हेरून ठेवली आहेत. ती सर्वही इथेच सर्व वाचकांसाठी मोफत असतील अशी महत्वाकांक्षा आहे. अर्थात त्यासाठी आणि वेबसाईट कायमची मोफत ठेवण्यासाठीही प्रायोजक लागतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आतपर्यंत माझ्या कूर्मगतीने का होईना पण फेसबुक मित्रांच्या साहाय्याने पहिला प्रकल्प तडीला नेतो आहे. त्यामुळे यापुढे काय काय करावे लागते त्याची कल्पना आली आहे आणि पुढील कामासाठी हुरूपही आलेला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी आणि मदतीने पूर्ण झालेला हा अनुवाद तुम्हा सर्वासाठी खुला करतो आहे.

मोफत उपलब्ध असेलल्या या अमूल्य अनुवादाबद्दल आपल्या परिचितांना जरूर सांगा. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांना तर जरूर सांगा. 'इतिहास हा केवळ राजांचा, लढायांचा आणि हार-जीतीचा नसतो तर तो संस्थांचा आणि आर्थिक घटनांचाही असतो', हे मला उमगलेले आणि या पुस्तकामुळे अधोरेखित झालेले सत्य, या अनुवादाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होतो आहे. आणि हे केवळ तुम्हा सर्वांच्या सहकार्याने होऊ शकले आहे हे कृतज्ञतापूर्वक नमूद करून मी तुमच्याकडून पुढील उपक्रमासाठी आशीर्वाद मागतो आहे.

--आनंद मोरे